लेखक, कवींनी बहिष्कार टाकला, संमेलनाध्यक्ष काय करणार?

०७ जानेवारी २०१९

वाचन वेळ : ७ मिनिटं


सुप्रसिद्ध लेखिका नयनतारा सहगल यांचं निमंत्रण रद्द करून यवतमाळच्या अखिल भारतीय मराठी संमेलनाने वादाचा नवा अध्याय लिहिलाय. निमंत्रण ऐनवेळी रद्द करण्याच्या प्रकारावर चौफेर टीका होतेय. अनेक निमंत्रितांनीही या सगळ्या प्रकाराचा निषेध करत संमेलनाला जाणार नसल्याची घोषणा सोशल मीडियावर केलीय. त्यामुळे हे संमेलनाचं बारगळण्याची चिन्हं दिसतायंत. या सगळ्यांचा घेतलेला हा आढावा.

यवतमाळ इथे होणाऱ्या ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटक साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखिका नयनतारा सहगल यांचं निमंत्रण ऐनवेळी रद्द केल्यामुळे नवा वाद निर्माण झालाय. साहित्य संमेलनाचे आयोजक, साहित्य महामंडळ यांच्यासोबतच सरकारवरही टीका होतेय. काहीजणांनी तर आता हे संमेलनच रद्द करण्याची मागणी केलीय.

येत्या ११, १२ आणि १३ जानेवारीला होणाऱ्या या संमेलनात वेगवेगळे परिसंवाद, चर्चासत्र, मुलाखती, कविसंमेलन आदींचं आयोजन करण्यात आलंय. यासाठी संमेलनाच्या आयोजकांनीही कोट्यवधी रुपये खर्चून जय्यत तयारी केलीय. संमेलनावर होणाऱ्या खर्चामुळे वाद सुरू आहे. पण आता उद्घाटकालाच ऐनवेळी न बोलवण्यावरून नव्याच वादाला तोंड फुटलंय.

नेमकं काय झालं?

सुप्रसिद्ध लेखिका, पंडित जवाहरलाल नेहरूंची भाची नयनतारा सहगल यांना संमेलनाच्या उद्घाटक म्हणून निमंत्रण देण्यात आलं. पण पाचेक दिवस शिल्लक राहिलेले असतानाच संमेलनाच्या आयोजकांनी सहगल यांचं निमंत्रण रद्द केलं. ‘अपरिहार्य’ कारणही सांगितलं. यासाठी मनसेच्या काही स्थानिक लोकांनी केलेल्या विरोधाचा दाखलाही देण्यात आला.

यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवरही खूप टीका झाली. पण सहगल यांच्या उपस्थितीला विरोध करण्याची भूमिका ही स्थानिक कार्यकर्त्यांची असून त्याचा पक्षाही काहीही संबंध नसल्याचं मनसेने स्पष्ट केलं. पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनाच निवेदन काढून पक्षाची भूमिका स्पष्ट करावी लागली.

चित्रलेखाचे संपादक ज्ञानेश महाराव यांनी निषेधाच्या या कृतीला निमंत्रण वापसी म्हटलंय. ते लिहितात, 'नयनतारा सहगल यांचं संमेलनातील भाषण सोशल मीडियातून प्रकाशित झालं. त्यात त्यांनी देशातील सरकार पुरस्कृत असहिष्णुता आणि सामाजिक समभावाला छेद देणाऱ्या व्यवहारावर नेमकं बोट ठेवलं आहे. ती आजची गरज आहे. सहगल यांच्या भाषणातील मुद्दे माझ्याही बोलण्यातून अधिक कठोरपणे येतील. हे लक्षात घेऊन माझे निमंत्रण रद्द करावे.'

पण ‘अतिथी देवो भव’ परंपरा असलेल्या महाराष्ट्राच्या साहित्य विश्वात या निर्णयामागे एकच खळबळ उडाली. यातून ज्येष्ठांचा आदर, नारी शक्तिचा सन्मान करण्याच्या भारतीय संस्कृतीचाच अपमान झाला.

