कोरोनात भारताची कामगिरी सरस की केवळ सांत्वन?

१८ मे २०२१

वाचन वेळ : ४ मिनिटं


सध्या तरी देशाचं एकूणच जीवन कोरोनानं व्यापून टाकलंय. बारकाईने विचार केला तर भयानक परिस्थितीचं विश्लेषण करणारी एकच बाजू समाजापुढे येत आहे. दुसर्‍या बाजूचा विचार फारसा होताना दिसत नाही. आपली कामगिरी सरस दिसतेय.  पण ती केवळ सांत्वना आहे, समस्येचं समाधान मुळीच नाही हे मात्र विसरता नये.

गेले दोन महिने आपल्या देशात कोरोनाचं तांडव सुरू आहे. लाखो लोकांना संसर्ग होतोय. दररोज हजारोंच्या संख्येने मृत्यू होत आहेत. स्मशानांमधे जागा नाही. मृतदेह नदीत टाकले जात आहेत, जागोजागी चिता जळत आहेत. याचे फोटो जगभर गेलेत.

सरकारच्या एकूणच आरोग्य व्यवस्थेचा पार बोर्‍या वाजला आहे. उपचारासाठी आवश्यक असलेल्या सर्व वस्तूंची आणि मनुष्यशक्तीची देशभर प्रचंड कमतरता आहे. ही परिस्थिती वास्तव आहे. सरकारवर अव्याहतपणे टीका होत आहे.

अनेक प्रकारे विधायक सूचनासुद्धा केल्या जात आहेत. सध्या तरी देशाचं एकूणच जीवन कोरोनानं व्यापून टाकलंय. बारकाईने विचार केला तर भयानक परिस्थितीचं विश्लेषण करणारी एकच बाजू समाजापुढे येत आहे. दुसर्‍या बाजूचा विचार फारसा होताना दिसत नाही.

कोरोना का वाढलाय?

या प्रश्नाचं उत्तर देताना विश्लेषक जवळजवळ एकमताने तीन कारणं सांगतात. पहिलं अगदी फेब्रुवारी, मार्च पर्यंत केंद्र सरकार पूर्णपणे गाफील, बेफिकीर आणि आत्मसंतुष्ट होतं. येऊ घातलेल्या संकटाला प्रभावीपणे तोंड देण्यासाठी कसलीही पूर्वतयारी नव्हती. त्यामुळे एप्रिलमधे सरकार पूर्णपणे गांगारून गेलं.

दुसरं कारण म्हणजे वेगवेगळ्या पाच राज्यांमधे निवडणुका झाल्या. लाखांच्या सभा घेतल्या. अफाट गर्दी जमली. कोणतीही खबरदारी घेतली नव्हती. त्यामुळे संसर्ग वाढला. कोरोना वाढला. तिसरं म्हणजे हरिद्वार इथं कुंभ मेळ्याला परवानगी देणं. लाखो लोक एकत्र आले. संसर्ग वाढला आणि ते लोक आपापल्या राज्यामधे कोरोना घेऊन गेले. रोग अधिक वाढला.

कोरोना वाढवण्यामधे या तीन कारणांची जबाबदारी नाकारणं कोणालाही शक्य नाही. या साथीचं स्पष्टीकरण द्यायला फक्त हीच कारणं पुरेशी नाहीत. कारण या तीन कारणांचा सखोल विचार करताना अनेक प्रश्न, शंका मनात येतात. त्या शंका विचारणं विषय समजण्यासाठी आवश्यक आहे. कारण या तीन कारणांचा अभाव आहे तिथं कोरोना वाढवायास नको होता. पण असं झालेलं नाही.

हेही वाचा : आव्हाडांनी करमुसेला ठोकल्यानं ट्रोलिंगची कीड संपणार का?

कोरोनात महाराष्ट्र अव्वल

कोणतीही राज्यव्यापी निवडणूक नव्हती, कुंभ मेळा नाही, लाखा-लाखांच्या सभा नव्हत्या, त्या आर्थिक, सामाजिक आणि वैचारिक अशा सर्वार्थाने प्रगत आणि पुरोगामी अशा आपल्या महाराष्ट्रात कोरोना विजेच्या वेगाने का फैलावला? एवढंच नाही तर संसर्ग झालेल्यांची संख्या आणि एकूण मृत्यूसंख्या यामधे आपलं राज्य अव्वल आहे.

हा दुर्दैवी प्रकार का घडावा? इंग्रजीत ज्याला ‘ड्यूबियस डिस्टिंक्शन’ म्हणतात, ते आपल्या वाट्याला का यावं? सुदैवाने गेल्या दोन दिवसांत केसेस ६० हजारवरून ४० हजारपर्यंत उतरल्यात. तरीही आपण चुकीच्या ठिकाणी ‘अव्वल’ आहोतच. याचा वस्तुनिष्ठ विचार होणं आवश्यक नाही का?

