मुंबईचा श्वास असणारी खारफुटीची ५४ हजार झाडं बुलेट ट्रेनसाठी तोडणार

३० जून २०१९

वाचन वेळ : ४ मिनिटं


मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. मोदी सरकारच्या पहिल्या कारकीर्दीत या प्रोजेक्ट काम सुरू झालं. या कामाला गती दुसऱ्या सरकारच्या काळात मिळतेय. या ड्रीम प्रोजेक्टसाठी खारफुटीच्या तब्बल ५४ हजार झाडांचा बळी दिला जाणार आहे. हवामान बदलाचा सामना करणाऱ्या या झाडांवर नासा संशोधन करतेय, आपण मात्र त्यांची कत्तल करतोय.

खारफुटी अर्थात तिवरांची झाडे ही निसर्गाचा समतोल राखणारी आणि पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची मानली जातात. ही खारफुटीची झाले मुंबईतील सर्वात जुन्या झाडांपैकी आहेत. या झाडांमुळे आपण ग्लोबल वॉर्मिंगमुळे होणारं नुकसान टाळू शकतो.ही झाडे कापणाऱ्यांवर फौजदारी स्वरूपाची गुन्हे दाखल केले जातात.

खारफुटीची झाडं वाचवण्याची मोहिम सुरू आहे. मात्र आता तर विविध  विकास प्रकल्पांच्या नावाखाली या झाडांची कत्तल करण्यात येत आहे. सध्या बुलेट ट्रेनच्या प्रकल्पासाठी खारफुटींच्या झाडांची कत्तल केली जाणार असल्याने पर्यावरण प्रेमींमध्ये खळबळ उडाली आहे. विकास तर हवा मात्र पर्यावरणाला उध्दवस्त करून नको असा सूर सर्वत्र उमटू लागलाय.

मुंबईत १०० वर्षांपासून असलेली झाडं

मुंबईच्या निसर्गातली खारफुटीची झाडं हवामानाचा समतोल राखण्यासाठी गरजेची आहेत. सातत्याने बदलत जाणाऱ्या वातावरणात माणसाला आणि इथल्या पर्यावरणाच्या रक्षणासाठी खारफुटीची झाडं उपयोगाची आहेत. आपल्याला लोकलने प्रवास करताना किंवा एक्सप्रेस वेवरुन जाताना ही झाडं दिसतात. खरं तर त्या भागात गेल्यावर आपल्याला खूप घाण वास येतो. पण ही झाडं तिथे जगत असलेल्या प्रत्येक जमातीसाठी जीवनदान देणारी आहेत. तिथे वास येतो. कारण माणासाने त्या खाडीत कचरा टाकून टाकून पार वाट लावलीय.

खारफुटीची झाड मुंबईतल्या अनेक जुन्या झाडांपैकी आहेत. मग मुंबईतून तर अनेक जुनीजाणती झाडं नामशेष झाली असं आपले आजोबा आजी सांगतात. म्हणे मुंबईतही जैव विविधता होती. त्यातला काही भाग अजूनही शिल्लक आहे. त्यामुळेच तर आपण आहोत असंही म्हणता येईल. पण पूर्वी कोणती झाडं होती? जुन्या मुंबईची ओळख सांगणारी १०० ते ६० वर्षे जुनी दुर्मिळ झाडंही आहेत. ज्यात वड, पिंपळ, ओक, नागचाफा, सुरु, खारफुटी, नारळ, ताड, निलगिरी इत्यादी आहेत.

आता ही झाडं अगदी तुरळक आहेत. आणि आताच्या आपल्या पिढीला ती ओळखताही येत नाहीत. मुंबई मेट्रोसिटी बनत असताना त्याच्या संपत्तीची अर्थात निसर्गाची कत्तल केली. त्यातच मुंबईची ओळख सांगणारी अनेक झाडं नामशेष झाली.

