काळमेकर लाईव्ह: सोशल मीडियाचा जमाना मांडणारी कादंबरी

२१ मार्च २०२२

वाचन वेळ : ११ मिनिटं


'पिपिलिका मुक्तिधाम' ही बाळासाहेब लबडे यांची कादंबरी मराठी कादंबरीतला मैलाचा दगड ठरली. या नंतर बाळासाहेब लबडे यांची दुसरी कादंबरी कोणती? आणि कशी असणार? याविषयी साहित्यविश्वात उत्सुकता असताना 'काळमेकर लाइव्ह' ही त्यांची दुसरी कादंबरी पद्मगंधा प्रकाशन, पुणे प्रकाशित करतंय. त्यातला काही अंश.

मी एक ऍप बोलत आहे. माझ्या विषयी मी तुम्हाला काय सांगू. मला वेगवेगळी रूपे धारण करता येतात . सुरवातीला मला कच्च्या मालातून पक्क्यामधे जायला काही काळ लागतो. आणि एकदा का मी तयार झालो की लोक माझीच भाषा बोलायला लागतात. माझाच गवगवा सगळीकडे करतात. जयजयकार करतात.

मी कसा आहे? किती उपयोगी आहे? किती निरूपयोगी आहे? हे ठरवणं माझ्या हातात नाही. ते सर्व मला बनवणाऱ्या कंपनीवर आधारित आहे. कंपनी म्हटलं की, आर्थिक व्यवहार हा आलाच. त्याच्यावरच माझं सगळं अस्तित्व आधारित आहे. नाहीतर या कंपन्यांना समाजसेवा करायला काही वेड लागलं नाही.

ऍपच्या आत प्रवेश करण्यासाठी मी तुम्हाला विनंती करत आहे. कारण तुम्ही वाचक माझे ग्राहक आहात. आज दोनच प्रकारची माणसं अस्तित्वात आहेत. एक विक्रेता आणि दुसरा ग्राहक. याशिवाय दुसरं काही असू शकत नाही. मी ऍप असल्यामुळे मला मानवी भावना समजत नाहीत. माझ्यात काय बदल करायचा आहे ते माझी कंपनी ठरवते, त्यामुळे आजकाल सगळ्यांना जसा मास्टर माईंड असतो.

तसा माझा काळमेकर म्हणून जन्म स्वित्झर्लंडला झालाय. तिथून मी जगभर पोचलो आहे. बिझनेसच्या दृष्टीकोनातून सगळ्या भाषिकांना आकर्षित करण्यासाठी सगळ्या खंडीय, प्रादेशिक भाषांमधे बोलू लागलो आहे. त्यामुळे ज्याला त्याला मी आपला वाटू लागलोय. प्रत्येकाला आपल्या अस्मिता माझ्यात दिसू लागल्यात. ही माझी आणि माझ्या कंपनीची जमेची बाजू आहे. तशी मला कोणताही धर्मिय, राजकीय, सामाजिक, बाजू नाही. मात्र आर्थिक बाजूमधे मी सतत सजग असणारा आहे.

तसा मी मनाने मोकळा आहे. तुम्हाला स्वत:ला कोणत्या गोष्टीचे ऍप पाहिजे हे तुम्ही ठरवा. त्याला मी काही अडवू शकत नाही. तुम्ही सुध्दा मालक होऊ शकता. मला तुमच्या ताब्यात ठेऊ शकतो. आणि जगभर ग्राहक जोडू शकता. तुम्हाला तुमचा विचार पसरवायचा आहे? चला तर मग वाट कशाची बघताय? लागा कामाला? मी तुमच्या सोबत आहेच. तुमचा मित्र बनून. तुमचा सखा बनून दीर्घ काळपर्यंत तुमच्या सोबत.

