भूतलावरच्या जैवविविधतेपैकी २० टक्केच प्राणी-वनस्पती-सूक्ष्मजीवांविषयी मानवाला माहिती आहे, असं म्हटलं जातं. याबद्दलच्या संशोधनांमधून अनेक नवीन प्रजाती जगासमोर येत असतात. निसर्गामधे नवीन जाती-प्रजाती निर्माण होण्याची प्रक्रिया अव्याहतपणाने सुरु असते. दर पाच-दहा वर्षांनी याबद्दलचा अभ्यास होणं गरजेचं आहे. आज जागतिक जैवविविधता दिनाच्या निमित्ताने, या अभ्यासाचं महत्त्व समजून घ्यायला हवी.
दरवर्षी २२ मे रोजी जागतिक जैवविविधता दिन साजरा केला जातो. या भूतलावर विपुल प्रमाणावर जैविक विविधता आहे. पण विज्ञान-तंत्रज्ञान इतकं प्रगत आणि विकसित झालेलं असतानाही पृथ्वीतलावरील सर्व सजीवांचा, वनस्पतींचा अभ्यास अजूनही अपूर्ण आहे.
पृथ्वीतलावर कोट्यवधी प्रकारच्या सजीवांच्या जाती-प्रजाती अस्तित्त्वात असल्या तरी त्यापैकी मानवाला आणि विज्ञानाला केवळ २० टक्के जैवविविधता परिचित आहे. सर्वसाधारणपणे १३ लाख प्राण्यांच्या जाती-प्रजाती आणि वनस्पती आणि सूक्ष्मजीवांच्या ७ लाख जाती-प्रजाती विज्ञानाला माहीत आहेत. पृथ्वीतलावर आज अस्तित्त्वात असणारी सजीवसृष्टी अथवा जैवविविधता विकसित होण्यासाठी निसर्गाला कोट्यवधी वर्षांचा कालावधी लागलाय.
ही सर्व जैवविविधता उत्क्रांतीच्या प्रक्रियेमधून सुरु झालीय. ही उत्क्रांती सजीवांच्या उत्पत्तीपासून आजअखेर अखंडितपणानं सुरु आहे आणि भविष्यातही ती तशीच सुरु राहणार आहे. उत्क्रांतीच्या या प्रवाहामधे ही जैवविविधता निर्माण होत असताना काही नैसर्गिक कारणांमुळं सजीवांच्या काही जातीप्रजाती नष्ट झाल्या; पण त्याचवेळी नवीन प्रजाती तयार होण्याची प्रक्रियाही सुरुच राहिलीय.
हेही वाचा: एका झाडाची किंमत शोधली कशी?
ढोबळमानानं पाहिल्यास पृथ्वीतलावर उष्णकटिबंधातल्या भूप्रदेशांमधे जैवविविधतेचं प्रमाण तुलनेनं अधिक आहे. शीतकटिबंधातल्या भूप्रदेशांमधे ते तुलनेनं कमी असून ध्रुवीय प्रदेशामधे अत्यल्प प्रमाणात जैवविविधता आहे. त्यामुळे उष्ण कटिबंधातला भूप्रदेश हा जैवविविधतेच्या दृष्टीनं सर्वांत महत्त्वाचा आहे. या भूप्रदेशामधे असणार्या वर्षावनांमधे जगातली सर्वांत महत्त्वाची जैवविविधता आहे. मात्र पृथ्वीवरच्या एकूण जमिनीच्या केवळ ७ टक्के भूभागावर अशी वर्षावने आहेत.
म्हणजेच जगातली निम्म्याहून अधिक जैवविधिता केवळ सात टक्के भागामधे आहे आणि म्हणूनच ती सर्वाधिक महत्त्वाची आहे. मानवाने त्याच्या सोयीनुसार या उष्णकटिबंधामधे देश-प्रदेश तयार केले आहेत. जगाच्या पाठीवरचे १७ देश हे प्रामुख्याने जैवविविधतेनं संपन्नसमृद्ध आहेत. यापैकी १२ देश हे अत्यंत महत्त्वाचे असून त्यामधे भारताचा समावेश आहे.
