जलिकट्टू : माणसाच्या अंतरंगात लपलेल्या हिंस्र जनावराचं दर्शन देणारा सिनेमा

१६ डिसेंबर २०२०

वाचन वेळ : ४ मिनिटं


‘जलिकट्टू’ हा मल्याळी चित्रपट भारताकडून यंदा ऑस्करसाठी निवडला गेलाय. राजकारण, जातपात, नैतिकता, वैमनस्य आणि समाजातल्या सगळ्या अवगुणांना हा सिनेमा स्पर्श करतो. ही गर्दीची कथा आहे. माणसाच्या अंतरंगात छुपं हिंस्र जनावर खरंच दडलंय का, असा प्रश्नी हा नितांत सुंदर चित्रपट उपस्थित करतो, हे त्याचं यश.

गावातल्या एका श्रीमंत व्यापाऱ्याच्या मुलीच्या साखरपुड्याच्या जेवणासाठी ताज्या बीफची खाटिकाला ऑर्डर दिलीय. जनावर कापण्यासाठी पूर्वतयारी चालू असतानाच वीज जाते आणि अंधाराचा फायदा घेऊन रेडा पळून जातो. गावाभोवती असलेली शेतं, उंच माड, जंगल यातून सैरभैर पळू लागतो. जमिनीतल्या पिकांची नासधूस होते आणि त्याला जेरबंद करण्यासाठी खाटिकाची तारांबळ उडते.

बातमी गावभर पसरते, तसे लोक मिळेल ती आयुधं घेऊन पाठलाग करू लागतात. त्यात ते जनावर एका विहिरीत पडतं. त्यामुळं आणखीनच गोंधळ होतो. मग लाकडांचा चौक करून पुली लावून दोरखंडाने एकाला विहिरीत सोडून जनावर वर खेचण्याचा उद्योग सुरू होतो. रेडा वर काढला जातो. त्यानंतर सुरू होते माणसामाणसांतील जीवघेणा खेळ. कापण्याचा मानकरी कोण? मी की तू?

हेही वाचा : तान्हाजी सिनेमातल्या शिवरायांचं काय करायचं?

अंधारात शूट केलेला सिनेमा

दिग्दर्शकाच्या नजरेतून हा पाठलाग माणूस आणि जनावर यातला नसून, दोन जनावरांतला आहे. माणसाच्या अंतरंगातील हिंस्र श्वा पद, मस्तवालपणा,  लबाडी, हावरेपणा उघडा करून दाखवण्याचा दिग्दर्शकाचा प्रयास दिसतो. जनावराने केलेला दंगा, त्यावर गावकऱ्यांची झुंबड, अमानवी हुल्लडबाजी, एकमेकांवर गुरगुरणं यातून अद्याप आदिमानवाचे अंश आपल्यात वास करून आहेत, असं दिसून येतं.

पाठलाग आणि हुल्लडबाजीत शेतीची नासधूस झाल्यावर कुरकुर करणारे काही शेतकरीपण आहेत. त्यातच पूर्ववैमनस्यातून एकमेकांचा काटा काढणारेही आहेत. कोणी तरी बंदूकधारी इसमालाही बोलावलंय. जनावराला गोळी घालायची नाही, असं खाटिकांचं म्हणणं आहे. सगळा सावळागोंधळ. जनावराला कसे का असेना, पकडणे हा पुरुषार्थ असल्याचा काहींचा हेतू आहे. हे जग सर्वांसाठी आहे, जगू देत त्या मुक्या जनावरालाही, असे सांगणारापण एक भला माणूस आहे.

एक वृद्ध इथे पूर्वी खूप जनावरे होती, अशी जुनी आठवण काढत उद्वेगाने म्हणतो, ‘हीपण दोन पायांची जनावरेच की!’ असे छोटे छोटे प्रसंग आणि प्रत्येकाला मिळालेल्या छोट्या; पण कथेत महत्त्वाची भर घालणाऱ्या भूमिका यामधून दिग्दर्शक सतत भाष्य करत राहतो.

