पा. रंजितचा ‘नक्षत्रम नगरगिरदू’ हा तमिळ सिनेमा ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात रिलीज झाला. २०१८च्या ‘काला’नंतर थियेटरमधे प्रदर्शित होणारा रंजितचा हा पहिलाच सिनेमा होता. आजवरच्या प्रत्येक सिनेमात आपल्या आशयाचा आणि कलेचा दर्जा उंचावत नेणाऱ्या रंजितने याही सिनेमात तेच केलं. पण या सिनेमाला तिकीटबारीवर मात्र फारशी कमाल दाखवता आली नाही.
चारचौघात प्रेमाचा विषय निघाला की साहजिकच डोळ्यासमोर येणाऱ्या ‘प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं’ या कवी मंगेश पाडगावकरांच्या ओळी ‘नक्षत्रम नगरगिरदू’ पाहताना धूसर होऊ लागतात. ‘नक्षत्रम नगरगिरदू’ हा पा. रंजितचा यावर्षी आलेला नवा सिनेमा. त्याच्या आजवरच्या इतर सिनेमांसारखाच हा सिनेमाही आशयाच्या दृष्टीने इतरांपेक्षा वरचढ ठरतो.
३१ ऑगस्टला रिलीज झालेल्या या सिनेमाला समीक्षकांची वाहवा लाभली. पण रंजितच्या इतर सिनेमांइतका हा सिनेमा प्रेक्षकांपर्यंत पोचला नाही. खरं तर, २०१८ला आलेल्या ‘काला’च्या दणदणीत यशानंतर थियेटरमधे रिलीज होणारा रंजितचा हा पहिलाच सिनेमा होता. रिलीजनंतरचा सुरवातीचा काही काळ सोडला तर आशय आणि तंत्राच्या आघाडीवर उत्तम असणारा या सिनेमाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवल्याचं चित्र बघायला मिळालं.
‘नक्षत्रम नगरगिरदू’ ही एका पाँडिचेरीतल्या एका नाटक कंपनीची कथा आहे. वेगवेगळ्या सांस्कृतिक पार्श्वभूमीतून आलेला हा तरुण नाटककारांचा गृप प्रेमाच्या समकालीन स्वरूपावर नाटक बसवायचं ठरवतो. यातल्या प्रत्येकासाठी प्रेमाची व्याख्या वेगळी असते. त्या प्रेमाचं सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, लैंगिक, आर्थिक असं वेगवेगळं स्वरूप ही मुलं नाट्यरुपाने रंगमंचावर आणू पाहतात.
‘नक्षत्रम नगरगिरदू’च्या निमित्ताने, भारतीय सिनेमाच्या इतिहासात पहिल्यांदाच एका आंबेडकरवादी तरुणीला सिनेमाचं मध्यवर्ती पात्र म्हणून दाखवलं गेलंय. रेने नावाच्या या मुलीची भूमिका दुसारा विजयनने साकारलीय. रेनेच्या निमित्ताने, फक्त वर्षानुवर्षे चालत आलेल्या विखारी जातीव्यवस्थेलाच नाही, तर तिच्याच छत्रछायेत दुर्लक्षितपणे वाढणाऱ्या पुरुषकेंद्रित विचारधारेलाही रंजितनं या सिनेमातून आव्हान दिलंय.
हेही वाचा: इफ्फी : देशविदेशांच्या सिनेमांचा कॅलिडोस्कोप
पा. रंजित हे गेल्या दशकभरातलं तमिळ आणि पर्यायाने भारतीय सिनेदिग्दर्शकांच्या यादीतलं एक महत्त्वाचं नाव झालंय. या स्वातंत्र्यदिनाला रंजितचा ‘अट्टाकत्ती’ हा पहिला सिनेमा रिलीज होऊन दहा वर्षं झाली. सवर्णांची मक्तेदारी असलेल्या या क्षेत्रात आपल्या सिनेमातून दलितांचं म्हणणं, त्यांच्या कथा आणि जगण्यातलं वास्तव ठामपणे मांडणाऱ्या काही मोजक्याच दिग्दर्शकांच्या यादीत रंजितचं नाव सगळ्यात वर आहे.
