जेव्हा गुराखी, बँडवाला आणि फॉरेनरिटर्नही सरपंच होतात

२२ डिसेंबर २०२२

वाचन वेळ : ६ मिनिटं


महाराष्ट्रातल्या ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल परवा लागलाय. कोणतीच राजकीय पार्श्वभूमी नसलेले असंख्य सर्वसामान्य चेहरे या निवडणुकीतून थेट सरपंचपदी निवडून आलेत. यात कुणी गुराखी आहे कुणी बँडवाला आहे तर कुणी ऊसतोड कामगार. तसंच पहिल्यांदाच राजकारणात एण्ट्री केलेली आणि थेट सरपंचपदी पोचलेली तरणीबांड पोरंही यात आहेत.

गावच्या निवडणुका फार इंटरेस्टिंग असतात. कोणत्याही राजकीय पक्षाच्या चिन्हावर या निवडणुका लढवल्या जात नाहीत. त्यामुळे गावकी आणि भावकी अशा दोन गोष्टी इथं महत्वाच्या असतात. तालुक्याचं राजकारण आपल्या आवाक्यात राहावं म्हणून स्थानिक नेते या निवडणुकांमधे झपाटून कामाला लागलेले दिसतात.

अगदी सर्वसामान्य आणि कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेले अनेक चेहरे महाराष्ट्रातल्या ग्रामपंचायत निवडणुकीतून थेट सरपंचपदी निवडून आलेत. त्यांच्या संघर्षाच्या गोष्टी सध्या सोशल मीडियातून तुफान वायरल होतायत. ग्रामपंचायत निवडणुकांमधला हा एक वेगळा पॅटर्न आहे. याच वेगळ्या पॅटर्नची टीवी चॅनेल आणि पेपरमधूनही जोरदार चर्चा होतेय. 

गुराख्यासाठी गाव एकटवलं

चंद्रपूरच्या बामनी गावचे प्रल्हाद आलम. घरची आर्थिक परिस्थिती फारच बेताची. शेती आणि मोलमजुरीवर त्यांच्या कुटुंबाचं पोट चालतं. दोन पैसे मिळावेत म्हणून त्यांनी गावातल्या लोकांची गुरं चरायचं काम हाती घेतलं. प्रचंड प्रामाणिक आणि कष्टाळू असलेल्या प्रल्हाद आलम यांच्यावर गावच्या लोकांचा भारी विश्वास होता. त्यातूनच त्यांची ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत एण्ट्री झाली.

आलम निवडणुकीच्या रिंगणात उतरले आणि त्यांनी थेट सरपंचपदासाठी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला. निवडणूक लढवायची तर थोड्या का होईना पैशांची गरज होती. त्यासाठी अख्खं गाव एकटवलं. प्रल्हाद आलम यांच्या प्रामाणिकपणाला लोकांना प्रतिसाद दिला. गावकऱ्यांनीच वर्गणी काढली. निवडणूक प्रचारासाठी गावातले तरुणही पुढे आले. आलम यांनी आपल्या सायकलवरून गावातल्या प्रत्येकाच्या भेटीगाठी सुरू केल्या.

संपूर्ण गाव त्यांच्यामागे उभं राहिलं. भाजप आणि काँग्रेस अशा दोन्ही प्रस्थापित पक्षांचे उमेदवार त्यांच्या समोर उभे होते. पण प्रत्यक्षात निकाल लागल्यावर त्यांनी दोन्ही पक्षांच्या उमेदवारांचं पुरतं पानिपत केल्याचं स्पष्ट झालं. दोन्ही राष्ट्रीय पक्षांना धक्का देत १०८५ मतं मिळवत प्रल्हाद आलम सरपंचपदी निवडून आलेत.

हेही वाचा: बाळासाहेब ठाकरेंनी सेक्युलर पक्षांबरोबर २२ वेळा केली होती दोस्ती

ऊसतोड महिला कामगार ते सरपंच

आजही गावगड्यातल्या महिला या राजकीय प्रक्रियेपासून दूर राहिलेल्या दिसतात. महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थेत आरक्षण मिळालं आणि अशा महिलांना राजकीय प्रक्रियेत सहभागी होता आलं. तरीही प्रतिनिधित्वाचा मुद्दा येतो त्यावेळी महिला मुख्य राजकीय प्रवाहापासून कोसो दूर असतात. अशाच अनुसूचित जाती प्रवर्गातून येणाऱ्या नांदेडच्या राजश्री गोटमुकले.

