ह्यो मालवनी दिवसाचो ट्रेण्ड इलो खयसून?

०५ एप्रिल २०२३

वाचन वेळ : ५ मिनिटं


जगाक मालवनीची गोडी लावल्यानं ती आमच्या मालवनीच्या बापाशीन. मालवनीचो ह्यो बापूस म्हणजे आमचो तात्या सरपंच. म्हणजेच नटसम्राट मच्छिंद्र कांबळी. कारण त्यांनी 'वस्त्रहरण' करूक घेतल्यानी आणि सगळा जग मालवनीच्या प्रेमात पडला! म्हणूनच मच्छिंद्र कांबळींचो वाढदिवस म्हणजे 'इंटरनॅशनल मालवनी दिवस' करायचो सोशल मीडियावरील पोराबाळांनी ठरवल्यानी त्याची ही गोष्ट.

रांडेचो मेलो, आऊशीचो घो त्याच्या, हाडा मसनात गेली तरी मेल्याचो माज काय उतरना नाय! कांडा लागूदे त्याच्या तोंडाक! मायझयांनो, या शिव्या ऐकून घाबरा नको हा. मालवनीत शिव्या प्रेमानं घातल्या जातत. म्हना, ज्यांच्या तोंडात सतत फक, फक असतलो त्यांका मालवनी भाषेची गोडी गमाक थोडो येळ जातलोच. 

मालवनी म्हणजे शिव्या आणि ओव्यांका एकाच ओसरीवर ठेवणारी भाषा. आमका मालवनी भाषेची गोडी लावल्यानं ती आमच्या सख्ख्या बापाशीन आणि मालवनीच्या बापाशीन. ४ एप्रिल एकोनीशेसत्तेचाळीसाक त्याचो जनम झालो. त्याचा नाव मालवनी नटसम्राट मच्छिंद्र कांबळी. 

मालवनी ही फक्त तळकोकणातील बोली नसून जगाक जिंकायची ताकद असलेली प्रेमळ भाषा बनविल्यानी ती आमच्या बाबुजींनी म्हणजे मच्छिंद्र कांबळींनी. म्हणूनच त्यांचो वाढदिवस इंटरनेटवर स्वयंघोषित मालवनी दिवस म्हणून दणक्यात साजरो झालो.

४ एप्रिलाक या वर्षी नेमका काय झाला?

काल जो तो स्टेटस ठेवत होतो. फेसबुकवर पोश्टी टाकत होतो. आज मालवनी भाषा दिन, चला त्या नटसम्राटाक आदरांजली व्हावया. त्या समजून घेऊक म्या गुगलचो आसरो घेतलो. त्या बापड्याक पन धड काय खबर नाय. नंतर लक्षात आला. लोका उत्साहान मालवनी नटसम्राटाचो दिवस मालवनी भाषा दिन म्हणून पुडाकार घेऊन साजरो करतत. 

लोकांका मराठी भाषा दिन कुसुमाग्रजांमुळे समजलो हा तसो मालवनी भाषा दिन मच्छिंद्र कांबळींमुळे समजता हा. सगळेजन साजरो करतत मग आपन कित्या मागे रव्हा, म्हनत आपन पन एक मालवनीत पोश्ट टाकून दिली. लोकांचो रिस्पॉन्स बरो आलो मगे. फेसबुकावर ४ तारखेक मालवनीतल्या पोश्टी, मालवनीतल्या कमेंटींचो नुसतो पाऊस पडलो. 

तुमका माझा बोलना खरा वाटो ना वाटो पन सोशल मिडियावर मालवनी भाषा दिवस साजरो झालो या मात्र १०० टक्ते खरा हा. लोकांनी पोश्टी टाकल्यानी, मालवनीत स्टेटस लिहिल्यांनी. त्या मालवनी नटसम्राटाक लोकांनी उस्फूर्त आदरांजली वाहिल्यानी. 

हेही वाचा:  'मुंबई आमचीच', असं आम्ही मुंबईचे मराठी लोक का म्हणतो?

यावर्षाकच मालवनी भाषा दिवस कित्या व्हायरल झालो?