सामाजिकदृष्ट्या महत्त्वाच्या विषयांवर सिनेमे बनवणाऱ्या तमिळ सिनेसृष्टीत इतकी वर्षं दुर्लक्षित राहिलेल्या जातीव्यवस्थेचं वास्तव रंजितने उघडपणे पडद्यावर मांडलंय. याच विषयाची वेगवेगळ्या पद्धतीने मांडणी करू पाहणाऱ्या वेट्रीमारन, मारी सेल्वाराज, ज्ञानवेलसारख्या दिग्दर्शकांना त्याने वेळोवेळी हिंमत दिलीय. रंजितचं तमिळ सिनेसृष्टीत असं दिवसेंदिवस वाढणारं प्रस्थ कित्येकांच्या डोळ्यात खुपत असेल याची गणतीच नाही.
आपल्या पहिल्या सिनेमापासून ते आजपर्यंत रंजित अनेकानेक अडचणींना तोंड देतोय. सिनेमात बुद्ध दाखवशील, आंबेडकर दाखवशील तर सिनेमा चालणार नाही, अशा हितचिंतकांच्या सल्ल्यांना आणि हितशत्रूंच्या धमक्यांना रंजित कधीही घाबरला नाही. उलट येणाऱ्या प्रत्येक सिनेमात तो बुद्धाच्या नवनव्या रूपांना जागा देतोय. त्याच्या सिनेमातल्या पात्रांमधून आंबेडकरी चळवळीची मशाल धगधगतच राहिलीय.
तो केवळ आंबेडकर आणि बुद्धाचा चाहता नाही. त्याच्या आजोबांकडून त्याला द्रविड चळवळीचे आद्यप्रणेते पेरीयार आणि त्यांच्या विचारसरणीचं बाळकडू मिळालंय. लेनिन, कार्ल मार्क्स हे त्याला आंबेडकरांइतकेच जवळचे आहेत. आजवर त्याने वाचलेलं, ऐकलेलं, पाहिलेलं आणि अनुभवलेलं जग तो या सर्व विचारधारांच्या पारड्यात मापून बघतो. त्यामुळेच त्याचे सिनेमे शोषितांच्या लढ्याशी जवळीक साधू शकतात.
रंजितच्या ‘अट्टाकत्ती’मधे आंबेडकरी प्रतीकांचा आणि जातीयवादाचा उल्लेख फारसा ठळक नसला तरी तो दुर्लक्षित करण्याजोगा नक्कीच नव्हता. त्या सिनेमात रंजितने पडद्यावर दिसणाऱ्या गोष्टींचा अर्थ लावायची जबाबदारी प्रेक्षकांवरच सोपवली होती. पहिल्याच प्रसंगात निळा शर्ट घालून फिरणारा ‘अट्टाकत्ती’चा साधाभोळा नायक दिनकरन हा तमिळ प्रेक्षकांना भावणार नाही, असं सांगत निर्माते आणि वितरकांनी सात महिने या सिनेमाचं रिलीज लांबवलं होतं.
पण रंजित आपल्या मतांवर आणि मांडणीवर ठाम राहिला. त्याचा हा साधाभोळा, सामान्यांना आपलासा वाटणारा नायक आणि त्याची कॉलेजमधली सत्ता तमिळ प्रेक्षकांना विशेष आवडली. आपल्या निरंतर संघर्षातूनच आपल्याला सत्ता आणि सन्मान मिळवता येईल हा आंबेडकरांनी दिलेला आत्मविश्वास दिनकरनच्या भूमिकेत झळकतो. हा सिनेमा हिट झाला आणि रंजितची गाडी सुसाट सुटली.
