दिवेलावणीवरील फेबु-वॉट्सपगिरीः वाचा, हसा, विचारही करा

०४ एप्रिल २०२०

वाचन वेळ : ८ मिनिटं


पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शुक्रवारी सकाळी ५ एप्रिलला अंधार करून रात्री ९ वाजता ९ मिनिटं दिवे लावण्याचं आवाहन केलंय. मोदींचा हा संदेश इतका इनोवेटिव होता की त्याने सोशल मीडियावाल्यांच्या प्रतिभेला भरतं आलं. अनेकांनी त्यांची खिल्ली उडवली. पण त्यांची बाजू मांडणारेही होते. अशा काही मिल्याजुल्या मेसेजची ही फेबुगिरी, वॉट्सपगिरी.

फेसबूक असो, ट्विटर आणि त्यापेक्षाही वॉट्सअप. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शुक्रवार सकाळच्या भाषणानंतर सोशल मीडियावर तुफान आलं. सगळे प्लॅटफॉर्म क्रिएटिव मेसेजनी भरून वाहिले. त्यातले हे निवडक मेसेज आपल्यासाठी. वाचा, हसा आणि त्यावर विचारही करा.

 

मित्रों,

घरात मेणबत्ती, टॉर्च आहे का शोधा, ५ तारखेला संध्याकाळी मोबाईल फुल रिचार्ज करा. ९ मिनिटं लाईट दाखवायचा आहे. लाईट शो जोरात झाला पाहिजे. बाकी खालील प्रश्न अजिबात विचारायचे नाही.

१. किती लोकं उपाशी आहेत? किती अजून इच्छित स्थळी पोचायचं आहे?

२. देश कोरोना नियंत्रणात आणत आहे का?

३. मेडिकल फॅसिलिटी, मेडिकल इन्फ्रास्ट्रक्चर याबाबत काय ? पुरेसं आहे का ?

४. खासगी डॉक्टरना पुरेसे मेडिकल कीट कधी देणार ?

५. लॉकडाऊन वाढत गेलं तर जीवनावश्यक वस्तूंसाठीदेखील बाहेर जायला नको. त्याकरता महानगरपालिका, नगरपालिका, गाव प्रशासनाकडून घरपोच वस्तू पोहोच होतील, अशा सुविधा सरकार हळूहळू डेवलप करेल का?

६. मरकजसारख्या गोष्टीबद्दल पंतप्रधान काही का बोलले नाहीत? पुढेही अशा कृत्यांना आळा कसा घालणार आहे?

७. मुस्लिम, हिंदू अगर कोणीही असो, आता धार्मिक स्थळ, धार्मिक कार्यक्रम, उत्सव खपवून घेतले जाणार नाहीत, याबद्दल प्रबोधन का केलं नाही?

८. स्वपक्षीय मुख्यमंत्री योगी आदित्य यांनी गुढीपाडव्याला संचारबंदी मोडून, सोशल डिस्टन्सिंग बाजूला सारून जमावाला घेऊन मंदिरात राममूर्तीचं पूजन कसं केलं?

९. महाराष्ट्र पोलिसांनी मरकजला परवानगी नाकारली होती. मग केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अखत्यारित असलेल्या दिल्ली पोलिसांनी काणाडोळा का केला?

आणि हो

१०. मेणबत्ती आणायला आता कितीजण बाहेर पडतील?

का कुणास ठाऊक पण उद्धव ठाकरे आश्वासक आणि आपलेसे वाटतात, तसे मोदीसाहेब का वाटत नाहीत?

उपयोगशून्य टाळ्या / थाळ्या वाजवणं आणि आता मेणबत्ती / टॉर्च / मोबाईल लाईट पेटवणं, असे इवेंट मोदीसाहेब का करत बसतात?

असे प्रश्न तुम्हाला अजिबात पडता कामा नये. देश महासत्ता बनवायचा असेल तर ते जे बोलतात ते ऐका. कारण प्रत्यक्ष देवाने अवतार घेतला आहे. देवाला कोण प्रश्न विचारतं का?

