जुन्या इफ्फीच्या ताज्या आठवणी

१७ जानेवारी २०२१

वाचन वेळ : ४ मिनिटं


इफ्फी हा गोव्यात होणारा आंतरराष्ट्रीय सिनेमा महोत्सव. यातला एक सिनेमा पाहिला तरी हजार पानांचं पुस्तक वाचल्याचा अनुभव येईल इतका दर्जेदार असतो. दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात सुरू होणाऱ्या या महोत्सवाची सुरवात यंदा कोरोनामुळे १६ जानेवारीपासून झालीय. प्रत्यक्ष आणि ऑनलाईन असं त्याचं हायब्रीड स्वरूप असणार आहे. यानिमित्ताने गेल्या काही वर्षातल्या महोत्सवातल्या आठवणी ताज्या करायला हव्यात.

||एक||

तो बोलत होता. थेटर हाऊसफुल होतं. प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत होता. टाळ्या कडाडत. हसू फुटत होतं. झामकन वातावरण गंभीरही व्हायचं. अभिनेता विचारी, विचारवंत असेल तर आशयाला किती उंचीवर नेऊ शकतो ते लक्षात येत होतं. विषय होता अभिनय कसा करावा? आणि बोलत होता बोमन इराणी. 

तो बोलत असताना एक महिला निघून जात होती. थेटरमधे काही लोक उभे राहून त्याला ऐकत होते आणि गर्दीतून वाट काढत जाणाऱ्या महिलेकडे दुडूदुडू जात बोमन तिच्याशी बोलला.

‘का निघून जाताय?’ त्यानं विचारलं. महिला म्हणाली, ‘मुलाला शाळेतून घरी आणायचं आहे. त्यामुळे जावं लागतंय.’ या प्रसंगालाही अभिनय या विषयाच्या विस्ताराचा भाग म्हणून बोमनने केलेली एकजीव सांधाजोड लाजवाबच! अभिनेत्याला तंत्रज्ञानाचे बारकावे कसे माहीत असावे लागतात, याचं त्यानं केलेलं विवेचन आठवणीत राहिलं.

||दोन||

ते आले आणि ऐकायला आलेल्यांची संख्या पाहून थक्क झाले. ‘आता मला ऐकायला आठ - दहा लोक येतील. ते ज्येष्ठ नागरिक असतील, असं मला वाटलेलं. पण तुम्ही एवढी गर्दी केलीत, तरुण मुलंही आली. मलाही आश्चर्य वाटलं,’ हे त्यांनी नमूद करत आभारही मानले. मग ते बोलत राहिले. ‘सिनेमाच्या विषयाची वैश्विकता महत्त्वाची. ती असेल तर असा सिनेमा कितीही काळ जिवंत राहू शकतो. सिनेमा एकतर चांगला असतो किंवा वाईट. बाकी वर्गीकरण मी करत नाही,’ श्याम बेनेगल बोलत होते.

||तीन||

कला ही काही क्रांती करत नसते. पण क्रांतीचं कारण मात्र होऊ शकते. तंत्रज्ञानापेक्षा आशयच महत्त्वाचा. तंत्रज्ञान नंतर. कंटेंट इज द किंग. डॉ. गिरीश कासारवल्ली स्पष्ट आणि स्वच्छ. मला गोष्ट सांगायला आवडते. मी माझ्या पद्धतीने गोष्ट सांगतो. बाकी अन्वयार्थ प्रेक्षक काढतील. ते वाहत राहिलेलं संपूर्ण महोत्सवात. महोत्सव तेव्हा दहा दिवसांचा असायचा.

खूप सजवलेला केक आहे. पाहताच जिभेला पाणी सुटलं. तुम्ही खाल तेव्हा तो बेचव असल्याचं तुमच्या लक्षात आलं तर? सिनेमा अभ्यासकांच्या गटामधे झालेल्या जाहीर चर्चेत लक्षात राहिलेलं वाक्य.

हेही वाचा : जलिकट्टू : माणसाच्या अंतरंगात लपलेल्या हिंस्र जनावराचं दर्शन देणारा सिनेमा

||चार||

अमेरिकेत कास्टिंग दिग्दर्शक निर्मितीसाठी काम करतात. भारतात कास्टिंग दिग्दर्शकाची भूमिका पूर्णपणे वेगळी आहे. कास्टिंग ही सर्जनशील प्रक्रिया आहे. कास्टिंग सोसायटी ऑफ अमेरिकेच्या सदस्य नॅन्सी बिशप बोलत होत्या. वेगळाच पैलू पडद्यामागचा उलगडत गेलेला.

||पाच||

नसिरुद्दीन शहा बोलून गेला, मी जगाच्या कानाकोपऱ्यात जाऊन नाटक, सिनेमे पाहिले. निळू फुलेंसारखा ताकदीचा अभिनय पाहायला मिळाला नाही. अशा कैक आठवणींची गर्दी इफ्फीचा विचार करताना धडका मारत होती.

||सहा||

जगभर चंगळवादी लालसा वाढलीय. पैशासाठी वाट्टेल ते करायची प्रवृत्ती वाढतेय. सगळंच काही हवंहवंसं जगाला वाटू लागलंय. ही हाव चांगली नाही. ती आपल्याला जग नष्ट करण्याकडे घेऊन जातेय. आम्ही कृतज्ञ होणं थांबवलंय. जगाच्या सुंदर रचनेलाच आम्ही विसरलो आहोत. बोलत होते निकिता मिखालकोव.