मालवनी नटसम्राटाचोच दिवस मालवनी भाषा दिन म्हणून साजरो करायचो ठरलो, तो कोरोनाच्या आधी. तो कार्यक्रम काय होऊक नाय. पन त्यानंतर लोकांका मालवनी दिनाच्या पोश्टी दिसू लागल्या. मालवनी नटसम्राट मश्चिंद्र कांबळीचो झिल प्रसाद कांबळी आमच्याशी बोललो.

प्रसाद दादा बोललो, 'मी आजपर्यंत पप्पांसाठी ४ एप्रिलाक फक्त हॅपी बर्थडे इतकोच स्टेटस ठेवतंय.' पन यंग पोरांनी जो काय उत्साह दाखवलो ना त्याका तोड नाय. काय उचलून धरल्यांनी त्यांच्या लाडक्या नटसम्राटाचो वाढदिवस! 

कोरोना येऊच्या आधी एका संस्थेनं माका कार्यक्रमाक बोलवल्यानी. त्यांका पप्पांचो जन्मदिवस मालवनी भाषा दिवस म्हणून साजरो करुचो होतो. पण कोरोना इलो आनी ता काय जमाक नाय. पण मग बरीच लोका सोशल मिडियावर पोश्टी टाकूक लागले. यावर्षी फेसबुकवर त्याचो पाऊस पडलो. एका लेकरानं पप्पांचो देव्हाऱ्यातलो फोटो ट्वीट केलो. त्याका कितो तो प्रतिसाद!. 

मालवनी जत्रा आणि मालवनी नाटका

खरं सांगायचा तर मालवनी नाटका या आधीपन व्हायची पण मालवनी नाटकांका खरी ओळख दिली ती पप्पांनीच. सिंधूदूर्ग सांस्कृतिक केंद्र झाला नी पहिला मालवनी स्नेहसंमेलन पप्पांनी केला. त्यानंतर जेव्हा मुंबईत मालवनी स्नेहसंमेलनाचो कार्यक्रम झालो तेव्हा मालवनी जत्रोत्सव करायची आयडिया पप्पांचीच. त्यांनी कोकण रेल्वेच्या मुंबईंच्या सेंट्रल रेल्वे वर्कशॉपमध्ये ह्यो विचार लोकांसमोर मांडलो. 

लोकांका तो आवडलो नी मालवनी जत्रोत्सवाची लाट इली. मुंबईत इंग्रजांच्या काळात पन मालवनी खानवळी असत पण मालवनी जेवान लोकप्रिय करण्यात पप्पांचो मोठो वाटो हा. मुंबईत गोमंतक होता पण थय गोमंतकीय जेवन मिळता. पिवर मालवनी जेवन खाऊक तुम्ही पार्ल्याच्या गजालीक जाता ना त्या गजालीचा नाव गजाली असा कारनं मच्छिंद्र कांबळी. 

मालवनीत काय गजाली मारत रव्हलंस असा म्हनतत. गजालीक पिवर मराठी ‘गप्पा’ म्हनतत. पन गजाली, सिंधूदूर्ग ही मालवनी हॉटेला मुंबईकरांना मालवनी जेवन घालतत कारण पप्पांनी त्यावेळेक धडपड केली. २०२५मध्ये पप्पांच्या बड्डेक कार्यक्रम करुचो हा. मालवनी बोलीवर आणि पप्पांवर प्रेम करनारी लोकच एकत्र येऊन तो करतील यावर माझो विश्वास हा. या मालवनी नटसम्राटावर लोकांचा प्रेम बघून इतकी वर्ष पप्पा लोकांच्या मनात जीते असत या पाहून बरा वाटता. तुम्हा मालवनकरांचे किती ते आभार मानू, असं प्रसाद दादा बोललो.

हेही वाचा: मराठीला कुणी अभिजात भाषेचा दर्जा देता का दर्जा?

