मुली रात्री मोकळेपणाने फिरू शकतील तीच खरी नवरात्र!

१७ ऑक्टोबर २०२०

वाचन वेळ : ४ मिनिटं


स्त्री शक्तीचा उत्सव म्हणून आपण नवरात्रीकडे पाहतो. पण पावलोपावली त्रास सहन करणाऱ्या स्त्रिया आपल्या आसपास असताना नवरात्र नेमकी कशी साजरी करायची ते ठरवायला हवं. स्त्रीची पुजा करायची की या जगात तिला आनंदाने राहता यावं यासाठी प्रयत्न करायचेत याचा विचार करायला हवा. 'बलात्कार झालाच नाही' असं म्हणून हाथरसमधल्या प्रकरणावर गपचूप बसणारे आपण नेमक्या कोणत्या तोंडाने देवीसमोर हात जोडणार आहोत?

कोरोना नसता तर आत्तापर्यंत नऊ दिवस जागर स्त्री शक्तीचा साजरा करणारे भलेमोठे फ्लेक्स रस्त्यावर दिसू लागले असते. ऑफिसला, नोकरीवर जाणाऱ्या बायकांना नऊ दिवस नऊ वेगवेगळ्या रंगाच्या साड्या घालून मिरवता आलं असतं. अनेक मंडळांना खऱ्या दुर्गा म्हणून इंदिरा गांधी, सावित्रीबाई फुले, जिजामाता, झाशीची राणी वगैरे महान स्त्रियांची आठवण काढता आली असती. त्यांच्यावर व्याख्यानं वगैरे ठेवता आली असती.

पण झगमगाटात लपून गेलेल्या तुमच्या माझ्या रोजच्या आयुष्यातल्या बाईचं काय करायचं? नवरात्र चालू असताना मासिक पाळी आली म्हणून देवीच्या दर्शनाला जाऊ शकत नाही असं हिरमसून सांगणाऱ्या तरूण मुलींचं काय करायचं? महान स्त्रीवरचं व्याख्यान ऐकणाऱ्या अगदी छोट्या मुलीच्या मनात आलेल्या आपल्यालाही शाळा शिकता आली असती तर किती बरं झालं असतं या भावनेचं नेमकं काय करायचं? नवरात्रीच्या नऊ दिवसांपैकीच एखाद्या रंगाची अंगभर साडी घालून लोकलमधून वगैरे जाताना पुरूष अंगचंटीला येतो म्हणून वैतागलेल्या बाईचं काय करायचं?

अशा अनेक स्त्रिया आपल्या आसपास असताना नवरात्र साजरा करण्याचा नेमका मार्ग कोणता याचे प्राधान्यक्रम आता आपण लावून घ्यायला हवेत. स्त्रीची पुजा करायची की या जगात तिला आनंदाने राहता यावं यासाठी प्रयत्न करायचेत याचा परत परत विचार करायला हवा. बलात्कार झालाच नाही असं म्हणून हाथरसमधल्या प्रकरणावर गपचूप बसणारे आपण नेमक्या कोणत्या तोंडाने देवीसमोर हात जोडणार आहोत हे तरी निदान ठरवून घ्यायला हवं.

हेही वाचा : घटस्थापना : भारतातल्या कृषीप्रधान संस्कृतीचं दर्शन घडवणारा सण

समाजाचं चित्रं बदलायला हवं

काल घटस्थापना होती. आपलं सृजन साजरं करण्यासाठी शेतीचा शोध लावलेल्या बाईनेच चालू केलेला हा सण. मातीच्या पोटातून बीज अंकूरतं तसंच आपल्या गर्भाशयात हा नवा जीव अंकूरतो, तिथूनच उगवतो हे स्त्रीला कळालं. आपलं गर्भाशय हे या सृजनशील पृथ्वीचं छोटं रूप आहे, हेही तिला उमगलं. त्याचाच उत्सव आजवर ती घटाच्या रुपात मांडत गेली. आज या घटांना देवीची उपमा दिली जाते. नवरात्रीच्या तीन दिवसांत आपण दुर्गा, सरस्वती आणि लक्ष्मीची उपासना करतो. नवरात्र म्हणजे स्त्रीच्या शक्तीचा, बुद्धीचा आणि धनाचा उत्सव असंही म्हणतो.