-    विनय खातू

हेही वाचा : आपण आधीच दिवे लावलेत, आतातरी डोकं लावूया

मी मेणबत्ती, दिवा, टॉर्च काहीच पेटवणार नाही.

मी फक्त बाल्कनीत येऊन उभा राहणार.

कारण 

मी स्वयंप्रकाशित आहे,

-          एक पुणेकर

******

एक मेणबत्ती २ KCal उष्णता देते.

एक मोबाईल फ्लॅश ०.५ KCal उष्णता देतो.

एक तेलाचा दिवा ३ KCal उष्णता देतो.

समजा १३० करोड लोकांमधे ७० करोड लोकांनी हा आदेश पाळला आणि त्यात ३५ करोड मेणबत्ती, २० करोड फ्लॅश आणि १५ करोड दिवे पेटवले गेले, तर १२५ करोड KCal उष्णता निर्माण होईल. कोरोना १० KCal उष्णतेत मरून जातो. त्यामुळे ५ एप्रिलला सर्व कोरोना विषाणू मरून  जाणार.

******

रविवारी आपण सगळे जे दिवे लावणार. वाक्प्रचार नाही याची नोंद घ्यावी. त्या कार्यक्रमाबाबत मी दोन सुधारणा सुचवतो.

पहिली म्हणजे दिवा ठेवायची जागा गाईच्या शेणाने सारवलेली असावी. तसेच दिवा दक्षिण दिशेलाच लावावा, कारण ती यमाची दिशा असते.

दुसरी म्हणजे, अर्धा तास महामृत्युंजय मंत्राचा जप करावा. म्हणजे कोरोनाने मृत्यू होणार नाहीत.

या सगळ्या कार्यक्रमाचा एक प्रोजेक्ट रिपोर्ट बनवून UNESCO, WHO आणि नोबेल समितीला पाठवावा. पारितोषिक निश्चित!

हेही वाचा : दिल्लीच्या तबलिगी प्रकरणात नेमकं खरं काय आणि खोटं काय?

५ एप्रिल आणि कोरोनाचा सहसंबंध

कृपया लेख पूर्ण वाचणे

इ.स.१६६३ साली मोगल सुभेदार शाईस्तेखान हा पुण्याच्या लाल महालात जवळपास २०००च्या फौजेसह तळ ठोकून बसला होता. त्याने रयतेवर अनंत अत्याचार केले होते. त्याचा बंदोबस्त करण्यासाठी महाराजांनी एक युक्ती केली. आणि थेट लाल महालात केवळ २०० मावळ्यांसह प्रवेश करून त्याची तीन बोटे छाटली. तो दिवस होता ५ एप्रिल १६६३चा.

आता तुमच्या लक्षात आलंच असेल की आपल्या आदरणीय मोदीजींनी नेमका ५ एप्रिलचाच दिवस का निवडला ते. कारण ज्याप्रमाणे महाराजांनी गनिमी काव्याने शाईस्तेखानाला पळवून लावले. अगदी त्याच धर्तीवर आपल्याला कोरोनाला पळवून लावायचं आहे. तेही ५ एप्रिललाच. जसा महाराजांनी शाईस्तेखानावर अचानक हल्ला केला अगदी तस्साच हल्ला आपल्याला कोरोनावर करायचा आहे.

आता हेच बघा ना, १३० कोटी जनतेने एकाचवेळी सर्व दिवे बंद केले की कोरोना कन्फ्युज होईल आणि विचार करेन की सर्व लोक गेले कुठे. मग तो सैरभैरसारखा आपल्याला शोधत बसेल आणि इतक्यात आपण सर्वांनी मेणबत्त्या, दिवे पेटवले की हा मूर्ख कोरोना धाडकन दिव्याकडे आकर्षित होईल आणि मेणबत्तीच्या ज्योतीत कधी भस्म होईल कळणारसुद्धा नाही!

आहे की नाही गनिमी कावा.

(टीप: सदर लेखातील शाईस्तेखान हल्ल्याची तारीख खरी असून कुणीही यावर शंका घेण्याची गरज नाही.तसेच भक्तांनी फक्त ही टीप सोडून इतर लेख शेअर करावा आणि इतरांनी विनोदाने पूर्ण लेख शेअर करावा. कारण या १३० कोटींच्या देशातील ५ एप्रिलबाबतचा हा पहिलाच लेख आहे.)