भारतामधे आजमितीला प्राण्यांच्या सुमारे ९८ हजार प्रजाती असून वनस्पतींच्या ४८ हजार प्रजाती आहेत असं मानलं जातं. जगातल्या एकूण जैवविविधतेच्या ६.७ टक्के जैवविविधता भारतात आहे. जगभरातल्या एकूण वनस्पतीसंपदेच्या ७.१ वनस्पती भारतात आहेत. तर भूतलावरच्या एकूण प्राण्यांच्या प्रजातींपैकी ६.७ प्राणीप्रजाती भारतात आहेत. यावरून भारताची समृद्धता लक्षात येते. भारतामधे जैवविविधतेनं संपन्न असणारे चार प्रमुख प्रदेश आहेत.
ईशान्य हिमालयन प्रदेशात अरुणाचल प्रदेश, मेघालय, सिक्कीम, नागालँड, आसामचा काही भाग समाविष्ट आहे. या प्रदेशातल्या जंगलांमधे भारतातली सर्वांत मोठी जैवविविधता आहे. आजवर झालेल्या अभ्यासावरून असं दिसून आलंय की, या भागामधे ९००० सपुष्प वनस्पतींच्या प्रजाती आहेत. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे यापैकी ३५०० प्रजाती या ‘एण्डेनिक’ म्हणजेच ठराविक भूप्रदेशावरच उगवतात. त्यामुळे हा भूप्रदेश अधिक महत्त्वाचा मानला जातो.
पश्चिम घाट हा जैवविविधतेनं समृद्ध असलेला भारतातला दुसर्या क्रमांकाचा भूप्रदेश आहे. पश्चिम घाटामधे गुजरातचा काहीसा भाग, महाराष्ट्राचा बराचसा भाग, गोवा, कर्नाटक, तमिळनाडू आणि केरळचा काही भाग अंतर्भूत होतो. आजवरच्या संशोधनामधून पश्चिम घाटामधे सुमारे ४५०० सपुष्प वनस्पतीपैकी जवळपास १५०० सपुष्प वनस्पतींच्या प्रजाती एण्डेनिक आहेत.
त्यामुळेच ईशान्य हिमालयन प्रदेशाबरोबरच पश्चिम घाटही जागतिक स्तरावर महत्त्वाचा मानला जातो. पश्चिम हिमालयन प्रदेशात काश्मीर, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशचा समावेश होतो. इथंही मोठ्या प्रमाणावर जैवविविधता आहे. अंदमान निकोबार हा सर्व बेटांचा प्रदेश असून ही बेटेही जैवविविधतेनं संपन्न आहेत.
हेही वाचा: रात्रभर झाडांचे खून होत राहिले, रात्रभर जागणारी मुंबई झोपून राहिली
शास्त्रज्ञांनी केलेल्या अभ्यासानुसार, जगभरात जैवविविधतेच्या दृष्टीनं अतिसंवेदनशील असणार्या भूप्रदेशांची म्हणजेच जागतिक हॉटस्पॉट प्रदेशांची संख्या ३५ आहे. या प्रदेशांमधे अत्यंत दुर्मिळ प्राणी आणि वनस्पतींचं वास्तव्य आहे. या प्रदेशांचं क्षेत्रफळ पृथ्वीवरील एकूण क्षेत्रफळाच्या १.९ टक्के इतकं आहे. याचाच अर्थ भूतलावरचा ९ टक्के भूप्रदेश हा जैवविविधतेच्या दृष्टीनं आत्यंतिक महत्त्वाचा आहे.
वर उल्लेख केलेल्या ३५ प्रदेशांना अतिसंवेदनशील मानण्यामागं तिथल्या दुर्मिळ जाती-प्रजातींचं कारण आहेच; पण त्याचबरोबर मानवी हस्तक्षेपामुळं तेथील जैवविविधता धोक्यात आलीय. तिसरं कारण म्हणजे, या प्रदेशांमधे एण्डेनिक वनस्पती आणि प्राण्यांचं प्रमाण तुलनेनं जास्त आहे. या ३५ प्रदेशांपैकी ईशान्य हिमालयन प्रदेश आणि पश्चिम घाट हे दोन अतिसंवेदनशील प्रदेश भारतामधे आहेत.