माझ्या माध्यमातून तुमचं करियर करा. तुम्हाला काही सूचत नसेल तर मी सुचवतो. जसं की, झुक्याने फेसबुक तयार केलंय. त्यावर आमचा रेहम्या आणि कॅडी आणि त्याचे असंख्य मित्र आहेत. आता तुम्हाला बिझनेस सुरू करायचा असेल तर सेवाधारी बना. जसं फ्लिपकार्ट विक्री करते. अॅमेझॉन विक्री करते. कर्ट विक्री करते. तुम्हीही करू शकता. आणि जसं तुम्ही खरं ऍप काढू शकता तसं खोट ऍपही काढू शकता. मग तुमच्यावर जामतारा सारख्या सिरिज सुद्धा येऊ शकतात.

हेही वाचा: गाथासप्तशती: प्रत्येक घरात असावा असा मराठीतला आद्यग्रंथ

वीडियो तयार करण्यासाठी कॉईनमास्टर आहे तसं तुम्ही मास्टर व्हा. चला ना मग एखादी गेम तयार करा. एखादा म्युझिक प्लेअर तयार करा. एखादा रेडिओ तयार करा. शेरो शायरीचे ऍप तयार करा. हे पहा तुम्हाला हे सगळं रेडीमेड करता येईल. आमचे कॉम्प्युटर सायन्सचे बॅकग्राऊंड असलेले वीर सहज मदत करतील. ज्याला अँड्रॉइड ऍप्लिकेशन डेवलपमेंटचा कोर्स आला तो सहज करू शकतो.

मी आता कॉम्प्यूटरच्या सगळ्या भाषा बोलू लागलोय. जावा, सी प्लस प्लस, वगैरे वगैरे. कंपन्या सांगतात, एक तर तुम्ही स्वत:ची काही गोष्ट या ऍपमधून विकू शकता किंवा जाहिराती दाखवून तुम्ही पैसे कमवू शकता. या सगळ्या जाहिरातच्या ऍपमधे आमचे खूप फ्रॉडर सुद्धा लपलेले आहेत. त्यांच्यापासून सावध रहा. 

जाहिरात कशी करायची ही एक कला आहे. ऍप बनवणं सोपं आहे. पण ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचलं पाहिजे मी सुद्धा एक ऍप आहे. युट्यूब वर जर मला सर्च केलं तर माझे खूप सारे वीडियो पहायला मिळतील. जे तुम्हाला मदत करतील. पैसे कमवण्यासाठी गुगल अँडसेन्सवर अकाऊंट उघडावं लागेल. नंतर ते प्ले स्टोअरवर अपलोड करावं लागेल . काही रक्कम देऊन रजिस्टर करावं लागेल. नंतर तुम्ही ते प्ले स्टोअरवर अपलोड करू शकता.

मी हे सगळं आमचे ग्राहक हे रेहम्या आणि कॅडी यांना समजावून सांगून थकलोय. त्यांच्या डोक्यात अजून हवा तसा प्रकाश पडत नाही. ते दोघे फेसबुक, व्हाटस्अप, झूम, गुगल मीट यावर येतात. त्याचा वापर करतात पण ते म्हणतात हे ऍप तयार करणं आम्हाला जमणार नाही. ते कुवतीच्या बाहेर आहे. शिवाय लोकांना लुटण्याचा आमचा स्वभाव नाही. असो त्यांची एक कहाणी मी तुम्हाला सांगणार आहे.

हेही वाचा: ‘जेजुरी’ समजवणाऱ्या एका दुर्लक्षित पुस्तकाची पंचविशी

आजच्या काळात माझं मन चिनभिन झालंय. मी त्याला स्थिरावण्याचा प्रयत्न करतो आहे. मनात सारखा ताण आहे. त्याच्यावर मात करण्याचा प्रयत्न मी करतो. मला सारखा प्रश्न पडतो आहे. माणसाचं सगळं जीवन हे क्षणभंगूर आहे. जगणं म्हणजे काय? आणि मरण म्हणजे काय? तशी आपल्या जीवनाची दोन टोकं आहेत. माणसांना जगण्याविषयी सांगता येते पण त्यांना त्यांच्या मृत्यू विषयी सांगता येत नाही. आमच्या आजूबाजूचे लोक सारखं असं म्हणतात जीवन हा एक पीके आहे.

