राम जगताप: शेतमजूर ते डिजिटल संपादक बनण्यापर्यंतचा प्रवास

०३ जून २०२२

वाचन वेळ : ७ मिनिटं


महाराष्ट्र फाऊंडेशन देत असलेल्या साहित्य आणि समाजकार्य क्षेत्राशी संबंधित पुरस्कारांमागची भूमिका, विजेत्या व्यक्तींवर लिहलेले आटोपशीर लेख, त्यांचं मनोगत, फोटो आणि इतर कामं, यापूर्वीच्या पुरस्कारप्राप्त मान्यवरांची यादी असं सगळं सामावलेली ‘स्मरणिका २०२२-महाराष्ट्र फाउंडेशन’ नुकतीच प्रसिद्ध झाली. यातला पत्रकार, लेखक, संपादक राम जगताप यांच्यावर लिहलेला हा लेख.

डेस्कटॉप दिसू शकेल आणि कीबोर्ड वापरता येईल इतकीच जेमतेम जागा रामच्या कामाच्या टेबलावर जाणीवपूर्वक राखलीय. बाकी सगळीकडे ‘तातडी’नं वाचायच्या, लिहायच्या पुस्तकांची, नोंदीच्या कागदांची, नियतकालिकांची चळत. टेबलाच्या डाव्या हाताला पुन्हा महत्त्वाच्या वर्तमानपत्रांची आणि मासिकांची मनुष्यउंची रास. झोपायच्या खोलीत पूर्ण भिंत व्यापलेलं पुस्तकांचं कपाट आणि आवश्यक संदर्भांची मासिकं, दिवाळी अंक, नियतकालिकं यांची मोठाली खोकी.

हे त्याच्या घरातलं थेट डोळ्यांना दिसणारं दृश्य, मात्र प्रत्यक्ष रामच्या डोक्यात नांदणारे कप्पे, उपकप्पे, चोरकप्पे, कड्याकुलपं करकचून लावून किल्ली सातासमुद्रापार टाकून दिलेले कप्पे! त्यांचा विषयच लांब. नुकती कुठं चाळीशी पार केलेल्या रामच्या केसांचा रंग उडाला आणि हळूहळू करत केसही उडत चाललेत. या परिणामाला निसर्गक्रम म्हणून मोकळं होता येणार नाही इतकं नाट्यमय, कष्टमय, चिकाटीचं आणि झपाट्याचं रामचं आयुष्य!

हेही वाचा: वाचकाचा लेख: माझ्या न्यूड मॉडेलिंगची खरीखुरी गोष्ट

मुद्रितशोधनापासून सुरवात करत पत्रकारिता, लेखन, संपादन करणारा, मराठीत अलीकडे उगवलेल्या डिजिटल फीचर पोर्टलसारख्या माध्यमात घुसून ठोस उभं राहणारा अभ्यासू, चिकित्सक, चोखंदळ पत्रकार म्हणून राम जगताप आता परिचित आहे.

‘तर्काचा घोडा’ हे रामनं त्याच्या एका सदराला दिलेलं नाव खरोखर चपखल आहे. अशाच तर्काच्या घोड्यावर मांड ठोकून सहसा बोलल्या न जाणार्‍या विषयांना हात घालत ओचकारे काढणं, कधी टवाळी करणं, समाज माध्यमातल्या अनुनयवृत्तीला फाट्यावर मारत खडे बोल सुनावणं तो करत आलाय. असं करून अप्रिय होण्याची भीती त्यानं कधी बाळगलीच नसावी. आयुष्यातल्या विपरीत परिस्थितीला धडका देण्यातून जे शहाणपण अंगी आलं ते टिकवून धरत तो कृती करत राहिलाय.

मराठवाड्यातल्या जालना जिल्ह्यातल्या पिंपरखेड बु. या छोट्याशा गावातल्या रामच्या लहानपणाच्या अभावाचं वर्णन ‘अठरा विश्‍वं दारिद्र्य’ या शब्दांत करणं तंतोतंत खरं असलं तरी पुस्तकी वाटेल. गल्लीतली मुलं शाळा सुटल्यावर, सुट्टीदिवशी खेळतायत, झोपतायत असं वातावरण आसपास असायचं तेव्हा राम, आईबाप आणि दोन भावांसोबत खांद्यावर फावडं, घमेलं घेऊन पाईपलाईन खोदायला, वळण टाकायला, केळी नाहीतर ऊस घोळायला निघालेला असायचा.

आपले सवंगडी लहानपण मनमुराद जगतायत आणि कामाला नाही म्हटलं तर बाप लाथाबुक्क्यांनी बुकलून काढेल, शाळा बंद करून टाकेल या भीतीनं मान मुकाट खाली खालून आपण कष्ट काढतोय याची जाणीव होऊन रडायला आलं तरी उसंत नसायची. किरणामाल गुंडाळून आलेला प्रत्येक कागद वाचून काढण्याचा त्याचा झपाटा पाहून आई कधीतरी म्हटलीही होती, ‘हा गुवाचा कागद पण वाचल्याशिवाय सोडणार नाही.’

