काळ्या बाजारात अडकलेलं रेमडेसिविर खरंच कोरोनावर काम करतं? 

१४ एप्रिल २०२१

वाचन वेळ : ४ मिनिटं


सध्या कोरोनावरच्या रेमडेसिविर या औषधाची सगळीकडे चर्चा आहे. कोरोना पेशंटची संख्या वाढल्यामुळे औषधाच्या मागणीतही वाढ झालीय. त्यासाठी मेडिकल बाहेर लांबच लांब रांगा लागतायत. भरमसाठ किंमत आकारली जातेय. रेमडेसिविरचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे केंद्र सरकारने औषधाची निर्यातही थांबवलीय. पेशंटला एवढं विश्वासार्ह वाटणारं हे औषध खरंच कोरोनावर काम करतं का?

भारतात कोरोनाची दुसरी लाट आलीय. पेशंटच्या संख्येत वाढ होतेय. गेल्यावर्षी औषध, लस, त्याच्या ट्रायल यावर चर्चा होत राहिली. अजूनही होतेय. सगळे काळजीत होते. पर्यायी औषधांचा विचारही करण्यात आला. एचआयवीचं रेट्रोवायरिड आणि लॅण्टीवायरस औषध, मलेरियावरच्या हायड्रोक्लोरोक्वीन या औषधाकडे कोरोनावरचा उपाय म्हणून बघितलं गेलं. हायड्रोक्लोरोक्वीनची ट्रायल घेण्यात आली.

हायड्रोक्लोरोक्वीन नंतर रेमडेसिविर औषध चर्चेत आलं. सध्या रेमडेसिविरसाठी मेडिकल स्टोअर बाहेर गर्दी होतेय. लांबच लांब रांगा लागतायत. मध्यप्रदेशातल्या इंदौरमधे गर्दीमुळे ट्राफिक जाम झाल्याची बातमी आली. भारतात या औषधाचा तुटवडा निर्माण झाला असताना त्याचा काळाबाजारही जोरात सुरू झालाय. त्यासाठी कोरोना पेशंटच्या नातेवाईकांकडून भरमसाठ किमती आकारल्या जातायंत. 

रेमडेसिविर इबोलावरचं औषध

रेमडेसिविर हे अँटी वायरल औषध आहे. इंजेक्शनमधून ते दिलं जातं. २००९ ला हिपॅटायटीस सी या वायरससाठी म्हणून ते बनवलं होतं. पण त्याला बाजारात आणायची परवानगी मिळाली नाही. 

हे औषध बनवणाऱ्या अमेरिकेतल्या गिलिएड या कंपनीनं २०१५ ला एक दावा केला. रेमडेसिविर हे औषध आफ्रिकेतला इबोला वायरसचा संसर्ग रोखू शकतो असं कंपनीनं म्हटलं होतं. इबोलासाठी ते वापरलं जाऊ लागलं. तसंच इतर वायरसचा संसर्ग रोखायची क्षमताही या औषधात असल्याचा दावा गिलिएडनं केला होता. मर्स आणि सार्स या साथीच्या रोगांमधेही त्याचा वापर करण्यात येऊ लागला. सध्याचा कोरोना वायरस या दोन वायरसच्याच कुटुंबात येतो.

मागच्या वर्षी कोरोना वायरसचा संसर्ग वाढायला लागला तशी रेमडेसिविरची चर्चाही होऊ लागली. ट्रायल घेण्यात आल्या. कोरोना वायरस माणसाच्या शरीरात प्रवेश करतो तेव्हा आरडीआरपी नावाचं द्रव्य त्याच्या शरीरात सोडतो. त्यामुळे शरीरात वायरस अधिक वेगाने पसरतो. त्याला रोखायचं काम रेमडेसिविर औषध करतं असं म्हटलं जातं. त्यामुळेच या औषधाला जास्त मागणी आहे. 

हेही वाचा : लस असतानाही आपल्याला वायरसवरच्या औषधांची गरज पडेल?

उत्पादनाच्या सूचना, निर्यात बंद

भारतात रेमडेसिविर औषधाचं उत्पादन ७ कंपन्या करतात. यात सिपला, झायडस कॅडिला, हेटरो, मायलन, ज्यूबीलंट लाइफ, सायन्सेस, डॉक्टर रेडीज, सन फार्मा या कंपन्यांचा समावेश आहे. तयार केल्यानंतर ३ महिन्यात हे औषध एक्सपायर होतं. ऑक्टोबर नंतर कोरोनाच्या आकडेवारीत जशी घट झाली तशी रेमडेसिविरची मागणीही घटली. तीनच महिने औषध टिकत असल्याने कंपन्यांनी लगेचच आपलं उत्पादन कमी केलं.

आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, भारतात रेमडेसिविरची उत्पादन क्षमता ३१ लाख ६० हजार छोट्या बॉटल महिना इतकी आहे. त्यापैकी हेटरो कंपनी १० लाख ५० हजार बॉटलचं उत्पादन करते. तर सिपला ६ लाख २० हजार, झायडस कॅडिला ५ लाख, मायलन कंपनी महिना ४ लाख बॉटलचं उत्पादन करते. बाकी कंपन्यांकडून प्रत्येक महिन्याला १ ते २ लाख बॉटल इतकं उत्पादन घेतलं जातं. 

