आज राष्ट्रीय कन्या दिवस. आजचा हा दिवस, जो भारत देशातल्या सर्व मुलींचा आहे, तो खरंच साजरा करण्यासारखा आहे का? आपल्या देशातल्या बहुतेक मुली अॅनिमिक राहिल्यात. नीट विचार करून अनेक अंगांनी नियोजन करून हा प्रश्न निश्चित सोडवता येईल. पण हा प्रश्न सुट्टा नाहीय. त्यासोबत स्त्री सन्मान, स्त्री शिक्षण, स्त्रीपुरुष समता ही मूल्यं घेऊन एक वेगळी चळवळ झाली पाहिजे. समाजाला, शासनाला आणि समस्त पुरुषवर्गाला खडबडून जागं करायला हवं.
आज राष्ट्रीय कन्या दिवस. देशातल्या सगळ्या मुलींना खूप मनापासून शुभेच्छा देताना माझं मन खंतावलेलं आहे. आज दिवस त्यांचा आहे. मुलींचा!
वर्षातला एखादा दिवस कोणाच्या तरी नावाने आपण राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय दिवस म्हणून पाळतो, साजरा करतो. एखादा दुर्मिळ आनंद, कधी न मिळणारा एखादा सन्मान, सहसा न मिळणारं महत्त्व, एखादा छान उत्सवी मूड एखाद्या सणा सारखा आपल्याही वाट्याला यावा आणि इतरांनाही त्याची आठवण करून द्यावी म्हणून आपण असे दिवस साजरे करतो. यांचं खूप महत्व आहेच!
पण आजचा हा दिवस, जो भारत देशातल्या सर्व मुलींचा आहे, तो खरंच साजरा करण्यासारखा आहे का?
मी आरोग्याचं काम करतो. ग्रामीण आदिवासी भागात, शहरी वस्त्यांमधे फिरतो. कधी दुर्गम भागात प्रवास करतो. अनेकदा एसटी मधून जाताना शाळेत जाणाऱ्या मुली माझ्या सहप्रवासी असतात. हिरव्यागार जंगलातून, दुतर्फा शेतीवाडी असलेल्या प्रदेशातून बस जात असते. नीट वेणी फणी केलेल्या, गणवेश घातलेल्या, बसमधे अभ्यास करणाऱ्या, कधी अगदी गप्प तर कधी खिदळणाऱ्या या मुली पाहून खूप प्रश्न माझ्या मनात येतात! बहुतेक मुली अॅनिमिक! म्हणजे अशक्त, रक्त फिकट असलेल्या.
याच मुली कधी कधी त्यांच्या शाळेत मला भेटतात. आरोग्य संवादाच्या शालेय शिबिराला त्या आवर्जून येतात. आरोग्य हा विषय घेऊन खूप संवाद होतो. सुरुवातीला गप्प गप्प असणाऱ्या या मुली पुढे खूप मनापासून बोलायला लागतात.
हेही वाचा : मुलींच्या लग्नाचं वय वाढवण्याच्या निर्णयाचं आपण स्वागत करायला हवं?
त्यांच्याशी बोलताना असं जाणवत राहतं की 'बेटी बचाव बेटी पढाव' ही घोषणा अपुरी आणि खोटी वाटणारी आहे!
त्यांना मोकळेपणाने बोलायचंय. फिरायचंय. नद्या डोंगर पायाखाली घालायचेत. खूप शिकायचंय. खूप वाचायचंय. नवी नवी कौशल्यं आत्मसात करायचीयत. आईवडिलांना गरिबीतून वर आणायचंय आणि सुंदरसुद्धा दिसायचंय!
त्यांना सुरक्षितता तर हवी आहेच. पण कोणत्याही माणसाची ही अगदी किमान मागणी आहे. आमचा जन्म होऊ दिला हा काही तुमचा उपकार नाही. गर्भातच आमचं लिंग ओळखून काढून टाकलं नाही हे खूप चांगलं झालं. पण आता आम्ही आलो आहोत या जगात तर आमचं सहर्ष स्वागत करा! नाकं मुरडू नका!
आम्ही नुसती 'बेटी बचाव' ही मागणी किती वर्षे करणार? जन्म घेण्याचा आमचा मुलभूत आणि नैसर्गिक हक्क आहे याची पुरेशी जाणीव कुटुंबात, समाजात, सरकारकडे, शासन दरबारी आहे का? 'बेटी पढाव' हेही ठीकच. पण त्याने फार काही होत नाही! मुद्दा सन्मानाचा आहे! त्याचं काय? तोही आमचा अधिकार आहे! आजच्या दिवसापुरता फक्त नाही. कायमचा हवा आहे.
आणि तुम्ही नका आम्हाला बचावू! तुम्ही नका पढावू! आम्ही समर्थ आहोत. आम्हाला सन्मान हवा आहे. बरोबरीची वागणूक हवीय. समान संधी द्या! बस्स! बाकी सगळं जे आम्हाला हवं ते त्याच्या सोबत आपोआप येईल.
