कोकणातल्या जांभा खडकाची रंजक कुळकथा

०२ ऑक्टोबर २०२१

वाचन वेळ : ६ मिनिटं


धो धो पावसाच्या कोकणात, घाटमाथ्यांवर आढळणारा जांभा. त्याच्या चिरा, त्याच्यापासून बनवलेली घरं. हे सगळं आपल्या परिचयाचं. मोहात पाडणारं. पण हा जांभा तिथे कसा आणि कुठून आला, याची कहाणी रोचक आहे. सृष्टीचा हाच इतिहास उलगडून दाखवणारा ज्येष्ठ पुराजीववैज्ञानिक डॉ. विद्याधर बोरकर यांचा भवताल मासिकाच्या ताज्या अंकातला हा लेख.

महाराष्ट्र राज्याच्या ८० टक्के क्षेत्रात ज्वालामुखीजन्य काळा कातळ म्हणजे बेसॉल्ट आढळतो. कोकणही याला अपवाद नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दक्षिणेकडचा काही भाग सोडला तर कोकणातही सगळीकडे काळा कातळच आढळतो.

कोकणात बऱ्याच ठिकाणी, आणि घाटावरही काही ठिकाणी, काळ्या कातळाच्या जोडीने जांभा दगड म्हणजे लॅटेराइट सापडतो; पण तोही ऊन, वारा, पाऊस यांचा काळ्या कातळावर परिणाम होऊनच बनलेला आहे.

अशा परिस्थितीमधे कोकणात आणि सह्याद्रीला लागून असणाऱ्या घाटावरच्याही काही जिल्ह्यामधे अॅल्युमिनिअमचा धातुपाषाण म्हणून ओळखला जाणारा बॉक्साइट आला कुठून, अशी शंका कुणाच्या मनात आली तर नवल नाही. वस्तुस्थिती अशी आहे की बॉक्साइट जांभा दगडाच्या पोटातच असतो.

हेही वाचा: डळमळले भूमंडळ : किल्लारीच्या आठवणींना उजाळा (भाग १)

जांभा खडक हवामानाची निर्मिती

जांभा खडकाच्या सड्यांमधे बॉक्साइटचे साठे कसे निर्माण होतात, हे पाहायचं असेल तर त्यासाठी आधी आपल्याला जांभा खडकाची कुळकथा समजून घ्यावी लागेल. खरं तर काळा कातळ धडधाकट, एकसंध दिसतो. त्याच्यापासून पिवळसर, तांबडट, अथवा जांभळट रंगाचा; कुठे कुठे पांढुरक्या रंगाचे पट्टे असणारा; जागोजागी भोकं पडलेला जांभा दगड तयार होत असेल, हेच आधी बुद्धीला पटत नाही.

जांभा खडकाबद्दल आणखी एक गोष्ट स्पष्ट करणं गरजेचं आहे. जांभा खडक फक्त काळ्या कातळापासूनच तयार होतो असं नाही. भारतातही आणि भारताबाहेरही, तो इतर अनेक खडकांपासूनसुद्धा तयार होतो. एखाद्या प्रदेशात कोणता  खडक अस्तित्वात आहे, आणि तिथलं हवामान कसंय, या दोन गोष्टींवरून त्या खडकापासून जांभा दगड तयार होऊ शकतो की नाही हे ठरतं.

आपण हे लक्षात घ्यायला हवं की जगभरातले खडक बारा महिने अठरा काळ ऊन, पाऊस आणि वारा यांना तोंड देत असतात. दिवसरात्रीच्या पाठशिवणीच्या खेळानुसार त्यांच्याभोवतीच्या पर्यावरणात दैनंदिन बदल होत असतात. त्याहूनही अधिक तीव्र बदल उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा अशा ॠतुचक्रामुळे होत असतात.