कोरोना पेशंटच्या आकडेवारीत अचानक वाढ झाली तशी या औषधाची मागणीही अचानक वाढली. ७ एप्रिलला या कंपन्यांना उत्पादन वाढवण्याच्या सूचना केंद्र सरकारकडून देण्यात आल्या. भारतात रेमडेसिविरचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे केंद्र सरकारने औषधाची निर्यातही बंद केली.

काळाबाजारही तेजीत

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही काल जनतेशी संवाद साधताना दिवसाला ४० ते ५० हजार रेमडेसिविरची मागणी असल्याचं म्हटलंय. पेशंटची संख्या वाढत राहिली तर हा आकडा १ लाखापर्यंत पोचेल असंही ते म्हणाले. त्याआधी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही औषध कंपन्यांना रेमडेसिविरचं उत्पादन वाढवायची विनंती केली होती.

रेमडेसिविरची मागणी वाढत असताना मोठ्या प्रमाणात काळाबाजार होतोय. भरमसाठ किंमती आकारल्या जातायत. वन रुपी क्लिनिकचे संस्थापक आणि सीएओ डॉ. राहुल घुले यांनी १५०० बेड क्षमतेचा कोविड हॉस्पिटलचा सेटअप उभा केलाय. त्यांनाही मेडिकल स्टोअर्स, औषध कंपन्यांच्या मनमानी कारभाराचा सामना करावा लागतोय. त्यांनी हा काळाबाजार अमानवी आणि व्यावसायिक धोरणाच्या विरोधात असल्याचं ट्विट करत म्हटलंय.

या काळाबाजाराविरोधात सरकारही पावलं उचलताना दिसतंय. मेडिकल, औषध कंपन्यांना त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या साठा नेमका कितीय याची माहिती त्यांच्या वेबसाईटवर टाकायचे आदेश दिलेत. तसंच रेमडेसिविर किंमत सर्वसामान्य माणसांच्या आवाक्यात राहील याचा विचार करून तशी किंमत आकारल्या जातील. तशा सूचनाही सरकारने केल्यात. 

हेही वाचा :  आपल्याला हात धुवायला शिकवणाऱ्या या दोघींना बिग थँक्यू

रेमडेसिविर बिनकामाचं?

कोरोना पेशंटवर रेमडेसिविरचा सकारात्मक परिणाम होतोय असा कोणताच पुरावा नसल्याचं 'वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन' अर्थात डब्ल्यूएचओचं म्हणणं आहे. डब्ल्यूएचओच्या तंत्रज्ञान विभाग प्रमुख मारिया वॅन कोराखोवा आणि वरिष्ठ शास्त्रज्ञ सौम्या स्वामीनाथन यांनी इंडिया टुडे टीवीला छोटेखानी मुलाखत दिलीय. त्यात त्यांनी रेमडेसिविरच्या आतापर्यंत ५ क्लिनिकल ट्रायल झाल्याचं म्हटलंय.

कोरोनाच्या मृत्यूच्या संख्येत रेमडेसिविरमुळे कोणतीही घट झाली नसल्याचं या ट्रायलमधून समोर आल्याचं निरीक्षण दोघांनी नोंदवलंय. वेंटिलेटरवर असलेल्या पेशंटलाही याचा फायदा होत नसल्याचं ते म्हणतात. गेल्यावर्षी नोव्हेंबरमधे जगभरातल्या ३० देशांमधल्या जवळपास ११ हजार २६६ वयोवृद्ध कोरोना पेशंटवर रेमडेसिविरची ट्रायल घेण्यात आली होती. पण त्यातून फारसं काही हाती आलं नसल्याचं या तज्ञांचं म्हणणं आहे.

तर अमेरिकेतल्या अन्न आणि औषध प्रशासनाच्या फेब्रुवारीतल्या गाईडलाईननुसार, हॉस्पिटलमधे भर्ती असलेल्या पेशंटचं बरं व्हायचं प्रमाण वाढावं म्हणून हे औषध काम करेल. तर मागच्या वर्षी नोव्हेंबरमधे ‘द लॅन्सेट जर्नल’मधे कोरोनाचा संसर्ग व्हायच्या १० दिवस आधी रेमडेसिविर दिलं गेलं तर ज्यांना कोरोनाचा जास्त धोका आहे त्यांचा जीव वाचवता येऊ शकतो असं म्हटलं होतं. 'द न्यु इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिन' यांचाही गेल्यावर्षी १० एप्रिलला असाच रिसर्च आला होता.

हेही वाचा : 

कोरोना वायरसबद्दल मुलांशी आपण कसं बोलायचं?

एकदा बरं झाल्यानंतर पुन्हा कोरोनाचा संसर्ग होतो का?

कोरोनाच्या काळात जन्मलेल्या मुलाला काय म्हणायचं बरं?

तुम्हाला कोरोना फेक न्यूज रोगाची लागण झालेली नाही ना?