हेही वाचा: आर्टिकल १५ः डायरेक्टरचा प्रभाव असलेला सिनेमा
त्यानंतर आलेल्या ‘मद्रास’ने राजकारणात सढळपणे वापरला जाणारा आणि सत्ताकारणात बाजूला ढकलला जाणारा वंचित समुदाय पडद्यावर दाखवला. टुकार गोष्टींची अस्मिता मिरवताना पायाभूत गरजांकडे राजकारणी कायमच दुर्लक्ष करतात. भ्रष्ट आणि फसव्या नेत्यांकडून मतदारांची होणारी दिशाभूल हा नेहमीच्याच चर्चेचा विषय आहे. पण या विषयातलं अधिक दाहक वास्तव म्हणजेच गरीब, वंचित समुदायाचं ‘आयडेंटीटी पॉलिटिक्स’ पा. रंजितच्या ‘मद्रास’ने मांडलं.
पुढे रंजितने सुपरस्टार रजनीकांतला घेऊन ‘कबाली’ बनवला. आपली ओळख बनलेल्या जुन्या पेहरावाऐवजी बाबासाहेबांसारखा सूटबूट घालून ‘शिका, संघटीत व्हा, संघर्ष करा’ची कृतीशील अंमलबजावणी करू पाहणारा हा कबाली मलेशियातल्या तमिळ मजुरांसाठी मार्क्सची भाषा बोलतो. वरवर बघायला गेलं तर हा सिनेमा रजनीच्या ‘मास’ चाहत्यांसाठी बनवलेला एक गँगस्टर ड्रामा वाटतो, पण रंजितचा परीसस्पर्श सिनेमाच्या आशयाला ‘क्लास’ बनवतो.
त्यानंतर आलेल्या ‘काला’मधेही रजनीकांतच प्रमुख भूमिकेत होता. झोपडपट्टी आणि स्थानिक राजकारणी ही साधी वर्गसंघर्षाची लढाई रंजित द्रविड चळवळीचे प्रणेते पेरियार यांच्या नजरेतून मांडतो. रंजित रामायणाच्या रूपकांचा वापर करत या सिनेमात आर्य विरुद्ध द्रविड हा जुना संघर्ष उभा करतो. भीमवाड्यात जळलेल्या बुद्धविहारासमोर उभं राहून ‘जमीन आमचा हक्क आहे’ म्हणणारा ‘काला’ हा गेल्या दशकाभरातल्या कथानायकांपेक्षा कित्येकपट बलवान आहे.
रंजितचा ‘सारपट्टा परंपरै’ हा लॉकडाऊनमुळे ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्यात आला. आपल्या आखाड्याची इज्जत वाचवण्यासाठी खेळणाऱ्या एका बॉक्सरची ही गोष्ट होती. आंबेडकरी चळवळींशी संबंधित असलेल्या प्रतीकांचा आपल्या सिनेमात इतका उघडपणे वापर करण्याची रंजितची ही पहिलीच वेळ होती. या सिनेमाने रंजितच्या एकंदर दिग्दर्शकीय कारकिर्दीला आणखीनच वजन मिळवून दिलं.
‘सारपट्टा परंपरै’ हा निव्वळ एक स्पोर्ट्स ड्रामा नव्हता. त्यातले बॉक्सिंगचे सामने हे फक्त एखाद्या आखाड्याची इज्जत वाढवण्यासाठी खेळले गेले नव्हते. प्रत्यक्षात या सामन्यांमधून प्रमुख अभिनेता आर्याने साकारलेल्या कपिलन या दलित तरुणाच्या आणि त्याच्या समाजाच्या अस्तित्वाची लढाईच गडद होत होती. सिनेमाच्या एका प्रसंगात बुद्धाच्या कुशीत बसलेली लहान पोरं पाहिल्यावर रंजितला समजलेला बुद्ध किती समावेशक आहे हे ठळकपणे जाणवतं.
