‘वाकड्या तिकड्या’ लोकांचं प्रेम

१३ फेब्रुवारी २०१९

वाचन वेळ : ५ मिनिटं


‘प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं’. पाडगावकरांची कविता म्हणताना ‘तुमचं-आमचं’ म्हणजे नक्की कोणाचं प्रेम म्हणायचं असतं आपल्याला? एबीसीडीच्या बाराखडीतल्या ‘एम आणि एफ’, म्हणजे मेल आणि फिमेलचंच ना? पण जेंडरच्या बाराखडीत उरलेल्या ‘एलजीबीटीक्यूए’ अल्फाबेट्सचं काय? त्यांच्या प्रेमाचं काय करायचं? त्याचं प्रेम सेम असतं की वेगळं? हे त्यांच्याच शब्दात सतरंगी वॅलेंटाईनच्या लेखांमधे वाचता येईल.

मार्केटचा इवेंट म्हणा किंवा पाश्चात्त्य खूळ. दरसालप्रमाणेच वॅलेंटाईन वीक जोरात सुरू आहे. ‘लव इज इन द एअर’ म्हणत हवेत तरंगणारे खूप लोक ऑनलाइन ऑफलाईन दिसायला लागलेत. एरवी निळं असलेलं फेसबुकपण आठवडाभर गुलाबी होईल का काय असं सगळं चित्र आहे.

हां, म्हणजे प्रेमाचा रंग गुलाबी, इश्काचा रंग लाल असं काय-काय आपल्या डोक्यात सालोसाल घट्ट बसलेलं असतं. एकदम शारूखच्या स्टायलीत दोन्ही हात पसरून आभाळाकडे बघत ‘रंग दे तू मोहे गेरूआ’ म्हणण्यातपण एक रोमान्स आहेच. पण ‘कोलाज’चा यावेळचा पहिला वॅलेंटाईन मात्र लाल गुलाबी गेरूआ नसून सतरंगी आहे.

मेट्रोसिटी असेल किंवा एखादं खुर्द-बुद्रुक. लवस्टोऱ्या एकदम प्राचीन काळापासून सगळीकडे घडत आल्यात. एक ‘तो’ आणि एक ‘ती’ च्या प्रेमाची आग पेटलेली असते. त्या तथाकथित ‘नैसर्गिक’ प्रेमाच्या आगीतही आपला समाज ‘खानदान की इज्जत’, ‘लोग क्या कहेंगे’चं रॉकेल-पेट्रोल इमानेइतबारे ओतत राहतोय. त्यात मग ते प्रेम त्या दोघीतलं किंवा त्या दोघातलं असलं तर? मग तर एकदम ‘दक्ष’ पोझीशन घेत ‘संस्कृती खतरेमें है’चे नारे लागायला लागतात!

‘प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं’. पाडगावकरांची कविता म्हणताना ‘तुमचं-आमचं’ म्हणजे नक्की कोणाचं प्रेम म्हणायचं असतं आपल्याला? एबीसीडीच्या बाराखडीतल्या ‘एम आणि एफ’, म्हणजे मेल आणि फिमेलचंच ना? पण जेंडरच्या बाराखडीत उरलेल्या ‘एलजीबीटीक्यूए’ अल्फाबेट्सचं काय? त्यांच्या प्रेमाचं काय करायचं? हे एलजीबीटीक्यूए म्हणजेच लेस्बियन, गे, बायासेक्सुअल, ट्रान्सजेंडर, क्विर आणि असेक्शुअल. त्याचं प्रेम सेम असतं की वेगळं? हे त्यांच्याच शब्दात आज आणि उद्या तुम्हाला वाचता येईल.

कलम ३७७ रद्द झालंय, काही दिवसांपूर्वीच मुंबईत दोन गे माणसांचं लग्न थाटामाटात लागलं. त्यातला विनोद फिलीप चेन्न्नईचा तर त्याचा जोडीदार विन्सेट  फ्रान्सचा आहे. दोघं थोड्याच दिवसात पॅरिसला सेटल होणारेत. ३७७ चं कलम रद्द करत ‘प्यार करना कोई गुनाह नही’ असं खुद्द सुप्रीम कोर्टानं सांगून झालंय. पण तुमच्या-माझ्या शेजारचे बरेच काका-काकू, ताई-दादा अजूनही ‘शी, काय ही घाणेरडी-विकृत लोकं’ असंच म्हणतात.

अशा ‘स्ट्रेट’ नसलेल्या कपल्सना रहायला घर मिळणं अजूनही अवघड आहे. एकूण काय, तर माहोल अजूनही जिगर मुरादाबादींनी सांगितल्यासारखा ‘ये इश्क नही आसान’ असाच आहे. तरीही ही स्ट्रेट नसलेली ‘वाकडीतिकडी माणसं’ एकमेकांच्या प्रेमात पडतात. प्रेमात बुडतात, तरंगतात, धडपडतात, उभी राहतात. एरवीच ‘स्ट्रेट’वाल्यांचा प्रेमगेम रंगीला-रसीला. एलजीबीटीक्यूमधला लव-सेक्स-धोखाचा खेळ तर अजुनच थ्रिलिंग असतोय असं म्हणायला हरकत नाही. कारण तुम्ही-आम्ही ‘स्ट्रेट’ लोकांनी त्यांना ‘नॉन स्ट्रेट’चं लेबल लावून उगाचच एक ‘टॅबू’ उभा केलेला असतोय.

