डॉ. मीनाक्षी पाटील यांचा ‘ललद्यदस् ललबाय’ हा दुसरा कवितासंग्रह ऑगस्ट २०२२ला प्रकाशित झाला. एकविसाव्या शतकातल्या सामाजिक आणि वाङ्मयीन जाणीवांची परिणती म्हणजे मीनाक्षी पाटील यांची कविता आहे. मराठी स्त्रीकवितेचा एक वेगळा, आत्मविश्वासपूर्ण अविष्कार मीनाक्षी पाटील यांच्या या कवितेच्या रूपानं आपणाला अनुभवता येतो.
डॉ. मीनाक्षी पाटील या कवयित्री, ललित लेखिका आणि चित्रकार आहेत. सध्या त्या महाराष्ट्र राज्याच्या साहित्य संस्कृती मंडळाच्या सचिव आहेत. त्यांचा पहिला कवितासंग्रह ‘इज इट इन युवर डीएनए’ हा २००९ला प्रकाशित झाला होता. त्यांचा दुसरा कवितासंग्रह ‘ललद्यदस् ललबाय’ हा ऑगस्ट २०२२ला प्रकाशित झालाय. म्हणजे त्यांची कविता आणि एकविसाव्या शतकाची सुरवात सोबतच झालीय.
एकविसाव्या शतकातल्या सामाजिक आणि वाङ्मयीन जाणीवांची परिणती म्हणजे मीनाक्षी पाटील यांची कविता आहे. शहरी मध्यमवर्गीय स्त्रीजीवनाच्या रुटीन, सुस्त जीवनापासून या पहिल्या कवितासंग्रहाची सुरवात होते.
पण पुढं आईनं आपल्याबद्दल आणि भावाबद्दल वागणुकीत ठेवलेला दुजाभाव आपल्या मुलीच्या वाट्याला येऊ नये म्हणून दक्षता घेणारी आणि आई विषयीचं कलुषित मन विसरून तिला माफ करणारी, आईच्या शेवटच्या दिवसात भावापेक्षाही आईला जीव लावणारी, अशी ती या संग्रहाच्या सुरवातीच्याच काही कवितांमधून पाहायला मिळते. विचारांच्या चालू लाटांवर स्वार होऊन त्यात कवितेला कोंबण्याऐवजी,
आपण जसे असू कोणत्याही काळात
आपल्या आदीम अर्कासकट
तशीच राहील आपली कविता,
पाच पंचवीस किंवा पन्नास वर्षांनी
असं कवयित्रीला वाटतं. पण तरी तिची कविता मात्र नव्याचीच कास धरताना दिसते.
हेही वाचा: एक शून्य प्रतिक्रियाः जगणं आणि लिहिण्यातल्या शून्य अंतराची कविता
वास्तुशांतीच्या दिवशी सगळ्यांच्या कृत्रिम हालचालींना कंटाळून वास्तुपुरुषच शेजारच्या घरी राहायला गेला, अशी एक अफलातून कल्पना एका कवितेत येते. कामाच्या धबडग्यात सुचलेल्या ओळी लिहून ठेवायलाही वेळ मिळत नाही, त्या तशाच साचत जातात मनात. कवयित्रीला तुंबलेलं गटार पाहून लिहायच्या राहून गेलेल्या ओळी आठवतात. शेवटी व्यवहारानं भावनांचंही गटार करून टाकलं असा शोकात्मक भाव एका कवितेत येतो.
काही कविता अस्तित्वाच्या जडत्वाचा प्रत्येय देतात. इच्छा असूनही नाकारता न येणारं ईश्वराचं अस्तित्व काही कवितांमधे येतं, तरी महानगरातलं व्यावसायिक देवालय पाहताना गावाकडचं निवांत देवपणही कवयित्रीला आठवतं. जसे लोक तसे त्यांचे देव हेच खरं. त्यांच्या अनेक कविता वाचताना लक्षात येतं की त्यांचं मूळ गावाकडं आणि वर्तमान महानगरात आहे.
