जीवनाची विपुलता, अस्तित्वाची समग्रता हा आशय असलेली प्रशान्त बागड यांची नवल ही कादंबरी. नावाप्रमाणेच काहीतरी नवीन गोष्ट सांगू पाहणारी. या कादंबरीची ओळख करून देणारं एक लहानसं निवेदन नितीन पाटील यांनी आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून केलं होतं. त्या भाषणाचं निखिल बैसाणे यांनी केलेलं शब्दांकन इथं देत आहोत.
प्रशान्त बागड लिखित ‘नवल’ कादंबरी कल्याणमधल्या पपायरस प्रकाशनाने प्रकाशित केलीय. प्रशान्त बागड यांची मराठी वाचकांना एक समर्थ कथाकार म्हणून ओळख आहे. त्यांचा पहिला कथासंग्रह ‘विवादे विषादे प्रमादे प्रवासे’ हा शब्द पब्लिकेशनकडून २०१० ला प्रकाशित झाला होता. या कथासंग्रहाला ‘पु. ना. पंडित पुरस्कार’ आणि ‘बाबुराव बागूल शब्द पुरस्कार’ मिळाला. ‘नवल’ ही बागड यांची पहिलीवहिली कादंबरी.
कादंबरी हा साहित्यप्रकार इतर साहित्यप्रकारांच्या तुलनेत तसा नवीनच समजला जातो. गेल्या चार-पाच शतकांदरम्यान हा साहित्यप्रकार एक विशिष्ट विश्वभान आणि आधुनिकतेची जाण घेऊन जगभर विकसित झाला. आता मराठी कादंबरीविषयी बोलायचं झालं तर उगमापासून आतापर्यंत आपल्याला साधारणपणे दोन प्रवृत्ती दिसून येतात. यात पहिली आणि बहुसंख्यांक असणारी प्रवृत्ती म्हणजे एका विशिष्ट कथारूपाला धरून चालणारी. हे कथारूप म्हणजे एकमेकांना अनुसरून, एका रेषेत घडत जाणार्या घटनांची मालिका.
दुसरा एक छोटासा प्रयोगशील कादंबरीचा प्रवाहही आपल्याला दिसून येतो. या छोट्या प्रवाहातही सफल कलाकृती म्हणता येईल अशा कादंबऱ्यांची संख्या खूपच कमी आहे. एखादा प्रयोग यशस्वी झाला की त्याच धाटणीच्या कादंबर्या लिहिल्या जातात. प्रयोगासाठी प्रयोग हे मराठी कादंबरीचं एक मोठं दुखणंच होऊन बसलंय. या सबंध पार्श्वभूमीवर प्रशान्त बागड यांची ‘नवल’ ही कादंबरी प्रखरपणे आपलं वेगळंपण जपत आपली एक स्वतंत्र वाट निवडते.
हेही वाचा : गाथासप्तशती: प्रत्येक घरात असावा असा मराठीतला आद्यग्रंथ
‘नवल’ची खासियत म्हणजे कादंबरीनिर्मितीतले घटक. पात्रं, आशय, निवेदन आणि तंत्र या बाबतीतले सगळे क्लिशेज ही कादंबरी टाळते. ‘नवल’च्या नायकाविषयी बोलायचं म्हटलं तर ‘नवल’चा नायक एकांडा, एकाकी आहे खरा.
पण जगापासून तुटण्याचा विषाद त्याला नाही. बहुतेक वेळा अब्सर्डिस्ट म्हणजेच जगण्याला काही अर्थ नाही असं मानणारा किंवा अस्तित्ववादी नायक जग, अस्तित्व, नातेसंबंध आणि त्यातून जन्माला आलेल्या मूल्यव्यवस्थेविषयी झालेल्या भ्रमनिरासातून तुटून एकटा होतो.‘नवल’चा नायक मात्र निवड म्हणून एकाकीपणाचा स्वीकार करतो. कारण त्याला त्याचं, स्वतःचं एक तरल, संवेदनक्षम असं एक जग निर्माण करण्याची आस लागते.
म्हणूनच कादंबरीतलं एक वाक्य सांगावंसं वाटतं, ‘त्याची संध्याकाळ रात्रीची आणि उद्याची वाट पाहत नाही. ती उष:काल-गर्भ पेरणारी सावली नसते. तिला या कच्च्या अंधारात, या नुकत्या अंधारात उडत जाणार्या पक्षांच्या आभाळातळी निखिल मोकळीक हवी असते.’ ‘नवल’चा नायक अशी इच्छा बाळगू शकतो. कारण तो जीवनाकडे विशिष्ट विचारसरणी किंवा दृष्टिकोनातून बघण्याचं टाळतो. त्याला विशिष्ट कुंपणात राहून एकत्र अर्थ लावणं जवळजवळ अशुभ वाटतं.
आता या कादंबरीच्या आशयाविषयी बोलायला हवं. कादंबरी वाचून झाल्यानंतर ती नेमकी कशाविषयी आहे हा आपल्याकडचा फार कळीचा प्रश्न असतो. या प्रश्नाचं उत्तर साधारणपणे ही अमुक एका सामाजिक प्रश्नाविषयी आहे, तमुक एका राजकीय प्रश्नाविषयी आहे, अशा पद्धतीनं दिलं जातं. ‘नवल’ मात्र हे सगळे सापळे टाळत आपलं मार्गक्रमण करत असते.