हेही वाचा: हवामान बदल हे मानवजातीच्या अस्तित्वासमोरचं मोठं आव्हान

मुंबईत इंग्रजांनी लावलेली झाडं

आता आपल्याला दिसणाऱ्या झाडांमधे अशोक, गुलमोहर, लॅबर्ननम मोठ्या प्रमाणात दिसतात. पण ही झाडं जुनी नाहीत. कारण ही झाडं मुंबईत इंग्रजांनी लावली. ही झाडं मुंबईत चांगल्याप्रकारे वाढली. इंग्रजांनी ती शोभेसाठी लावली. इंग्रज मुंबईतल्या दमट हवामानाला आणि मुख्य म्हणजे उंदीर, घुशी, गांडूळ, साप, पाली, डास इत्यादींना वैतागले होते. म्हणूनच त्यांनी मुंबईला त्यांच्या स्वरुपात ढाळण्यासाठी जसे रस्ते, इमारती, सोयी सुविधा केल्या. तसंच झाडांचीही नव्याने लागवड केली.

आता आपल्याला जुनी आणि दुर्मिळ झाडं मलबार हिल, राणी बाग, आरे कॉलनी, नॅशनल पार्क इथे बघायला मिळतात. पण मुंबईत प्रवास करताना खारफुटी म्हणजे मँग्रूव्हची झाडं आपल्याला हमखास दिसत असतील. पालघर, वसई, भाईंदर, वांद्रे, माहीम, नवी मुंबई, ठाणे इत्यादी ठिकाणी खारफुटी मोठ्या प्रमाणात आहेत. ही झाडं मुंबईतल्या पर्यावरणाच्या दृष्टीने महत्त्वाची आहे.

हेही वाचा: मुंबईच्या विकासात पर्यावरणाला धक्का लागणारच!

खारफुटीची ५४ हजार झाडं कापणार

हीच सगळ्यात महत्त्वाची खारफुटीची झाडं कापली जाणार आहेत. कारण ही झाडं पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रोजेक्टसाठी अडथळा ठरवण्यात आलीत. या कोट्यवधींच्या प्रोजेक्टसाठी गुजरात, पालघर, ठाण्यातल्या १३.३६ हेक्टर जमिनीवरची ५४ हजार खारफुटीच्या झाडं कापली जाणार आहेत. आणि यासाठी महत्त्वाचं म्हणजे केंद्रीय वन आणि पर्यावरण विभागानेही हिरवा कंदील दिलाय.

बुलेट ट्रेनचा रस्ता एकूण ५०८ किमी आहे. त्यापैकी १५५ किमीचा रस्ता महाराष्ट्रातून जातो. यासाठी महाराष्ट्रातल्या ५८२ हेक्टर जमीन सरकारने संपादित केलीय. या एकूण मार्गावरील ३२ हेक्टर खारफुटीचं जंगल आणि १३१ हेक्टरचं जंगल तोडणार आहेत. यामुळे निश्चितच पर्यावरणाचा ऱ्हास होणार आहे. पण यावर दिवाकर रावतेंनी विधान परिषदेत बोलताना सांगितलं, की जेवढी खारफुटीची झाडं तोडली जातील त्याच्या पाचपट झाडं लावू.

द हिंदू वर्तमानपत्राच्या बातमीनुसार, एकूण दीड लाख खारफुटीची झाडं कापली जाणार होती. पण त्यावर उपाय काढून आता ५४ हजार झाडं कापली जातील. पण ही झाडं मुंबई आणि आजूबाजूच्या शहरांसाठी पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहेत. याचा परिणाम निश्चितच वातावरणावर होणार आहे, असं पर्यावरणवादी म्हणताहेत. इथे नोंद घेण्याजोगी गोष्ट म्हणजे, झाडं तोडून ती नव्याने लावण्याचा कोणताही उपक्रम पूर्णपणे यशस्वी झालेला नाही. त्यामुळे आताही तो कितपत यशस्वी होईल यावर शंका घेतली जातेय.

हेही वाचा: उद्या गुजरातमधे धडकणाऱ्या वादळाला वायू हे नाव कोणी दिलं?

मग नासा अभ्यास का करतंय?