-          धिरज

१० एप्रिल

सकाळी १० मिनिटे घरातील एकेकाने आंघोळ करताना कोरोना गो गो गाणे गावं.

११ एप्रिल

सकाळी सात वाजता घरातील प्रत्येकाने ब्रश करून भरपूर फेस काढून एकतेचं दर्शन घडवा.

१२ एप्रिल

सर्व महिलांनी दुपारी २ वाजता मिक्सरमधे वाटण वाटून कोरोनाला गरगरून टाका.

१३ एप्रिल

घराघरातील लहान बाळांच्या कुल्यास पहाटे ४ वाजता चिमटा काढून त्यांचे टँहँ कोरोनास ऐकू जाईल असे पहावे.

१४ एप्रिल

आपल्या बॉसला सकाळी ७ वाजता फोन करुन १५ एप्रिलपासून सुटी हवी याकरिता सर्वांनी एकाचवेळी कडाक्याचे भांडण करा.

१५ एप्रिल

कोरोना मागं पाय लावून पळालाय मुकाट्यानं कामावर जा.

******

माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी देशाला उद्देशून एक संदेश दिला. या संदेशात त्यांनी असे आवाहन केले आहे की सर्व देशवासीयांनी मिळून ५ एप्रिलला रात्री ९ वाजता ९ मिनिटांपर्यंत दीपप्रज्वलन करून देशाच्या एकात्मतेचं प्रतीक म्हणून आणि कोरोना महामारीच्या विरोधात एकजूट म्हणून एकत्र प्रयास करायचा आहे. त्यात पंतप्रधानांनी स्पष्ट सांगितलं आहे की कोणीही घरातून बाहेर पडू नये आणि सोशल डिस्टन्सिंग ठेवूनच हे करायचे आहे.

या आवाहनानंतर अनेक प्रतिक्रिया येणं स्वाभाविक आहे. काही लोक म्हणतील, या स्टंटची काय गरज आहे?  काही म्हणतील की पंतप्रधान मोदी हे कोणत्याही गोष्टीची इवेंट करतात. 

रात्री दिवे लावून काय विशेष होणार आहे?  यापेक्षा  हॉस्पिटल बांधा. गरीब लोकांना मदत करा. टेस्टच्या सुविधा द्या, इत्यादी इत्यादी. अशा अनेक प्रतिक्रिया येतील.

आपण या गोष्टींमागील एक पॉझिटीव कारण जाणून घेऊ जे मला जाणवले. सर्वप्रथम हे पाहू की सर्व राज्य सरकारं आणि केंद्र सरकार पूर्ण ताकदीनं या कोरोनाच्या साथीचा  समर्थपणे मुकाबला करत आहे. केंद्र आणि राज्य सरकार यांनी मिळून अनेक ठिकाणी तपासणी केंद्रं तसंच हॉस्पिटल उपलब्ध करून दिली आहेत. पोलिस त्यांचं काम तत्परतेने करत आहेत. डॉक्टर, नर्सिंग स्टाफ, इतर पॅरामेडिकल स्टाफ सेवेला तत्पर आहेत.  बँका  आणि इतर अत्यावश्यक सेवा सुरू आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने जाहीरपणे भारताचे कौतुक केलं आहे आणि या साथीच्या विरोधात भारताला पूर्ण सहकार्य केले आहे.

हे सर्व सुरु असताना अजून एक गोष्टीची आवश्यकता आहे आणि ती म्हणजे सकारात्मता. लोकांच्या मनात प्रचंड भीती आहे, चिंतेचं वातावरण आहे. सर्वत्र नैराश्य आहे. अशावेळी सामूहिक सकारात्मक प्रार्थनेची गरज आहे. जे विचार आपण मनातून बाहेर टाकतो, तेच विचार आपल्याकडे परावर्तित होतात. जे आपण निसर्गाला देत असतो, निसर्ग तेच आपल्याला परत करत असतो. अगदी व्याजासकट.