अनेक ठिकाणी भितींवर लिहिलेली घोषणा वाचली. ‘मुलगी नाही तर बहीण नाही! मुलगी नाही तर आई नाही! मुलगी नाही तर बायको नाही!’ मुलगी नाही तर भाकरी कोण करून घालेल, असं लिहिलेलं अजून वाचलेलं नाहीये, पण मनात मात्र खूप असतं. यात कोणालाही काहीच कसं चुकीचं वाटत नाही? मुली हव्या आहेत कारण पुढच्या पिढ्यांना जन्म द्यायचा आहे म्हणून? भाऊबीजेला बहीण हवी म्हणून आणि शरीरसुख हवं आणि स्वयंपाकाला आणि कष्टाला बाई हवी म्हणून बायको हवी? इतकंच? बाईचा जन्म पुरुषकेंद्री नाती सजवण्यासाठी फक्त?
बाई म्हणजे गर्भाशय नाही, न केवळ योनीमार्ग! बाई म्हणजे वस्तू नाही. बाई म्हणजे माणूस! असं सर्व पुरुषांना लहानपणापासून शिकवायला हवंय. जे गेली कित्येक वर्ष राहूनच गेलंय.
हेही वाचा : बायका आंदोलक बनून रस्त्यावर उतरतात, त्याचा अर्थ पुरुष कसा लावणार?
मुलींचा सन्मान त्यांच्या अन्नातही असायला हवा. कित्येक मुली सकाळी चहा चपाती खाऊन शाळेत येतात. किंवा नुसता चहा! घरात अन्न नाही, असं नाही. पण अंडी वगैरे मुलांच्या वाट्याला. आजही मुलींना घरची कामं उरकून मग जेवायला बसवलं जातं. भाजीचं पाणी, डाळीचं पाणी आणि भात किंवा चपाती. नाहीतर तिखट चटणी.
‘सारखी खा खा करू नको, तुला परक्याचा घरी जायचंय, ते लोक काय म्हणतील’ असं म्हणून अर्धपोटी राहण्याची प्रॅक्टिसच जणू करून घेतली जाते. त्याग करायची मग सवयच होऊन जाते. वर चांगला नवरा मिळावा म्हणून उपास तापास, व्रतं वैकल्यं मुलींच्याच मागे लावलीयत.
जास्त खाल्लं तर मी जाड होईन असं काही मुलींना वाटतं. जाडीमुळे लग्नाच्या बाजारात किंमत कमी होते !
त्यात वयात येत असताना शरीरात विकास होतो. मासिक पाळी येते. आधीच ऍनिमिया असणारीचा ऍनिमिया वाढतो. रक्ताचा लाल रंग फिक्कट होऊ लागतो. मग दम लागतो. चक्कर येते, अंग दुखतं, काही करू नये वाटतं. उदासी वाटते. भूक कमी होते.
मासिक पाळीचं रक्त अशुद्ध असतं असलं काही तरी खूळ डोक्यात भरवलं जातं. कोणीही त्यांना नीट समजून सांगत नाही की हेही रक्त चांगलंच असतं. मासिक पाळीतून बाहेर गेलेल्या रक्ताची भरपाई व्हायला हवी. त्यासाठी भरपूर चार वेळा पोटभर खायला हवं. गडद हिरव्या भाज्या, डाळी, मासे, अंडी, स्वस्त फळं पोटात जायला हवी.
जंगलं नाहीशी होतायत तशा जंगली भाज्या नाहीशा होतायत. टाकळा, डाकुर्ली, मायाळू, आंबाडीची फुलं, कळवंडी, हिर्मा किती तरी पालेभाज्या फळभाज्या कंदमुळे आहेत. जंगलातले पक्षी, नदीतले मासे आहेत. यात रक्तवाढीसाठी आवश्यक असं लोह, फॉलिक ऍसिड आणि जीवनसत्त्वं खूप आहेत. नेहमीच्या भाज्यांपेक्षा त्यात या गोष्टी अधिक आहेत. हे सगळं नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.
अलीकडे तर त्यांच्याही बाजारात मेथी आणि पालकच मिळतो. बाई मजुरी करून घरी जाताना बाजारातून एखादी जुडी घेऊन जाते. जाता जाताच ती सुकून जाते. खूप तिखट आणि पाणी घालून मग त्याचं पातळ ‘कोरड्यास’ केलं जातं. त्यातून फार कमी पोषक द्रव्य मुलींच्या वाट्याला येतं.
आपला देश खूप हिरवा आहे. या हिरवाई मधे भरपूर पोषक द्रव्ये आहेत. पण या देशातल्या मुलींचं रक्त फिक्कट आहे. वाईट वाटतं की जंगली भाज्या हा पुण्यासारख्या ठिकाणी केवळ ‘रानभाज्या उत्सवा’चा विषय राहिला आहे.
हेही वाचा : #NoBra या हॅशटॅगविषयी ब्र का नाही काढायचा?