खिडकीचे गज संपवणारा चंद्र असो की भिरभिरत राहणारं नजरेचं फुलपाखरू असो, अस्तित्ववादासोबत हेही या कवितेत येतात. चराचरसृष्टीचे काही विभ्रमही या कवितेत सामावलेत. उदाहरणार्थ सुळका, मुंगळा, बांध अशा काही कविता. कधीच न सोडवता येणाऱ्या प्रश्नपत्रिकेसारखं आपलं अस्तित्व गुंतागुंतीचं झालेलं पाहून, विद्यापीठात कमावलेलं मेरिट काय कामाचं? असा प्रश्नही कवयित्रीला पडतो.
महानगराच्या वसुलांचा सराव करण्याऐवजी आपलं स्वयंभूपण जपावं आणि आपल्या अस्तित्वाला काही अर्थ द्यावा, म्हणून स्वतःला ‘कास्ट अवे’ करत जाण्याचा मार्ग कवयित्री स्वीकारते. येणाऱ्या काळावर तप्त मुद्रा उमटवण्याची तिला कदाचित ती पूर्व अट वाटत असावी. म्हणूनच प्रतिक्रिया न नोंदवणाऱ्या थंड बथड झालेल्या माणसांचं तिला आश्चर्य वाटतं.
या पार्श्वभूमीवर तिला आपलं जिवंतपण टिकवून ठेवावसं वाटतं. आपण ‘बी प्रोफेशनल’ होऊ नये असं वाटतं. मुखवटे चढवून तर अजिबात जगू नये ही तिची मनीषा असते. पुस्तकातले स्त्रीमुक्तीचे आदर्श आणि प्रत्यक्षात त्याचा स्त्रियांशी पुसटसाही न दिसणारा संबंध, यांचा अवमेळ कवयित्रीला बुचकळ्यात टाकतो.
ती वाचन बंद करून वास्तवाला सामोरे जाते. तिच्या या भोवतीच्या वास्तवाला सामोरं जाण्यामुळे तिला सततच कशाकशाचं वाईट वाटत राहतं. आपण जिवंत आहोत म्हणजे काय हे समजून घेण्यासाठी आपण कविता लिहितो हे या कवयित्रीचं कविता लिहिण्यामागचं उघड उघड प्रयोजन आहे.
हेही वाचा: तणसः संभ्रमित वर्तमानाचा तळशोध
या संग्रहाची शीर्षककविता, जी या संग्रहात शेवटी आहे, ती वाचताना काही संदर्भ आठवतात. आयुष्याच्या एका अस्थिर, अशाश्वत अवस्थेत भालचंद्र नेमाडे यांनी ‘कोसला’ ही कादंबरी लिहिली. तशाच बेकारीच्या, अंधकारमय भवितव्याच्या चिंतेत वसंत आबाजी डहाके यांनी ‘योगभ्रष्ट’ ही दीर्घकविता लिहिली.
त्यानंतरच्या पिढीच्या वाट्याला आलेल्या तशाच अनिश्चित आयुष्यात मीनाक्षी पाटील यांनी ‘इज इट इन युवर डीएनए’ ही दीर्घ कविता लिहिलीय. कोसलाला साठीच्या दशकातल्या पुण्याची पार्श्वभूमी आहे. योगभ्रष्टला ऐंशीच्या दशकातली चंद्रपूरची पार्श्वभूमी आहे. तर या कवितेला एकविसाव्या शतकाच्या पहिल्या दशकाची मुंबईची पार्श्वभूमी आहे.
नेमाडे, डहाके आणि पाटील या तिघांचीही पार्श्वभूमी गावाकडची आणि वाट्याला आलं महानगर. या तिन्ही साहित्यकृतीमधे मला कुठंतरी एक सूत्र दिसलं. एका अर्थानं साहित्यात उमटलेला हा महाराष्ट्राचा इतिहास आणि भूगोलच आहे.
या संग्रहाचे जे चार विभाग करण्यात आले, त्यातल्या पहिल्या विभागाला ‘आत’ असं शीर्षक दिलंय. पहिल्या कवितासंग्रहाची शीर्षक कविता, संग्रहाच्या शेवटी तर दुसऱ्या संग्रहाची शीर्षक कविता संग्रहाच्या सुरवातीलाच आलीय. आधीच्या कवितेसारखी हीसुद्धा दीर्घकविता आहे. स्वतःच्या घराचा शोध घेणाऱ्या स्त्रीचं हे मनोगत आहे. अर्थातच हे घर म्हणजे स्त्रीचं स्वत्व.
