भावा, कोल्हापूरच्या फुटबॉलचा नादच खुळा!

२८ नोव्हेंबर २०२२

वाचन वेळ : ५ मिनिटं


कतारमधे फिफाचा फुटबॉल वर्ल्डकप सुरू आहे. त्यानिमित्ताने कोल्हापूरच्या फुटबॉलची चर्चा होतेय. स्वातंत्र्यपूर्व काळापासून कोल्हापूरच्या जनतेनं फुटबॉल आणि कुस्ती या खेळांवर विशेष प्रेम केलं. त्यावर सोनेरी कळस चढवला तो इथल्या राजघराण्यानं. राजघराण्यातल्या सर्वांनीच कला आणि क्रीडा क्षेत्रावर भरभरून प्रेम केलं. म्हणूनच या खेळांना राजाश्रयासोबत लोकाश्रयही मिळाला.

विश्वचषक सुरू होऊन चार-पाच दिवस झालेत. कोल्हापूरामधे विश्वचषकाचा ज्वर भलताच शिगेला पोचलाय. गल्ली बोळातून विविध टीमचे समर्थक आपल्या टीमच्या समर्थनार्थ पेास्टरबाजी करण्यात दंग आहेत. जल्लोषी वातावरण निर्माण झालंय. यामधे पहिल्या फेरीत पराभूत झाल्यामुळे अर्जेंटीना आणि जर्मनीच्या समर्थकांची निराशा मात्र लपून राहू शकलेली नाही. आपणच आपली समजूत काढून पुढच्या फेरीत नक्कीच आपली टीम जिंकणार असा आशावाद त्यांना आहे.

एक नक्की की फुटबॉल विश्वचषकाच्या निमित्ताने कोल्हापूरच्या फुटबॉलची दखल संपूूर्ण देशातल्या पेपरनी घेतलीय. एकवेळ मुंबई, बेंगलोर, गोवा, याठिकाणी मॅच पहायला गर्दी होणार नाही, पण कोल्हापूरातल्या स्थानिक मॅचला मोठया प्रमाणावर गर्दी होणारच. इतकं पोषक वातावरण कोल्हापूरमधे फुटबॉल खेळाच्या बाबतीत पहायला मिळतं. हे असं का? याचं कारण म्हणजे पूर्वीपासून कोल्हापूरच्या क्रीडा विश्वाला मिळालेला राजाश्रय आणि लोकाश्रय होय.

राजघराण्याचं खेळांवर विशेष प्रेम

कोल्हापूर शहर आणि त्याच्या आसपासचा भाग भौगोलिकदृष्ट्या समृद्ध असल्यामुळे इथलं हवामान चांगलं आहे. त्यामुळेच कोल्हापूरचं क्रीडा क्षेत्र पुर्वीपासूनच विकसित झालंय. स्वातंत्र्यपूर्व काळापासून कोल्हापूरच्या जनतेनं फुटबॉल आणि कुस्ती या खेळांवर विशेष प्रेम केलं. या खेळांना आपलंसं केलं. त्यावर सोनेरी कळस चढवला तो इथल्या राजघराण्याने.

पूर्वीपासूनच अगदी राजर्षी शाहू महाराजांपासून ते आजच्या श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, श्रीमंत मालोजीराजे छत्रपती यांच्यापर्यंत राजघराण्यातल्या सर्वांनीच कला आणि क्रीडा क्षेत्रावर प्रेम केलंय. म्हणूनच या खेळांना लोकाश्रय मिळालेला आहे. त्यामुळेच कृष्णराव माणगावे मास्तरांसारखे बिनीचे शिलेदार प्रॅक्टीस क्लब कडून राईट बॅक या जागेवर फुटबॉल खेळले आणि १९५२च्या हेलिसिंकी ऑलिम्पिक स्पर्धेत त्यांनी कुस्तीगीर म्हणूनही चौथा क्रमांकही मिळवला. कोल्हापूरच्या फुटबॉलला राजश्रय मिळाला तो खऱ्या अर्थाने छत्रपती शहाजी महाराजांच्या रुपाने.

