दिवाळी स्पेशल कथा : ‘ब्याव’

१५ नोव्हेंबर २०२०

वाचन वेळ : १८ मिनिटं


दिवाळीत फराळाची, मिठाईची रेलचेल असते तशी दर्जेदार बुद्धीसाठी पौष्टिक साहित्याचीही चंगळ असते. दिवाळीनिमित्त पुस्तकांच्या दुकानात खास सूट वगैरेही मिळते. त्यासोबतच दिवाळी अंकातून, पेपरामधून प्रसिद्ध होणाऱ्या कथा, कविता आपलं वेगळेपण ठळकपणे दाखवत असतात. अशीच एक वेगळी मारवाडी लहेजातली अमृता देसर्डा यांची स्पेशल मराठी कथा : ‘ब्याव’ दिवाळीनिमित्त कोलाजच्या वाचकांसाठी.

सूरज आणि अर्चना दोघेही सूरजच्या घराच्या अंगणातल्या झोपाळ्यात बसले होते. ऊन चांगलंच डोक्यावर आलं होतं. दोघांच्या मनात खळबळ चालू होती. अर्चनाच्या हृदयाची धडधड वाढली होती. तिनं हळूच मोबाईल स्क्रीनवरून तिच्या वडीलांना फोन लावला. सूरज तिच्या बाजूलाच बसून सगळं ऐकत होता. 

‘पप्पा, म्हे अर्चू बोलू.’

इतकं बोलून अर्चना शांत राहिली थोडावेळ. तिची धडधड वाढली होती.

‘हा बोल बेटा. कठे है, आव जिमने;’ पलीकडून आवाज आला.

‘पप्पा, थे चिडो नको प्लीज. म्हे, म्हे नं सूरज साते आज रजिस्टर ब्याव कऱ्यो’

‘काय? कै बोले तू समजे नं?’ अर्चनाच्या वडिलांचा एकदम चिडका आवाज आला.

‘हा पप्पा’

‘तू कै बोले समजे कै थने’ आता तिच्या वडीलांचा रडका आवाज येऊ लागला. ते कुणाशी तरी दुसऱ्याशी बोलायला लागले. एकीकडे फोन चालूच होता.

‘देखो, कै बोले या छोरी. हे भगवान, बचाव म्हने. कै बोलू म्हे अबे. अर्चूरी मम्मी देखो, कै केयरी हे या. ब्याव कर काढी छोरी. हे ऐकण्याआधी मी मेलो असतो तर बरं झालं असतं. अर्चनाचे वडील आता रडू लागले. त्यांच्या मोठ्या मुलीने फोन घेतला.

‘अर्चना, कठे है तू?’ तिच्या बहीणीने अर्चनाशी बोलायला सुरूवात केली.

’जिजी, म्हे सूरज रा घरे. सुखरूप हू.’

‘वठे कै करे? पप्पा रोवने लाग्या. तू लग्न केलंस आम्हाला न सांगता? तुला काहीच कसं नाही वाटलं. आत्ताच्या आत्ता घरी ये.’

‘नही, जिजी. म्हे नही आवणार अबे. अर्चना पण रडू लागली. तिला बोलणं अवघड झालं. तिनं फोन ठेवून दिला.

इकडे अर्चनाच्या कुटुंबात हलकल्लोळ झाला. तिचं एकत्र राहणारं जैन कुटुंब. अर्चना चांगली उच्चशिक्षित. २७ वर्षांची. नोकरी करणारी. तिच्या घरी दादा, दादी, भैया, भाभी, बहीण, मम्मी, पप्पा सगळे एकत्र राहायचे. दहा बारा जणांचे एकत्र कुटुंब. सगळेजण घराच्या हॉलमधे घोळका करून बसले. वातावरण खूप गंभीर झालं होतं. सकाळी कामाला जाते म्हणून गेलेली अर्चना अचानक लग्न झाल्याचं कळवते. तो धक्का कुणालाच पचवता येत नव्हता. अर्चनाची आई तर चक्कर येऊनच आडवी पडली. तिचे वडील आधी खूप रडले. पण थोड्यावेळाने सावरले. तिच्या मोठ्या भावाने अर्चनाला पुन्हा फोन केला.

‘अर्चू, तू कठे है, म्हे आऊ थने मिळणे?’