राजश्री गोटमुकले या ऊसतोड कामगार आहेत. मोलमजुरी करून कसंबसं त्या आपलं घर चालवतात. त्यातूनच मुलांचं शिक्षणही करतायत. याच कष्टकरी महिलेला नांदेड जिल्ह्यातल्या पळशी गावच्या ग्रामस्थांनी सरपंचपदी निवडून दिलंय. एका ऊसतोड महिला कामगाराला सरपंचपदाचा बहुमान मिळलाय. ३५० मतं मिळवत राजश्री गोटमुकले या निवडणुकीत बहुमताने विजयी झाल्यात.

प्रस्थापितांचा बँड वाजवणारा बँडवाला

जळगावचे कांतीलाल सोनवणे लग्नसोहळ्यात बँडवादक म्हणून काम करतात. अंतुर्ली खुर्द हे त्यांचं गाव. इथंच ते कुटुंबासोबत राहतात. पहिल्यांदाच ते ग्रामपंचायत निवडणुकीच्या मैदानात उतरले होते. त्यांनी स्वतः सरपंचपदासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. कांतीलाल इतक्यावरच थांबले नाहीत त्यांनी स्वतःचं पॅनल या निवडणुकीत उभं केलं.

निवडणूक निकाल लागले तसं एका बँडवाल्यानं सगळ्याच राजकीय नेत्यांचा चांगलाच बँड वाजवला. कांतीलाल स्वतः निवडून आलेच शिवाय निवडणुकीच्या मैदानात उतरवलेले पॅनलचे सातही सदस्य त्यांनी निवडून आणले. कांतीलाल स्वतः सरपंचपदाच्या निवडणुकीत ५१३ मतांनी निवडून आलेत. त्यांच्या पूर्ण पॅनलला गावकऱ्यांनी साथ दिल्याचं निवडणूक निकालांवरून स्पष्ट झालं.

विशेष म्हणजे त्यांनी या निवडणुकीत कोणत्याच राजकीय पक्षाचा पाठिंबा घेतलेला नव्हता. स्वतंत्रपणे त्यांनी आपलं पॅनल उभं केलं होतं. त्यामुळे त्यांच्या निवडीची जिल्ह्यातच नाही तर अख्ख्या राज्यभरात चर्चा झाली. पुढं कोणत्या पक्षात जायचं याचा निर्णय लवकरच जाहीर करू असंही त्यांनी मीडियाशी बोलताना स्पष्ट केलं.

हेही वाचा: उद्धव ठाकरेः मन शुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वीमोलाची

संस्थाचालकाला शिपायाचा धोबीपछाड

एखाद्या संस्थेत आपण काम करत असू तर त्याच संस्थेच्या मालकाविरोधात जाणं किती अवघड असू शकेल? याची कल्पना केली तरी अनेकांना धडकी भरेल. पण म्हणतात ना राजकारणात काहीही होऊ शकतं. असंच काहीसं औरंगाबादमधे घडलंय. तिथल्या संस्थेत काम करणाऱ्या एका शिपायानं थेट संस्थाचालकाविरोधात सरपंचपदाची निवडणूक लढवली आणि जिंकलीही.

औरंगाबादच्या पैठण इथली हिरापूर-थापटी-तांडा ही ग्रुप ग्रामपंचायत. इथल्याच एका संस्थेत विनोद राठोड हे शिपाई म्हणून काम करतात. याच संस्थेचे संस्थाचालक असलेल्या कल्याण राठोड यांनी सरपंचपदासाठी आपला अर्ज दाखल केला होता. त्यांच्याच विरोधात संस्थेत शिपाई असलेल्या विनोद राठोड यांनीही वेगळ्या पॅनलकडून अर्ज दाखल केला होता.

