डॉ. दाभोलकरांच्या मारेकऱ्यांची ओळख पटली, सूत्रधार कधी पकडणार?

०१ एप्रिल २०२२

वाचन वेळ : ६ मिनिटं


डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची २० ऑगस्ट २०१३ला पुण्यात हत्या झाली. त्यांच्या हत्येचा आरोप असलेले सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना १९ मार्चला प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांनी न्यायालयात ओळखलं. सचिन-शरद यांना हत्या करण्यासाठी तयार करणारे सूत्रधार अजूनही पुढे आलेले नाहीत. ते आणण्यासाठी न्यायालयाने तपास यंत्रणेला भाग पाडलं पाहिजे.

अंधश्रद्धा निर्मूलक डॉ. नरेंद्र दाभोलकर, श्रमजीवींच्या हक्कांसाठी संघटित लढा देणारे कॉम्रेड गोविंद पानसरे, कर्नाटकातले संशोधक साहित्यिक एम.एम. कलबुर्गी, सत्यशोधक-संपादक गौरी लंकेश; ही काही अपार लोकप्रियता मिळवलेली किंवा आपल्या विचार-कार्याने निवडणुकांत जनमत बदलवणारी माणसं नव्हती. किंबहुना, जनमताच्या रोषाला हिमतीने सामोरं जात सत्य-असत्याचं दर्शन-प्रदर्शन घडवण्याचं काम ते सातत्याने करत होते.

'काम लोकहिताचं, पण ते ज्यांच्यासाठी करायचं त्यांचीच पाठ!' असा विपरीत अनुभव पचवत ते आपलं काम चिकाटीने करत होते. तरीही त्यांच्या २०१३ ते २०१५ या काळात एका पाठोपाठ एक निर्घृण हत्या झाल्या. कारण देशात आज जे ताणतणावाचं वातावरण आहे, त्याची पाळंमुळं रुजू नयेत, यासाठी त्यांचा लोकजागृतीचा आटापिटा सुरू होता. त्याला मर्यादा होत्या.

विधानसभेतल्या भाजपच्या १२ आमदारांचं निलंबन होताच, जशा 'लोकशाहीचा खून' झाल्याच्या बोंबा उठल्या; तशा लोकशाहीची मूल्यं जतन करण्यासाठी आयुष्याची बाजी लावणार्‍या या चौघांच्या हत्या झाल्यावर लोकशाहीचा खून झाला अशा घोषणा देत रस्त्यावर उतरले, असं झालं नाही. उलट, 'त्यांच्या हत्या वेगळ्याच कारणासाठी झाल्या,' अशी त्यांची बदनामी करणार्‍या कुजबुज चर्चा सुरू झाल्या. हा सामाजिक उफराटेपणा सनातन आहे.

दाभोलकरांच्या हत्येचं कनेक्शन

या चारातली पहिली हत्या डॉ. दाभोलकर यांची पुण्यात २० ऑगस्ट २०१३ला झाली. त्यांची हत्या केल्याचा आरोप असलेले सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना १९ मार्चला प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांनी न्यायालयात ओळखलं. 'अंदुरे आणि कळसकर यांनी डॉ. दाभोलकर यांच्यावर गोळीबार केला आणि पळ काढला,’ असं त्यांनी न्यायालयाला सांगितलंय.

विशेष न्यायाधीश एस.आर. नावंदर यांच्यापुढे पुणे न्यायालयात या खटल्याची सुनावणी सुरू असून या प्रकरणात सनातन संस्थाशी संबंधित डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, ॲड. संजीव पुनाळेकर, विक्रम भावे यांच्यासह आता सचिन अंदुरे व शरद कळसकर यांच्यावरही आरोप निश्चित करण्यात आले आहेत.

औरंगाबाद इथं राहणाऱ्या सचिन आणि शरद यांना ऑगस्ट २०१८ मधे अटक झाली. मुंबई-विरार दरम्यानच्या नालासोपारा इथं राहणारा सनातन साधक वैभव राऊत याच्या घरी एटीएसने टाकलेल्या धाडीत शस्त्रं आणि स्फोटकाचा साठा सापडला.

त्यावेळी वैभव राऊत याच्या चौकशीतून सुधन्वा गोंधळेकर, श्रीकांत पांगारकर, गणेश कपाळे, अविनाश पवार यांच्यासह सचिन आणि शरद यांची नावं पुढे आली. यातून स्फोटकांचं नालासोपारा, जळगाव, जालना, सातारा, कोल्हापूर, मुंबई असं मोठं 'कनेक्शन ओपन' झालं.

आरोपींचा वकील कटकारस्थानात

सचिन अंदुरेला औरंगाबादेतल्या राहत्या घरातून अटक झाली; तर शरदला कोल्हापुरात अटक झाली. या दोघांच्या चौकशीतून ॲड. संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांची नावं पुढे आल्यावर त्यांनाही मे २०१९ मधे अटक करण्यात आलं.