मुलींना काही ठिकाणी शाळेत आयर्न फॉलिक ऍसिडची गोळी आठवड्यातून एक अशी दिली जाते. अनेक डॉक्टरांच्या मते याचा फार उपयोग नाही. हा वरवरचा उपाय आहे. मुलींचं एकूण पोषणच खूप सुधारायला हवंय. आणि ते शक्य आहे! याचा एक सर्वस्पर्शी राष्ट्रीय कार्यक्रम हाती घ्यायला हवा. ज्यात आरोग्यशिक्षण हा महत्त्वाचा पैलू असेल.
ऍनिमिया म्हणजे रक्तात हिमोग्लोबिन म्हणजे लाल रंगाच्या द्रव्याचं प्रमाण कमी. हिमोग्लोबिनचं काम काय, तर नाकाने घेतलेला ऑक्सिजन शरीरात सगळ्या पेशींपर्यंत पोचवणं. तेच नीट होत नाही. हवेत ऑक्सिजन खूप आहे, पण रक्तातच नाही अशी अवस्था होते. रक्तातच ऑक्सिजन कमी असल्याने तो मेंदूपर्यंत देखील नीट पोहोचत नाही. त्यामुळे लक्ष नीट केंद्रित करता येत नाही.
अशक्तपणा येतो, अस्वस्थता वाटते, बेचैनी जाणवते, झोप ग्लानी येते आणि पोटात भूकही असते. यामुळे अभ्यासात लक्ष लागत नाही. मुलगी म्हणूनही बाकी खूप टेन्शनही असतं. मुली मागे राहतात. नापास होतात. मग गळती सुरू होते. दहावीच्या आधीच त्यांना शाळेतून घरी बसवलं जातं. त्यांची लग्नं लहान वयातच केली जातात. मग लगेच गरोदरपण, डिलिव्हरी, रक्तस्राव की पुन्हा ऍनिमिया! त्यांना होणारी मुलं कमी वजनाची, अशक्त आणि साध्या साध्या आजारांना सहज बळी पडणारी. हे चक्र थांबणार कधी?
आपल्या देशात ६० टक्के मुली अनिमिक आहेत! आदिवासी भागात ८० ते ९० टक्के मुली अनिमिक आहेत! मुलग्यांमधे हे प्रमाण २० टक्के आहे. तेही खूपच आहे.
काही मुली अशाही स्थितीत नेटाने शिक्षण घेतात. मेरिटला येतात. नोकऱ्या करतात. पुढे येतात. संघर्ष करतात. स्वतःच्या पायावर उभ्या राहतात. संसार करतात. मुलांना शिकवतात हे या देशातलं एक महान आश्चर्य मानायला हवं.
आरोग्य संवादाच्या शिबिरात मुली एक गाणं म्हणतात..
‘तारा मनाच्या कशा झंकारू लागल्या
हज्जार कोकीळा गळा घुमू लागल्या
अंग अंग वाजे मृदंग बाई सूर माझा बोले
दंग दंग माझा आनंद बाई घुंगरू वाजे!’
त्यांच्या सध्याच्या आरोग्याच्या अशा परिस्थितीत मला मात्र काही वेगळंच ऐकू येतं. ‘तारा मनाच्या का मूक होऊ लागल्या’ अर्थात मी निराशा वादी मुळीच नाहीये.
‘दोन हजार वीस साली भारत देश सुपर पॉवर होणार’ असं माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम म्हणाले होते. प्रगती त्या दिशेने काही झालीच नाही, असं नाही. पण ज्या देशात दहातल्या सहा मुली रक्तपांढरीने ग्रस्त आहेत तो देश सुपर पॉवर कसा होईल?
सुरुवातीला म्हटलं तसं काही झालं तरी मी देशभरातल्या मुलींना आजच्या दिवसाच्या शुभेच्छा देईनच. पण शुभेच्छा देताना खोलवर खंत वाटते आहे.
नीट विचार करून अनेक अंगांनी नियोजन करून मुलींचा किमान अॅनिमियाचा प्रश्न निश्चित सोडवता येणार आहे. हा प्रश्न सुट्टा नाहीये. त्यासोबत स्त्री सन्मान, स्त्री शिक्षण, स्त्रीपुरुष समता ही मूल्यं घेऊन एक वेगळी चळवळ झाली पाहिजे. स्त्री-आरोग्यासाठीचं एक बृहद आंदोलन व्हायला हवं. समाजाला, शासनाला आणि समस्त पुरुषवर्गाला खडबडून जागं करायला हवं.
हेही वाचा :
तर, ते मलाही नक्षलवादी ठरवतीलः नजुबाई गावित
मुली रात्री मोकळेपणाने फिरू शकतील तीच खरी नवरात्र!
या पाच शक्तीशाली महिलांवर अवलंबून आहे कोरोनानंतरचं जग
तालिबानशी शांतता चर्चेने अफगाणी महिला का अस्वस्थ आहेत?
जागतिक कन्या दिनः स्त्री सन्मानासाठी दाढीमिशा लावून काम करणाऱ्या शास्त्रज्ञ
(लेखक गेली 27 वर्षे सामाजिक आरोग्यावर काम करतात. आरोग्य भान या चळवळीचे एक संस्थापक कार्यकर्ते आहेत.)