दोन महत्वाच्या प्रकिया

या सगळ्याचा खडकांवर परिणाम होत असतो. त्यामुळे खडकांची अगदी मंदगतीने झीज होते. ही झीज लाखो वर्ष सुरू असते, आणि ती दोन प्रकारे होत असते फिजिकल डिसिंटिग्रेशन म्हणजे भौतिक विच्छेदन आणि केमिकल  डीकॉम्पोजिशन रासायनिक विघटन. भौतिक विच्छेदनामुळे खडकांचे तुकडे तुकडे होतात. धोंडे, मोठे दगड असे डबर; आणि जोडीने लहान दगड, छोटे खडे, चुरा, आणि भुगा अशा अनेक प्रकारांनी खडकांचं विच्छेदन होतं.

पावसाच्या पाण्याबरोबर यातले छोटे खडे, चुरा, आणि भुगा हे वाहून जाऊ शकतं. ओहोळ आणि ओढे यांच्या द्वारे नदीकडे, आणि नदीच्या मार्गे समुद्राकडे, असा त्या तुकड्यांचा, चुऱ्याचा आणि भुग्याचा प्रवास सुरू असतो. भौतिक विच्छेदनामुळे झालेल्या तुकड्यांपैकी आणि चुऱ्यापैकी सगळाच्या सगळा भाग पाण्याबरोबर वाहून जात नाही. काही भाग मूळ ठिकाणीच शिल्लक राहतो.

रासायनिक विघटनामुळे खडकांमधे रासायनिक बदल होतात. त्यातून दोन प्रकारचे पदार्थ निर्माण होतात; पाण्यात विरघळणारे, आणि पाण्यात न विरघळणारे. त्यातले पाण्यात विरघळणारे पदार्थ पावसाच्या पाण्याबरोबर वाहून जातात. जे न विरघळणारे आहेत, त्यातलेसुद्धा काही कण पाण्याबरोबर वाहून जातात. काही कण मात्र मूळ ठिकाणीच शिल्लक राहतात.

भौतिक विच्छेदन आणि रासायनिक विघटन या दोन्ही प्रक्रिया मिळून खडकांवर होणारा जो एकूण परिमाण आहे, त्याला विदरण म्हणतात. ज्या प्रदेशात तापमान आणि पावसाचं प्रमाण जास्त असतं, अशाच प्रदेशात मूळ खडकापासून जांभा दगड तयार होण्याची शक्यता जास्त असते. कारण तिथल्या खडकांचं भौतिक विच्छेदन आणि रासायनिक विघटन या दोन्ही प्रक्रिया खूप परिणामकारक रीतीने घडून येतात.

हेही वाचा: पाऊस तर जगभर पडतो, पण भारतातला मान्सून जगावेगळा आहे!

उष्ण कटिबंधीय तापमान

मूळ खडकापासून जांभा खडक तयार होतो म्हणजे नक्की काय घडतं, हे समजून घेणं स्वारस्यपूर्ण आहे. तापमान आणि पावसाचं प्रमाण हे हवामानातले दोन्ही घटक जास्त असणारी ठिकाणं म्हणजे कर्कवृत्त आणि मकरवृत्त यांच्या दरम्यानचा, म्हणजेच उष्ण कटिबंधाचा प्रदेश होय.

या प्रदेशाच्या हवामानाची काही वैशिष्टयं आहेत. इथलं तापमान सर्वसाधारणपणे २७ अंश सेल्सिअसच्या आसपास असतं. इथला उन्हाळा अत्यंत तीव्र असतो, आणि तापमान बरेच दिवस २७ अंश सेल्सिअसपेक्षाही काही अंशांनी जास्त असतं. हिवाळ्यातही तापमान सहसा १८ अंश सेल्सिअसपेक्षा खाली जात नाही. त्यामुळे या प्रदेशातला हिवाळा अगदी निष्प्रभ असतो.