‘ नको भैया, म्हेच आऊ सूरज साते.’ अर्चना त्याला म्हणाली.

‘फोन सूरज ने दे जरा’

अर्चनाने सूरजला फोन दिला.

आधी काय बोलावं हे दोघांनाही कळत नव्हतं. पण अर्चनाचा भाऊ समजूतदार होता. त्याने दोघांना घरी भेटायला बोलावलं. इकडे लग्न झाल्याची बातमी तिच्या कॉलनीत वाऱ्यासारखी पसरली. तिच्या दोन मैत्रिणी घरी आल्या. तिची आई त्यांना पाहून पुन्हा हळवी झाली.

‘काय केलं माझ्या पोरीने बघा. तुम्हाला नाही का सांगितलं अर्चूने? केवढा मोठा निर्णय घेतला बघा तिनं.’

अर्चनाच्या मैत्रिणी पण शॉकमधे होत्या. त्यांना सूरज आणि अर्चना दोघांच्या अफेयरबद्दल कल्पना होती, पण अर्चना लग्नाचं पाऊल उचलेल असं कधी वाटलं नाही. त्यांनाही रडू आलं. अर्चनाचे आज्जी, आजोबा पण घरातच होते. त्यांनाही काय बोलावं हे समजत नव्हतं. पण आता नातीने घेतलेला निर्णय स्वीकारण्याशिवाय पर्याय नाही हे समजून ते फक्त घडेल ते पाहत होते.

‘काकू, सूरज तसा चांगला मुलगा आहे. पण अर्चना त्याच्याशी लग्न करेल याची आम्हाला अजिबात कल्पना नव्हती. खरं, देवा शप्पथ. आम्ही का खोटं बोलू?’ त्यातली एक मैत्रीण हळूच म्हणाली.

‘सूरजला ओळखतो आम्ही. तो यायचा घरी. एकदा, दोनदा आला होता.’ अर्चनाची आज्जी त्यांना म्हणाली.

‘आयो, घरे आयो, आणि म्हारा छोरीने फसायो, हे भगवान, कै करू, कठे मुंडो भतावू? कै पत ऱ्हिला अपना समाज म्हे. दादीसा कै करू म्हे’ पुन्हा तिची आई मोठ्याने रडू लागली. त्यांचे रडणे ऐकून घरातल्या बायका पण रडू लागल्या. बिन्नीने केलेला चहा पण कुणी पिलं नाही. फक्त अर्चनाच्या दादांनी चहा घेतला.

‘बिन्नी, फोन लागावो अर्चूने. म्हने देखनो है उन्हे, उन्हे बुलावो.’ बिन्नी अर्थात भाटिया कुटुंबाची एकुलती एक सून. ती तिच्या सासूबाईंचं सांत्वन करू लागली.

‘मम्मीजी, शांत हुजाओ. रोवो मती. वा आणि सूरज आवे है. प्लीज शांत हुजाओ.’ सून त्यांना जवळ घेऊन म्हणाली.

भाटिया परिवार हा तसा धार्मिक आणि सज्जन परिवार. त्यांच्या संपूर्ण खानदानात आंतरजातीय विवाह कुणी केला नव्हता. अर्चना भाटिया हिनं पहिल्यांदा हे पाऊल उचलल्यामुळं त्यांना चांगलाच धक्का बसला होता. त्यांच्या घरात असं कधीच झालं नव्हतं. तिचे वडील चहाचे व्यापारी. त्यांचा मुख्य बाजारपेठेत मोठा धंदा होता. दुपारी ते नेहमीप्रमाणे दुकान बंद करून घरी जेवायला आले होते. त्यांची बिन्नी त्यांना गरम गरम फुलके वाढत होती. आणि जेवता जेवताच त्यांना ही धक्कादायक बातमी समजली होती. तशी त्यांना  सूरज आणि अर्चनाची मैत्री आहे हे ठाऊक होतं. ती त्याला भेटते हे माहीत होतं. पण त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं होतं. आपली मुलगी ही जैन संस्कारात वाढली आहे. ती कधीच असलं काही चुकीचं पाऊल उचलणार नाही असा विश्वास त्यांना होता. अर्चनावर त्यांचा विशेष जीव होता कारण ती कुटुंबातली सगळ्यात जास्त शिकलेली लाडकी लेक होती. डबल ग्रॅज्यूएट होऊन चांगल्या कंपनीत काम करत होती. तिच्यासाठी चांगला मुलगा पाहून ते तिचं लग्न धुमधडाक्यात करणार होते. पण अर्चनाने त्याचं स्वप्नं चांगलंच धुळीला मिळवलं.