रंजितच्या याच समावेशक बुद्धाने ‘विक्टीम’ या वेबसिरीजमधे मात्र वादाला तोंड फोडलं. यातल्या रंजितने दिग्दर्शित केलेल्या ‘धम्मम’ या एपिसोडमधे बुद्धाच्या खांद्यावर उभी राहून मोकळ्या हातांनी आकाश कवेत घेणारी चिमुरडी आपल्याला दिसते. ते बघून शेतात काम करणारा तिचा बाप तिला ओरडतो. तेव्हा ‘बुद्धाला देव बनवू नका’ ही बुद्धाचीच शिकवण ती आपल्या बापाला ठणकावून सांगते. या प्रसंगावरून बरीच उलटसुलट चर्चा सुरु झाली.
एकीकडे, ‘धम्मा’चं इतकं प्रगल्भ रूप दाखवल्यामुळे रंजितचं कौतुक होत होतं. तर दुसरीकडे, बुद्धाला देवत्वाच्या चौकटीत अडकवलेल्यांच्या भावना दुखावल्या गेल्या होत्या. त्यांच्या मते, या प्रसंगामुळे बुद्धाची विटंबना झाली होती. पण खरं तर, रंजितच्या ‘धम्मम’मधे बाबासाहेबांचं बोट धरून सामाजिक न्यायाचा पाठपुरावा करणाऱ्या जुन्या पिढीसोबत बुद्धाच्या अंगाखांद्यावर खेळणाऱ्या नव्या पिढीचं संवेदनशील व्यक्तीस्वातंत्र्य एकत्र येताना दिसलं.
हेही वाचा: ओटीटी प्लॅटफॉर्मना सेन्सॉर असायला हवा?
रंजितच्या या ठाम भूमिका फक्त सिनेमाच्या पडद्यापुरत्या मर्यादित नव्हत्या. त्याने पाठबळ दिलेला ‘द कास्टलेस कलेक्टीव’ हा म्युझिक बँड आंबेडकरी चळवळीपासून प्रेरणा घेत जातीयवाद, स्त्रीवाद अशा विषयांवर गाणी बनवतोय. ‘गाना’ हा लोकसंगीताचा एक प्रकार या बँडचा विशेष आधार आहे. या बँडमधले तेन्मा, अरीवू, इसैवनीसारखे ‘गाना’ कलाकार आणि ‘जय भीम अॅन्थम’, ‘वडं चेन्नई’सारखी गाणी विशेष लोकप्रिय आहेत.
मार्च २०२१ ‘एंजॉय एंजामी’ हे तमिळ गाणं यूट्यूबवर रिलीज झालं. काही दिवसांतच हे गाणं प्रसिद्धीच्या शिखरावर पोचलं. यावर्षी चेन्नईत झालेल्या चेस ऑलिम्पियाडमधेही हे गाणं सादर केलं गेलं होतं. त्यावेळी लाईव सादरीकरणात अरीवू नसल्याने नव्या वादाला तोंड फुटलं. कारण मुळात हे गाणं अरीवूनं लिहलं आणि संगीतबद्ध केलं होतं. पण तमिळ सिनेसृष्टीतला सुप्रसिद्ध संगीतकार संतोष नारायणनने यामागचं अरीवूचं श्रेय आणि मेहनत झाकोळण्याचा पुरेपूर प्रयत्न केला होता.
हे गाणं अरीवू आणि संतोषची सावत्र मुलगी दी यांनी एकत्र गायलं होतं. या गाण्यासाठी संगीतकार म्हणून संतोषचं नाव लागलं असलं तरी ती पूर्णपणे आपली रचना असल्याचा दावा अरीवूने केला होता. इतकं असूनही वारंवार अरीवूला प्रसिद्धीच्या झोतापासून जाणीवपूर्वक दूर ठेवलं गेलं. ‘रोलिंग स्टोन इंडिया’सारख्या प्रतिष्ठीत मासिकाच्या कवरवरही अरीवूऐवजी दीला स्थान देण्यात आलं होतं. या सगळ्या वादात अरीवूच्या पाठीशी ठामपणे उभं राहिलेलं नाव होतं, ‘पा. रंजित’!