पूर्वीच्या काळात भारतवर्षात सामूहिक प्रार्थना करण्यावर भर दिला जात असे. आजही ख्रिस्ती आणि इस्लाम धर्मात सामूहिक प्रार्थना करण्यावरच भर दिला जातो. काही धर्मांध याचा विकृत अर्थ घेतात हा भाग निराळा.

तर सामूहिक प्रार्थना किंवा सामूहिक सद्विचार करणं हे एकाच वेळी सर्वांनी मनाने आणि विचाराने एकत्र येऊन निसर्गात सकारात्मक लहरी उद्दीपित करणे होय. या सकारात्मक विचाराने निसर्गसुद्धा सकारात्मक प्रतिसाद देतो.

एकत्र एकच विचार तयार केल्याने प्रत्येकाच्या अंतर्मनात एक सकारात्मक विचार तयार होत असतो. बाह्य आणि अंतर्मनाचे सख्य हे पूर्ण वैद्यकीय शाखेला ठाऊक आहे. ध्यान, धारणा आणि योग हे याचाच एक भाग आहेत. आणि म्हणूनच करोडो लोकांनी केलेला अंतर्मनातील हा सकारात्मक विचार जर लोकांच्या मनात एकाच वेळी येत असेल तर त्याची शक्ती किती असेल याची कल्पना करा.

त्यामुळे माननीय पंतप्रधानांनी केलेले आवाहन हे खूप खोल विचार करून केलंय. तसेच भारतीय लोकांना हे फार गरजेचे आहे. सर्व हेवेदावे, जाती, पोटजाती विसरून फक्त हिंदुस्थानी ही एकच जमात असे मानून एकत्र येण्याची गरज आहे. तरच भारत या आणि पुढील आव्हानांना समर्थ पणे सामोरे जाऊ शकेल.

जय हिंद.

डॉ. मंदार नि. पाटकर, एमडी (होमिओपॅथी)

******

आपला इवेंटचा सोस देशातली आरोग्य व्यवस्था मोडून काढू शकतो.

जर सर्व देशात एकाच वेळी लाईट बंद केले तर विजेची मागणी एकदम कमी होऊन जाईल. आधीच लॉकडाऊन मुळे मागणी कमी झाल्यामुळे मागणी पुरवठा आणि निर्मितीचं गणित बिघडलं आहे.

जर वापर असेल तरच वीज निर्माण करता येते, वापरच नसेल तर बनवलेली वीज कुठे ठेवता येत नाही. त्यामुळे सर्वांनी एकाच वेळी लाईट बंद केले तर अजून परिस्थिती बिघडून जाईल आणि स्टेट तसेच सेंट्रल ग्रीड हाय फ्रिक्वेन्सीवर फेल होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. 

या इवेंटचा फेरविचार व्हावा आणि लाईट ना बंद ना करता फक्त दिवे किंवा मेणबत्ती लावली जावी. महाराष्ट्राची विजेची मागणी २३००० MW वरून १३००० घटलेली आहे आणि ही १३००० MW वीज फक्त अत्यावश्यक सेवा आणि घरगुती विजेचा लोड आहे. जर सर्वांनी अचानक दिवे बंद केले तर ग्रीड फेल होऊन सर्व पॉवर स्टेशन हाय फ्रिक्वेन्सीवर ट्रिप होतील. संपूर्ण राज्य अंधारात जाईल. महाराष्ट्रासारखे मोठे पॉवर डिमांड असलेले राज्यात जर ग्रीड फेल्युअरमुळे सर्व पॉवर स्टेशन बंद पडले तर मल्टिस्टेट ग्रीड फेल्युअर होईल आणि पूर्ण देश अंधारात जाईल. हॉस्पिटल सेवा विस्कळीत होतील. आयसीयूमधे माणसं मरतील कारण सगळीकडे बॅकअप असेलच असं नाही. जनरेटर चालवलं तरी त्याला मर्यादा आहेत, डिझेल पुरवठा व्हायला हवा कारण हा डाऊनटाइम प्रचंड मोठा आहे.