अर्चनाचा फोन येऊन एक तास होऊन गेला. इकडे सूरजच्या घरी त्याचे आई-वडील, भाऊ, दोन बहीणी हे सगळे होते. सूरज आणि अर्चना एकाच कॉलेजमधे होते तेव्हापासून त्यांचे प्रेम प्रकरण चालू होतं. सूरज पुढे शिकला नाही. पण अर्चनाच्या संपर्कात होता. त्याला बरी नोकरी होती. तोही एकत्र कुटुंबात रहात होता. त्याचं मराठी कुटुंब. अर्चना लग्नाच्या आधी त्याच्या घरी यायची, जायची. चार ते पाच वर्षांची त्यांची ओळख होती. त्यामुळे तिला सूरजच्या कुटुंबाचा आधार वाटत होता. घरातून स्थळं बघायला सुरूवात झाली होती. तिच्या वडिलांनी जैन वधू-वर सूचक मंडळात तिचा अर्ज तिला न सांगता भरला होता. त्यामुळे अर्चना आणखीनच घाबरली होती. आधी तिला घरात दादा, दादी यांच्याशी बोलावं वाटलं, पण त्यांनी कदाचित समजून घेतलं नसतं म्हणून तिनं त्यांना काही सांगितलं नाही.

इकडे अर्चनाच्या भावाला सूरजचं घर माहित होतं. तो अस्वस्थ झाला होता. आपली बहीण अशी वागेल यावर त्याचा अजिबात विश्वास नव्हता. त्याने त्याच्या घरी जायचा निर्णय घेतला. सूरजच्या घरी त्याचे आई-वडील, दोन मोठ्या बहीणी होत्या. तो जेव्हा गेला तेव्हा अर्चना साडीत होती. तिच्या गळ्यात मंगळसूत्र होतं. तिचं रूप पाहून हसावं की रडावं हे त्याला समजलं नाही.

‘अर्चू, तू क्यू कियो नही म्हने. म्हे पप्पा ने बतायो असतो.’ तिचा भाऊ काकुळतीने तिला पाहून म्हणाला.

‘भैय्या, म्हने घनो डर हुतो मन में. म्हणून नाही सांगितलं. आणि तुम्ही खरंच मान्य केलं असता?’

‘मला काही सांगू नको. आधी घरी ये. तुम्ही पण या,’ सूरज मग तिच्या भावाला म्हणाला,

‘दादा काळजी करू नका. आम्ही येतो. घरच्यांशी बोलतो.’ त्याच्या बहीणीही त्याला सांगू लागल्या.

‘तुमच्या घरी चालले नसते, असं अर्चना आम्हाला म्हणाली. आणि या दोघांना रजिस्टर पद्धतीनेच लग्न करायचं होतं. आम्हाला पण वाटलं तुमच्याशी आधी बोलून घ्यावं. पण आम्ही पण किती दिवस थांबणार. शेवटी आम्ही पाठीशी उभे राहिलो दोघांच्या,’ सूरजची मोठी बहीणी अर्चनाच्या भावाला म्हणाली.

‘ताई, हा धक्का खूप मोठा आहे पचवायला. आम्हाला थोडा वेळ लागेल. शेवटी कितीही केलं तरी अर्चू माझी छोटी बहीण आहे. तिने घेतलेला हा निर्णय स्वीकारायला माझ्या कुटुंबाला जड जाईल. असो. पण आता जे झालं त्यात चर्चा करण्यापेक्षा तुम्ही संध्याकाळी आमच्या घरी या. माझ्या आई-वडिलांना विश्वास द्या. आणि आत्ता या दोघांना आमच्या घरी पाठवा. काळजी करू नका. तुमच्या मुलाला काही होणार नाही,’ अर्चनाच्या दादांनं समजूतदारपणाची भूमिका घेतली. जे झालं आहे त्याला सामोरं जावून घरच्यांना समजून सांगणं त्याला महत्त्वाचं वाटत होतं. मग अर्चना आणि सूरज या दोघांना घेऊन तो घरी गेला.