पीके म्हणजे काय? रेहम्याने मला विचारलं तेव्हा मी सांगितलं काळमेकरवर आपण कुणाला तरी आपला स्पर्धक खेळाडू म्हणून लाईव घेत असतो. आपल्या दोघांची दोन गाणी होतात आणि त्यातलं सर्वोत्कृष्ट गाणं ज्याने गायलं असेल त्याला ऑडियन्स गिफ्टींग करून जिंकून देतो. ही गिफ्टींग करण्यासाठी काळमेकरने आपल्याला एक गिफ्टींग बॉक्स बहाल केलाय. त्यात गुलाबाची फुलं, फुलांचा गुच्छ, सुंदर जिरेटोप, सुंदर घंट्या, डायमंड, सिल्वर कॉईन, गोल्डन कॉईन दिलेत. ते एका कॉईनपासून हजार कॉईनपर्यंत आहेत.

ज्याच्याकडे जेवढे कॉईन आहेत ते सगळे तो पीकेवर उधळत असतो. तर जीवन ही अशी मौज आहे. त्यामुळे ती लुटायची असते. रडत बसायचं नाही . एन्जॉय आणि एन्जॉय करायचं. जीवन सुंदर आहे त्याचा आस्वाद घ्या असं रेहन्या सतत म्हणत राहतो. मला मी आपला ढिम्मपणे त्या पीकेवर बसून असतो. लगेच हसणं आणि लगेच एन्जॉय करणं मला जमत नाही.

मानसिकदृष्ट्या मी असुरक्षित असतो. मी रिकामा बसलो की उगीच चिंता आणि काळजी लागते. माझीच मला भिती वाटायला लागते. या भितीतूनच मी या ऍपवर आलो आहे. माझं जीवन रेहम्या म्हणतो तसं सुंदर करण्याचा माझा प्रयत्न आहे. पण फारवेळ माझं लक्ष हे एका ठिकाणी केंद्रित होऊ शकत नाही. त्यामुळे मी थोडावेळ रेहम्या बरोबर लाईव असतो. तर थोड्यावेळेत माणसांच्या शोधात बाहेर पडतो.

हेही वाचा: वारकरी संप्रदायाची सहिष्णुता आजच्या काळात महत्त्वाची

मी असं का करतो हे माझं मला कळत नाही, त्यासाठी मला काळ मेकरने दिलेला एक पर्याय महत्वाचा वाटतो. तो म्हणजे मल्टी गेस्टरूम. त्यात सतत जगातली अनेक माणसं हजर असतात. ती अनोळखी असली तरी आपलं स्वागत करतात. आपणाशी गप्पा मारायला तयार होतात. असं माणूस जोडणं मला महत्वाचं वाटतं.

डोकं जड पडलं आहे. मी नुसताच बसून आहे. एकटक पहातो आहे. बाजूबाजूला सगळी भिती आहे. सगळ्या बातम्या नुसत्या मृत्यूचे आकडे दाखवत आहेत. स्पेन, इटली, जर्मनीमधे मुडद्यांच्या रांगाच रांगा लागल्या आहेत. त्यांना गाडण्यासाठी जागा नाही. माणसं एकटी एकटी आहेत. येताना एकटी आली आणि जाताना एकटी गेली. त्यांच्या प्रेतावर दोन फुलं वाहायला किंवा अश्रू ढाळायला कोणीच नाही. हा निराशेचा वारा वातावरणात पसरला आहे. तो माझ्यापर्यंत आला आहे. त्याच्या झुळूकेनं माझा मेंदू हँग झाला आहे. सगळं जगणं हँग झालं आहे.