डाऊन टाईम नेमका किती? एक पॉवर स्टेशन सर्विसमधे यायला साधारण १६ तास लागतात. याप्रमाणे सर्व परिस्थिती नॉर्मल व्हायला एक आठवडा जाईल. आपला इवेंटचा सोस आपल्याच दवाखान्यात असलेल्या माणसांच्या जीवावर उठू शकतो याची नोंद घ्या.

माझी माहिती चुकीची असेल किंवा असला कुठलाही तांत्रिक बिघाड होणार नाही असं कुणाचं म्हणणं असेल तर त्याने व्यवस्थित माहिती मांडावी. असं होऊ नये आणि लोकांचे प्राण धोक्यात येऊ नयेत ही सदिच्छा. बाकी निर्णय तुमचा.

#कोरोना_विषाणू #मेंदूचा_कोरोना

आनंद शितोळे

हे कोरोना स्पेशलही वाचा : 

एखाद्या वायरसचं बारसं कसं केलं जातं?

महाराष्ट्राचे एक मंत्री कोरोना संशयित बनतात तेव्हा

कोरोना कुटुंबातलं सातवं पोरच इतकं वात्रट कसं निघालं?

पंतप्रधान कोरोना पॅकेजनंतरही गरीब फाटकाच राहणार आहे

लॉकडाऊनः कोकणात हापूस घरातच पडून, युरोपात फळं खायला मिळेनात

विरोध करणाऱ्यांनो,

तुम्हाला माहीत नाही याच्या मागे ही मास्टरस्ट्रोक आहे. पूर्ण जगभर कोरोनाविरुद्ध औषधाचे संशोधन सुरू असताना, युद्धपातळीवर आर्थिक परिस्थिती, आरोग्य, शासन व्यवस्था इत्यादीबद्दल `तुम्ही काय दिवे लावले?` असा प्रश्न आता पुढे कुणी विचारू शकणार नाही.

तुम मुझे प्रॉब्लेम दो, मैं तुम्हें इवेंट दूंगा.

******

फक्त दिवा लावायला सांगितलंय...

नाहीतर दिवाळी समजून चिवडा, फराळ, मिठाया वाटत नका बसू गावभर.

******

आज सकाळी नऊ वाजताच्या भाषणात मोदीजी तबलिगींच्या वागण्याची खरडपट्टी काढतील अशी आशा लोक आणि त्यांचे भक्त लावून बसले होते. पण तसा उल्लेख भाषणात न आल्याने सगळे निराश आहेत.

१७ वर्षांच्या सहवासात भक्त असूनही आपण मोदींना का बरे ओळखू शकलो नाही? मोदी आज पंतप्रधान पदावर आहेत. त्या पदाला साजेसे वागणे अपेक्षित आहे. संपूर्ण जगाचे लक्ष त्यांच्याकडे लागले आहे. आपण समजतो तेवढी तबलिग ही समस्या ओलांडताच येणार नाही अशी नाहीये. ती सोडवण्याचा आराखडा मोदींकडे आहे. पहिल्या दिवसापासून आहे. तुम्हाला कळणार नाही अशा पद्धतीने ते याचा सामना करतील.

असे बघा की शत्रूने खड्डा खणला आहे. मग आपण त्याच्यात जाऊन पडण्याची पावले टाकली तर जिंकेल कोण? आपण की शत्रू? यापेक्षा खणलेल्या खड्ड्यात शत्रूलाच ढकलून देणे, हे काम हुशारीचे नाही का? अराजक माजवणे हा तर शत्रूचा डाव आहे, आपण त्यात फसायचे नसते.

शत्रूला खड्डा खणू द्यायची उसंत मोदींनी दिली आहे. पुढचे काम सफाईने होईल. माशी मारण्यासाठी तोफा बाहेर काढायच्या नसतात. हीच वेळ आहे त्यांच्यामागे उभे राहण्याची. आपले डोके चालते राहिले पाहिजे. पण वाहवता नये. थोडा धीर धरा. सत्तर वर्षांचा रोग आहे. रोगी न दगावता सुधारायचा आहे. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असते. आणि आपल्यापेक्षा दसपट जास्त खोलात जाऊन मोदी विचार करतात. एक चूक हातून झाली तर महागात पडेल, परवणार नाही. म्हणून  आजवर भले वेळ लागला तरी बेहत्तर पण हातून चूक होऊ नये म्हणून ते सगळ्यांना जपतात.