सकाळी घरून निघताना अर्चनाने सलवार कमीज घातला होता. आणि आता ती साडीत होती.

घरी आल्यावर तिच्याकडे पाहून तिच्या आईनं तर हंबरडाच फोडला. तिच्या घरातले सगळेजण हॉलमधे आले. अर्चनालाही रडायला आलं. पण तिनं स्वतःला सावरायचा प्रयत्न केला. सूरज गोंधळला होता.

‘मम्मा, रोवू नको ना. मम्मा म्हने…’

‘इसो क्यू हुयो? कै कमी पड्यो थने. काय रे सूरज, तुला सांगावं नाही वाटलं का आम्हाला? माझ्या मुलीशी लग्न करून मोकळा झालास?’ तिची आई काकुळतीला येऊन म्हणाली.

‘काकू, सॉरी तुम्हाला सांगायची हिंमत आधी झाली नाही. पण तुम्ही काळजी नका करू. रडू नका.’ सूरज खूप मनापासून तिच्या आईला म्हणाला. त्याच्याही डोळ्यात अश्रू जमा झाले.

अर्चनाची आई फक्त रडू लागली. तिचे वडील एका खुर्चीत शांत बसले होते. अर्चनाने ते काहीतरी बोलतील म्हणून त्यांच्याकडे पाहिलं. तर तिच्या लग्न झाल्यानंतरच्या एकूणच रुपाला पाहून त्यांना रडूच कोसळलं. संपूर्ण आयुष्यात तिचे वडील कधीही इतके हमसून रडले नाही. पण त्यांचा मुलीला पाहून बांध कोसळला. तिचे दादा, भाभी, आज्जी, आजोबा सगळेजण त्यांच्या जवळ गेले. त्यांना समजावून सांगू लागले.

अर्चनाही जवळ गेली. त्यांना हळूच म्हणाली, ‘पप्पा, सॉरी. म्हे थाने विश्वास में लियो नही. म्हने माफ करजो आणि आशीर्वाद देवो.’

‘मी हे लग्न मानणार नाही. तू हे गळ्यात घातलेलं काढून टाक, विकास तिला तिच्या रुममधे जायला सांग. मी त्या कागदाला लग्न मानत नाही,’ तिचे वडील मोठ्याने खवळून म्हणाले.

अर्चना थोडी लांब झाली. मग शांतपणे म्हणाली,

‘पप्पा, मी आता २७ वर्षांची आहे. सज्ञान आहे. आणि तुम्ही जरी या कागदाला मानलं नाही, तरी कायदा या कागदाला ग्राह्य मानतो,’ तिनं सोबत लग्नाच्या प्रमाणपत्राची एक झेरॉक्स आणली होती. ती त्यांच्या हातात दिली. तिच्या वडिलांनी ती थरथरत्या हातानं बघितली आणि मुलाच्या हातात दिली. ते एकदम शांत झाले. आपलीच मुलगी आपल्या विरोधात उभी राहिली हे पाहून त्यांना काहीच बोलावं असं वाटलं नाही.

‘कल्पना तरी द्यायचीस. निदान विचारायचं तरी आम्हाला. आम्ही बोलून घेतलं असतं’ अर्चनाचे दादा आजोबा आता मधे पडले.

हेही वाचा : आज तर दिव्यांचा उत्सव आहे!

‘दादा, म्हारी हिम्मत नही हुई. म्हे भाभी किंवा दादी ने बोलणार हुती. पण नही बोली. म्हने प्लीज माफ करो. आशीर्वाद देवो. आणि अर्चना रडायला लागली. कोणी काहीच बोललं नाही. खूपवेळ शांतता नांदली. मग तिचे वडील तिला एकदम म्हणाले,

‘तू आता तिकडं जाणार का?’

‘हो पप्पा. सूरजच्या घरी.’

‘नको जावू बेटा. इथंच रहा,’ तिची आई रडत म्हणाली.

‘मम्मा, मी लग्न केलं. तर जावं लागेल नं’

‘नको जावू बेटा. नको जावू,’ तिची आई रडत रडत तिला म्हणाली.

‘जावू द्या तिला. मोठी झाली ना. सज्ञान झाली. समजतं तिला आता सगळं,’ अर्चनाचे वडील चिडून म्हणाले.