बहिष्कार टाकणाऱ्यांची यादी

सहगल यांचं निमंत्रण रद्द करण्यात आल्याची बातमी रविवारी संध्याकाळी सोशल मीडियावरून वणव्यासारखी वायरल झाली. त्यांचं न झालेलं भाषणही खूप शेअर झालं. दुसऱ्या दिवशी सोमवारी सकाळपासूनच अनेक निमंत्रितांनी आयोजकांचा निषेध करत संमेलनावर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली. याला लेखक, प्रकाशक, वाचकांचाही सोशल मीडियावर मोठा प्रतिसाद मिळतोय.

यामधे माजी संमेलनाध्यक्ष वसंत आबाजी डहाके, मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे सदस्य, पत्रकार आसाराम लोमटे, चित्रलेखाचे संपादक ज्ञानेश महाराव, माजी संपादक चंद्रकांत वानखडे, दिव्य मराठीचे संपादक संजय आवटे, एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर, लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर, कवयित्री प्रभा गणोरकर, ज्येष्ठ पत्रकार, विचारवंत जयदेव डोळे, साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त कवी श्रीकांत साहेबराव, देशमुख पत्रकार श्रीकांत बोजेवार, कवी प्रा. केशव सखाराम देशमुख, मंगेश नारायण काळे, बालाजी सुतार, नामदेव कोळी, कवी प्रकाशक मनोज सुरेंद्र पाठक, प्रा. गणेश मोहिते, प्रा. रामचंद्र काळूंखे, कवयित्री दिशा शेख आदींचा समावेश आहे.

ज्येष्ठ संपादक संजय आवटे यांनी गुरुवारी रात्रीच संमेलनाला न जाण्याची भूमिका स्पष्ट केली. त्यांनी लिहिलंय, ‘नयनतारा सहगल या संमेलनाचे उदघाटन करत असल्याने, या संमेलनाविषयी आत्यंतिक औत्सुक्य होते. प्रत्यक्षात मात्र आयोजकांनी नयनतारांचे आमंत्रण रद्द केल्याने मला धक्का बसला आहे.’ 

हे संमेलनचं रद्द करा

कथाकार, पत्रकार आणि अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे सदस्य असलेल्या आसाराम लोमटे यांचं निषेधपत्र सोशल मीडियावर वायरल झालंय. ते लिहितात, ‘झुंडशाहीच्या दबावाखाली येऊन केलेली ही कृती उद्वेगजनक, संतापजनक आणि निषेधार्हच आहे. एका ज्येष्ठ लेखिकेचा उपमर्द होत असताना अखिल भारतीय साहित्य महामंडळाने कणखर आणि रोखठोक भूमिका घ्यावी, हे संमेलनच रद्द करून टाकावं, अशी माझी व्यक्तिगत भूमिका आहे. व्यक्तिशः यवतमाळ येथील साहित्य संमेलनावर बहिष्कार घालण्याचा निर्णय मी घेतला आहे.’

मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष आणि साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी निमंत्रण रद्द करण्याच्या निर्णयाचा धिक्कार केलाय. त्यांनी आपल्या निवेदनात म्हटलंय, ‘वर्तमानपत्रांतून आलेल्या बातम्या वाचून धक्का बसला. निमंत्रण रद्द करण्याआधी तुम्ही आमच्याशी बोलले असते तर आम्ही, निदान मी तरी तुम्हाला विरोध केला असता. अर्थात त्याचा काहीही उपयोग झाला नसता हे वेगळे! तुमच्याबरोबर निष्कारण आम्हीही झोडपले जात आहोत. घेतलेला निर्णय धिक्कार करावा असाच आहे.’ मराठवाडा साहित्य परिषदेच्या सदस्यांनीही संमेलनावर बहिष्कार टाकण्याची घोषणा केलीय.

कवी, कथाकार बालाजी सुतार लिहितात, ‘संसदेतल्यांपासून गावगन्ना सटरफटर नगरसेवकांपर्यंत कुणीही टीका केली तरी कुणाला चिंता वाटत नाही. एक साहित्यिक बोलतो तेव्हा घाबरून निमंत्रण रद्द होतं. ये डर कायम रहना चाहिए. मी निमंत्रित होतो. आता संमेलनाला जाणार नाही. कडेकोट बहिष्कार! आयोजक संस्थेचा कडकडीत निषेध. ’ सुतार यांना सोशल मीडियावरच्या परिसंवादाचं निमंत्रण होतं.