१३० कोटी लोकांच्या जीविताचे एवढे मोठे ओझे डोक्यावर घेऊन ते चालत आहेत. आपल्या अपेक्षांचे ओझे त्यांच्या डोक्यावर याक्षणी चढता नये हे बघण्याचे काम आपले आहे.

- स्वाती तोरसेकर

******

ज्यांनी आयुष्यभर पप्पू आणि साहेबांसमोर कौतुकाची आरती ओवाळली, त्यांना आदरणीय मोदींजींच्या बुद्धिप्रगल्भतेचा आवाका कसा कळणार ?

पण, गुलामांनो लक्षात घ्या, आजही आमच्यासारखे कट्टर मोदीभक्त तुमच्या खोटेपणाचा बुरखा फडून ठेवण्यासाठी समर्थ आहेत. मागच्यावेळी तुम्ही उपग्रहातून औषधफवारणी होणार असल्याची अफवा पसरवली. आम्हा भक्तांची बदनामी करण्याचा डाव रचला. पण अशा अफवांवर विश्वास ठेवायला आम्ही मंदबुद्धी नाही आहोत.

गुलामांनो आदरणीय मोदीसाहेबांच्या चाणक्यनितीची थोडी झलक तुम्हाला देतो. मोदी साहेबांनी २२ मार्चला जनता कर्फ्यूचे आवाहन केले होते. संध्याकाळी पाच वाजता थाळी वाजविण्यासही सांगितले. अनेकांना ती चेष्टाही वाटली. पण, लक्षात घ्या हे नियोजन होते त्यानंतर १४ दिवसांनी म्हणजे ५ एप्रिल रोजी थेट परग्रहवासीयांना आमंत्रित करण्याचे.

अमेरिकेच्या एरिया ५६ या परिसरात दुसऱ्या ग्रहावरील एलियन्सला ठेवले जाते. प्रत्येक देशामधे असे एलियन पकडून ठेवलेले आहेत. मोदी साहेब परदेश दौरे करतात यावरून त्यांना नावे ठेवली जातात. पण ते परदेश दौरे करत नव्हते गुलामांनो, तर ते एलियनला भेटत होते. कारण ज्यावेळी देशावर येणाऱ्या संकटाचा सामना करण्यासाठी माणूस सक्षम नसेल, त्यावेळी एलियन्सची मदत घेता येऊ शकते, हे मोदीसाहेबांनी ओळखले होते.

अमेरिका दौऱ्यावेळी मोदीसाहेब एरिया५६ येथील एका एलियनला भेटले होते. ऍक्टिव्हफक६९ असे त्या एलियनचे नाव. त्यावेळी त्या एलियनने सांगितले कि मंगळ ग्रहावर कोवीडॉगीस्टाईल नावाचे इथेलियम आय ट्वेंटी रसायन आहे. जे कोणत्याही वायरसचा नाश करण्यासाठी उपयोगी पडू शकते. ही माहिती त्या एलियनने फक्त मोदीसाहेबांना दिली. कारण त्याला मोदी साहेबांच्या आत्मिक उर्जेची प्रचिती आली.

तुम्हाला मदत हवी असेल त्यावेळी १३० कोटी धातूच्या भांड्यांचा आवाज करा, असेही त्या एलियनने सांगितले होते. भांडी वाजवल्याचा आवाज मंगळ ग्रहावर पोहचेल आणि त्यानंतर आमच्या स्पेसशीप कोवीडॉगीस्टाईल घेऊन पृथ्वीकडे रवाना होतील. मात्र त्यांना पोहचायला ३४० तास लागतील. पृथ्वीवर आमच्या स्पेसशिप पोहचतील आणि अवघ्या नऊ मिनिटात आमचे एलियन कोवीडॉगीस्टाईलने फवारणी करतील. अट फक्त एकच असेल की परिसरातील लाईट बंद असावी आणि अग्निदिपक प्रज्वलीत करावेत. कारण तांत्रिक विजेच्या उजेडात कोवीडॉगीस्टाईल प्रभावी ठरत नाही. आता वेळ आलीये मित्रांनो, कारण ३४० तास पूर्ण होतात बरोबर ५ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता.