मधे निवडणूक प्रचाराची रणधुमाळीही झाली. पण प्रत्यक्ष निवडणुकीचा निकाल लागला तेव्हा संस्थाचालकांना धोबीपछाड देत विनोद राठोड यांनी विजय आपल्याकडे खेचून आणला. त्यांच्या पॅनलचे ४ सदस्यही निवडून आले. तर विरोधी पॅनलला फक्त दोन जागांवर समाधान मानावं लागलं. एका शिपायानं थेट संस्थाचालकाला निवडणुकीच्या मैदानात चितपट केलं.

परदेशातून रिटर्न, थेट सरपंच

आपल्याकडे उच्चशिक्षित तरुणाई राजकारणात यायला कचरते असं कायमच बोललं जातं. पण हे खोडून काढायचं काम या निवडणुकांमधे तरुणांनी केलंय. सांगलीची यशोधरा शिंदे ही अशीच एक तरुणी. मिरजमधल्या वड्डी गावच्या गावकऱ्यांनी तिला लोकनियुक्त सरपंचपदी विराजमान केलंय. विशेष म्हणजे मेडिकलचं शिक्षण घेण्यासाठी यशोधरा ही युरोपातल्या जॉर्जिया देशात गेली होती. तिथून ती माघारी आली आणि लोकांनी तिला थेट ग्रामपंचायतीत धाडलं.

यशोधरा शिंदे हीने या निवडणुकीत आपलं पूर्ण पॅनल निवडून आणलंय. यशोधरा प्रतिनिधित्व करत असलेलं वड्डी हे गाव कर्नाटकच्या सीमेवर आहे. ५ हजार वस्तीच्या या गावात महिलांच्या आरोग्याचा प्रश्न यशोधरा शिंदेनं केंद्रस्थानी ठेवला. त्यासोबत इतर मूलभूत प्रश्न होतेच. त्या सगळ्यांना निवडणुकीचा मुद्दा करत या 'फॉरेन रिटर्न' मुलीने लोकांची मनं जिंकली. त्यामुळेच लोकांनी तिला सरपंचपदी बसवलं.

टाइम्स ऑफ इंडियाला यशोधरा शिंदेनं एक छोटेखानी प्रतिक्रिया दिलीय. त्यात तिने निवडणुकीत उभं राहण्यामागचा किस्सा सांगितलाय. तिचे आजी-आजोबा यापूर्वी सरपंच म्हणून निवडून आले होते. त्यामुळे ग्रामपंचायतीसाठी निवडणुका लागल्या तसं तिच्या वडलांनी जॉर्जियात असलेल्या आपल्या लेकीला गळ घातली. लेक भारतात आली. निवडणुकीचा फॉर्म भरला. प्रचाराला लागली आणि आता सरपंच म्हणून निवडूनही आली.

हेही वाचा: राज्यपालांनी उद्धव ठाकरेंना आमदार बनवणं, हे कायद्याला धरून आणि देशभक्तीलाही

भाजी विक्रेत्याचा सरपंच झाला

कोल्हापूरच्या शाहूवाडीतलं वरेवाडी हे अतिशय दुर्गम भागातलं गाव. याच गावात आनंद भोसले नावाचा तरुण राहतो. अगदी सर्वसामान्य कुटूंबातून येणाऱ्या आनंद याचं इथल्याच बांबवडे बाजारपेठेत भाजीचं दुकान आहे. रोजचा भाजीपाला विकून तो आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालवतो.

शाहूवाडी भागात आमदार विनय कोरे यांच्या जनसुराज्य पक्षाचं चांगलंच बस्तान आहे. स्वतः कोरे या भागाचं प्रतिनिधित्व करतात. इथल्याच वरेवाडीतून प्रतिस्पर्ध्यांना धूळ चारत आनंद भोसले सरपंचपदी निवडून आलेत. याआधी त्यांनी उपसरपंच म्हणून काम केलंय. त्यामुळे तेव्हा जो काही संपर्क त्यांनी वाढवला होता त्याचं फळ या निवडणुकीतून त्यांना मिळालंय.