मला काय करावं ते सुचत नाही. पुन्हा निराशेच्या डोहात चाललो आहे. याची जाणीव मला होते आहे. डोकं जड जड पडतंय. आणि मनाची बेचैनी सारखी वाढत चाललीय. जगभरच्या लोकांची प्रेतं सारखी माझ्या डोळ्यासमोर येत आहेत. त्यामुळे माझ्या नसानसातलं रक्त उसळी मारू लागलंय.

मी खोल खोल मनाच्या खोल खोल जाऊन विचार करतो आहे. विचार आणि विचार दुसरं काही नाही. या विचारांची वलयं अशी तशी तशी अशी सगळ्या बाजूने घिरट्या घालत आहेत. आता मला काहीतरी होतंय. आणि मी अधिक वेगाने विचार करू लागलो आहे.खूप वेगात. खूप वेगात. खूप वेगात. अगदी मनाचा स्पीड वाढलाय आणि आता माझं मन माझ्या ताब्यातून निघून गेलंय असं वाटतं.

हेही वाचा: धनगर संमेलनाच्या निमित्ताने मूक समाज बोलू पाहतोय

मृत्यू हा एक अजरामर वारसा आहे. मी एक प्रेतात्मा आहे. साऱ्या व्हारसनांनो! मला शेवटचं जाळा, माझ्या मृत्यूत उगवू नका देऊ पुन्हा पुन्हा जगण्याचं आदिमभास. या सगळ्या भौतिक जंजाळाची वटवाघळं माझ्या सरणाच्या वरती टांगून राहीली आहेत. हा घुबडांचा चित्कार आणि हा अंधारातल्या भीतीच्या भुतांचा थयथयाट किलकिल्या डोळ्यांनी पाहतो आहे मी माझा अंत्यविधी.

कधी मी टांगला गेलो आहे असाह्यतेने समोरच्या वडाच्या पारंब्यांना, या मुळ्या माझ्या अंगाभोवती लपेटून गरगर फिरवत आहेत माझ्या शापित जगण्याला. दु:खाची एक जखम घेऊन मी फिरत राहीन या नवीन पोकळीत. या पाचोळ्याच्या रांगोळ्या सैरभैर घेऊन आकाशाचे डोंगर झाल्या आहेत. त्यांच्यावरती घनगर्द सावल्या मृत्यूची छाया बनून आहेत. आदि-मध्य-अंत ही माझीच मृत्यूरूपं आहेत. आपल्या मनाला त्याने बजावलं. झटकून टाका. झटकून टाका चांगलं पहा. 

रात्रीचा शो संपलेला आहे. थिएटर पासून सायकल घेऊन मी निघालो आहे. बारा वाजून गेले आहेत. गुंजनच्या बाहेर सुनसान आहे. अचानक लाईट गेलेली आहे. अरे बापरे! हिला आत्ताच जायचं होतं. मी माझी गाडी स्टँडवरून काढली टांग टाकली. खरखरर खुड झालं आणि चैन खाली पडली. ह़ं&& मी सुस्कारा सोडला. मी खाली उतरून गाडी स्टँडला लावली. चेन कवर खोललं. चैन पकडायला काय मिळतंय का पाहिलं. हं मिळाला एक कागद.

चिमटीत चैन धरून बसवायचा ट्रायल वन टू थ्री बसव चैन की फिरव चाक बोटं सगळी काळी झाली आॅईल लागलं. चैन बसली. मी गाडी सुरू केली. अंधार तर मी म्हणत होता. रंगरंग वाजली. चालली आणि जोराचा आवाज झाला. फटाका फुटला. गाडी पंक्चर झाली. मी टायरकडं बघर राहिलो नशीब आपटलो नाही. सावध होतो म्हणून बरं.