विशेष म्हणजे, संजीव पुनाळेकर हे टीवी मीडियातून सनातन संस्थेचे प्रवक्ते म्हणून बाजू मांडत होते; तसंच डॉ. दाभोलकर आणि कॉम्रेड पानसरे हत्या खटल्यात संशयित आरोपीचे वकील म्हणून काम पाहात होते. त्यांच्यावर हत्येच्या कट-कारस्थानाबरोबरच हत्येसाठी वापरलेलं पिस्तुल नष्ट करण्यासाठी ते ठाण्याच्या खाडीत फेकून दिल्याचा आरोप आहे.

या कारस्थाना संबंधाने विक्रम भावे यालाही आरोपी करण्यात आलं. ३१ मे २००८ला ठाण्याच्या गडकरी नाट्यगृहात आणि ४ जून २००८ला नवी मुंबई- वाशी इथल्या विष्णुदास भावे नाट्यगृहात 'आम्ही पाचपुते' या नाटकाच्या वेळी बॉम्बस्फोट झाले; तेव्हा सनातन संस्था, पनवेलशी संबंधित सहा जणांना अटक झाली. त्यात विक्रम भावे होता.

भावेच्यावतीने ॲड. संजीव पुनाळेकर यांनी उच्च न्यायालयात जामीन अर्ज दिल्यावर ३० ऑगस्ट २०११ला न्या. पी.बी. हरदास आणि न्या. मृदुला भाटकर यांनी २० हजार रुपयांच्या जामिनाला मंजुरी दिली आणि विक्रम भावेची सुटका झाली.

हेही वाचा: गोविंद पानसरे: डोंगराला भिडणारा म्हातारा

दाभोलकरांच्या हत्येची कबुली

दरम्यान, 'गडकरी आणि भावे नाट्यगृह बाँबस्फोट' प्रकरणाच्या खटल्यात आरोपी असलेल्या रमेश गडकरी आणि विक्रम भावे यांना न्यायालयाने १० वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. ते प्रकरण वरच्या कोर्टात अपिलात असतानाच; डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणात अटक झालेल्या डॉ. वीरेंद्र तावडे याच्या चौकशीनंतर विक्रम भावे यालाही अटक करण्यात आली.

बाँबस्फोटाच्या प्रकरणात जामिनावर सुटल्यावर भावे याने डॉ. दाभोलकरांच्या खूनाचा आरोप अंगावर घेण्याचा पराक्रम केला होता. या प्रकरणातही त्याची एक लाखाच्या जामिनावर न्यायालयाने सुटका केली. दरम्यान, त्याने 'मालेगाव बाँबस्फोटातले अदृश्य हात' हे पुस्तकही लिहिलंय.

नालासोपारा शस्त्रं-स्फोटक साठा प्रकरण फडणवीस सरकारच्या काळात बाहेर आल्यामुळे डॉ. दाभोलकर हत्येचे सचिन आणि शरद यांच्यापर्यंत पोचणारे धागेदोरे तपास यंत्रणेच्या हाती लागले. एटीएसने ही धाड कर्नाटकाच्या तपास यंत्रणेमुळे घातली होती. ती यंत्रणा कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्या हत्येचा मागोवा घेत नालासोपारापर्यंत पोचली होती. तेव्हा कर्नाटकात काँग्रेस-जनता दलाचं सरकार होतं. सचिन आणि शरद यांनी अटक होताच आपण डॉ. दाभोलकर यांच्या हत्येशी संबंधित असल्याची कबुली दिली होती.

अंदुरे-कळसकर धर्मासाठी लटकले?

सचिन आणि शरद या दोघांचीही कौटुंबिक स्थिती साधी-गरीब आहे. एक मुलगी असलेला सचिन कापडाच्या दुकानात काम करायचा; तर शरद कोल्हापुरात आयटीआयचं शिक्षण घेऊन नोकरीच्या प्रतीक्षेत होता.

औरंगाबाद जिल्ह्यातल्या केसापुरीचा शरद हा अल्पभूधारक शेतकर्‍याचा मुलगा. गावात २०१० मधे हिंदुत्ववादी संघटनेचा धार्मिक कार्यक्रम झाला, तेव्हा तो १६ वर्षांचा होता; आणि दाभोलकरांचा खून करण्यासाठी त्याची निवड २०१२मधे झाली, तेव्हा तो १८ वर्षांचा होता. वयाच्या १९ व्या वर्षी त्याने दाभोलकरांची हत्या केली. एवढ्यावरच तो न थांबता, आपल्या साथीदारांसह पुढील खूनाच्या नियोजनात गुंतला होता.

बारावीपर्यंतचं शिक्षण झाल्यावर शरदने गाव सोडलं आणि कोल्हापूरला गेला. तिथं आपण 'टर्नर-फिटर'चं काम करत असल्याचं त्याने घरच्यांना सांगितलं होतं. चारपाच महिन्यांनी घरी यायचा. घरच्यांना ५-१० हजार रुपये द्यायचा. कोल्हापुरात चांगलं शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उद्योग उभारणार असल्याचं स्वप्न; तो घरच्यांना ऐकवायचा. पण त्याचे वेगळेच उद्योग सुरू आहेत, याची पुसटशीही कल्पना घरच्यांना नसावी.