तापमानाचं प्रमाण जास्त असल्यामुळे हवेमधे बाष्पाचं प्रमाणही खूप असतं. शिवाय उष्ण कटिबंधात पावसाचं प्रमाणही जास्त असते. या पट्ट्यात किमान चार महिने मोसमी पाऊस पडतो. काही ठिकाणी तर बारमाही पाउस पडतो. या परिस्थितीमुळे उष्ण कटिबंधातल्या खडकांचं रासायनिक विघटन प्रभावीपणे होतं. पुरेशा प्रमाणात पाउस पडत असल्यामुळे भूजलाचाही तुटवडा नसतो. त्यामुळे खडकांचं विघटन अधिक परिपूर्णपणे होण्यासाठी भूजलाचाही हातभार लागतो.

असा अवतरतो जांभा खडक

उष्ण कटिबंधातल्या इतक्या खडकांना अशा खडतर प्रकारच्या भौतिक आणि रासायनिक विदरणप्रक्रियेला सामोरं जावं लागतं. खडकांच्या विदारणापासून निर्माण झालेल्या पदार्थांपैकी काही भाग पाण्याबरोबर वाहून जातो, हे आपण पाहिलंच. वाहून जाणाऱ्या पदार्थांमधे रासायनिक विच्छेदनातून निर्माण झालेल्या पदार्थांपैकी सोडिअम, पोटॅशिअम आणि कॅल्शिअम यांच्या क्षारांचा समावेश असतो.

हे क्षार मूळ खडकांतून मुक्त होऊन पाण्यात विरघळले की त्या पाण्याची रासायनिक क्षमता इतकी वाढते की खडकातल्या खनिजांचं विघटन होऊन त्यातून बाहेर पडलेल्या सिलिकॉन डाय ऑक्साइडचा काही भागही त्यात विरघळतो. पाण्यावाटे वाहून जाणाऱ्या क्षारांबरोबर सिलिकाही काही प्रमाणात निघून जाते.

खडकाच्या मूळ रासायनिक घटकांपैकी काही अशा प्रकारे निघून जातात; आणि लोहाची ऑक्साइडं, हायड्रॉक्सॉइडं, बाकीच्या सिलिका आणि अॅल्युमिनिअमचे हायड्रॉक्सॉइड ही न विरघळणारी रसायनं मागे उरतात. लोहाच्या हायड्रॉक्सॉइडमुळे मागे राहिलेल्या रसायनांच्या या मिश्रणाला गडद तांबडी छटा येते.

हेही वाचा: इतिहास सांगतो, निसर्गातलं वैविध्य संपत असल्यानं जगावर वायरस संकट

कोकणात मोठ्या प्रमाणात आढळतो

मूळ खडकाच्या अगदी वरच्या काही भागापुरतंच हे विदारण मर्यादित असलं, तरी खडकाचा जो भाग बदलतो, तो इतका बदलतो की मूळ खडकाच्या कुठल्याही खाणाखुणा शिल्लक रहात नाहीत. तिथं नवीनच खडक अवतरतो. त्या खडकाचं इंग्रजी नाव लॅटेराइट. मराठीत आपण त्याला ‘जांभा’ किंवा; ‘जांभा पाषाण’ म्हणतो.

जशी इतर खडकांची झीज होत असते, तशी ती काळ्या कातळाचीही होत असते. काळ्या कातळापासून जांभा दगड निर्माण होण्याजोगी परिस्थिती महाराष्ट्रात असल्यामुळे तो आढळतो. आणि पावसाचं प्रमाण जास्त असल्यामुळे विशेषत: कोकणात तो जास्त प्रमाणात आढळतो.

भारतात मिळाली ओळख

योगायोगाची गोष्ट अशी की जांभा खडक पृथ्वीवर अनेक ठिकाणी सापडत असला, तरी एक वेगळा दगड म्हणून भूविज्ञानाला त्याची ओळख पटली ती भारतातच. १८०७ आणि त्याची नोंद करणारे संशोधक फ्रान्सिस ब्यूकानन हॅमिल्टन हे ईस्ट इंडिया कंपनीत डॉक्टर होते. वैद्कीय ज्ञानाबरोबरच त्यांना वनस्पतीविज्ञान, प्राणीविज्ञान आणि भूविज्ञान या निसर्गविज्ञानांमधे उत्तम गती होती.