असंच वाचता वाचता सापडलेल्या गिरगावच्या पत्त्यावर पोस्टकार्ड टाकून त्यानं कधीतरी नाटकाची दोन पुस्तकं मागवली. दिवसभर घाम गाळून साठ रूपये आणि मुलं हाताखाली असतील तर त्यांचे चाळीस रूपये अशी तोटकी कमाई असताना वडलांनी पाठ दणकून न टाकता पन्नास रूपये देऊन पार्सल सोडवलं इतकं रामचं वाचनवेड पराकोटीचं होतं.

हेही वाचा: पालघर झुंडबळी सत्य कळण्यासाठी सहा प्रश्नांची उत्तरं मिळायला हवीत

पाचवीनंतर मामाच्या पाटोदा गावाच्या शाळेत शिकायला जाण्यानं एकीकडं राम आणखी घुमा झाला, पण त्याच्या ‘इतक्याशा’ जगण्याला आणखी पदरही फुटले. शिक्षकांचा आवडता हुषार विद्यार्थी वाचलेलं वहीत उतरवून ठेवायला लागला. आसपासच्या बौद्ध वस्तीत चळवळीची गाणी ऐकायला, म्हणायला लागला. शाळेतल्या शिक्षकांमुळं पुस्तकांपर्यंत गाडी सरकली.

वेगवेगळ्या लेखकांच्या पुस्तकातल्या उपमा आणि प्रतिमा वाचताना त्याला वाटायचं, निसर्गाचं वर्णन करण्याएवढा शांतपणा आणि स्थैर्य प्रत्यक्ष जगण्यात असतं तरी का? मिळेल ते वाचत, मनाशी घोळवत पुस्तकांची वाट राम शोधत राहिला. तसंही शिकायचं असलं तर आपल्या आपल्या बळावर कमवून शिका असं बापानं फार लहानपणीच सांगितलं होतं, त्यामुळं बारावीनंतर पुढं शिकण्याचा निर्णय स्वत:च घ्यायचा होता. कॉलेज कुठलं, प्रवेश कसा घ्यायचा याबद्दल काहीच गंधवार्ता नव्हती.

शहरात गेलो तर गावच्या चाकोरीबद्ध जंजाळातून सुटका होईल म्हणून पुण्यात जायचं ठरवलं खरं, पण पोचल्यावर कळलं की प्रवेशाची तारीख केव्हाच उलटून गेलीय. त्या हुकलेल्या वर्षात गावात परतण्याऐवजी, सालगडी म्हणून फुलगावला राबणार्‍या मधल्या भावाबरोबर रामनं पुन्हा स्वत:ला ढोरमेहनतीला जुंपलं.

शेतमालकांची काचेच्या कपाटात शिस्तशीर लावलेली आजवर न पाहिलेली भरपूर पुस्तकं बघून रामचा जीव निवला. त्या काकांनी शिकवल्याप्रमाणे पेपरमधल्या महत्त्वाच्या लेखांची कात्रणं नीट कापून बैजवार लावताना राम हरखून जायचा. घरात स्वतंत्र वर्तमानपत्र येतं हेही तिथं नव्यानंच कळलेलं. याच अनुभवांचा अमीट ठसा रामच्या घराच्या कोपर्‍याकोपर्‍यात दिसतो.

दहावी झाल्यावर गावापासून तालुक्यावजा गावात कॉलेजसाठी पंधरा-सोळा किलोमीटरचं अंतर कापण्यासाठी सायकल असली तरी पायात चप्पल कुठं होती! अनवाणी फिरताना मुलं कीव केल्यासारखं बघतात म्हणून मग कॉलेजला आठवडाभर दांडी मारून राबणूक केली तेव्हा कुठं स्लीपरसाठी पैसे हाती आले. १९९९ला महाविद्यालयीन शिक्षणासाठी पुण्यात कॉटबेसिसवर राहायला लागल्यावर दुर्मिळ पुस्तकं आणि नियतकालिकं विकणारी माणसं आणि जागा हुडकल्या.

एसटीडी बूथ चालव, दही-ताक, सँडविचच्या हॉटेलात पडेल ते काम कर, लोणच्याच्या कारखान्यात राब असं करत रामनं शिक्षण पूर्ण करता करता स्वत:च्या खर्चानं पुस्तकं घ्यायला सुरुवात केली. जे जे नवे संदर्भ कानावर पडतील त्याबद्दलची पुस्तकं, अंक, कोश शोधून वाचण्याचा सपाटा लावला. अर्थात तुटपुंज्या कमाईत राहाणं, खाणं आणि कॉलेजचा खर्च भागवताना जीव आधीच मेटाकुटीला यायचा, त्यात जुनी का असेनात पुस्तकं स्वखर्चानं घेणं हे वेड भलतंच होतं.