पुन्हा सन्मानाने बोलवा

सगळीकडून संमेलनाच्या आयोजकांवर टीका होतेय. पण तरुण समीक्षक डॉ. गणेश मोहिते यांनी यामागे राजकीय हात असल्याची शंका व्यक्त केलीय. आयोजकांनी दबावातून हा निर्णय घेतल्याचं सांगताना ते लिहितात, ‘आता तरी त्यांनी शांतपणे विचार करुन हे 'संमेलन अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या बाजूने आहे.' कोणत्याही जेष्ठ लेखक, विचारवंताचा अपमान करण्याचा आम्हाला अधिकार नाही, असं म्हणून दिलगिरी व्यक्त करावी आणि नयनतारा सहगल यांना पुन्हा उद्घाटक म्हणून सन्मानाने पाचारण करावं.’ 

डॉ. मोहिते यांनीही संमेलनावर बहिष्कार टाकण्याची घोषणा केलीय. ‘मराठी समीक्षेची समीक्षा' या परिसंवादासाठी त्यांना निमंत्रण होतं. प्रकाशक येशू पाटील यांनीही यवतमाळच्या संमेलनात आपण स्टॉल लावणार नसल्याचं लिहिलंय.

आयोजकांनी नयनतारांचे आमंत्रण रद्द केल्याने मला धक्का बसला. त्यांचे विचार दडपण्याचाच हा प्रयत्न दिसतो. उद्या प्रत्येकाचं भाषण यांच्याकडून तपासून घेण्याची वेळ येईल किंवा मधेच बोलणं थांबवलं जाईल. अशा संमेलनात सहभागी होणं न पटणारं आहे,’ असं डॉ. रामचंद्र काळुंखे लिहितात. डॉ. काळुंखे यांना एका परिसंवादासाठी बोलावण्यात आलं होतं.

हे आमचं संमेलनचं नाही

सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या कवयित्री दिशा पिंकी शेख यांनी संमेलनाला जाणार नसल्याचं स्पष्ट केलंय. त्या लिहितात, ‘एक तर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आमचं नाहीचं. हे माहीत असताना मी संमेलनाचं आमंत्रण स्वीकारलं होत. वाटलं काही नाही तर किमान आमच्या तृतीयपंथी समुदायाच्या प्रश्नांना मांडता येईल. पण नयनतारा सहगल यांना आमंत्रण देऊन परत त्यांना येऊ नये म्हणून सांगणं, मला वाटतं हा प्रत्येक लिहित्या हाताचा अपमान आहे.’

काही कवी, प्रकाशकांनीही बहिष्काराची भाषा केलीय. वाघूर या दिवाळी अंकाचे संपादक, कवी नामदेव कोळी लिहितात, ‘मी काही सेलिब्रेटी लेखक, कवी नाही. कविता वाचनासाठी यावेळी पहिल्यांदाच निमंत्रण मिळालंय. माझ्या कोणत्याही मंचावरील सहभागाने खरं तर काहीच फरक पडणार नाही. पण ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांचा निमंत्रण नाकारून जो अपमान केलाय, त्याचा निषेध म्हणून मी या संमेलनाचा बहिष्कार करतो.’

स्टेजवर जाऊन सुनावणार

दुसरीकडे काहींनी संमेलनाला जाऊन निषेध नोंदवणार असल्याचं सांगितलं. साहित्य संमेलनाचं मावळते अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी निमंत्रण रद्द करण्याचा कृतीचा निषेध केलाय. संमेलनाच्या समारोपाला होणाऱ्या मावळत्या अध्यक्षांच्या भाषणात आपण या कृतीचा समाचार घेणार असल्याचं देशमुख यांनी स्पष्ट केलंय.