हेही वाचा: क्रिकेटचे लघुउद्योग सुटलेत सुसाट

फुटबॉलला राजाश्रय मिळाला

तत्कालीन देवासचे राजे विक्रमसिंह महाराज हे अत्यंत फुटबॉलप्रेमी. १९२९ ते १९३२ या काळात ते राजाराम कॉलेजमधे शिकत असताना कॉलेजकडून कॅप्टन म्हणून त्यांनी नावलौकिक मिळवला. कालांतराने सैन्यदलात कॅप्टन पदावर असणारे विक्रमसिंह महाराज कोल्हापूरच्या गादीवर श्रीमंत छत्रपती शहाजी महाराज म्हणून विराजमान झाले. या काळात त्यांनी न्यू पॅलेस इथं जयभवानी फुटबॉल टीमची निर्मिती केली.

महाराजांच्या राज्यारोहन समारंभानिमित्त त्यांनी कोल्हापूरात राजाराम कॉलेजच्या मैदानावर राज्यारोहन चषक फुटबॉल स्पर्धेचं आयोजन केलं. या स्पर्धेत ब्रिटीशांच्या ताब्यात असणाऱ्या वळीवडे इथली पोलंडच्या दुसऱ्या महायुद्धातल्या युध्दकैदी खेळाडूंची दर्जेदार टीमही सहभागी झाली होती. उपांत्य सामना प्रॅक्टीस विरुद्ध शिवाजी असा झाला. सलग ६ दिवस बरोबरीत सुटलेला सामना अखेर ७व्या दिवशी शिवाजीने जिंकला.

अंतिम सामना जयभवानी आणि शिवाजी तरुण मंडळ यांच्यात झाला. त्याला न भूतो न भविष्यती अशी गर्दी झाली होती. यामुळे कोल्हापूरात जणू काही भारत बंद सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. अंतिम सामना शिवाजी तरुण मंडळाने जिंकला खरा पण कोल्हापूरच्या जनतेचं खरं फुटबॉलवरचं प्रेम नंतरचे दोन महिने शिवाजी तरुण मंडळाने अनुभवलं. दोन महिने शिवाजीचे खेळाडू स्वत:च्या घरात जेवले नव्हते. असे फुटबॉल वेडे खेळाडू आणि फुटबॉल वेडे कोल्हापूरकर.

शाळा-कॉलेजमधेच विद्यार्थ्यांना प्रोत्साहन

आजही शिवाजी पेठ, मंगळवार पेठ, शुक्रवार पेठ, बुधवार पेठ या जुन्या कोल्हापूरात घराघरातून लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत फुटबॉल खेळ खेळला जातो.  पूर्वीच्या काळी शालेय स्तरावर खेळाडूंना फारशी स्पर्धा खेळायला मिळत नव्हती. शासकीय स्पर्धा तर अस्तित्वातच नव्हत्या. त्या १९७० पासून सुरू झाल्या. पण सध्याच्या खेळाडूंना वयाच्या १२ व्या वर्षांपासून विविध स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळत आहे.

कोल्हापूरात फुटबॉल खेळामधे आज अमुलाग्र बदल झालेला दिसून येतो. पूर्वीचा धुसमुसळा खेळ कमी होऊन आज नियमांच्या चाकोरीतला खेळ जोपासला जातोय. आज कोल्हापूरच्या टीम शालेय राज्य, राष्ट्रीय स्पर्धेत यश मिळवत आहेत. शालेय आणि  आंतरविद्यापीठ स्पर्धेत मुंबई, गोवा सारख्या टीमना सातत्याने पराभूत करत आहेत. केएसएच्या विविध गटातल्या टीमही राज्य स्पर्धेत विजयी होतायत.

मुलींंच्या टीमही याला अपवाद नाहीत. मुलीही अत्यंत दर्जेदार कामगिरी करत आहेत. याचं कारण म्हणजे आज कोल्हापूरात अस्तित्वात असलेले डी लायसन्स पात्र प्रशिक्षक, सातत्याने होत असलेल्या सिनियर डिविजनच्या स्पर्धा आणि पालकांमधे निर्माण झालेली जागरुकता, अभिरुची आणि त्यांचा मिळत असलेला पाठिंबा.