विशेष म्हणजे आनंद भोसले यांनी कोल्हापूरच्या शिवाजी युनिवर्सिटीतून पत्रकारितेचं शिक्षण घेतलंय. ते करत असताना त्यांनी स्वतःचा खर्च भागवण्यासाठी छोटीमोठी कामंही केली. पत्रकारितेचं शिक्षण झालं आणि त्यांनी भाजी विक्रीचा व्यवसाय सुरू केला. जनसंपर्काच्या जोरावर त्यांनी निवडणुकीत छाप पाडलीय.

विशीतल्या पोरांची हवा

ग्रामपंचायत निवडणुकीतून तरुणाईनं आपला वेगळा पॅटर्न दाखवून दिलाय. १८ वर्ष झाली की आपल्याला मताधिकार मिळतो. पण अगदी याच वयात विशीतल्या तरुणाईनं राजकारणात एण्ट्री घेत 'हम भीं कुछ कम नहीं' हे दाखवून दिलंय. अशाच जालना जिल्ह्यातल्या तळणी गावच्या गौतम सदावर्ते या तरुणाने सगळ्यांनाच धक्का दिलाय. तळणी गावच्या इतिहासात पहिल्यांदाच एका तरुणाकडे गावचं सरपंचपद आलंय.

परभणी जिल्ह्यातल्या जिंतूरमधल्या सोनापूर तांडा गावच्या दीपक चव्हाण याने ग्रामपंचायत निवडणुकीत बाजी मारलीय. समाजसेवेचा ध्यास घेतलेल्या अवघ्या २१ वर्षांच्या दीपकची जनतेतून सरपंचपदी निवड झालीय. तर लातूरच्या अहमदपूरमधल्या शिंदगी-खुर्द आणि मंगदारी या ग्रुप ग्रामपंचायतीत डिग्रीच्या शेवटच्या वर्षात असलेला २१ वर्षांचा संगमेश्वर सोदगीर विजयी झालाय. तर कळमनुरीतल्या वाकोडी ग्रामपंचायतीत नर्सिंगचं शिक्षण घेतलेल्या सोनू भालेराव या मुलीने सरपंचपदी बाजी मारली.

अहमदनगरमधल्या बेलवंडी गावच्या ऋषिकेश शेलार या २४ वर्षांच्या तरुणानेही सरपंचपदाच्या खुर्चीत बसलाय. तर अकोल्यातल्या नैराट गावच्या गावकऱ्यांनी २१ वर्षांच्या प्रिया सराटे हिचीही सरपंचपदी निवड झालीय. विशेष म्हणजे आपली आजी विजया सराटे यांना हरवून प्रिया निवडणुकीत जिंकलीय. शिक्षणाच्या माध्यमातून गावचा विकास हे ध्येय असलेली शुभांगी रहिले ही २२ वर्षांची तरुणीही जळगावच्या आडगाव ग्रामपंचायतीची लोकनियुक्त सरपंच म्हणून सत्तेच्या खुर्चीत विराजमान झालीय.

शत्रुघ्न बाजड हा तरुण वाशीमच्या रिसोड या २५०० लोकवस्तीच्या गावचा सरपंच झालाय. त्याचं शिक्षण हैद्राबादच्या 'इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी' इथून झालंय. पीएचडीधारक असलेल्या शत्रुघ्न यांच्या बाजूने आता गावकऱ्यांनी आपला कौल दिलाय. कोल्हापूरच्या इचलकरंजीमधल्या तळंदगे गावातून सरपंचपदी निवड झालेला संदीप पोळ हा राज्यशास्त्रचा संशोधक विद्यार्थी आहे. तर कम्प्युटर ऑपरेटर आणि नर्सिंगचा डिप्लोमा केलेल्या दर्शना ढळे वाशीमच्या दिघी गावच्या सरपंचपदी निवडून आल्यात.

हेही वाचा: 

मनोहर पर्रीकरः शून्यातून विश्व उभं करणारा नेता

संघर्ष करायचा की शरणागती पत्करायची, हे ठाकरे कुटुंबाला ठरवावं लागेल

स्वबळावर सत्तेसाठी भाजपने हा फॉर्म्युला वापरल्यास शिवसेनेला बसणार झटका

राजेश टोपेः आईच्या आजारपणातही महाराष्ट्र बरा होण्यासाठी लढणारा आरोग्यमंत्री