तुम्ही मोबाईल चार्जरशिवाय विकत घेणार का?

०३ फेब्रुवारी २०२१

वाचन वेळ : ६ मिनिटं


चार्जर नसेल तर मोबाईल चालूच शकत नाही. पण ऍपल, सॅमसंग आणि झियोमी सारख्या कंपन्यांनी पर्यावरणाचं कारण पुढे करत नव्या फोनसोबत चार्जर देणं बंद केलंय. खरंतर, त्यांचा मूळ उद्देश पैसे वाचवण्याचाच आहे. त्यातच भर म्हणजे ताज्या बजेटमधे चार्जरवरचा कर वाढवण्यात आलाय. त्यामुळे नवीन फोन घेताना आता चार्जर मिळणारच नाही असं एकंदर दिसतंय.

मोबाईल फोन म्हणजे आपला जीव की प्राण. आणि चार्जर हा या मोबाईलचा जीव की प्राण. आपण मोबाईलशिवाय आणि मोबाईल चार्जरशिवाय जगू शकत नाही. आपला एक फोन खराब झाला तर आपल्याला दुसरा लागतोच. आणि नवीन फोन बरोबर स्क्रीनगार्ड, मेमरी कार्ड अशा ऍक्सेसरीपैकी काही मिळो न मिळो चार्जर मिळतोच मिळतो. त्यावरच तर आपला फोन चालतो. पण येत्या काही काळात नवीन फोनसोबत हा चार्जर मिळणंच बंद झालं तर?

पूर्वी नवीन फोन विकत घेतला की त्याच्या बॉक्समधे चार्जर आणि इअरफोन असायचे. आता कोणत्याही फोनसोबत इअरफोन मिळत नाहीत. ते वेगळे मागवायला लागतात. इतकंच काय तर अलिकडे ब्ल्यूटूथ इअरफोनचा शोध लागल्यापासून अनेक कंपन्यांनी मोबाईलमधे इअरफोनची पिन घुसवण्यासाठी जॅक देणंही बंद केलंय. असाच नव्या मोबाईल फोनच्या बॉक्समधून त्याचा चार्जरही वगळण्यात आला तर?

अनेक कंपन्यांनी तर चार्जर वगळणं आधीच सुरू केलंय. त्यातच १ फेब्रुवारीला सादर झालेल्या देशाच्या बजेटमधे या चार्जर, इअरफोन आणि मोबाईलच्या इतर ऍक्सेसरीवरचा आयात कर वाढणार असल्याची घोषणा करण्यात आलीय. त्यामुळे इथून पुढं कोणत्याही कंपनीच्या नवीन फोनसोबत त्याचा चार्जर मिळणार नसल्याची शक्यता दाट झालीय.

चर्चा चार्जरच्या गैरहजेरीची

ऑक्टोबर २०२० मधे आयफोन १२ ची नवीन सिरीज लॉन्च करण्यात आली. ५ जी तंत्रज्ञानासोबत अनेक नव्या सुधारण्या या नव्या सिरीजमधे होत्या. पण या सुधारणांपेक्षा जास्त चर्चा झाली ती फोनसोबत वॉल चार्जर आणि एअरपॉड्स म्हणजे ऍपलचे वायरलेस इअरबड्स मिळत नसल्याची.

३० ऑक्टोबरपासून ही नवी सिरीज भारतात उपलब्ध झाली. या नव्या सिरीजमधल्या फोनची किंमत ७० हजारापासून सुरू होते. सगळ्यात महागडं वर्जन १ लाख ३० हजारापर्यंत जातं. म्हणजे ऍपलच्या आधीच्या सिरीजमधल्या फोनपेक्षा कितीतरी पट्टींनी जास्त. एवढं महाग असूनही या मोबाईलसोबत एअरपॉड तर सोडाच पण चार्जरही दिला जात नाही. फक्त यूएसबी टाईप सी केबल या फोनसोबत मिळते.

हेही वाचा : कशी चालेल फाइव जीची जादू?

कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी

आयफोन १२ सोबत आयफोन ११ आणि काही इतर सिरीजमधल्या नव्याने मॅन्युफॅक्चर होणाऱ्या फोन बॉक्समधेही चार्जर नसेल असं ऍपलने स्पष्ट केलं. पर्यावरण वाचवण्यासाठी हे पाऊल उचलत असल्याचं ते म्हणाले. चार्जर आणि एअरपॉड्स न दिल्याने ई कचरा आणि कार्बन उत्सर्जन कमी होईल, अशी ऍपलची भूमिका होती. 