तसं घरापर्यंतचं अंतर दोन एक किलोमीटरचं होतं. आता काय करणार? ढकलत न्यावी लागणार. हॅन्डल धरून तिला मी ढकलायला सुरवात केली. मला उगीचच वाटलं सादल बाबावरून अजान ऐकू येत आहे. खरचं अंजान ऐकू येते की मला भास होतोय‌. मी मलाच चिमटा घेऊन पाहिला. अंधाराला तुडवत मी चाललो होतो. मारूतीच्या मंदिरात दिवा लावलेला होता. लांबून त्याची ज्योती दिसत होती. बाकी मंदिराला अंधाराने वेढले होते. त्याच्या पुढच्या बाजूला स्मशानभूमी होती. तिचा वैकुंठभूमी हा फलक उठून दिसत होता.

हेही वाचा: साहित्य संमेलनात आहात, तर तेरला जाऊन याच! 

आत कुत्री विव्हळत होती. त्यांचा आवाज भयान आणि भेसूर वाटत होता. वातावरणात बदल झाला होता. मी आपलं गपगुमान गाडी रेटत चाललो होतो. त्या टायराचा आवाज करकर करत काळोखाला चिरत होता. मी खाली मान खाली घालून चाललो आहे. माझ्या मागून येताना एक आकृती दिसते आहे. ती नुसतीच पांढरी दिसते आहे माझ्यात आणि तिच्यात अंतर आहे. त्यामुळे मी फक्त एकटाच आहे असं नाही. 

कुणीतरी जोडीला आहे ही गोष्ट मला दिलासा देऊन गेली. कोण असावा? माझ्या रस्त्याने माझ्या मागावर का येतो आहे? मी थिएटरमधे असताना किंवा बाहेर हा काही दिसला नाही. एवढ्या रात्रीचा काय करत असेल? स्मशानभूमी सोडल्यावरच हा का दिसला असेल? तो कुणाकडे चालला असेल? मी आकाशात पाहिला सगळा अंधारच होता कुठे चंद्र आणि चांदण्या दिसत नव्हत्या.

बहुतेक आज अमावस्या असावी. अमावस्या असली तरी मी काही घाबरणार नाही. तसा माझा स्वभाव भित्रा नाही. तो इसम वेगात चालत होता. माझ्या गाडीचा आवाज आणि त्याच्या पायाचा आवाज एवढंच ऐकू येत होतं. मी विचार केला हा एवढा वेगात कसा चालतो आहे. तो आता माझ्या मागे पाचशे मीटर होता. मी त्याच्याकडे वळून पाहिलं. तो झपाझपा चालला होता. तो थोड्याच वेळात मला गाठेल असं वाटलं.

समोर पाहतो तर एकदम दचकलो मी! एक घुबड पुढच्या चाकापासून चित्कारत बाजूच्या वडाच्या झाडावर गेलं. आज रस्त्यावरून एकही गाडी गेली नव्हती. चौकात रस्ता दुरूस्तीसाठी बंद केला होता. घुबड गेल्यामुळे माझ्या काळजात धस्स झालं. मी थोडासा अडखळून सायकलीत वलबलो. पडता पडता मी स्वतःला सावरलं. तो झपाझपा चालत माझ्या शंभर मीटरवर आला. आता मला लक्षात आलं. तो जवळ आला आहे.

शंकऱ्याचा म्हातारा इथंच गाडीखाली पडून मेला होता. तो रखवालदार म्हणून फिरत असतो. सगळीकडे म्हणतात. परत मी माझ्या विचारात गेलो. रखवालदार मग तो मला काय करायचा नाही. त्यातच तो जवळ आला झपझप चालत होता. त्याच्या पायांचा आवाज येत होता. बहुतेक त्याने पायात काही घातलं नसावं. तो जवळ आला तसा मी काढता पाय घ्यायचा ठरवलं. माझी पावलं झप‌झप पडायला लागली. कुठून दुर्बूद्धी आली आणि एकटाच पिक्चर बघायला आलो. गाडीचे दोन्ही हॅन्डल मी घट्ट धरले. मुठी आवळल्या. सायकल ओढायला मी सुरवात केली. तो आता बरोबरीने माझ्या चालत होता. मी त्याच्याकडे नजर वळवून सुद्धा पहात नव्हतो पण एवढं मात्र लक्षात आलं त्याने धोतर नेसलंय.