शिवाय वेगवेगळ्या वाचणार्‍या, चळवळीतल्या माणसांना त्यांची वेळ घेऊन फाफलत जाऊन भेटणं, त्यांच्याशी बोलून जगाबद्दल आणखी कळून घ्यायचा प्रयत्न करणं हे तर तो झपाटल्यासारखा करतच होता. त्याच दरम्यान कुठंकुठं लिहून, मुद्रितशोधनाचं काम करून त्याचं सुख त्याला लाभत होतं. सगळी वणवण, सगळे मनस्ताप, अस्थिरता, बेचैनी तो डायरीच्या पानांवर मोकळी करायचा.

ते अक्षर अगदी ओघवतं, लयदार! अशीच काही पानं वाचली तेव्हा कळलं, वाचून झालेल्या पेपर्स आणि नियतकालिकांची रद्दी विकून या माणसानं दोनदोन दिवसांची पोटाची रिकामी खळगी कधी दूधपोहे खाऊन, कधी शेंगदाण्याचे लाडू खाऊन तर कधी नुसतीच उकडलेली अंडी खाऊन कशीबशी भरलीय.

हेही वाचा: अर्णब सोनिया गांधींवर टीका करत होते, तेव्हा माझं काळीज रडत होतं

पुढे कधी लोकसत्ता आणि प्रहारसारख्या दैनिकांत रविवारच्या पुरवण्यांचं संपादन पाहिलेल्या, आयबीएन लोकमतसारख्या त्यावेळी नव्यानं आलेल्या चॅनलमधे निखिल वागळेंच्या हाताखाली आणखी धार चढलेल्या, निर्भीड, करारी, टोकदार सत्य लिहिणार्‍या या माणसाच्या अबोलपणाचं खापर सहजच हुशारीच्या अहंकारावर, त्यामुळे एरवी ग्रासणार्‍या तुच्छतावादावर, त्यातून बहरणार्‍या शिष्टपणावर फोडणं शक्य असतं.

रामची जडघडण थोडक्यात कळली तरी लक्षात येतं, हा माणूस सावकाश खुलतो. त्याची लेखणी आणि चिकित्सक बुद्धी भीड बाळगणारी नाही, पण माणसांचं प्रेम, त्यांचा जिव्हाळा, स्पर्श, खुली चेष्टामस्करी याला सामोरं जाताना तो कवचात शिरतो.

भाग्यश्री भागवत सारखी तितकीच तीक्ष्ण बुद्धीची बायको आणि त्या दोघांना पुरून उरेल अशी चळवळी, उधाणलेली लेक मुद्रा आयुष्यात आल्यावर आता राम बर्‍याच प्रमाणात शांतवला आहे. कवचाचा आश्रय घेणं कमी होत चाललंय. आपलं कोवळेपण, मूलपण खोल दडवून ठेवणारा, आस्तेआस्ते खुलणारा राम व्यवहारशून्यतेबद्दल मात्र तसूभर बदललेला नाही.

पुण्यात आल्यावर ‘साहित्यसूची’, ‘सत्याग्रही विचारधारा’ या अंकांसाठी कामं करता करता आणि ‘साधना’ परिवाराच्या सान्निध्यानं पुरोगामी, ज्ञानव्रती माणसांशी त्याच्या भेटीगाठी व्हायच्या. त्यातून वाचन, विचार, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, लोकशाही, मूल्यं या संकल्पना अधिकाधिक स्पष्ट होत गेल्या. काम अधिक ठोस, ठाम होत गेलं. नंतर नोकरीनिमित्तानं मुंबईला गेल्यावर तर वर्तुळ वाढतच गेलं.

साहित्यापासून राजकारणापर्यंत सतत अपडेट राहाणं, जगभरात घडणार्‍या घटनांचे बिंदू जोडून त्याचा अन्वयार्थ लावणं ही जडून गेलेली सवयच. या सगळ्या घुसळणीतून तयार झालेल्या चिकित्सक बुद्धीचा परिपाक म्हणजे रामनं मित्रासह संपादित केलेलं पहिलं पुस्तक ‘मराठा समाज : वास्तव आणि अपेक्षा’.

२००४च्या भांडारकर इन्स्टिट्यूटवरील हल्ल्याच्या पार्श्‍वभूमीवर, मराठ्यांच्या संघटनेची महाराष्ट्रभर दहशत तयार झालेली असताना इतिहास आणि वर्तमानाकडे भेदक दृष्टीनं पाहात उघडपणे घेतलेली भूमिका रामच्या पत्रकारितेतील निष्ठेबद्दलचं बोलकं उदाहरण आहे. हे पुस्तक त्याच्या तिशीच्या आसपास प्रकाशित झालं. ज्या जातीत जन्माला आला तिची आणि स्वत:ची कठोर चिकित्सा करत त्यानं जणू भविष्यातली त्याची कार्यपद्धतच स्पष्टपणे सांगितली.