२०३० पर्यंत ऍपलच्या उपकरणांमुळे होणारं कार्बन उत्सर्जन १०० टक्के कमी करायचं, असं ऍपल कंपनीचं ध्येय आहे. नव्या मोबाईल बॉक्समधे चार्जर आणि एअरपॉड नसतील तर ७० टक्के पॅकेजिंग कमी होईल. थोडक्यात, बॉक्स छोटा होईल. यामुळे एकावेळी भरपूर माल नेता येईल. याने वाहतुकीमुळे होणारं कार्बन उत्सर्जन कमी होईल. शिवाय, गरज नसताना एकापेक्षा जास्त चार्जर घरी पडून असल्यामुळे तयार होणारा ई कचरा कमी व्हायलाही आळा बसेल, असं ऍपलचं म्हणणं आहे.

पर्यावरण वाचवायचंय म्हणून?

मोबाईलसोबत मिळणार नसला तरी आयफोन घेणाऱ्यांना चार्जर लागणारच. निदान त्यांचा आहे तो चार्जर खराब झाल्यावर तरी त्यांना नवा घ्यावा लागणारंच. त्यामुळे फोनसोबत मिळाला नाही तर लोक बाहेरून चार्जर मागवतील. यातही वायरलेस चार्जिंगचा फार भारी पर्याय आयफोनसाठी उपलब्ध आहे. साध्या वॉल चार्जरपेक्षा म्हणजे भिंतीवरच्या इलेक्ट्रिक बोर्डमधे लावायच्या चार्जरपेक्षा यूजर्स या नव्या पर्यायालाच प्राधान्य देतील. आणि हा वायरलेस चार्जर वॉल चार्जरपेक्षा जवळपास ४० टक्के जास्त कार्बन उत्सर्जन करतो.

समजा, सगळे यूजर्स फक्त वॉल चार्जरच वापरतील असं गृहीत धरलं तरी त्यासाठी पुन्हा वेगळे पैसे मोजावे लागतीलच शिवाय कंपनीला हे नवे चार्जर आपल्यापर्यंत पोचवण्यासाठी पुन्हा वाहतुकीवर खर्च करावाच लागेल. त्यामुळे व्हायचं ते कार्बन उत्सर्जन होणारंच आहे, असं द वर्ज या अमेरिकन वेबसाईटवरच्या एका लेखात सांगितलंय. त्यामुळे ऍपलची ही भूमिका पर्यावरण प्रेम वगैरे काही नसून पैसे कमावण्याचं एक साधन आहे, हे स्पष्ट झालंय.

हेही वाचा : आता मोबाईलला रेंज नसलेल्या जागेवरूनही कॉल करता येणार

चार्जर नसेल तर काय करायचं?

ऍपलच्या या पर्यावरणाच्या काळजीसाठी आखलेल्या स्ट्रॅटेजीची सुरवातीला सगळ्या मोबाईल कंपन्यांनी टरच उडवली. आपण असं काही करणार नसल्याचंही अनेकांनी जाहीर केलं. मात्र हळूहळू यातून किती पैसे कमावले आणि वाचवले जाऊ शकतात याचा अंदाज त्यांना आला. मग पर्यावरणाचं कारण पुढे करत सॅमसंग आणि झियोमी सारख्या ब्रँडने आपणही मोबाईलसोबत चार्जर देणार नसल्याचं जाहीर करन टाकलं. नुकतंच जानेवारी २०२१ मधे सॅमसंग गॅलेक्सीचं नवीन मॉडेलही चार्जरशिवाय विकलं जातंय.

हे दोन्ही ब्रॅंड भारतात खूप चालतात. त्यामुळे त्यांचं अनुकरण करून इतर कंपन्याही लवकरच आपल्या बॉक्समधून चार्जर गायब करणार असल्याची शक्यता निर्माण झाली होती. त्यातच १ फेब्रुवारीला झालेल्या बजेटमधे चार्जर आणि मोबाईल ऍक्सेसरीवरचा आयात कर वाढवण्यात आलाय. त्यामुळे आता या शक्यतेवर शिक्कामोर्तब होईल अशी चिन्ह दिसतायत.

पण एक लक्षात ठेवा. असा चार्जर मिळाला नाही तरी घाबरायचं काम नाही. कारण, पर्यावरणाचा आणि यूजर्सचा विचार करता युनिवर्सल चार्जर किंवा चार्जिंग बुथ सारख्या संकल्पना लवकरच प्रत्यक्षात यायलाही वेळ लागणार नाही.

हेही वाचा : 

कॅमेरा विकत घेताय, मग हे नक्की वाचा

आयफोनः नव्या जगाचा स्टेट्स सिम्बॉल

२०१९ चा निरोपः आपला मोबाईल कसा बदलला?

स्मार्टफोनच्या जमान्यातही लोकांना फीचर फोनचा नाद का सोडवत नाही?