वस्त्रहरणचो प्रयोग शेक्शपिअरच्या कोकणात

माका पन त्याच म्हनूचा हा, किती खरा असा रे प्रसाद कांबळी दादा बोललो ता. मालवनीक सातासमुद्रापार न्यायचो पराक्रम केलो तो बाबूजींनीच. त्यावेळी सुटबूट घ्यायचो पैसो नसताना शेक्सपिअरच्या मातीयेत बाबूजींनी वस्त्रहरण या नाटक नेला. लंडनमध्ये वस्त्रहरणचो प्रयोग मराठीत सुरु झालो पन १५ मिंटनात लोकांनी आवाज केलो, वस्त्रहरण हवा तर मालवनीतच. 

वस्त्रहरण बाबूजींनी काम करायचा आधीपास्न टेजवर होता पण बाबूजींनी वस्त्रहरणाक लोकांच्या घरापर्यंत पोहोचवला. आज वस्त्रहरणाच्या युटयूबरील ऑडिओ क्लीपिक काय लोकप्रियता असा म्हनून सांगू. आजवर तब्बल १२ लाख रसिकांनी बाबुजींचो वस्त्रहरणाचो नुसतो आवाज ऐकलानी असा. काय त्या एका नाटकाचो ताकद!

४ हजार ८०० प्रयोगांनंतर बाबूजी सगळ्यांका सोडून गेले पन प्रसाद दादानं जेव्हा वस्त्रहरणचो पाच हजारावो प्रयोग शनमुखानंद हॉलमध्ये केल्यानंतर तेव्हा मराठा मंदिरमधलो ‘मुगले आजम’ आठवल्याचा गंगाराम गवाणकरांनी लिहून ठेवला हा. रांडेच्यांनू, मालवनी म्हटली की लोका म्हनतत ये मेलो शिव्या देता. करनी करता. पण बाबूजींनी त्यांच्या नाटकातून देव-देवस्कीच्या नावानं कधीच कोंबो कापलो हा. 

होय महाराजा!

आजकाल पोरा मदर डे, फादर डे साजरे करतत. पन महाराष्ट्राच्या बापाशीचो राज्याभिषेक दिवस जूनमध्ये ६ तारखेक झालो. तो आता मोठो साजरो होता हा, पन ह्यो दिवस साजरो कराक सुरुवातीस रायगडावर दहाबाराच मावळे असत. आता दीड लाखापेक्षा जास्त मावळे ह्यो दिवस साजरो करतत.

मालवनीच्या बापाशीचो जनमदिन एप्रिलाक ४ तारखेक होतो. बोलीभाषेचो दिवस साजरा झाल्याचो तरी महाराष्ट्राक माहिती नाय. पण लोकांनी काल जसो तो दिवस साजरो केलो तसो पुढे आनखी उत्साहान साजरो केल्यांनी तर बोलीभाषेचो दिवस पण शासनदरबारी साजरो होऊन टाईम लागायचो नाय. आता तर सोशल मिडिया असा. हे पोश्टी केले की हे व्हायरल होतत. मग कित्या मागे रव्हाचा. पुढे आनखी जोमानं पोश्टी करुया. 

खरंतर, मालवनी माणसाच्या मनातलो अडसराच्या पाण्याचो झरो वाहतो केलो तो बाबूजींनीच. आमका संगळ्यांका वाटता. मालवनी बोलीभाषेत मच्छिंद्र कांबळी सारखो नटसम्राट जन्माला आलो या आमचा भाग्य. बाबूजी, आमका तुमचो जनमदिवस सेलिब्रेट करुचो हा. माय मालवनीतच गजाली मारुचे हत. त्यासाठी यावर्षीच रामेश्वराक गाऱ्हाना घालूक व्हया. फक्त तुम्ही ढगातनं बोला, होय महाराजा!

हेही वाचा: 

मराठी भाषेच्या अभिजातपणाची कूळकथा

संयुक्त महाराष्ट्रासाठी आपण गुजरातला किती कोटी दिले?

महाराष्ट्राची निर्मिती भाषेच्या संघर्षातून नाही, तर वर्गसंघर्षातून

शाहिरांनी फक्त गायला नाही तर घडवलायही महाराष्ट्राचा इतिहास