भल्याभल्या प्रतिस्पर्ध्यांची फिरकी घेणारे फिरकीचे भारतीय जादूगार

०१ मार्च २०२३

वाचन वेळ : ६ मिनिटं


आश्विन, जडेजा आणि अक्षर या भारताच्या तिन्ही स्पिनरचं कौतुक करावंच लागेल. त्यांनी संधीचा छान लाभ उठवला. प्रतिस्पर्धी बॅट्समनना अधिक डोकं वर काढू दिलं नाही. त्यांनी बॅटिंगमधेही चमक दाखवली. जडेजा आणि पटेल यांनी उपयुक्त अर्धशतकं लगावली. आश्विनही नेटाने बॅटिंग करताना दिसला. यामुळे टीमला जणू बोनस मिळत गेला. 

भारतीय क्रिकेट टीमने पाहुण्या ऑस्ट्रेलिया टीमची पहिल्या दोन कसोटीमधे धूळधाण उडवली. त्याचं बरेचसं श्रेय फिरकी त्रिकुटाला दिलं जातंय. आश्विन, जडेजा आणि अक्षर पटेल यांनी धुमाकूळ घालत पाहुण्या बॅट्समनना नेस्तनाबूत केल्याचं दिसून आलं. नामुष्की म्हणावी असे सणसणीत पराभव ऑस्ट्रेलियाच्या वाट्याला आले. यापूर्वी इतक्या वाईटरित्या क्वचितच कांगारू हरलेत.

खेळपट्टीचा मुद्दा वादग्रस्त

खेळपट्टी आणि घरचं वातावरण या दोन गोष्टी नेहमीच यजमान टीमला फायदेशीर ठरतात असा इतिहास आहे आणि याचीच पुनरावृत्ती होताना दिसतेय. हल्ली सर्रास आपल्या बॉलरला अनुकूल खेळपट्ट्या यजमान तयार करतात. काही महिन्यांपूर्वी अ‍ॅडलेडमधे भारताचा डाव ३६ धावांत आटोपला होता. तिथं त्यांनी त्यांना हवी तशी खेळपट्टी ठेवली होती.

त्यामुळे खेळपट्टी हा कळीचा मुद्दा नेहमीच कसोटी क्रिकेटमधे ठरतो. हल्ली तर विजय मिळाल्यावर खुश होऊन विजयी कर्णधार खेळपट्टी तयार करणार्‍यांना बक्षीस ही देत असतो आणि त्यांचं तोंड भरून कौतूकही करतो. ऑस्ट्रेलिया कडून या खेळपट्टीबद्दल नाराजी व्यक्त होईलच.

हेही वाचा: लेजंड धोनीचा अखेरचा 'षटकार'

फिरकीचे तीन जादूगार

तरीही भारताच्या तिन्ही स्पिनरचं कौतुक करावंच लागेल. त्यांनी मिळालेल्या संधीचा छान लाभ उठवला. प्रतिस्पर्धी बॅट्समनना अधिक डोकं वर काढू दिल नाही. सतत दबाव ठेवला आणि मुख्य म्हणजे तिघांमधे ऊर्जा कमालीची होती. या तिघांचे कुठले ना कुठले विक्रम टप्प्यात होते म्हणून त्यांना सारखी बॉलिंग करायला हवी असायची. असा उत्साह, अशी उमेद असणं वाईट नाही.

या तिघांचं आणखी कौतुक यासाठी की त्यांनी बॅटिंगमधेही चमक दाखवली. जडेजा आणि पटेल यांनी उपयुक्त अर्धशतकं लगावली. आश्विनही नेटाने बॅटिंग करताना दिसला. यामुळे टीमला जणू बोनस मिळत गेला. हे तिघे अष्टपैलू म्हणावी अशी कामगिरी करताना दिसले. आता तर जडेजा आंतरराष्ट्रीय मानांकनामधे अव्वल अष्टपैलू म्हणून स्थान मिळवून आहे आणि आश्विन त्याच्या पाठोपाठ आहे.

आकडेवारी गाढव असते असं क्रिकेट पंडित पूर्वी म्हणायचे. पण आता आकडेवारी संगणकामुळे महत्वाची ठरू लागलीय. धावा कशा काढल्या किंवा विकेट कसे मिळाले ही गोष्ट आता गौण झालीय. किती काढल्या आणि घेतल्या या गोष्टीला महत्व आलंय. साहजिकच दोन कसोटीमधे ३१ विकेट घेणारे आश्विन आणि जडेजा हिरो मानले गेलेत. सोबत तिसरा पटेलही आहे. सिराजला तर वापरावंही लागलेलं नाही अशी स्थिती आहे.

अव्वल दर्जाची आकडेवारी

आश्विन आणि जडेजा यांनी एकत्रपणे खेळलेल्या ४५ कसोटीमधे तब्बल ४६२ विकेट घेतल्यात यावरून त्यांच्या थोरवीची कल्पना यावी. तसा पटेल नुकताच कसोटीपटू झालाय. तरी एकूण बारा कसोटीमधे त्याच्या नावावरही विकेटचं अर्धशतक आहे आणि सहाशेच्या आसपास धावाही आहेत.