‘हो, मी मोठी झालेय पप्पा. तुम्हाला स्वीकार करावाच लागेल सूरजचा. तो चांगला आहे. तुम्ही ओळखता त्याला. आपल्या घरी तो आलाय, तुम्ही त्याच्या घरच्यांना ओळखता. माणसं महत्त्वाची. जात नाही.’

‘कै बोलू म्हे? छोरी घनी बडी हुई म्हारी,’ तिच्या वडीलांनी दोघांकडे पाहिलं.

सूरज फक्त शांत उभा होता. तो काही बोलला नाही.

‘भैया, म्हा निकला. शामका आवा, इरा ताई साते,’ अर्चना धीर करून म्हणाली.

‘तू थांब ना अर्चू. नको जावू. थने म्हारी शप्पथ,’ तिची आई पुन्हा म्हणाली.

‘म्हे नही थांबणार मम्मा. म्हे आऊ शामका. तू रडू नको. म्हे अठेच है. सूरज साते आवू,’ इतकं बोलून ती सूरजला खुणेनं चल म्हणाली. दोघेही बाहेर पडले. ती इतकी ठाम राहून लग्नाचा निर्णय घेईल याचा तिच्या कुटुंबानं अजिबातच विचार केला न्हवता. खूप मित्र-मैत्रीण असणारी, मोकळ्या स्वभावाची अर्चना अचानक इतकी बदलली कशी हा प्रश्न सगळ्या भाटिया कुटुंबाच्या मनात आला. पण ती सुखरूप आहे, तिचं निर्णय तिनं घेतला आहे म्हटल्यावर तिच्या घरचे तिला काही बोलले नाही.

‘भैया, तू दोघांना समजावून सांग. मी आहेच त्यांची मुलगी म्हणून कायम सोबत. पण त्यांनी पण मला समजून घ्यायला हवं. माझी इच्छा, स्वप्न सूरज सोबत जुळली आहे. तो आणि मी आनंदात राहू. मला मोठ्या थाटात लग्न करायचं नाही. पप्पा आणि मम्मीची इच्छा मी पूर्ण नाही करू शकले त्याबद्दल माफ कर मला. पण प्लीज तू तरी समजून घे.’ घरातून निघाल्यावर तिचा भाऊ तिला पार्किंग पर्यंत सोडवायला आला तेव्हा अर्चना त्याला म्हणाली.

‘हो. तुम्ही या रात्री. वाट पाहतो,’ इतकं बोलून तिच्या भावाच्या डोळ्यात अश्रू दाटून आले. अर्चना निघून गेल्यावर तिच्या घरचे सगळे एकत्र जमले. तिची आई आता रडत नव्हती. पण उदासपणे पडून होती. अर्चनाची नानी तशी कडक होती. ती घरातलं सगळं सांभाळत होती. तिचे वडीलही आता बरेच शांत झाले होते. अर्चनाचा मामा आला होता. तो सगळ्यांना धीर देत होता.

‘हल्ली करतात जातीबाहेर लग्न. आपल्या मुलांची ख़ुशी ती आपली ख़ुशी’ तिचा मामा म्हणाला.

‘हो, त्या सोहनीच्या घरी नाही का, इंटरकास्ट झालं. त्यांना आता मुलगा पण झाला. सगळं नीट आहे. दोन्ही कुटुंब एकत्र येतात सणासुदीला,’ अर्चनाचे आजोबा म्हणाले.

‘हो, खरं आहे. भावसा, अपनी छोरी है, स्वीकार करने लागीला. मन में राग नको. जो हुयो वो हुयो.’ विकास भैय्या समजुतीच्या सुरात म्हणाला.

‘बोलने सोपो है बेटा. पण स्वीकार किसो करू?’ वडील भैयाकडे पाहून म्हणाले.
‘करावा लागेल आपल्याला. मुलाच्या घरचे येणार आहेत ना बैठकीला. वाटल्यास आपण त्यांचे पुन्हा लग्न करून देऊयात. म्हणजे माझ्या मुलालाही बरं वाटेल,’ दादी मधेच बोलल्या.

‘मला माहीत आहे माझी छोरी. ती काही पुन्हा लग्न करणार नाही. आणि धुमधडाक्यात तर नाहीच नाही,’ वडील म्हणाले.