पुढे कधी त्याची एकट्याची किंवा सहलेखक-संपादकासह ‘मध्यमवर्ग उभा, आडवा, तिरपा’, ‘कर्ती माणसं’, ‘नोटबंदी - अर्थक्रांती की आर्थिक घोडचूक’, ‘मायलेकी बापलेकी’ अशी पुस्तकं प्रकाशित झाली. विषय ठरला की पछाडून जात रात्ररात्र संदर्भांसाठी गाडून घेणारा, मूळापर्यंत जात परंपरा तपासत, प्रश्‍न विचारत, चिकित्सा करत, सत्याशी इमान राखण्याचा पत्रकारितेचा धर्म त्यानं कसोशीनं सांभाळलेला दिसतो.

हेही वाचा: नेशन वॉन्ट्स टू नो अर्णब, ये जबां किसकी हैं?

प्रिंट मीडियातून निखिल वागळेंच्या आग्रहामुळे एकदम विज्युअल मीडियात शिरलेला राम कष्टाची तयारी असल्यामुळेच कधी भांबावला नाही. या माध्यमाची ताकद, मर्यादा, पेच सगळं समजून अक्षरश: त्याला भिडला. अनुभवांचा पैस विस्तारला. बघताना मान दुखून जाईल इतकी उंच, श्रेष्ठ माणसं त्यानं अनुभवली. त्यांचं प्रेम मिळवलं.

२६/११ च्या हल्ल्यात अर्ध्या तासाच्या फरकानं टर्मिनसवरून परतल्यामुळं जीव वाचलेल्या रामच्या वाट्याला खरंतर सर्वसामान्यपणे यशस्वी म्हणता येईल अशी कामाची जमीन मिळाली होती. मात्र चोवीस तास आल्या बातमीला सामोरं जात, मेंदूतले संदर्भ जुळवून मांडण्याच्या तात्कालिक जगण्याला तो अपार थकला.

नवं वाचण्यासाठी, पाहण्यासाठी, जगतोय त्याचं विश्‍लेषण करण्यासाठी जिथं उसंत नाही तिथं टिकून काय करायचं म्हणून जुन्या अनेक नोकर्‍यांप्रमाणे एका तिडीकेसरशी त्यानं हीही नोकरी सोडली. सामाजिक दृष्टीनं माणूस जसजसा वरच्या पातळीवर जातो, त्याचं व्यक्तिगत स्वातंत्र्य मर्यादित होत जातं याचं भान न विसरता राम स्वत:ला कायम जमिनीवर राखत राहिला.

त्याच जमिनीवर आपल्या पुढच्या लेखाच्या तयारीसाठी मांडलेली पुस्तकं आणि अंक बाजूला करत आपल्या लेकीबरोबर हा तर्कदुष्ट राम कोलांट्याउड्या मारतो. ताजा होतो. म्हणून तर लहान मुलाच्या उत्साहानं मराठीत नवं असलेलं डिजिटल फीचर पोर्टलचं वर्तमान आणि भविष्यकालीन जग आणि निकड समजावून घेत ‘अक्षरनामा’सारखं फीचर पोर्टल पाच वर्ष यशस्वीपणे चालवून दाखवतो. त्याची क्षमता आजमवण्यासाठी स्वत:ला श्रमवतो.

मात्र ही उस्तवार करताना आणि घडी पुन्हापुन्हा बसवताना त्याचं स्वत:चं लेखन, त्यासाठीची बैठक यासाठी नेहमीप्रमाणे वेळ अपुराच पडतोय. तरीही रामला खूप हात आणि बरेच डोळे आहेत असं मला वाटतं. जुन्या अनुभवांचा कडवटपणा मनात न बाळगणारा राम स्थितप्रज्ञ असल्याचा आवही आणत नाही. तो शंभर टक्के माणूस आहे. तसा तो उरलाय म्हणूनच मर्म ओळखणारा आणि योग्य वेळी मर्मावर बोट ठेवत, वितुष्ट घेत समाजाला जागं करणारा पत्रकार म्हणून टिकू शकलाय!

हेही वाचा:

तर, ते मलाही नक्षलवादी ठरवतीलः नजुबाई गावित

राजन गवसः जगण्यातूनच आली लिहण्याची भूमिका

आंखी दास यांच्या फेसबूक राजीनाम्याच्या निमित्ताने

आर्या बॅनर्जी : आयुष्याचा टोकाला जाऊन शोध घेणारी मुसाफिर