हेही वाचा: अपघाताने जन्माला आलेल्या वनडे क्रिकेटची आज पन्नाशी 

फुटबॉल खेळाला चालना

आज कोल्हापूरी फुटबॉल म्हटलं की, डोळ्यासमोर येते ती छत्रपती शाहू स्टेडियमवरची हिरवळ, मोठमोठ्या बक्षिसाच्या स्पर्धा, नेटकं संयोजन, रांगड्या प्रेक्षकांनी खचाखच भरलेलं स्टेडियम, त्या गर्दीला सामोरं जाऊन जिद्दीने खेळ करणारे खेळाडू. या खेळाडूंच्या प्रत्येक हालचालीला मनापासून दाद देणाऱ्या प्रेक्षकांच्या शिट्ट्या, टाळ्या, मधेच खेळाडू आणि पंचांसाठी होणाऱ्या काही खास प्रेक्षकांच्या कॉमेंटस्.

हे गेली सत्तर वर्ष अखंडीतपणे चालू असून खेळाडू, पंच, संघटना, प्रेक्षक सर्वांनीच या गोष्टींची सवय लावून घेत गुण्यागोविंदाने सर्व सोपस्कार पार पाडलेले आहेत. आज कोल्हापूरचा फुटबॉल आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पोचलेला आहे. पण या कोल्हापूरच्या फुटबॉल खेळाला चालना देण्यासाठी, खेळ वाढीला लागण्यासाठी पूर्वीपासून अनेकांनी हातभार लावलेला आहे.

कोल्हापूरच्या फुटबॉलपटूंची भरारी

आज कोल्हापूरातले अनेक खेळाडू देशातल्या नामवंत टीमकडून खेळताना दिसतात. अनिकेत जाधव, निखिल कदम, अजिंक्य नलवडे अशी अनेक नावं घेता येतील. आजअखेर रिची फर्नांडिस, अजिंक्य गुजर, दिपराज राऊत, सागर केकरे, निखिल जाधव या खेळाडूंनी शालेय अशियाई स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व केलंय. तर कैलास पाटील, अजिंक्य नलवडे, योगेश कदम, रोहन आडनाईक, सागर चिले या खेळाडूंनी मुंबई आणि गोव्यातल्या क्लबकडून खेळून नावलौकिक मिळवलेला आहे.

विश्व शिंदे या खेळाडूची १७ वर्षाखालच्या भारतीय टीममधून मलेशिया इथं निवड झाली होती. सध्याच्या काळात अनिकेत जाधव हा तर कोल्हापूरच्या युथ फुटबॉलचा आयकॉन समजला जातोय. पाच वर्षांपूर्वी भारतात झालेल्या १७ वर्षाखालच्या विश्वचषक स्पर्धेत खेळणारा अनिकेत हा कोल्हापूरचा पहिला खेळाडू ठरला. सध्या तो ईस्ट बंगाल एफ सी. टीमकडून आय.एस. एल. स्पर्धा खेळतोय. त्याच्याबरोबरच निखिल कदम हा सुद्धा कोलकाता इथल्या भवानीपूर एफ. सी, टीमकडून कोलकाता सुपर लीग खेळत आहे.

अनेक खेळाडू संतोष ट्रॉफी सारखी नामवंत स्पर्धा खेळलेले आहेत. अशाप्रकारे कोल्हापूरातल्या गल्लीत खेळणारा फुटबॉल खेळाडू आज देशपातळीवर आणि देशाबाहेर खेळतोय. त्यामुळेच आज कोल्हापूरचं नाव भारतीय फुटबॉलच्या पटलावर आवर्जून घेतलं जातंय. त्यामुळेच कोल्हापूरला सॉकर सिटी का म्हणतात ते समजून येतं.

हेही वाचा: 

लेजंड धोनीचा अखेरचा 'षटकार'

क्रिकेटच्या पिचवर रंगतोय सतरंगी प्रेमाचा किस्सा

स्पर्श न करता खेळता येतं, म्हणून आपल्याकडे क्रिकेट वाढलं

पाकच्या टीमचं काय बिनसलंय, ते पुन्हा बाऊन्स बॅक करणार काय?

(लेखक फुटबॉल प्रशिक्षक असून त्यांचा लेख दैनिक पुढारीतून घेतलाय)