खरं तर, रंजितच्या याआधीच्या सर्व सिनेमांना संतोष नारायणननेच संगीत दिलं होतं. पण ‘एंजॉय एंजामी’च्या वादात रंजितने अरीवूची ठामपणे बाजू घेतल्यानंतर चित्र बदललं. या वादानंतर सध्याच्या काळाला सहज अनुरूप होईल असं संगीत हवं असल्याचं कारण देत रंजितने संतोषच्या ऐवजी तेन्माला पसंती दिली. तेन्मा हा ‘द कास्टलेस कलेक्टीव’चा म्होरक्या. रंजितच्या ‘धम्मम’ आणि ‘नक्षत्रम नगरगिरदू’साठी संगीतही त्यानेच दिलंय.
रंजितच्या इतर सिनेमांच्या तुलनेत ‘नक्षत्रम नगरगिरदू’ला थंड प्रतिसाद मिळालाय. त्यामागे त्याचं हे असं ठाम भूमिका घेत पारदर्शी राहणं बऱ्याच अंशी जबाबदार आहे. कारण बॉक्स ऑफिसचा विचार करता, ‘कोब्रा’चा अपवाद वगळता इतर कुठलाही मोठा तमिळ सिनेमा ‘नक्षत्रम नगरगिरदू’च्या समोर नव्हता. पण ‘एंजॉय एंजामी’च्या वादानंतर मीडियाच्या चर्चेतूनही हा सिनेमा जाणीवपूर्वक डावलला गेल्याचं चित्र दिसत होतं.
संतोष नारायणनसारख्या मोठ्या नावासोबत पंगा घेणं असेल किंवा बुद्धाची सर्वसमावेशक प्रतिमा ठळक करणं असेल, रंजितने कायम स्वतःच्या भूमिका खंबीरपणे मांडल्यात. त्याचं असं खंबीर असणंच मीडिया आणि तथाकथित समीक्षकांना खुपतंय. त्यामुळे आशय आणि तांत्रिकदृष्ट्या वरचढ असूनही ‘नक्षत्रम नगरगिरदू’ प्रेक्षकांपर्यंत पोचला नाही. त्याउलट, रिलीजसाठी महिन्याभराचा अवकाश असूनही ‘पोन्नियीन सेल्वन’ची चर्चा सतत होतच राहिलीय.
दुसरीकडे, हा प्रतिसाद प्रेक्षकांच्या वैचारिक भूमिकांवरही प्रश्नचिन्ह उभा करतोय. कारण, व्यावसायिक दृष्टीकोनातून बनवलेल्या सिनेमांचा भडीमार होत असताना रंजितने सिनेमाचं मुख्य पात्र म्हणून आंबेडकरवादी तरुणी दाखवणं कितपत योग्य आहे, यावर उलटसुलट चर्चा घडतेय. ‘क्वीन’, ‘मर्दानी, ‘गंगूबाई काठियावाडी’सारखे अपवाद वगळता इथला प्रेक्षक अजूनही स्त्रीवादी तसंच नायिकाप्रधान सिनेमांना तितकासा सरावलेला नाही.
रंजितला आंबेडकरवादच मांडायचा होता तर नायकप्रधान सिनेमा असलेला ‘सारपट्टा परंपरै’ही चालला असता, असं प्रेक्षकांचं म्हणणं आहे. या सिनेमाला ओटीटीवर मिळालेला प्रतिसाद बघता, प्रेक्षकांची मागणीही रास्त आहेच. पण म्हणून ‘नक्षत्रम नगरगिरदू’ची मांडणी फोल ठरत नाही. आजही स्त्रीवाद आणि त्यातल्या त्यात आंबेडकरवाद म्हणलं की नाक मुरडणाऱ्या प्रेक्षकांची संख्याही मोठी आहे. ‘नक्षत्रम नगरगिरदू’ला मिळालेला थंड प्रतिसाद हेच चित्र अधोरेखित करतोय.
हेही वाचा:
ओटीटी प्लॅटफॉर्म थेटरचे बाप बनणार का?
सिनेमांची संख्या कमी होतेय, हे चांगलं की वाईट?
जलिकट्टू : माणसाच्या अंतरंगात लपलेल्या हिंस्र जनावराचं दर्शन देणारा सिनेमा