१०४ या नंबरवरून आलेले कॉल उचलू नका तुमच्या बँकेतून सगळे पैसे जातील असं सांगणाऱ्या एका पोलिसांचा वीडियो वायरल झाला होता. पोलिसांसकट सगळ्यांनी त्यावर विश्वास ठेवला आणि नंतर ती मालिकेची जाहिरात होती हे कळाल्यावर आपल्याच बावळटपणावर आपण हसलो देखील. पण ही हसण्यासारखी गोष्ट नाही. फेक न्यूज हे आपल्या सगळ्यांसमोरचं मोठं आव्हान आहे.
आठवडाभरापूर्वीची गोष्ट आहे. मुंबई पोलिसांचा एक वीडियो सोशल मिडीयावर प्रचंड वायरल झाला. वीडियोत पेट्रोलिंग जीपमधे बसलेले पोलिस हवालदार माईकवर संदेश देत होते. ‘जागे व्हा आणि १४० या नंबरवरून फोन आल्यास तो उचलू नका, उचलल्यास तुमच्या बॅंक अकाऊंटवरची रक्कम झिरो होईल,’ असं आवाहन पोलिस करत होते. पोलिसांच्या ‘त्या’ वीडियोमुळे जनसामान्यांमधे एकच घबराट उडाली. फेसबूक, ट्विटर आणि व्हॉटसअप यासारख्या सोशल मिडीया प्लॅटफॉर्मवर सगळीकडे हा वीडियो वायरल झाला. शेवटी महाराष्ट्र सायबरला पुढं येत यासंदर्भात स्पष्टीकरण द्यावं लागलं.
‘+१४० या नंबर वरून येत असणारे कॉल उचलू नका, असं आवाहन करणाऱ्या पोलिस कॉन्स्टेबलचा वीडियो वायरल होतोय. त्यावर आम्ही स्पष्टीकरण देऊ इच्छितो की १४० वरून येणारे कॉल्स हे ‘टेलिमार्केटिंग’चे कॉल आहेत. या किंवा अशा कुठल्याही कॉल्सवर नागरिकांनी आपले गोपनीय वैयक्तिक डिटेल्स किंवा ओटीपी सांगू नयेत.’ असं महाराष्ट्र सायबरकडून स्पष्ट करण्यात आलं.
पण प्रकरण एवढ्यावरच थांबलं नाही. या १४० नंबरबद्दल त्याच दिवशी अगदी समांतरपणे दुसरी एक घटना घडत होती. अनोळखी नंबरवरून लोकांना फोन येत होते. फोनवर कुणीतरी तरुण भेदरलेल्या, रडवेल्या आवाजात, धापा टाकत बोलत होता. ‘मैं ऋषी बोल रहा हुँ, यहां एक मर्डर हो गया है और उसे मैंने अपने कॅमेरापर रेकॉर्ड कर लिया हैं. अब वो मुझे भी मारना चाहता हैं. ओह शीट…’ असं तो तरुण सांगत होता.
हेही वाचा : तुम्हाला कोरोना फेक न्यूज रोगाची लागण झालेली नाही ना?
कल्पना करा, कुणीतरी फोन करून हे असं काहीतरी बोलतंय, ऐकणाऱ्याची काय अवस्था झाली असेल? हे असे कॉल अनेकांना गेले. त्यातील काहींनी संबंधित व्यक्तीचा जीव वाचवण्यासाठी ट्विटरचा आधार घेतला. कॉल रेकॉर्डिंगच्या ट्विटमधे मुंबई पोलिसांना टॅग करून प्रकरणाची माहिती दिली. चौकशीअंती लक्षात आलं की हे कॉल १४० सुरवात असणाऱ्या नंबरवरून आले होते. तो टेलिमार्केटिंगचा कॉल होता. मार्केटिंग होतं ‘सोनी लिव्ह’ नावाच्या ऍपवरील वेब सिरीजचं.
एका वेबसिरीजच्या मार्केटिंगसाठी लोकांच्या भावनांशी खेळून झालं होतं. ही भीती एवढी दूरवर पोचली की कदाचित पोलिसांनी स्वतःच सावधगिरी म्हणून कुठलीही खातरजमा न करता १४० या क्रमांकावरून आलेले कॉल उचलू नका, अशा सूचना दिल्या.
फेक न्यूज आणि फेक न्यूजचं बदललेलं स्वरूप ही गोष्ट या सगळ्या प्रकरणात अगदी लख्खपणे आपल्यासमोर आली. फेक न्यूज किती सफाईदार चेहरा घेऊन आपल्यासमोर येते आणि आपण किती सहजपणे तिला बळी पडतो, हे यातून दिसलं. ‘बॅंक फ्रॉड’ विषयी दक्षता बाळगण्याचं आवाहन करणारा तो वीडियो सर्वसामान्यांमधे तर वायरल झालाच, पण ज्या मुंबई पोलिसांच्या नावाने ही फेक न्यूज पसरवण्यात आली, त्या मुंबई पोलिसांच्या व्हॉटसअॅप ग्रुपवरदेखील तो वीडियो फिरवला गेला.