गावाकडं लहान वयातच सुरु झालेला हा स्त्रीत्वाचा शोध पुढं महानगरात आल्यावर अधिकच गुंतागुंतीचा होत जातो. स्त्रीनं स्त्रीचं शोधलेलं स्त्रीत्व म्हणजे तिचं घर असा या कवितेचा निष्कर्ष काढता येईल. आतापर्यंत या स्त्रीत्वाला पुरुषत्वानं ओळख दिलेली होती. ती ओळख नाकारताना आता बाह्य पुरुषत्वाकडं दुर्लक्ष करून आतल्या स्त्रीत्वाकडंच वळलं पाहिजे हा या कवितेचा शेवट.
हेही वाचा: दिवाळी स्पेशल कथा : ‘ब्याव’
हा स्वत्वाचा शोध घेताना कवयित्रीच्या आधाराला येते ती चौदाव्या शतकातली काश्मिरी कवयित्री लल्लेश्वरी आणि आपली बाराव्या शतकातली मुक्ताबाई. त्यांनी घेतलेला आपल्या स्त्रीत्वाचा शोध हाच आजच्या स्त्रीमुक्तीच्या काळातही मीनाक्षी पाटील यांना जास्त प्रमाण वाटतो. आपल्या या पूर्वज स्त्रियांचा शोधही कवयित्रीला स्त्रीत्वाच्या शोधातूनच लागतो.
अगदी गावाकडं असताना लहानपणापासूनच तिचा हा अस्वस्थ शोध सुरु होतो आणि तो लल्लेश्वरी, मुक्ताईपाशी जाऊन थांबतो. आपल्याच नादात आपलंच गाणं गाणं, आपलं मरण आपण अनुभवणं, स्वप्नात कोमात जाणं सुखद वाटणं, हे सगळं ती भोवतालाला विसरण्यासाठी करते.
या संग्रहाच्या दुसऱ्या भागात 'बाहेर' या विभागामधे असाच काहीसा अर्थ सामावलाय. हाच तिचा प्रवास तिला लल्लेश्वरीकडे नेतो. इंद्रधनुष्याच्या पारंबीला पकडून क्षितिजापार होणं आणि असण्यानसण्याच्या पलीकडं जाण्याचा ध्यासही याच वाटेवरचा प्रवास आहे. आपल्या स्त्रीत्वाची पाळंमुळं म्युझियमच्याही पलीकडं आहेत.
कारण म्युझियममधेही जुन्यात जुनी स्त्री मोहेंजोदडोमधली कमरेखाली भंगलेली, हात तुटकीच तर ठेवलेली असते. म्हणून ती म्युझियम मधून परततच नाही. ती त्याही पलीकडं स्वतःला शोधत जाते आणि हरवूनच जाते. अंधार उजेडाच्या पलीकडचं पाहायला शिकते.
स्त्रीला भिंगरी बनवून नाचवू पाहणाऱ्यांना आपण वाहत्या वाऱ्यावर उडणाऱ्या बाभळीचा काटा आहोत असं ती धीटपणे सांगते. आपण अस्तित्वाच्या आदीम गुहेतली शिल्पाकृती आहोत असं तिला मेडोनाची शिल्पाकृती पाहताना जाणवतं. दुसऱ्या भागाचं शीर्षक ‘बाहेर’ असं आहे. इथं कवयित्रीचा आतल्या जगाबरोबरच बाहेरच्या जगाचाही शोध सुरुच आहे.
भोवती सुरु असलेली शूद्र बेडकांची डराव डराव, देशात-जगात सुरु असलेला राजकारण्यांचा नंगानाच, मरणाची अंतिम जाणीव न ठेवता आयुष्याची दिन दिन दिवाळी साजरी करणारी दिवाळखोर माणसं, नशीबाचं प्रोग्रॅमिंग करून देतो असं म्हणून लोकांच्या स्वप्नांचं गाठोड पळवणारे आधुनिक वाल्याकोळी कवयित्रीला दिसतो.