आणखीही काही कवी, लेखक, प्रकाशक, वाचक मंडळींनी संमेलनात उपस्थित राहून निषेध नोंदवण्याची भाषा केलीय. संमेलनाच्या ठिकाणी नयनतारा सहगल यांचं न झालेल्या भाषणाच्या प्रती वाटण्याची मोहीमही काहींनी हाती घेतलीय. यासाठी फोटोग्राफर, कार्यकर्ते संदेश भंडारे यांनी पुढाकार घेतलाय.

परिसंवाद, मुलाखती रद्द करण्याची नामुष्की

कवी, प्रकाशक मनोज सुरेंद्र पाठक लिहितात, ‘कॉपर कॉइनची पुस्तके ठेवण्याची तजवीज केली होती. नयनतारा सहगल प्रकरणाने सर्वांवर पाणी फिरलं. संमेलनात जाण्याची इच्छा उरली नाही. स्वत:च्या वैदर्भीय असण्याची अतिशय लाज वाटली पहिल्यांदाच.’ संमेलनाच्या काळात मोठ्या प्रमाणात पुस्तकांची विक्री होते. त्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून छोटेमोठे प्रकाशक संमेलनाला येतात.

संमेलनात मान्यवरांच्या मुलाखती, परिसंवाद, कविसंमेलन आदी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. पण अनेक मान्यवरांनी बहिष्काराची घोषणा केल्याने हे कार्यक्रम रद्द करण्याची नामुष्की संमेलनाच्या आयोजकांवर येणार आहे.

‘माध्यमांची स्वायतत्ता नेमकी कोणाची’ या परिसंवादात पाच जण निमंत्रित आहेत. त्यापैकी तिघांनी आताच बहिष्काराची घोषणा केलीय. प्रभा गणोरकर यांची प्रगट मुलाखत होणार होती. पण गणोरकर यांच्यासोबत संवादक मंगेश नारायण काळे आणि डॉ. कविता मुरुमकर यांनीही बहिष्कार टाकलाय. त्यामुळे ही मुलाखतच रद्द करण्याची वेळ आलीय. याशिवाय वेगवेळ्या परिसंवादातले दोन-तीन निमंत्रितांनी बहिष्कार टाकणार असल्याचं सांगितलंय.

संमेलनाध्यक्ष ढेरेंच्या भूमिकेकडे लक्ष

वाचक, लेखक, कवी, कलावंत, प्रकाशक यांच्याकडून संमेलनाच्या आयोजकांचा निषेध होतोय. पण संमेलनाच्या नियोजित अध्यक्ष अरुणा ढेरे यांनी ‘हे योग्य नाही’ अशी प्रतिक्रिया मीडियाला दिलीय. त्यांच्या भूमिकेवरही सोशल मीडियात टीका होताना दिसतेय. महत्त्वाचं म्हणजे, नेहमी वादात सापडणारी संमेलनाध्यक्षाची निवडणूक यंदा बिनविरोध झाली. कोणत्याही वादाविना झालेल्या निवडीनंतर ढेरे संमेलनाध्यक्ष झाल्या. पण आता भूमिका घेण्यावरून त्या चांगल्याच वादात सापडताना दिसतायंत.

काहीजण ढेरे यांनी वेळेतच दुर्गा भागवतांसारखी जोरकस भूमिका घ्यावी, अशी अपेक्षा काही जणांनी सोशल मीडियावर व्यक्त केलीय. आणीबाणीच्या काळात दुर्गा भागवत यांनी संमेलनाच्या स्टेजवरून सत्ताधाऱ्यांना खडसावून अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा एल्गार केला होता. अरुणा ढेरेंनीही तशीच बाणेदार, कणखर भूमिका घेण्याची मागणी होतेय. आता संमेलनाध्यक्ष ढेरे काय भूमिका घेताय, याकडेच सगळ्यांचं लक्ष लागलेय.

यवतमाळ संमेलनाला निमंत्रण रद्द करण्यावरून गालबोट लागलंय. हे काही आता मिटवता येणार नाही. पण संमेलनाध्यक्ष कोणती भूमिका घेतात, कधी घेतात, कुठे मांडतात हे बघणं महत्त्वाचं आहे.