‘अहो पण सप्तपदी, होम-हवन तर व्हायला हवा. बिदाई नको? असं कसं?’ अर्चनाची आई म्हणाली. तीही आता संभाषणात बोलू लागली. बराचवेळ सगळे एकमेकांशी बोलले. शेवटी मामा, पप्पा आणि भैया यांनी पुढाकार घेऊन प्रकरण समजुतीने घ्यायचं ठरवलं. भाटिया कुटुंब थोडं शांत झालं. सगळेजण रात्रीची वाट पाहू लागले.

अर्चना सूरजच्या मागे त्याच्या गाडीवर बसली तेव्हा तिनं त्याच्या खांद्यावर मान टाकली आणि रडू लागली.

‘अर्चू, मी आहे सोबत. तू काळजी नको करू. शेवटपर्यंत राहील कायम.’

‘माहीत आहे मला सूरू.’

‘मग रडू नको.’

‘हो, नाही रडत.’

‘तुझ्या घरचे समजून घेतील. ते खूप चांगले आहेत. भांडण केलं नाही त्यांनी.’
‘हा, पप्पा खूप प्रेम करतात माझ्यावर. ते स्वीकारतील तुला. फक्त थोडा धीर धर. अपमान तसा होणार नाही तुझा, पण तरी झालाच तर पचव.’
‘हो. नक्कीच अर्चू. आज आपण बोलूयात त्यांच्याशी शांतपणे. तू फक्त सोबत रहा.’
‘हम.’
‘माझी अर्चू.’
‘सूरज, तुझ्या घरच्यांची साथ राहील नं आपल्याला? ते मला स्वीकारतील नं?’
‘का नाही, त्यांना सांगूनच तर केलंय लग्न. तू काळजी करू नको. सगळं माझ्यावर सोपव’
अर्चना मग काहीच बोलली नाही, त्याच्या खांद्यावर विसावली. दोघेही मग सूरजच्या घरी पोहोचले. सगळेजण त्यांची वाट पाहत होते. त्यांच्याही घरातलं वातावरण गंभीर होतं. पण तरीही सूरज आणि अर्चनाचा एक कॉमन मित्र आणि मैत्रीण त्यांना हसवायचा प्रयत्न करत होते. वातावरण बऱ्यापैकी निवळलं होतं. पण पुन्हा अर्चनाच्या घरच्यांना भेटण्याचा ताण दोघांच्याही मनात होता.

रात्री आठच्या दरम्यान जेवण करून अर्चना, सूरज, त्याचे वडील, दोन मोठ्या बहीणी असे पाच जण अर्चनाच्या घरी जायला निघाले. तिथं काय बोलायचं याचं दडपण दोघांना होतं. पण सूरजचे वडील आणि ताई होती म्हणून त्यांना थोडा धीर होता त्यांचा. इकडं भाटिया कुटुंबात सगळेजण त्यांची वाट बघत होते. त्यांना घरी गेल्यावर जैन कुटुंबात जसा पाहुणचार होतो तसा झाला. चहा, सरबत, पाणी दिलं गेलं. सगळं अर्चनाची भाभी मन लावून करत होती. थोडावेळ निघून गेल्यावर मामाने चर्चेला सुरुवात केली.

‘आज आमच्या मुलीनं आम्हाला धक्का दिला आहे. लग्न ही प्रत्येकाच्या आयुष्यातली एक महldत्वाची गोष्ट आहे. अर्चनाने घेतलेला हा निर्णय आम्हाला आता मान्य करण्याशिवाय पर्याय नाही. पण तिच्या वडिलांची ती सगळ्यात लाडकी आणि धाकटी. ती असं काही करेल असं स्वप्नात देखील वाटलं नव्हतं.’
तिच्या मामाला मधेच तोडत अर्चनाचे वडील म्हणाले, ‘तुम्ही एकदा मला विचारायला हवं होतं.’
‘पाहुणे, तुम्ही शांत व्हा,’ अर्चनाची मामी म्हणाली. मग पुन्हा मामा बोलायला लागला.

‘आम्ही विचार केला आहे, तिचं पुन्हा सूरज सोबत सर्व विधी लावून लग्न करून द्यायचं. तुम्हाला काय वाटतं?’