ईस्ट इंडिया कंपनीची १७९९ मधे टिपू सुलतान यांच्याबरोबर जी निर्णायक लढाई झाली, त्यात ४ मे १७९९ रोजी टिपू सुलतान मारले गेले. ती लढाई ईस्ट इंडिया कंपनीने जिंकली. म्हैसूर प्रांत कंपनी सरकारच्या ताब्यात गेला. कंपनी सरकारने फ्रान्सिस ब्यूकानन हॅमिल्टन यांची ख्याती लक्षात घेऊन त्यांना दक्षिण भाारताच्या नैसर्गिक संपत्तीचं सर्वेक्षण करण्याचं काम सोपवलं, तेव्हा केरळमधे काही ठिकाणी भूपृष्ठालगत एक लालसर रंगाचा, मऊसर पाषाण आढळतो, असं त्यांच्या लक्षात आलं.

सुरुंग न लावता, केवळ लोखंडांच्या हत्यारांनी त्याचे सुबक चिरे पडतात, आणि वर काढल्यानंतर हवेच्या संपर्कात आल्यानंतर ते चिरे मजबूत होतात, हेही त्यांच्या लक्षात आलं. केरळमधे याच चिऱ्यांचा उपयोग करून घरे बांधायचा प्रघात आहे, याची त्यांनी नोंद घेतली. अंगाडीपुरम या गावी त्यांनी ही निरीक्षणं केली.

हेही वाचा: आपल्या ताटातल्या प्रत्येक घासामागे दडलंय पैशांचं गणित

असं झालं नामकरण

विटेसारख्या दिसणाऱ्या, आणि विटेप्रमाणेच घरं बांधण्यासाठी उपयोगी पडणाऱ्या या खडकाला काहीतरी अर्थपूर्ण नाव देण्याची गरज होती. तेव्हा वीट या अर्थाच्या ‘लॅटेर’ या लॅटिन शब्दावरून ब्यूकानन-हॅमिल्टन यांनी त्या खडकाला ‘लॅटेराइट’ असं नाव दिलं.

१९७९ साली ११ ते १४ डिसेंबर या दरम्यान भारतात ‘इंटरनॅशनल सेमिनार ऑन लॅटेरिटाइजेशन प्रोसेस’ आयोजित केलं होतं. त्या निमित्ताने भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण या विभागाने अंगाडीपुरम या गावी लॅटेराइटच्या ‘शोधा’ची स्मृती साजरी करण्यासाठी लॅटेराइटचे चिरे वापरूनच स्मृतीस्तंभ बांधला आहे.

बॉक्साइट जांभा खडकाच्या पोटात

जांभा खडक मुख्यत्वे करून लोहाच्या खनिजांनी बनत असला, तरी त्यात अॅल्युमिनिअमचे हायड्रॉक्सॉइडही थोड्या प्रमाणात असतं. जांभा खडकात काही काही टापू असे असतात की तिथं अॅल्युमिनिअमच्या हायड्रॉक्सॉइडच्या कणांचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणात असतं.

अॅल्युमिनिअमचं हायड्रॉक्सॉइड म्हणजेच बॉक्साइट. ज्या टापूंमधे अॅल्युमिनिअमच्या हायड्रॉक्सॉइडच्या कणांचं प्रमाण जास्त आहे, अशाच टापूंना आपण बॉक्साइटचे साठे म्हणतो. कोकणात बॉक्साइटचे असे साठे जांभा खडकाच्या पोटात आहेत, असं आपण म्हणू शकतो.

हेही वाचा: 

पाण्याचीही साहित्य संमेलनं होऊ शकतात!

मुंबईच्या विकासात पर्यावरणाला धक्का लागणारच!

पालघरचा भूकंप... कोट्यवधी वर्षांपासून आजपर्यंत!

युरोपात धावणारी ट्राम पुन्हा मुंबईची लाईफलाईन होईल?

पर्यावरण दिनः संवेदनशील कृती करण्यासाठी पावलं उचलूया