हेही वाचा : मनातला रावण काढायची ‘ऊर्मी’ देणारा स्वदेस

सिनेमाची उत्तरं मिळवण्याचं ठिकाण

जागतिक कॅलिडोस्कोपच्या प्रवासाच्या किती अनंत या आठवणी. भारताच्या आंतरराष्ट्रीय सिनेमा महोत्सवातल्या – इफ्फी म्हणजेच इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडियामधल्या. २००४ पासूनच्या. एकेक सिनेमा म्हणजे हजारो पानांचं पुस्तक वाचल्याचा अनुभव. देखणा तापदायी सोहळा. बदल, परिवर्तन, क्रांती, माणसाला किमान तारतम्याने विचार करायला लावणाऱ्या एकसे एक कलाकृती. जग बदलो न बदलो, अमुक अमुक अयोग्य आहे आणि ते ठोका घालून दुरुस्त केलं पाहिजे इतकी कलात्मक जाणीव व्यक्ती स्तरावर देणारे जगाच्या कानाकोपऱ्यातले सिनेमे.

सिनेमा म्हणजे काय? तो कसा पहावा? त्याची निर्मिती कशी करतात? कमी पैशात कशी निर्मिती करावी? ती करताना कोणती काळजी घ्यावी?  सिनेमाचं लायटिंग म्हणजे काय? ध्वनीमुद्रण म्हणजे काय? कलाकारांची निवड कशी करतात? गाणी, संगीत म्हणजे काय? व्यक्तिरेखेचा विकास कसा केला जातो? कथा, पटकथा, संवादात पहिल्यांदा कागदावर आणि नंतर संपादनाच्या मेजावर सिनेमा आकाराला जातो असं का म्हणतात?

यासारख्या अनंत प्रश्नांच्या मांदियाळीची काही उत्तरं हमखास मिळणारं ठिकाण म्हणजे चुकवू नये असे इफ्फीसारखे महोत्सव. एकवर्षी तर रंग आणि सिनेमाचा आशय अशा दृष्टिकोनातून एका चित्रकर्मीने केलेली सुंदर मांडणी ऐकता-पाहता आलेली.

सिनेमाची परिभाषा बदलली

जगभर हिंसाचाराचा आगडोंब उसळलेला आपण पाहतोय. भरचौकात फासावर लटकवलं पाहिजे यासारखा आवाज टिपेला पोचलाय. माणूस माणसाला ठार करून रक्ताच्या थारोळ्यातल्या मृतदेहावर नाचतो. त्यासाठी काहीही चालतं. जात, देव, धर्म, भाषा, प्रदेश, लिंग, वर्ण, वर्ग काहीही. द्वेषमूलकता किती भयानक वास्तव निर्माण करते, याचा थक्क करणारा पट मांडणारे जगभरातले सिनेमे पाहताना माणूसपण वाढायला मदत होते.

एका वर्षी तर धर्म विषयाला वाहिलेली मालिकाच या महोत्सवात होती. युद्धपटांच्या मालिकांची निवड तर अफलातूनच असायची. अलीकडच्या काही वर्षांत निवडीविषयीदेखील प्रश्न पडताहेत. द्वेषमूलकता वाढवणारे ऑडियो विज्युअल विडियो आपल्या हातातल्या मोबाईल नामक यंत्रावर आदळतात. आपण त्या पाहायच्या की जगभरातले सिनेमे पाहायचे ही निवड आपल्याला करायचीय.

आता सिनेमाची परिभाषा बदललीय. थेटरात जाऊन पाहणं या भाषेपुरतं आपण परिचित होतो. तंत्रज्ञानाने या भाषेत बदल केले. आठवा, पहिल्यांदा टीवी पाहिल्याचा अनुभव. पहिल्यांदा मोबाईलवर पाहिलेला, लक्षात राहिलेला सिनेमा. आता तर कोरोना साथरोगाच्या काळात महोत्सवाच्या नियोजनातही काही बदल झाले. तुम्हाला लिंक मिळणार आणि तुम्ही ती घरबसल्या पाहणार.

हेही वाचा : नागराज मंजुळेंनी आरएसएसच्या शाखेत जाणं का थांबवलं?

संवादाची गळा भेट होईल?

२० नोव्हेंबरपासून दरवर्षी होणारा हा महोत्सव यावेळी कालपासून म्हणजेच १६ जानेवारीपासून सुरू झालाय. यंदा त्याचं स्वरूप प्रत्यक्ष आणि ऑनलाईन असं हायब्रीड आहे. हा महोत्सव गावागावांत गटागटांनी पाहिला गेला तर सिनेमाची साक्षरता वाढेल. अशा किती तरी अर्थांनी तंत्रज्ञानाने सिनेक्षेत्र मुक्त झालंय. सामूहिक आनंदाची मजा घरबसल्या नाही हे खरंच. आभासी संपर्क आणि गळाभेटीतला स्पर्शाचा संवाद पुन्हा काही मुलभूत फरकाची बाकी सलत राहते.

असं असलं तरी माणूस सर्व संकटांवर मात करत आल्याचा इतिहास आहे. कोरोनाही जाईल आणि हायब्रीड न राहता प्रत्यक्षातल्या महोत्सवाची स्पर्शाची, संवादाची गळाभेट नक्कीच होईल. यंदा अंतर राखून मात्र मानवीयतेचं अंतर पडू न देता मानवीयतेच्या जागतिक सफरीचा आनंद घेऊन जगूया.

हेही वाचा : 

ऑस्करच्या आयचा घो!!

तान्हाजी सिनेमातल्या शिवरायांचं काय करायचं?

सिनेमांची संख्या कमी होतेय, हे चांगलं की वाईट?

ऋषी कपूर : ‘ढाई किलो’च्या हाताखाली दबला गेलेला हिरो

भानूताई सिनेमाच्या काळाचा अभ्यास करून वेशभूषा ठरवायच्या