आश्विन ९० कसोटी खेळलाय आणि त्याचे विकेट आहेत ४६३. त्याने तीन हजारच्यावर धावाही काढल्या आहेत. त्याने भारतात ५३ कसोटीमधे ३२६ विकेट घेतल्यात आणि जडेजा ने भारतात ३८ कसोटीमधे १८९ विकेट घेतल्यात तेही जेमतेम एका विकेटमागे वीस धावा खर्च करायचे.

याशिवाय या तिघांची वनडे आणि ट्वेंटी ट्वेंटीमधेही चांगली कामगिरी आहे. एकाच वेळी तीन तीन प्रकारात खेळताना एका स्पिनरला आपला टप्पा, दिशा योग्य ठेवताना आणि बॉलला उंची देताना खूप तडजोड करावी लागते. सतत सरावात राहावं लागतं. जडेजा तर जवळपास सहा महिने तंदुरुस्त नसल्याने सरावासाठी वंचित होता.

एकूण या तिघांचं कौतुक करावं अशीच यांची कामगिरी आहे यात शंका नाही. पण यांची जेव्हा सत्तर दशकातल्या फिरकी त्रिकूट किंवा चौकडी बरोबर तुलना केली जाते ती गोष्ट मात्र पटत नाही. मुळात अशी दोन विभिन्न काळातील खेळाडूंची तुलना करूच नये. याचं कारण वातावरण, खेळपट्टी, साहित्य, तंत्र यात झालेले बदल हे होय.

हेही वाचा: कमीत कमी सोयीसुविधा, तरीही अपंगाच्या भारतीय क्रिकेट टीमचं मोठं यश

सत्तरच्या दशकातली फिरकी

आज आपण आकडेवारीच मोठी मानली तरीही ते त्रिकूट म्हणजे बेदी, चंद्रशेखर, प्रसन्ना आणि वेंकटराघवन धरला तर ती चौकडी आताच्या या त्रिकुटाला भारी ठरते. जुनं ते सोनं अशा अर्थाने नाही. त्यांची भारतातली आणि भारताबाहेरची कामगिरी आपण लक्षात घेतली की त्यांची मातब्बरी समजते. हे चौघे फक्त १९६७च्या इंग्लंडमधल्या बर्मिंगहॅम कसोटीत एकत्र खेळले होते.

हे धाडस अर्थात तेव्हाचा चतुर आणि कल्पक कर्णधार पतौडीच दाखवू शकला होता. किंबहुना भारताची बॉलिंगची भिस्त ही वेगवान बॉलर फारसे नसल्याने स्पिनरवर ठेवायची शक्कल त्याचीच होती. जी पुढे वाडेकर आणि गावसकर यांनीही वापरली. तर सांगायला हवं की या फिरकीबहाद्दरांनी भारताला भारतातच नाही तर बाहेरही विजय मिळवून दिले.

यातला प्रसन्ना हा ऑफस्पिनर बॉलला उंची देण्यात वाकबगार होता. बिशन बेदी डावखुरा होता. त्याच्याकडे विविधता होती आणि तो चतुरही होता. चंद्रशेखर हा लेग ब्रेक आणि गुगली टाकायचा. त्याचा वेगात येणारा बॉल काही वेळा दिग्गज समजल्या जाणार्‍या वेगवान बॉलरने टाकलेल्या बॉलहून वेगात असायचा.

त्याचा पोलिओ मुळे लुळा असलेला उजवा हात अजब तर्‍हेने फिरायचा आणि त्यात वेगाची साथ असली की बघायला नको. त्याला टप्पा सापडला नाही तर महागडा ठरायचा आणि टप्पा सापडला तर तो अतिशय परिणामकारक ठरायचा. चौथा वेंकट हा फारशी विविधता ठेऊन नव्हता पण तो अचूक ऑफस्पिन टाकण्यात माहिर होता.

थक्क करणारी आकडेवारी

प्रसन्नाची आकडेवारी थक्क करणारी यासाठी आहे की त्याने ४९ कसोटीत एकूण १८९ विकेट घेतल्या. यातल्या ९५ विकेट भारतात तर ९४ भारताबाहेर होत्या. काय समतोल साधलाय बघा. त्याने १९७६मधे न्यूझीलंडमधे डावात ८ विकेट घेताना जी किफायतशीर बॉलिंग केली होती, तिला गाठणं आज ४७ वर्षानंतरही कुणा भारतीयाला शक्य झालेलं नाही.

त्याने दहावेळा एका डावात पाच विकेट घेतल्या त्यातल्या पाचवेळा भारतात तर पाचवेळा बाहेर. त्याने सामन्यात दहा विकेट दोनदा घेतल्या त्यातही एकदा भारतात एकदा बाहेर. म्हणजे तो काय कमालीचा स्पिनर असेल याची सहज कल्पना येते.