‘मुंबई पोलिस’ नावाच्या यंत्रणेचा भाग असणाऱ्या काही जणांनी फेसबूक आणि ट्विटरवर देखील यासंबंधीच्या पोस्ट टाकल्या. या उदाहरणाचा उद्देश यंत्रणेशी थेट संबंध असणारे लोक या फेक न्यूजला बळी कसं पडले यासंदर्भात प्रश्न उपस्थित करायचा नाही, तर फेक न्यूज ही किती स्ट्रक्चर्ड स्वरुपात आपल्यासमोर येते आणि कुणीही तिला किती सहजपणे बळी पडू शकतो, याकडे वाचकांचं लक्ष वेधण्याचा आहे. यासंदर्भातलं अगदी कालपरवाचं उदाहरणदेखील आपल्याला लक्षात घेता येईल.
सिनेसृष्टीतील महानायक अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर पुढील उपचारांसाठी त्यांना मुंबई येथील नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर लगेच बिग बींचा नानावटी रुग्णालयातील डॉक्टरांना आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना धन्यवाद देतानाचा एक वीडियो वायरल झाला. अमिताभ यांनी नानावटीमधील डॉक्टरांचे आभार मानल्याचे दावे करण्यात आले. मुख्य प्रवाहातील अनेक माध्यमांनी या वीडियोच्या आधारे बातम्याही दिल्या.
नंतर वस्तुस्थिती समोर आली की तो वीडियो होता तीन महिन्यांपूर्वीचा, एप्रिलमधला. पण एकूणच अमिताभ यांचं कोरोनामुळे नानावटी रुग्णालयात दाखल होणं आणि त्याचवेळी त्यांचा नानावटीमधील डॉक्टरांना धन्यवाद देणारा जुना वीडियो समोर येणं, हे त्या परिस्थितीला इतकं साजेसं होतं की तुम्हाला तो वीडियो खरा वाटला नसता तरच नवल. अनेकांचं तेच झालं. मुख्य प्रवाहातील माध्यमकर्मींचंही.
हे कोरोना स्पेशलही वाचा :
लस सापडल्यावर तरी कोरोना संपेल का?
डॉक्टरांनी घातलेला सूट म्हणजे कोरोनाविरूद्धचं चिलखतच!
कोरोनाचे पेशंट या देशांत सापडले नाहीत की काही झोल आहे?
कोविड-१९ आजारावर औषध नसताना पेशन्ट बरं कसं होतात?
एकदा बरं झाल्यावरही पेशंटला का होतेय पुन्हा कोरोनाची लागण?
किराणा दुकानातून आपण कोरोनाला घरी नेण्यापासून कसं वाचू शकतो?
सांगायचा मुद्दा हाच की फेक न्यूजने आता इतकं सफाईदार स्वरूप धारण केलंय की आपल्यापैकी कुणीही फेक न्यूजच्या सावजात सापडू शकतो. फेक न्यूजचे शिकार होऊ शकतो. अगदी कुणीही. वय, शिक्षण, ग्रामीण की शहरी अशा कुठल्याही भेदाविरहित कुणालाही फेक न्यूजची लागण होऊ शकते. आणि म्हणूनच ‘तिथे एक नव्हे, दोन गिधाडे होती’ म्हणत सुदानच्या मुलाचा फोटो काढणाऱ्या पुलित्झर पारितोषिक विजेत्या फोटोग्राफरला ‘गिधाड’ म्हणणारी फेक स्टोरी व्हॉट्सऍपवर वायरल होऊन थांबत नाही; तर केंद्र सरकारची बाजू मांडताना सॉलिसिटर जनरल तुषार मेहता चक्क सुप्रीम कोर्टात त्या ‘फेक’ गोष्टीचा दाखला देतात. तेव्हा फेक न्यूजचा हा राक्षस कुठपर्यंत पोचलाय याचा आपण अंदाज बांधू शकतो.
सोशल मीडियावर दररोजच कित्येक फेक न्यूज पसरवल्या जातात. काही जाणीवपूर्वक तर काही अनावधानाने. आपण अनावधानाने या फेक गोष्टी पसरवत असलो तरी ती गोष्ट कुणीतरी जाणीवपूर्वक तयार केलेली असते. जाणीवपूर्वक पसरवण्यात आलेल्या फेक न्यूजची निर्मिती एका विशिष्ट वर्गाला आणि एक विशिष्ट हेतू समोर ठेऊन केलेली असते. शिवाय ती पसरवण्यासाठी एक मोठी यंत्रणा काम करते.हे प्रामुख्याने राजकीय बातम्या, राजकीय नेत्यांसंबंधीचे फेक दावे यांच्या संदर्भात होतं.
आपल्या विरोधकाची जनमानसातली प्रतिमा खराब करण्यासाठी राजकारण्यांकडून फेक न्यूजचा एखाद्या अस्त्रासारखा वापर होणं आता सामान्य व्हायला लागलंय. यात कुठलाही पक्षीय भेदाभेद नाही. सर्वपक्षीय राजकीय नेते आपल्या विरोधकाच्या बाततीत सर्रासपणे हे हातखंडे वापरताना बघायला मिळतात.