हेही वाचा: मराठीला कुणी अभिजात भाषेचा दर्जा देता का दर्जा?

'आज एकटाच चालला वाटतं'
मी त्याला काहीच उत्तर दिलं नाही. परत पावलांचा वेग वाढवला.
कुत्र्याच्या अंगावर गाडी जाणार तेवढ्यात ते केकाटत पळालं.
'खुप घाई करू नको'
'मी ही किती झपाझप चालत होतो' 'बघ माझ्या पावलांचा वेग कमी केलाय'.
मग तर माझं डोकं प्रश्नांनी अधिक भणभणलं.
मी हु नाही की चू. याचे पाय बघायचे ते जर उलटे असतील तर,
'तू काहीच बोलत नाहीस पिक्चरला गेला होतास वाटतं'
मी जाम टेंन्शनमधे आलो. याला कसं कळलं असेल. अरे हो तो आपल्या मागून आला. त्याचा हा तर्क असावा.
मी हिम्मत करून त्याच्याकडं पाहिलं.
त्याच्या अंगात पांढरा शर्ट होता. डोक्यावर उपरणं घेतलेलं होतं. खाली धोतर होतं. उपरण्याने त्याने तोंड झाकून घेतलं होतं.
'मी धिटाईनं विचारलं तुम्ही कुठं राहता?'
त्याने चेहरा न दाखवता उत्तर दिलं 
'मी भटका आहे'
'म्हणजे तुम्हाला घर नाही'
'नाही' तो रागाने बोलला

मी गप्प झालो. न जाणो हा कुणी सायकिक असायचा. कदाचित मेंटल हॉस्पिटलचा, किंवा येरवड्याच्या जेल मधला कैदी असावा. मी आपली सायकल जोरात लोटत धावल्या सारखा चालू लागलो. तो म्हणाला

'कुत्रंमागं लागल्यासारखं का धावतोस. आपल्या दोघांचा एकमेकांना आधार आहे. या रस्त्यावर कुणी आहे का दुसरं'
'माझी चाल अशी आहे'
'मला अशी चाल असलेली माणसं आवडतात'
मी हादरलोच
'म्हणजे'
'माणसानं आपल्या जिवाला जपावं'
माझी भिंती थोडी कमी झाली
'तुम्ही कुठे जाताय?'
'सध्यातरी मी शोधात आहे'
'कसल्या'
'अजून मला ते कळायचं आहे'
माझं गूढ अधिकच वाढलं.
'तुम्हाला कोणत्या गावाला जायचं आहे'
'इकडे बघ इकडे'
मी पहातच नव्हतो
"घाबरलास वाटतं"
'नाही ओ मी तसा धीट आहे.
'बरं नका बघू आपल्याला या प्रवासात‌ एकमेकांचा आधार आहे हे काही कमी आहे.'
मी परत ताणमुक्त झालो.
मी तुझ्यासाठी पुडी आणली आहे. ही घे म्हणून त्याने माझ्या वरच्या खिशात कोंबली.
मी ओरडलो 'हे काय करताय व्हा तिकडे'
मी पाहिलं त्याचा चेहरा दिसतच नव्हता.फक्त उपरणंच घेतलेलं होतं.

मी घाबरलो. खुप घाबरलो. गाडी टाकून पळत सुटलो. आंबेडकरात पळत पळत शिरलो. मागे वळून पाहिलं. तो कुठेच दिसत नव्हता. Driving Miss Daisy हा सिनेमा पाहून आलो. तो मला आवडला. पण दुसऱ्या दिवशी माझ्या खिशातली पुडी मी चाचपडत राहिलो. 