‘नाही, मला हे मान्य नाही. मला लग्नाचा खर्च अजिबात करायचा नाही. हे मी पप्पांना वारंवार सांगितलं आहे. मी फक्त पाचशे रुपयात लग्न केलंय. आणि पुन्हा मला काही करायचं नाही. आणि हे आम्हा दोघांचं एकमत आहे.’ अर्चना सगळ्यांकडे पाहून मोठ्यानं आणि ठामपणे म्हणाली.

सगळेजण शांत बसले. तिची आई रडायला लागली. तिची जिजी तिला समजावयाला गेली.

‘असं करून कसं चालेल. काहीतरी मार्ग काढायला लागेल. आई-वडीलांची हौस, त्यांची इच्छा याचं महत्त्व काहीच नाही का?’ अर्चनाची मोठी बहीण म्हणाली.

‘जिजी, तुझ्या लग्नात काय झालं? किती दिलं आपण त्यांना. पण तरीही त्यांची हाव कमी झाली नाही. कर्ज काढून मला लग्न साजरं करायचं नाही. तुझा अनुभव पुरेसा आहे.’

‘माझी गोष्ट वेगळी आहे. आणि तुझ्यासाठी भावसांनी तरतूद करून ठेवली. तू इशी बोलू नको अर्चू. म्हारा नशीब में झिको हुतो वो हुयो,’ तिची जिजी रडायला लागली. ती वर्ष झालं, माहेरीच राहत होती. देण्याघेण्यातून तिच्या सासरी वाद चालू होते.

‘देखो, अब्बार आपा अर्चू रा ब्यावरी चर्चा करा है. मागच्या गोष्टी उकळत बसू नका,’ अर्चनाचे आजोबा म्हणाले. थोडावेळ कुणीच काही बोललं नाही.
‘नानासा, म्हने थाटमाट ब्याव नै करनो. प्लीज,’ अर्चना रडायला लागली.
आता सूरजच्या घरातले त्यांच्या चर्चेत सामील झाले. त्याची ताई सगळ्यांना म्हणाली, ‘मला वाटतं, अर्चना आणि सूरज यांना काय वाटतं हे महत्त्वाचं. त्यांची इच्छा नाही, तर नको काही करायला. फक्त आपण काही जवळच्या माणसांना बोलवून जेवण करूयात. तुम्हाला तुमच्या मुलीला जे काही द्यायचं आहे ते द्या हवं तर.’

‘हो, तिच्यासाठी जे काही करायचं ते मी करणारच आहे. बाप आहे मी तिचा. मला वाटत नाही का माझ्या मुलीचं लग्न माझ्या इच्छेप्रमाणे व्हावं. तुमचा मुलगा तिनं तिच्या इच्छेप्रमाणे निवडला. अर्चू, आम्ही तुझे कुणीच नाही का? इतकी कशी बदलली तू. कै हुयो थने.’

‘पप्पा, माझं प्रेम आहे तुमच्यावर. तुम्ही असं नका बोलू. मला खूप वाईट वाटतं. पण मलाच लग्नविधी, डामडौल, या सगळ्यात अडकायचं नव्हतं. माझी ही भूमिका समजून घ्या प्लीज. आपण सगळेजण एकत्र हॉटेलमधे जेवायला जावूयात. किंवा सूरजच्या घरी आपण सगळे जमूया. त्यांची काही माणसे आणि आपली काही माणसं. जेवण करू, गप्पा मारू. पप्पा प्लीज मला माफ करा. पण थाटामाटात लग्न नको. विधी नको. काहीच नको.

‘तुझं आता ऐकावंच लागणार आम्हाला. तू पर्याय काय ठेवलास,’ तिची आई म्हणाली.

‘बायसा, तुम्ही शांत व्हा. आता जे झालं ते झालं. आपली मुलगी आता त्यांची झाली. तुम्ही शांत व्हा.’ अर्चनाची मामी तिच्या आईला समजवायला लागली. सगळ्यांच्यात पुन्हा चर्चा झाली. तिचे वडील शांत झाले. त्यांनी माघार घेतली. सूरजच्या घरच्यांनी भाटिया कुटुंबाला अर्चना सुखी राहील असं आश्वासन दिलं. त्याच्या ताईनं सगळी जबाबदारी घेतली.