‘पकौडे तळण्याचा रोजगार सोडा, पण बजरंग दलात सध्या वॅकन्सी आहे’ अशा अर्थाचे जोक्स सोशल मीडियावर फिरतायत. त्यात तथ्य आहेच! पण सगळ्याच कट्टरतावाद्यांना फेब्रुवारीतला हा ‘प्यार का आतंक’ धोकादायक वाटतो. असं का असेल? प्रेमात पडलेली, पडू पाहणारी माणसं सनातन्यांना इतकी डेंजरस का वाटतात? ही प्रेमळ माणसं कदाचित अधिक समंजस, अधिक विवेकी किंवा थेट क्रांतिकारी, होण्याचा धोका सत्तेला घाबरवत असतो की काय? इथं फक्त राजकीय सत्ता अपेक्षित नाही. सामाजिक, कौटुंबिक, सांस्कृतिक सत्तासुद्धा प्रेमाला घाबरते. जनाब फैज अहमद फैज यांच्यासारखा ग्रेट शायर लिहून जातो.

'मकाम 'फैज' कोई राह में जचा ही नही

जो कू-ए-यार से निकले तो सू-ए-दार चले'

दरम्यानचा कुठलाच थांबा मला आवडला नाही, प्रेयसीच्या मोहल्ल्यातून निघालो तो आता थेट आता सुळावर चढायला चाललोय, प्रेमातली जिगरबाज फकिरी ही अशी असते! नाही नाही, ते ‘मेरा क्या, फकीर आदमी हूं’ वाली ती राजकीय फकिरी झाली. विषयांतर नको.

तर, सध्या गजाआड असलेला आसाराम बापू दरवर्षी म्हणतो ‘१४ फरवरी को मातृ-पितृ पूजन दिवस मनाये.’ पाकिस्तानच्या एका कॉलेजात मागे फतवा निघाला. १४ फेब्रुवरी साजरा करा. पण त्या दिवशी मुलांनी मुलींना ‘हिजाब’ गिफ्ट द्यावेत! हे असले विनोदी लोक काय किंवा बजरंग दल काय, हे सगळे प्रेम-कुंठीत माणसं वाटतात मला. हिंसा, द्वेष, विखार या सगळ्यासाठी कमालीचे तय्यार आणि फक्त ‘प्रेम’ म्हणलं की ‘निकाल तलवार’! या बिचाऱ्यांना कधीच कुणाचं खरंखुरं, कोसळतं प्रेम मिळालं नसेल. यांच्या डोळ्यात पाहून कधी कुणी ‘आशिकी’मधलं ‘मै दुनिया भुला दुंगा, तेरी चाहत में’ म्हणलं नसेल.

तीन महिने झाले बीडला बालाजी लांडगे नावाच्या तरुणानं खोट्या प्रतिष्ठेच्या नावाखाली सुमीत वाघमारेची हत्या केली. सुमीतनं बालाजीच्या बहिणीशी नुकताच प्रेमविवाह केलता. बालाजीच्या आयुष्यात कधी कुणावर त्याचा क्रश नसंल काय? तो कुणावर प्रेम करेल तेव्हा त्या आवडत्या चेहऱ्यात बहिणीचा चेहरा दिसणार नाही का त्याला कधी? दिसल्यावर त्याला रडू येईल की भीती वाटेल?

अशीच गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये दलित प्रणय कुमारची हत्या झाल्यावर अमृताच्या पोटात दोघांचं बाळ वाढत होतं. नुकताच तिनं एका मुलाला जन्म दिलाय. हे इवलंसं बाळ म्हणजे प्रेम विरुद्ध विखार, सनातनी विरुद्ध परिवर्तनवादी यांच्यातल्या संघर्षातला एक ठसठशीत विजय आहे. द्वेषाला उत्तर देताना केलेलं एक मार्मिक राजकीय विधान आहे. अमृता-प्रणयचा प्रेमवंश असाच अनादी अनंत काळापर्यंत वाढत राहील!

मागेच शायर जिगर मुरादाबादी म्हणून गेलेत,

'इस लफ्ज-ए-मोहब्बत का अदना ये फसाना है

सिमटे तो दिल-ए-आशिक फैले तो जमाना है'

आपणही आपल्या प्रेमाचा दायरा थोडा वाढवूया. प्रेम लोकशाहीनं दिलेला ‘राईट टू चूज’ म्हणजेच निवडीचा अधिकार बजावायला लावतं. जात-धर्म-वर्ग-वर्ण-भाषा इतकंच काय, जेंडरचेही बांध ओलांडून माणूस व्हायला सांगतं. म्हणूनच प्रेम करणं, कुणाचं कोसळतं प्रेम पेलणं इतकंच काय कुणाचं प्रेम समजून घेणंही खरंच अवघड आहे. तुम्हा सगळ्यांना ती हिंमत, ती ताकद मिळो,

हॅप्पी वॅलेंटाईन!
 

हेही वाचाः

तुमचं आमचं सेमच असतं

वो सुबह कभी तो आयेगी!

छोट्याशा गावातल्या दिशाचा सतरंगी संघर्ष