सूर्यासारख्या सत्याकडं दुर्लक्ष करणारी लबाड माणसं, सर्वार्थानं निराधार सामान्य माणसं आणि लाळघोटेपणाचा संसर्ग पसरवणारी हरामखोर माणसं, जीवनगाणे संपलेले कोरडेठाक डोळे, डोळ्यातला पाऊस पुसता न येणारे कोरडेठाक काळजीवाहू, सारी धूळधाण कोरड्या डोळ्यांनी बघत राहणारे समाजधुरीन, स्वतःच्या डोळ्यासमोर मातीमोल होत जाण्याची वेळ आपल्यावर आणणारा भोवताल, असं बाहेरचं जग कवयित्रीला दिसतं. या विभागात कवयित्री हे सगळं मांडत जाते.
हेही वाचा: एक कवी दुसऱ्या कवीला पत्र लिहितो तेव्हा
या संग्रहातला तिसरा विभाग ‘आत बाहेर’ या शीर्षकाचा आहे. यात स्त्री-पुरुष असा दोन्ही बाजूंचा विचार आहे. मुळात तो आणि ती हा भेदच का? सगळे अर्धनारीनटेश्वर का नको? असा प्रश्न इथं उपस्थित केला जातो. खरंतर या सगळ्याच्या पलीकडची ललेश्वरीची धारणा या संग्रहाच्या मुळाशी पहिल्याच कवितेत कवयित्रीनं मांडून ठेवलीय.
तरी दोघं मिळून जेव्हा खेळ मांडतात तेव्हा त्यांना कधीच सापडत नाही त्यांची स्वप्ननगरी किंवा झुमरी तलय्या. शेवटी दोघंही ओसाड गावचे राजाराणीच राहतात. गोळाबेरीज शून्यच येते. त्याच्यापेक्षा तिच्यात मुंगीसारखी शिस्त, चिवटपणा, आस्था जास्त असते. तरी कवयित्री तिला समजून सांगते ‘घुंगट के पट खोल ग बायो’.
तो आणि तिचा शोध कवयित्री भाषेच्या जंगलात शिरूनही घेते. आपल्याच कवितेत आपण सापडत नाही. शोधार्थ काढलेली होडीही कागदाचीच; तीही विरघळून जाते, असा अनुभवही इथं येतो. या विभागात शेवटची कविता कथालेखक, नाटककार जयंत पवार यांच्यावर लिहिलीय.
या संग्रहातला शेवटचा आणि चौथा भाग आहे ‘आत आत आत’ यात स्त्रीत्वाचा आणखी सखोल अनुभव आहे. स्त्रीत्व हे एक कधीच क्षय न होणारं पात्र आहे. त्याचा प्रवाह अखंडपणे सुरु आहे. त्याच्या आदीअंताचा कुणालाही अजून तरी थांगपत्ता लागलेला नाही.
जसं स्त्रीत्वाचं तसंच काळ आणि वेळेचंही आहे. तेही अनंत आणि अनाकलनीयच आहेत. शेवटच्या विभागातल्या चार कवितांमधून हीच जीवनाची, स्त्रीत्वाची अथांगता कवयित्री मांडून दाखवते.
मराठी स्त्रीकवितेचा एक वेगळा, आत्मविश्वासपूर्ण अविष्कार मीनाक्षी पाटील यांच्या या कवितेच्या रूपानं आपणाला अनुभवता येतो. त्याला जीवन शोधाच्या नव्या अध्यात्माचा परिसस्पर्शही आहेच. त्यामुळे ही कविता केवळ स्त्रीमुक्तीची न वाटता आत्मसाक्षात्काराची वाटते. त्यामुळेच स्त्रीच्या अस्तित्व विचारासोबतच एकूण मानवी जीवनाचा अस्तित्वविचार करतानाही ती दिसते.
हेही वाचा:
कथागत: अल्पसंख्यांकांच्या अस्वस्थ वर्तमानाच्या कथा
व्यवस्थेनं झोप उडवली असताना ‘निद्रानाश’ अटळ आहे!
गाव धरणाखाली जातं म्हणजे नेमकं काय होतं, हे सांगणारा कवितासंग्रह
‘बारकुल्या बारकुल्या ष्टोऱ्या’ने मराठी कादंबरीला साचलेपणातून बाहेर काढलं