संगीतकार आणि साऊंड डिझायनर यांनी इथं कमाल केलीय. सिनेमाच्या सुरुवातीपासूनच घड्याळाची आवाज वाढवलेली टिकटिक, झोपलेल्या माणसांचे श्वा्सोच्छ्वास, मिटलेल्या डोळ्यांची उघडझाप, कोरसमधली संथ गीतं इत्यादींनी गूढ आणि गंभीर वातावरणनिर्मिती केलीय. पल्या पुढे काय वाढलंय त्याची कल्पना हे आवाज तर देतातच; पण मनाची काही पूर्वतयारीसुद्धा करतात.

त्यात जवळजवळ बहुतांश सिनेमा रात्रीच्या अंधारात, शेतात, झाडाजंगलात आणि प्रत्येकाच्या हातात असलेल्या टॉर्चच्या प्रकाशात शूट केल्यामुळे भीषणता अधिकच वाढते.

तरीही सिनेमा कृत्रिम वाटत नाही

एस. हरीश यांच्या ‘चरेळी’ या कथेवरून त्यांनीच अन्य एकासोबत हा सिनेमा निर्माण केलाय आणि हा लिजो लोस पेलिसेरी या संवेदनशील दिग्दर्शकाने बनवलाय. महत्त्वाचं म्हणजे प्रशांत पिल्लई यांच्या संगीतामुळे आणि गिरीश गंगाधरन यांच्या कॅमेऱ्यामुळे  चित्रपट फार मोठी उंची गाठतो. 

गावातल्या माणसांचे विविध नमुने, गावातली आणि जंगलातली धावपळ, मटण तोडणारा खाटिक, त्याच्याबरोबर मांस खरेदी करणारे, वाद घालणारे ग्रामस्थ, बायकोला थोबाडीत मारून पुरुषार्थ गाजवणारा रागीट पोलिस, पोलिस दलाची असमर्थता, मग दंग्यात पेटवून दिलेली पोलिस जीप, शेकोटी पेटवून बसलेले बघे, घरातून पळून जाणारे प्रेमिक असे अनेकाविध प्रसंग अप्रतिमरीत्या कॅमेऱ्यात टिपलेत. 

जनावराला पकडण्यासाठी केलेली सगळी धुमश्चक्री आणि एवढा दोन-तीनशेचा मॉब शूट करणं तसं अवघडच होतं. पण सिनेमा कुठंच ओढून ताणून बनवलेला कृत्रिम वाटत नाही. आपण एका कोपऱ्यात उभं राहून समोर वास्तव प्रसंग पाहत आहोत, असंच वाटत राहते.

हेही वाचा : भानूताई सिनेमाच्या काळाचा अभ्यास करून वेशभूषा ठरवायच्या

राजन गवस यांच्या कवितेची आठवण

सांघिक उत्कृष्ट कामगिरीसाठी हा चित्रपट बनला आहे. राजकारण, जातपात, नैतिकता, वैमनस्य आणि समाजातल्या सगळ्या अवगुणांना हा सिनेमा स्पर्श करतो. ही गर्दीची कथा आहे. त्यामुळे चांगला अभिनय असा कुणा एकाचा उल्लेख करणं चुकीचं होईल. पण प्रत्येकाने आपलं काम चोख केलंय.

ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक राजन गवस यांची म्हैस नावाची कविता आहे. त्यात त्यांनी म्हशीला असेच ‘जलिकट्टू’सारखं रूपक म्हणून वापरून आपल्या जहाल शब्दांत समाजावर कोरडे ओढले होते. त्या कवितेची आठवण आल्याशिवाय राहत नाही. माणसाच्या अंतरंगात एक छुपे हिंस्र जनावर खरंच दडले आहे का, असा प्रश्नू हा नितांतसुंदर चित्रपट दर्शकाच्या निर्माण करतो, हे त्याचं यश आहे.  

हेही वाचा : 

कशी चालेल फाइव जीची जादू?

ओटीटी प्लॅटफॉर्म थेटरचे बाप बनणार का?

आपले पूर्वज नॉनव्हेज खायचे, दारू प्यायचे का?

ऋषी कपूर : ‘ढाई किलो’च्या हाताखाली दबला गेलेला हिरो

उत्तर प्रदेशचा लव जिहाद कायदा संविधान विरोधी का ठरतो?