समाजात धार्मिक तेढ निर्माण करण्यासाठी, एखाद्या विशिष्ट धार्मिक समुदायाबद्दल अफवा आणि गैरसमजुती पसरवण्यासाठीही फेक न्यूजचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. भारतात कोरोना प्रसाराच्या सुरवातीच्या काळात आपण हे मोठ्या प्रमाणात अनुभवलंय. एका विशिष्ट धार्मिक समुदायाला कोरोनाच्या प्रसारासाठी जबाबदार ठरवण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यासाठी वेगवेगळ्या फेक बातम्या आणि फेक दावे सोशल मीडिया आणि मुख्य प्रवाहातल्या माध्यमांनीही पसरवले. नंतरच्या काळात यातल्या अर्ध्या-अधिक बातम्या फेक असल्याचं सिद्धदेखील झालं. पण हे ‘सत्य’ किती लोकांपर्यंत पोचलं हा प्रश्न उरतोच.
फेक न्यूज हे सध्या माध्यम जगतासमोरचं आणि एकूणच समाज म्हणून आपल्या सर्वांसमोरचं मोठं आव्हान बनलंय. प्रत्येकाच्या हातातला स्मार्टफोन आणि स्वस्तातल्या इंटरनेटने तर फेक न्यूजच्या प्रसारास मोठाच हातभार लागलाय. ‘इंडिया स्पेंड’च्या आकडेवारीनुसार २०१४ ते २०१८ या काळात पसरलेल्या वेगवेगळ्या अफवांमुळे मॉब लिंचिंगच्या ४० घटना घडल्या. त्यात ४५ जणांचा जीव गेला. हे कुठेतरी थांबणं आवश्यक आहे. त्यासाठी सामुहिक प्रयत्नांची आवश्यकता आहे.
हेही वाचा : बाबासाहेबांनी कधी न दिलेली फेक मुलाखत छापून येते तेव्हा,
वायरल मेसेज, वीडियोजला मरण नसतं. ते वर्षानुवर्षे पसरत राहतात. अगदी २०१२-१३ च्या घटनांचे फोटोज, वीडियोज, मेसेजेस ताजे म्हणून फिरत असतात. लोक त्यावर विश्वासही ठेवतात. त्यामुळे ते खोटे आहेत, हे जिथल्या तिथेच सप्रमाण सांगणं, पुराव्याच्या आधारे खोटे दावे खोडून काढणं गरजेचंच. म्हणूनच जगभरात फेक न्यूज विरोधात मोहीम छेडण्यात आलीय.
फेक न्यूजच्या पडताळणीचं काम करणाऱ्या अनेक वेबसाईटस जागतिक स्तरावर अतिशय महत्वाचं काम करताहेत. भारतात देखील इंग्रजी आणि हिंदी भाषेत फॅक्ट चेकचं काम मोठ्या प्रमाणात सुरु आहे. हेच काम आता मराठीमधेही ‘चेकपोस्ट मराठी’ या वेबपोर्टलच्या माध्यमातून हाती घेण्यात आलंय. checkpostmarathi.com च्या रुपात मराठी माध्यमविश्वात फेक न्यूज विरोधातला प्रयोग आकार येतोय.
फेक न्यूज एखाद्या विषारी गॅससारखी असते, कुठूनतरी लीक होते किंवा लीक केली जाते. वाहत्या वाऱ्यात बेमालूमपणे सामील होते, तळागाळात पोचते. कधी ती आपल्याला तात्पुरती बेशुद्ध करते, कधी कायमची विकलांग करते तर कधी कुणाचा जीवसुद्धा घेते. फेक न्यूजची ही धुंदीच अशी असते की जिच्या आधारे लोक नको, नको ती पावलं उचलायला तयार होतात. नाहीतर एव्हाना साधी-भोळी आणि निरागस वाटणारी माणसं कुणाचा जीव घ्यायला धजावायची नाहीतच! त्यामुळे फेक न्यूजचा वेळीच बंदोबस्त करणं ही काळाची गरज बनलीय. आपलं माणूसपण आणि आपलं भारतीयत्व टिकवण्यासाठी सुद्धा.
हेही वाचा :
मोदी सरकारने एलआयसी विकल्यावर आपल्या पॉलिसींचं काय होणार?
डब्ल्यूएचओनं आधीचं कोरोनाचा इशारा दिला, तरीही ब्लेमगेम का सुरूय?
कोरोनाच्या धक्क्यानं पडलेल्या शेअर मार्केटमधे गुंतवणुकीची हीच ती वेळ?
विटॅमिन डीच्या कमतरतेमधे दडलंय देशांच्या वेगवेगळ्या मृत्यूदराचं गुपित?
भारतामुळेच जगात मंदी, असं आयएमएफच्या गीता गोपीनाथ का म्हणाल्या?
जगाचा बिझनेस कोमात, डीमार्ट जोमात, F.Y.B.Com ड्रॉपआऊट काकांची सक्सेस स्टोरी
(लेखक चेकपोस्ट मराठी डॉट कॉम या वेबसाईटचे संस्थापक आहेत.)