याचा अर्थ ती पलायनवादी कादंबरी आहे का? तर या प्रश्नाचं उत्तर ठामपणे नाही असंच देता येईल. आपण ‘नवल’च्या निवेदकाला ही कादंबरी कशाविषयी आहे असा प्रश्न विचारला तर तो त्याचा आवडता शब्द वापरत म्हणेल की, हा प्रश्नच ‘फिजूल’ आहे. जीवनाची विपुलता, अस्तित्वाची समग्रता, हाच ‘नवल’चा आशय आहे.
या कादंबरीला दोन एपिग्राफ्स आहेत. म्हणजे कादंबरी सुरू होण्याआधी लिहिलेली असतात ती वचनं. त्यातला एक एपिग्राफ हा किंग जेम्सच्या बायबलमधल्या मॅथ्यूच्या गॉस्पेल मधलं एक वाक्य आहे. त्याचं अतिशय सुंदर भाषांतर बागड यांनी केलंय. ते वाक्य असं आहे की, ‘मी तोंड उघडेन आणि गोष्ट सांगेन, सृष्टीस अज्ञात असलेल्या बाबी मी प्रकट करेन.’ या वाक्यातूनच ‘नवल’ची प्रकृती आणि प्रवृत्ती स्पष्ट होते.
हेही वाचा : ‘बारकुल्या बारकुल्या ष्टोऱ्या’ने मराठी कादंबरीला साचलेपणातून बाहेर काढलं
या कादंबरीचा एक गुण म्हणजे निवेदनातून, कथनाच्या रचनेतून, भाषेच्या सर्जनातून, असतेपणाच्या, जगण्याच्या नाना मिती तपासत ही कादंबरी पुढे जात असते. पण हे सगळं मला मांडायचं आहे असा हेका न धरता, अगदी बेमालूमपणे अनेक मृदुल सत्यं वाचकांच्या मनात पेरत ती जाते.
आशयसूत्री लिखाणाचा एक मोठा दोष म्हणजे ते फक्त अनुकृती करतं. बागडांची कादंबरी मात्र, इथे ॲरिस्टॉटलचा शब्द वापरायचा म्हटलं तर ‘इमिटेशन’ न करता ‘पोएसिस’कडे झुकते. म्हणूनच बांधकाम अपूर्ण असलेली खोली, तिच्यातला पिवळा बल्ब, गाणारा रेडियो आणि बघणार्याच्या अंत:करणातली दु:खाची छटा बाळगत, बांधकामपूर्व जागेपासून कल्पांताच्या कल्पनेपर्यंतची सफर ही कादंबरी आपल्याला घडवून आणू शकते.
प्रत्येक समर्थ कलाकृती ही वाचकांना एका उत्कट अनुभवापर्यंत घेऊन जात असते. त्या गंतव्यापर्यंत पोचण्यासाठी त्या कलाकृतीला आपली समर्थ, स्वतंत्र अशी भाषा घडवावी लागते. ‘नवल’चं भाषेचं भान अतिशय तीव्र आहे. म्हणजे इंग्रजी कवी विलियम ब्लेक म्हणतो ना, 'To see a World in a Grain of Sand … Hold Infinity in the palm of your hand.' तसाच ‘नवल’चा नायक-निवेदक प्रत्येक क्षणामधल्या जीवनाची व्यामिश्रता, अनेकार्थता टिपतो. ती त्याच्या अर्थगर्भ भाषेमधून. म्हणूनच ‘नवल’ची भाषा ही एक अभूतपूर्व गोष्ट आहे.
इथं एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की बागडांची ही अतिशय सुंदर असलेली भाषा म्हणजे केवळ कोरं अलंकारशास्त्र नाही. तर या कादंबरीमधेच अगदी आपल्या भाषेच्या नाना तर्हा आपल्याला पहायला मिळतात. म्हणजे होस्टेलवर बोलली जाणारी पोरांची खानदेशी तऱ्हा, निवेदकाची सटीक आणि तरल निरीक्षण नोंदवणारी भाषा. या सगळ्या गोष्टी लेखकाच्या भाषिक आत्मविश्वासाचं एक प्रतीकच म्हणता येईल.
म्हणजे एक छोटंसं उदाहरण द्यायचं म्हटलं तर एका वाक्यामधे 'dog-eared page' या इंग्रजी शब्दांचं 'कुत्र्याचे कान फुटलेलं पान' असं अतिशय सुंदर भाषांतर बागडांनी केलेलं आपल्याला दिसतं. या कादंबरीमधे लिओनार्दो दा विंचीचं वर्णन करताना निवेदक असं म्हणतो की, ‘लिओनार्दोला सुचायचं खूप. पण ती विपुलता त्याला पेलवायची नाही.’ बागड मात्र ही विपुलता लीलया पेलताना दिसतात.
‘नवल’ या शब्दाचा अर्थ आश्चर्य आणि चमत्कार असा आहेच. पण सोबत त्याचा एक अर्थ असा होतो की, ही एक नवीन गोष्ट आहे. बागड ही नवीन गोष्ट आपल्यासाठी घेऊन आलेत, तर या धुरंदर कादंबरीकाराची ही अफलातून गोष्ट आपण सर्वजण नक्की वाचायला हवी आणि ‘नवल’ची नवलाई आपण स्वतः जरूर अनुभवायला हवी.
हेही वाचा :
इश्क मजहब, इश्क मेरी जात बन गई
आगळ ही कादंबरी गाव आणि शहर यांच्यातला संवादसेतू
युगानुयुगे तूच : महामानवाच्या जीवनाचा ठाव घेणारी दीर्घकविता
मराठी जगात दहाव्या नंबरची सर्वाधिक बोलली जाणारी भाषा असताना संपेल कशी?
(लेखक अंमळनेरच्या प्रताप कॉलेजमधे इंग्रजी विषयाचे सहाय्यक प्राध्यापक आहेत.)