मित्रांनो ज्या माणसाने सदैव देशहिताचे निर्णय घेतलेत. त्याला आता तुमच्या मदतीची गरज आहे. माझ्या बंधूंनो आणि भगिनींनो जसे नियोजन केले होते, त्यानुसार सगळं सुरू आहे. तुम्ही घरामधे बसून रहा. घराबाहेर पडू नका. गुलामांनी यासारख्या काहीही अफवा पसरवल्या तरी विश्वास ठेवू नका. आपल्या कुटुंबाला सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी आपलीच आहे.

- कट्टर भक्त नितीन थोरात

हेही वाचा : १९४७ मधेच कोरोनासारख्या रोगाचं तंतोतंत वर्णन करणारी कादंबरी

उंबरठ्यावर डावीकडून ९ सेमी आणि उजवीकडून ९ सेमी जागा सोडावी. मधल्या जागेचे ९ भाग करावेत. त्या जागेत ९ मेणबत्त्या ठेवाव्यात.

आगपेटीच्या नऊ काड्यांनी त्या प्रज्ज्वलित कराव्या. ज्या बोटावर मतदानाची शाई लागली होती ते बोट प्रत्येक मेणबत्तीवर प्रत्येकी एक मिनिट असे धरावे. त्यात ९ मिनिटे जातील. त्याने बोटावरची त्वचा काळवंडून आपण पुन्हा एकदा मतदान केले आहे असा दिव्य भास होईल. तो भास नऊ मिनिटे टिकेल. त्या भासातून बाहेर आल्यानंतर उंबरठ्यावरील नऊ मेणबत्त्यांना निरोप द्यावा. वितळलेल्या मेणाची नऊ सेमी उंचीची एक बाहुली करावी. ती बाहुली उंबऱ्यापासून नवव्या लादीच्या खाली नऊ सेमी खोल पुरावी. दर नवव्या दिवशी त्या लादीची मानसपूजा करावी. असे केल्याने घरात सुखसमृद्धीशांतताआरोग्यादि नांदतील.

- राजीव काळे

******

जर्मनीत बर्लिनला मी हिटलर बंकरमधे एक पोस्टर लावलं होतं, त्या काळातला प्रोपोगांडा दाखवणारं. रात्री विमानं बॉम्बिंगला येण्याच्या खूप खूप वर्ष आधी त्याची तयारी सुरू होती. त्यासाठी केलेलं.

पोस्टर असं होतं की रात्रीची वेळ आहे. इमारतीमधले सगळे दिवे बंद आहेत. फक्त एका घराचा दिवा सुरू आहे. आणि लिहीलं होतं की, देशद्रोही ओळखायचा असेल, तर तो हाच! रात्री दिवे सुरु ठेवणारा! हा आपल्या देशाचा शत्रू आहे, त्याला तसंच वागवा!

आत्ता ५ तारखेला दिवे न घालवणारे आणि मेणबत्ती, पणती न लावणारे देशद्रोही, शत्रू पकडता येतील.

******

तुम्हाला कळणार नाही. ९ मिनिटे दिवे जाळल्याने दर मिनिटाला एक ग्रह शांत होतो. अशा रितीने नवग्रहशांती होते. मोदीजींना देशाची नव्हे तर अखिल विश्वाची काळजी!

नमो नमो.

हेही वाचा : 

सोशल कसलं, हे तर दिल्ली डिस्टन्सिंग!

अजय देवगण बड्डे स्पेशलः नैंटीजची लवइष्टोरी

छत्तीसगडमधे पुन्हा नक्षलवादी हल्ला होऊ शकतो

प्रभू रामचंद्रः महान सांस्कृतिक संघर्षाचा यशस्वी नायक

दिल्लीच्या तबलिगी प्रकरणात नेमकं खरं काय आणि खोटं काय?