तिचं काय करायचं? हा माझ्या पुढचा प्रश्न होता. ठेवावी की टाकून द्यावी ठेवली तर काय होईल आणि नाय ठेवली तर काय होईल. तेवढ्यात रेहम्याने मला पिक्चरची स्टोरी विचारली. मी त्याला थोडक्यात सांगितली. ती एका म्हातारीची गोष्ट आहे. गोष्ट साधी सोपी आहे. पण उत्सुकता ताणणारी आहे. म्हटलं तर ती नाटकापासून तयार झालेली आहे. नाटकच आहे म्हण ना!

नाटक म्हटल्यामुळे त्याचे कान टवकारले. पुढे काय आहे त्यात मला माझी गाडी आठवली. मी ती सकाळी जाऊन आणली होती आणि पंक्चरवाल्याकडं टाकली होती. आई सारखी बडबडत राहिली. त्याने मला टोकलं 'आरे बोल‌ की? काय झाले?. मग माझं कथन सुरू झालं. तो म्हातारा होता. नाही नाही म्हातारी होती. 'अरे नक्की काय होतं'. 'काय कळालं नाही. चेहरा दिसला नाही. हं पिक्चरमधे म्हातारी होती.'

अमेरिकेच्या दक्षिणेतल्या जॉर्जिया राज्यातल्या अटलांटामधे राहत असते. एक खाष्ट, श्रीमंत, ज्यू म्हातारी - मिस डेझी. हो हेच तिचं नाव ती बिनचपलाची फिरत असते. मागोमाग‌. आणि प्रश्न विचारते सारखे सारखे कंटाळेपर्यंत म्हातार्यासारखी. मार्टिन लूथर किंग यांच्या वर्णभेदाच्या विरोधातल्या चळवळीचा काळ तिचा आहे. तिचा लोचा होतो‌‌. माझा लोचा होतो‌. अपघात केल्यामुळे तिच्या गाडी चालवण्यावर बंदी येते. तिचा मुलगा तिच्या इच्छेविरुद्ध तिच्यासाठी एक ड्रायवर नेमतो. मला गाडी ओढत आणावी लागते. आणि ते घुबड ओरडतं.

ड्रायवर तो असतो मिस डेझीपेक्षा काही वर्षांनीच लहान. तिच्या जवळ असणारा कृष्णवर्णीय म्हातारा - होक. मिस डेझी आणि होक यांचं खडाष्टकापासून सुरू होणारं नातं मिस डेझी नव्वदीला पोचेपर्यंत एका आगळ्या स्नेहात बदलतं. ब्रॉडवे गाजवणाऱ्या आल्फ्रेड उहरी यांच्या नाटकावर आधारित एका हृद्य नात्याचा वेध घेणारा हा सिनेमा. मी एवढीच कथा सांगितली. ती पुडी मी घाईघाईत देवीच्या परडीत टाकून दिली. सुटलो. एकदाचा काय‌ असेल ते असेल. असं म्हणलो तरी ती पुडी माझ्या डोळ्यापुढं येत होती. मला छळत होती.

पुस्तकाचं नाव: काळमेकर लाइव्ह
लेखक: बाळासाहेब लबडे
प्रकाशक: पद्मगंधा प्रकाशन, पुणे
पाने: २९६

हेही वाचा: 

वाचकानं सजगपणे वाचन संस्कृती कशी घडवावी?

कथागत: अल्पसंख्यांकांच्या अस्वस्थ वर्तमानाच्या कथा

कोरोनाकाळाचं प्रतिबिंब मराठी साहित्यात कसं उमटलंय?

आपली आजीही बावन्नला पन्नासवर दोन म्हणते, मग वादाचं कारण काय?