पण प्रत्यक्ष आयुष्यात मात्र ही देवी अजिबात सुरक्षित राहत नाही. तिला साधी सन्मानाची वागणूकही मिळत नाही. स्त्रीभ्रूणहत्येच्या आरोपाखाली सुदाम मुंडे दुसऱ्यांदा अटक होतात. त्यांच्याकडे जाऊन पोटातल्या मुलीची हत्या करणाऱ्यांना ती लक्ष्मीचं रूप वाटत नाही.  लॉकडाऊनमधे ग्रामीण भागात बालविवाहाचं प्रमाण वाढलंय अशी बातमी काल परवाच पेपरमधे छापून आली होती. मुलींचं शिक्षणाचं वय असताना त्यांचं लग्न करून दिलं जातं तेव्हा त्या सरस्वती आहेत याची आठवण आपल्याला होत नाही.

तर हाथरसमधल्या मनीषावर बलात्कार झाल्यावर मुलीं स्वतःची सुरक्षा करण्यासाठी बाहेर जाण्यासाठी असक्षम असतात असं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणतात तेव्हाही ती दुर्गेचा अवतार आहे हे त्यांच्या मनात येत नाही. त्यामुळेच हे चित्रं बदलत नाही तेव्हा स्त्री शक्तीचा जागर झाला असं म्हणता येणार नाही.

हेही वाचा : जागतिक कन्या दिनः स्त्री सन्मानासाठी दाढीमिशा लावून काम करणाऱ्या शास्त्रज्ञ

नऊ प्रश्नांची उत्तरं

स्त्री शक्तीचा जागर करायचा असेल तर भारतातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यातल्या स्त्रीला तिच्या अधिकारांची जाणीव करून द्यायला हवी. तिचं रोजचं जगणं सुखकर करायला हवं. कोणतं काम स्त्रीचं आणि कोणतं काम पुरूषाचं याचे पारंपरिक निकष मोडायला हवेत. रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊन कुणाच्याही आधाराच्या कुबड्या न घेता खंबीरपणे स्त्री स्वतःच्या पायावर उभी राहिल हे पहायला हवं. मुलींशी कसं वागायचं, त्यांचा सन्मान कसा राखायचा याचे धडे आपल्या मुलांना द्यायला हवेत. या सगळ्यासाठी नऊ दिवसांत काही प्रयत्न करता येतायत का ते पहायला हवं.

स्त्री भ्रूणहत्या कधी थांबणार, मुलींना हवं तेवढं शिक्षण कधी मिळणार, बालविवाह कधी थांबणार, बलात्कार कधी थांबणार, मासिक पाळीची अस्पृश्यता कधी जाणार, लग्नात हुंडा देणं - घेणं कधी थांबणार, घरात स्त्रीला समान वागणूक कधी मिळणार, मुलीला वस्तूसारखं दान करायला लावणारी कन्यादानाची प्रथा कधी बंद होणार, तिच्या योनीवर, तिच्या शरीरावर तिच्या एकटीचा अधिकार आहे हे आपण कधी मान्य करणार या नऊ प्रश्नांची उत्तरं नवरात्रीच्या नऊ दिवसांत आपल्याला शोधायची आहेत.

हेही वाचा : 'ती'ला हवंय तिरंग्याचं पोषण

स्वातंत्र्यदेवतेची विनवणी

या नऊ प्रश्नांची उत्तरं सापडतील, नवरात्रीचे नऊ दिवस नऊ देवींची पुजा आपण मोकळ्या मनाने करू शकू, नऊ रंगांची मजा निर्धास्तपणे लुटू शकू तेव्हाच खऱ्या अर्थाने नवरात्रीचा उत्सव साजरा होईल.

समान मानव माना स्त्रीला तिची अस्मिता खुडू नका

दासी म्हणून पिटू नका वा देवी म्हणून भजू नका.

दासी, पुरूषाच्या पायाखालची घाण असलं काही समजून स्त्रीला मारू नकाच. पण देवी म्हणून देव्हाऱ्यात बसवून तिची आरतीही करू नका. स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षांनंतर तरी स्त्रीला माणसासारखी समान वागणूक द्या, हीच कुसूमाग्रजांच्या स्वातंत्र्यदेवतेचीही विनवणी आहे. देशातल्या प्रत्येक मुलीला रात्री अपरात्री कधीही सुरक्षीतपणे घरातून बाहेर पडता येईल तेव्हाच  आपण खरी नवरात्र साजरी करू शकू.

हेही वाचा : 

#NoBra या हॅशटॅगविषयी ब्र का नाही काढायचा?

चला, समतेच्या सॅनिटायझरनं पुरुषीपणाचा वायरस मारून टाकूया

मुलींच्या लग्नाचं वय वाढवण्याच्या निर्णयाचं आपण स्वागत करायला हवं?

पुरूषी वर्चस्व टिकवण्यासाठीच वापरलं जातं बायकांवरच्या विनोदाचं हत्यार

बायका आंदोलक बनून रस्त्यावर उतरतात, त्याचा अर्थ पुरुष कसा लावणार?