सूरजने पण अर्चनाच्या आईला धीर दिला. ती आधीपासून सूरजला ओळखत होती. तो एक चांगला मुलगा आहे याची खात्री तिला होती.

‘माझ्या मुलीला सुखी राहू द्या. हट्टी आणि जिद्दी आहे ती. पण मनानं चांगली आहे,’ आई पुन्हा रडायला लागली.

‘तुम्ही काही काळजी करू नका. आमच्यावर विश्वास ठेवा,’ सूरजचे वडील त्यांना म्हणाले.

घरातलं वातावरण एकदम भावूक झालं. पुन्हा एकदा भाभीने चहा, बिस्कीट सगळ्यांना दिलं. रात्री खूप उशिरापर्यंत सगळेजण एकत्र थांबले. अर्चना आणि सूरजने सगळ्यांचे आशीर्वाद घेतले. तिच्या वडिलांनी दोघांना पाया पडू दिले नाही. तिच्या आईने आशीर्वाद दिला. मामा, मामी, जिजी, भैया, भाभी सगळ्यांनी तिला आशीर्वाद दिला. काहीशा भावूक वातावरणात तिनं घरच्यांचा निरोप घेतला. सूरज आणि अर्चनाच्या मनावर असलेलं दडपण त्याच दिवशी दूर झालं. दोन्ही कुटुंबानं त्यांच्या लग्नाचा इतक्या सहजपणे स्वीकार केला. अर्चनाच्या कुटुंबाने समजूतदारपणा दाखवल्यामुळे सगळ्या गोष्टी सोप्या झाल्या. दोघांना खूप आनंद झाला.

अर्चनाच्या वडीलांच्या मनात मुलीचं लग्न थाटात करता आलं नाही याची बोच राहिली, पण ते बरेच खेळकर वृत्तीचे असल्यामुळे त्यांनी त्या गोष्टीचा स्वीकार केला. इतर नातेवाईकांना काय सांगायचं हा प्रश्न होता. पण तोही मिटला. तिच्या वडीलांनी सगळ्या जवळच्या नातेवाईकांना फोन करायचा आणि मुलीचे तिच्या मित्राशी रजिस्टर लग्न झालं असं सांगायचं ठरलं. इंटरकास्ट मॅरेज केल्यामुळे रजिस्टर लग्न करण्याचा निर्णय घेतला अशी भूमिका तिच्या वडिलांना घ्यावी लागली. तिच्या वडीलांनी मनावर दगड ठेवून ही गोष्ट सगळ्यांना सांगितली. त्यांनी मुलीची बाजू घेतल्यामुळे जैन समाजातल्या आणि आजूबाजूच्या ओळखीच्या लोकांनी त्यांना थेट विरोध केला नाही. काहीजण कुरबुर करत होते, पण त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं. तिच्या भैया- भाभीने आणि मामीने पुढाकार घेऊन तिला साड्या, कपडे, दागिने घेतले. तिच्यासाठी वडीलांनी मंगळसूत्र केलं. तिच्या आईने तिच्यासाठी केलेल्या बांगड्या दिल्या.अर्चनाच्या सासरच्या लोकांना त्यांनी घरी बोलावून सन्मान देऊन, आहेर देऊन मानपान त्यांच्या पद्धतीने केला. अर्चनाला दिलेल्या सगळ्या वस्तू दाखवल्या. चांगल्या हॉटेलमधे सगळे जवळचे नातेवाईक, जवळच्या साधारण एक तीस माणसांना जेवण दिलं. घरातल्या घरात प्रेमानं, आपुलकीनं अर्चनाची बिदाई झाली. सूरज आता भाटिया कुटुंबाचा सगळ्यात आवडता जावई झाला आहे. त्याचं आणि अर्चनाच्या वडीलांचं नातं अगदी बाप-लेकासारखं झालंय.

हेही वाचा :  

पुष्पा भावेंशी चिकित्सक गप्पांच्या निमित्ताने

बेगमपूर : संत रविदासांचं दु:ख नसलेलं शहर

मनोरंजन ब्यापारी: रिक्षा चालवत ते जगप्रसिद्ध लेखक बनलेत

पंगतीतलं पान : वेगळ्या प्रयोगातून आलेल्या कादंबरीची काही पानं

'मायलेकी बापलेकी' : सुजाण पालकत्वाची जाणीव करून देणारं पुस्तक