बेदीने ६७ कसोटीत एकूण २६६ विकेट घेतल्या. त्यातल्या १३९ भारतात तर १२७ भारताबाहेर. म्हणजे इथंही बऱ्यापैकी समतोल दिसतो. चंद्रशेखरही दोन्हीकडे यशस्वी होता. त्याने ५८ कसोटीत भारतात १४२ तर भारताबाहेर १०० अशा २४२ विकेट घेतल्या. वेंकटही बर्‍यापैकी संतुलन ठेवून होता. ५७ कसोटीत १५६ विकेट घेताना त्याने बाहेर ६२ तर भारतात ९४ अशी संख्या राखलेली दिसते.

म्हणजे यांना बाहेर हव्या तशा खेळपट्ट्या उपलब्ध नव्हत्या तरी त्यांची कामगिरी वाईट नव्हती. कदाचित बरीच बॉलिंग करायला मिळत असल्यानेही त्यांना फायदा झाला असेल. पण तरीही मान्य करावं लागतं की त्यांची प्रतिभा वेगळीच होती.

हेही वाचा: आरसीबीचा विराट म्हणजे उथळ पाण्याला खळखळाट फार!

तगडी बॉलिंग, दुबळी बॅटिंग

फिल्डींगचा आज जो दर्जा आहे, तो तेव्हा नव्हता. पण सोलकर, वाडेकर, अबिद, वेंकट हे चांगले फिल्डर होते. सगळे अकरा तसे नव्हते. इथं फिरकीची फिरकी म्हणून आपण घेऊ शकतो. आताचं त्रिकूट कशात भारी ठरत असेल तर बॅटिंगमधे. जुन्यापैकी एकटा वेंकट बर्‍यापैकी बॅट्समन होता.

बेदी प्रसन्ना हे क्वचित एखादी खेळी चांगले खेळून जायचे. चंद्रशेखर तर हात लुळा असल्याने एका डाव्या हातानेच बॉलला सामोरा जायचा. त्याच्या नावावर २३वेळा शून्यावर बाद व्हायचा नकोसा विक्रम आहे. तो आला की किती बॉल टिकणार हाच प्रश्न असायचा. त्याच्यावर उसळता बॉल टाकला जायचा.

यावर किरमानीने शक्कल लढवली होती. उसळता बॉल विकेटकीपर पकडेपर्यंत किरमानी स्ट्रायकर एंडला धावत सुतायचा. म्हणूनच जेव्हा वाडेकर भारतीय टीमचा व्यवस्थापक आणि प्रशिक्षक झाला तेव्हा त्याने सर्वात प्रथम जे निव्वळ बॉलर आहेत त्यांनाही बॅटिंगचा सराव करायला भाग पाडलं होतं.

नव्या त्रिकुटाची विशेष गोष्ट

दुसरं म्हणजे आताचं त्रिकूट फिल्डींग करण्यातही दर्जेदार आहे. जुन्यामधे प्रसन्ना आणि बेदी यांचं नंतर पोट सुटल्याने त्यांना अक्षरशः फिल्डींग करताना ते लपवावं लागायचं. तर चंद्रशेखर लुळ्या हातामुळे बॅट्समनजवळ फिल्डींग करू शकत नसायचा. वेंकट मात्र गलीत चांगला फिल्डर म्हणून नाव कमावून होता.

आणखी एका संदर्भात आताचं त्रिकूट वरचढ ठरतं ते आधी सांगितल्याप्रमाणे हे तिघेही तिन्ही प्रकारचं क्रिकेट खेळतात. जुन्यात चंद्रशेखर अवघा एक तर बेदी, वेंकट प्रत्येकी दहा वनडे सामने खेळले होते. प्रसन्ना तेवढाही नाही.

नवं त्रिकूट भारताबाहेर विशेष कामगिरी करू शकलेलं नाही हे वास्तव स्वीकारून केवळ फिरकीतलं प्राविण्य हा निकष लावला तर जुनं खरंच सोनं होतं. आज अक्षर पटेलची प्रामुख्याने कारकीर्द वनडे आणि ट्वेंटी ट्वेंटी क्रिकेटमधे अधिक आहे. कसोटीत तो मुरायचाय. त्यामुळे नव्या-जुन्या त्रिकुटाबद्दल तुलना करताना बरीच मर्यादा येते. कुणी का असेना जे भारतीय टीमला विजय मिळवून देतायत त्यांना मोठंच मानायला हवं.

हेही वाचा: 

कॉमेंट्रीटर असे अतिशहाण्यांसारखे का वागतात?

टीम इंडियाच्या पराभवाला भारतीय चाहतेही जबाबदार

स्वर्गातल्या वडलांना येस पप्पा म्हणणाऱ्या जॉनी बिअरस्टोची गोष्ट

जगातल्या सगळ्यात मोठ्या दुर्गुणाविरुद्ध क्रिकेटनं एका हत्यारासारखं काम केलं

(साभार: दैनिक पुढारी - बहार पुरवणी)