२०१०ला गावातल्या धार्मिक कार्यक्रमात जाणारा शरद २०१९मधे दाभोलकरांच्या खून प्रकरणाचा आरोपी म्हणून पकडला जाईल, याची अंधुकशी कल्पना दरम्यानच्या ७ वर्षांच्या काळात त्याच्या पालकांना का आली नसेल? त्यांना आता आपला मुलगा भगतसिंगसारखा वाटत असेल का? हे प्रश्न शरदच्या पालकांपुरतेच मर्यादित नाहीत. सचिन, वैभव, गणेश, श्रीकांत, अविनाश अशी ही मोठी यादी आहे.

हेही वाचा: अमेरिकेतल्या ब्लॅक लाईव्ज मॅटर आंदोलनाचं काळंगोरं वास्तव

बुद्धिनाश करणारे सनातनी उद्योग

२०१४मधे मोदी सरकार केंद्रात स्थानापन्न झाल्यावर आसाराम बापूला तुरुंगात आपण एकटे आहोत असं वाटू नये; यासाठी हरयाणा-हिस्सारचा बाबा रामपाल, उत्तर प्रदेशातला बाबा रामवृक्ष, पंजाबातला बाबा राम रहीम यांचीही तुरुंगात रवानगी झाली. त्यानिमित्ताने मोदी सरकारही हिंदूंच्या विरोधी आहे का? अशी चर्चा एका टीवी चॅनलने ठेवली होती. त्यात अॅड. पुनाळेकर यांच्या बरोबर मीही होतो.

पुनाळेकर हे तुरुंगात अटकेत असलेल्या बाबा-बापूंना संत म्हणत त्यांची बाजू मांडत होते. ते 'सनातन’ संस्थेचे प्रवक्ते म्हणून उपस्थित होते. त्याचा उल्लेख करून मी त्यांना विचारलं, 'आध्यात्मिक गुरूंना आणि परमपूज्यांच्या संस्थेला वकिलाची - प्रवक्त्याची गरज का लागते?'

या प्रश्नाने अॅड. पुनाळेकर हडबडले. त्यांची ती अवस्था बघून म्हणालो, 'भाजपचं मोदी सरकार ज्या बुवा-बाबा-बापूंची शिडी करून, देशात धार्मिक उन्माद वाढवून सत्तेवर आलं; ती शिडी आपल्यासाठी घातक होऊ नये, यासाठी मोडीत काढत आहे. तशीच सनातनचीही गत होईल, या भीतीपोटी पुनाळेकर आपली नाराजी व्यक्त करत असावेत. अशी नाराजी व्यक्त करण्याऐवजी बहुजन तरुणांचा बुद्धिनाश करणारे तुमचे सनातनी उद्योग थांबवा!'

यातल्या शेवटच्या वाक्यावर ते अस्वस्थ झाले. कार्यक्रम संपल्यावरही ते मला तसं काही नाही असं समजावून सांगत होते. मी त्यांना दाखले देत होतो. ते निरुत्तर होत होते. शेवटी निरोप घेताना म्हणालो, 'तुम्ही वकील-प्रवक्ते आहात. पण आरोपी असल्यासारखे बोलताय!' तेव्हा ते दाभोळकर- पानसरे खून खटल्यात आरोपी होतील, असं वाटलं नव्हतं.

सुत्रधारांचं काय?

सचिन-शरद हे दाभोलकर हत्येतले आरोपी आहेत, याचा थांग त्यांना अटक होईपर्यंत त्यांच्या घरच्यांना लागला नव्हता. ५-७ वर्षं क्रौर्य दडवून ठेवण्याचा सराईतपणा कसा येतो? हत्येला 'वध' म्हटलं की क्रौर्याला धर्मपालनाचा दर्जा मिळतो, असं धर्मांधांचं शास्त्र सांगतं. ते आत्मसात केल्यामुळे सचिन-शरदमधे दाभोलकरांच्या हत्येचा सल राहिला नसावा.

या दोघांनाही प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांनी न्यायालयात ओळखल्यामुळे त्यांना कठोर शिक्षा होईल, असं गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील म्हणालेत. पण त्याने काही संभाव्य धोका टळणार नाही. सचिन-शरद यांना दाभोलकर-पानसरे यांच्या हत्या करण्यासाठी तयार करणारे सूत्रधार अजूनही पुढे आलेले नाहीत. ते आणण्यासाठी न्यायालयाने तपास यंत्रणेला भाग पाडलं पाहिजे. कारण हेच सूत्रधार सचिन-शरद यांना शोधून लोकहितार्थ कार्य करणार्‍यांच्या हत्येचे बेत आखत असतील.

हेही वाचा: 

हिंदू राष्ट्राचं स्वप्न साकार होईल का?

बरा झाला. नायतर माझ्या विठूक कोरोना जायत

चीन कधीच जगावर सत्ता गाजवू शकत नाही, कारण

माझे जिवीची आवडी, पंढरपुरा आकाशमार्गे नेईन गुढी

(लेखक साप्ताहिक चित्रलेखाचे संपादक असून हा लेख चित्रलेखाच्या ताज्या अंकातील संपादकीय आहे)