पण ही खारफुटीची झाडं का महत्त्वाची आहेत? खारफुटीची झाडं जगात सगळीकडे आढळतात. समुद्राजवळच्या जमिनीवर ही झाडं येतात. पहिल्यांदा स्पॅनिश आणि नंतर पोर्तुगीजांना दक्षिण अमेरिकेत खारफुटींची झाडं आढळली. आणि त्यांनी मँग्युवरुन मँग्रुव असं नामकरण केलं, असं ग्लोबल मँग्रुव असायंस या वेबसाईटवर लिहिलंय. जगातल्या १ लाख ३७ हजार ८०० चौरस किलोमीटर क्षेत्रफळात खारफुटीची झाड आहेत. सध्या नासासुद्धा पृथ्वीवरच जीवन आणि ग्लोबल वॉर्मिंगपासून आपला बचाव करण्यासाठी या झाडांचा अभ्यास करत आहे.

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खारफुटीच्या झाडांमुळे पूर येत नाही. या झाडांची मूळ पाण्याचा प्रवाह शांत करतात. तसंच जमिनीची धूप कमी होते. आपल्याला माहिती आहे का, खारफुटीच्या झाडांमधे इतर झाडांच्या तुलनेत कार्बन डाय ऑक्साईड शोषून घेण्याची क्षमता पाचपट अधिक असते. म्हणून उगाच नाही नासा या झाडांना हवामान बदलातला महत्त्वाचा घटक समजून यावर अभ्यास करत आहे.

हेही वाचा: तेलंगणाने गोदावरीवर कसं उभारली जगातली सर्वांत मोठी पाणीउपसा योजना?

खारफुटीच्या झाडांची लागवड गरजेची

अमेरिकेतल्या फ्लोरिडा राज्यात्या मोठ्या प्रमाणात खारफुटीची झाडं आहेत. त्यांचा प्रमुख व्यवसाय हा फिशरी इंडस्ट्रीचा असल्यामुळे त्यांच्या समुद्राचं पाणी स्वच्छ ठेवण्यासाठी, समुद्रातल्या धोक्यात आणि लोप पावणाऱ्या प्रजातींना जगण्यासाठी खारफुटीच्या झाडांची मोठ्या प्रमाणात लागवड होते, असं युनिवर्सिटी ऑफ फ्लोरिडाच्या म्युझिअमच्या दस्तऐवजांमधे लिहिलंय.

युनिवर्सिटी ऑफ केंब्रिज, द नेचर कन्झरवन्सी आणि वेटलँड इंटरनॅशनलने गाईडलाईन्स ऑर कोस्टल मॅनेजमेंट आणि पॉलिसी मेकर्स यांनीही खारफुटीवर अभ्यास केलाय. त्यांच्या अभ्यासानुसार, खारफुटीची झाडं ही किनारपट्टीजवळच्या वस्तीसाठी संरक्षक तट म्हणून काम करतात. अगदी वादळ, त्सुनामी, समुद्री जीवन चांगल ठेवणं तसंच प्रदूषण कमी करण्यासाठीही झाडं खूप महत्त्वाची भूमिका बजावतात.

जगभरातल्या जवळपास सगळ्याच शहरांना सध्या प्रदुषणाची समस्या भेडसावत आहे. पण समुद्राच्या जवळ असलेल्या शहरांना समुद्र आणि खारफुटीच्या झाडांचा आधार आहे. त्यामुळे अधिकाधिक वातावरण शुद्ध होण्यास मदत होते. म्हणूनच खारफुटीची झाडं ही साधीसुधी नाहीत हे आपण समजून घेतलं पाहिजे. बुलेट ट्रेनसाठी केली जाणारी कत्तल म्हणजे एक प्रकारचं वातावरणाचं संतुलन ढासळण्यासारखं आहे. ते भरून काढण्यावर आपण खारफुटीच्या झाडांची लागवड करणं आवश्यक आहे.

हेही वाचा: 

वेगन म्हणजे वेजिटेरीअन नाही, त्यापेक्षा बरंच काही

३० वर्षांपूर्वी हरवलेल्या सुरेश कांबळेंना व्हॉट्सअपने शोधलं