केरळ महाराष्ट्राच्या खालोखाल

गेली कित्येक वर्ष कल्याणकारी राज्यात केरळचं स्थान फार वरचं आहे. पूर्ण साक्षरता, जीडीपीत वरचा क्रमांक, मानवी विकासात सातत्याने पहिला क्रमांक, देशात सर्वोत्कृष्ट अशी सरकारी आरोग्य यंत्रणा, लोकाभिमुख शासन इत्यादी कौतुकास्पद गोष्टी असताना कोरोनाला पायबंद घालण्यात केरळ आदर्श राज्य व्हायला हवं होतं. पण झालं भलतंच.

रोजच्या केसेसमधे केरळचा क्रमांक देशात महाराष्ट्राच्या खालोखाल दुसरा आहे. रोजच्या केसेस ३७ हजार. निवडणुकीच्या प्रचार सभांनी इथंही शिस्त पाळल्याचं दिसत नाही. नऊ कोटी लोकसंख्येत ३७ हजार म्हणजे गंभीर प्रकार नाही का? याचं विश्लेषण करायचं की नाही?

या राज्यांची स्थिती चांगली?

गोवा हे सर्वार्थानं कल्याणकारी राज्य. लोकसंख्या जेमतेम १५ ते १६ लाख. पण कोरोनाचं प्रमाण तब्बल ४९ टक्के. निवडणुका नाहीत, कुंभ मेळा नाही. तरीसुद्धा ही परिस्थिती. तर पश्चिम बंगालमधे सगळ्यात धामधुमीची निवडणूक झाली.

शेतकर्‍यांच्या प्रचार सभा, रोड शो इत्यादी. प्रत्येक ठिकाणी लाखोंनी गर्दी. मग बंगाल हा कोरोनाचा हॉटस्पॉट व्हायला पाहिजे होता. पण तसं नाही. रोजच्या केसेस २० हजार आहेत. याचाही विचार झाला पाहिजे.

उत्तर प्रदेश मागासलेलं, बीमारू अशी हेटाळणी झालेलं राज्य. कुंभ मेळ्याचा परिणाम काही तरी झाला असणारच. तरीसुद्धा केसेस मात्र साधारण रोज २० हजार पर्यंतच.

हेही वाचा : एकदा बरं झाल्यानंतर पुन्हा कोरोनाचा संसर्ग होतो का?

आपली कामगिरी सरस तरी

सर्वसामान्य लोकांसाठी युरोप-अमेरिका देश प्रगत आणि श्रीमंत आहेत. तिथं परिस्थिती उत्तम असणारच. पण तसं नाहीय. १ मे पर्यंत वेगवेगळ्या देशांमधे संसर्ग झालेल्यांची एकूण संख्या दर दहा लाख लोकांमधे अशी होती. अमेरिका ९० हजार, फ्रान्स ८० हजार, इंग्लंड ७० हजार, जर्मनी ४० हजार, भारत केवळ २०-२५ हजार.

इंडियन एक्सप्रेसच्या ११ मेच्या आकडेवारीनुसार, दर दहा लाख लोकसंख्येमागे मृत्यू झालेल्या लोकांची संख्या अमेरिका १७२१, फ्रान्स १६५०, इंग्लंड १८००, जर्मनी ९९०, जागतिक सरासरी ४०७ तर भारत १५४, बांगलादेश ८० तर पाकिस्तान साधारण ८१.

या परिस्थितीचा सुद्धा विचार व्हायला हवा. अर्थात आपली कामगिरी सरस दिसत असली तरी ती केवळ सांत्वना आहे, समस्येचं समाधान मुळीच नाही हे मात्र विसरू नये. प्रयत्न करणं गरजेचं आहेच.

निष्कर्षाच्या उलट पुरावा?

परिस्थिती बिकट आहे. लोकांचे जीव आणि रोजीरोटी यांचं रक्षण करण्याचं आव्हान आहे. पण काही चांगल्या बातम्या येत आहेत. कोरोनाचा आलेख हळूहळू उतरतोय. लहान-मोठे असे साधारण ४० देश सर्व प्रकारची मदत करत आहेत. लसीचं उत्पादन वाढवण्यात असलेली पेटंटची अडचण दूर झालीय.

इकॉनॉमिक टाइमच्या ११ मेच्या बातमीनुसार, लॉकडाऊन करून, लोकांना घरी बसवून साखळी तोडण्याच्या प्रयत्नात इतर देशांच्या मानाने आपली कामगिरी सरस आहे. टीका करताना एकूण परिस्थितीचा साकल्याने विचार करून आणि आपल्या निष्कर्षाच्या ‘उलट’ पुरावा नाही ना याची खातरजमा केली तर अधिक बरं होईल.

हेही वाचा : 

कोरोनाः मुस्लिम माऊली कुछ तो सोचोना, बोलोना

आपण आधीच दिवे लावलेत, आतातरी डोकं लावूया

तबलीगने भारतात कोरोना पसरवण्याचा कट केलाय का?

कोविड-१९ आजारावर औषध नसताना पेशन्ट बरं कसं होतात?

कोरोनाच्या युद्धात लढणाऱ्या आणि जिंकणाऱ्या स्त्रियाच खऱ्या वीरांगना!