इतकी प्रचंड जैवविविधता असूनही भारतात त्याचा मोठ्या प्रमाणावर अभ्यास झालेला नाही. त्यामुळेच वेळोवेळी झालेल्या अभ्यासामधून, पाहण्यांमधून अनेक नवनवीन प्रजातींचा शोध लागत असतो. २०१५मधे झालेल्या संशोधनातून ज्या ४४५ नव्या प्रजातींचा शोध लावण्यात आलाय. यामधे २६२ प्राण्यांच्या प्रजाती असून १८३ वनस्पतींच्या नवप्रजाती आहेत.
यामधे या सरपटणार्या प्राण्यांच्या चार, उभयचर प्राण्यांच्या सहा, रानआल्याच्या तीन आणि अंजिराच्या तीन नवप्रजातींचा समावेश आहे. त्यानंतरही प्राणी आणि वनस्पतींच्या १७६ नव्या प्रजाती आढळून आल्या होत्या. मात्र अजूनही या चारही प्रदेशांमधे मोठ्या प्रमाणावर सर्वेक्षण करणं, अभ्यास करणं गरजेचं आहे.
साधारण ४० वर्षांपूर्वी मी सातारा जिल्ह्यातल्या वनसंपदेवर संशोधन केलं होतं; मात्र आजही या भागामधे संशोधन केल्यास अनेक नवीन प्रजाती आढळतील. याचं कारण सुरवातीला म्हटल्याप्रमाणं, निसर्गामधे नवीन जाती-प्रजाती निर्माण होण्याची प्रक्रिया अव्याहतपणानं सुरु असते. त्यामुळंच दर पाच अथवा दहा वर्षांनी याबद्दलचा अभ्यास होणं गरजेचं आहे.
हेही वाचा: शुद्ध हवेसाठी, हॅशटॅग ‘शुद्ध हवा हक हमारा’ कॅम्पेन
याबद्दल आपण इंग्लंडचं उदाहरण पाहूया. इंग्लंडमधे जैवविविधतेचं प्रमाण अत्यल्प आहे; असं असतानाही जगातलं सर्वांत मोठं बोटॅनिकल गार्डन इंग्लंडमधे आहे. जगामधे टेक्झॉनॉमीवर काम करणार्या रिसर्च इन्स्टिट्युटस् आणि प्रख्यात शास्रज्ञ इंग्लंडमधे आहेत. इंग्लंडच्या या उदाहरणावरून भारतानं बोध घेण्याची गरज आहे.
आपल्याकडं विपुल प्रमाणात जैववैविध्य असूनही सर्वसामान्यांना आजही त्याविषयी माहिती नाही, त्यावर काम करणार्या संस्थांची, तज्ज्ञांची संख्या कमी आहे, ही गोष्ट खेदजनक आहे. ही संख्या कमी असण्याचं मुख्य कारण म्हणजे हे मुलभूत विज्ञान आहे. आजचा काळ हा तंत्रज्ञानाचा असल्यामुळं मुलभूत विज्ञानाकडं वळणार्यांचं प्रमाण कमी होत चाललंय.
वास्तविक, मुलभूत विज्ञानावरचं तंत्रज्ञान अवलंबून असतं; पण आपल्याला त्याचा विसर पडलाय. मुलभूत विज्ञानामधे संशोधन झालं नाही तर तंत्रज्ञान विकसितच होऊ शकत नाही. तंत्रज्ञानाच्या विकासाला सीमा आहेत; पण मुलभूत विज्ञानाला सीमा नाहीत. झूलॉजी, बॉटनी या मुलभूत विज्ञानशाखा आहेत; पण आज विद्यार्थ्यांचा सर्व कल हा तंत्रविज्ञानाकडे आहे. त्यामुळंच आपल्याकडच्या जैवविविधतेच्या अभ्यासाकडं मोठ्या प्रमाणावर दुर्लक्ष होतंय.
एकीकडे अभ्यासाची ही स्थिती असताना दुसरीकडे जैवविविधतेचं माहेरघर असणार्या जंगलांकडंही आपलं कमालीचं दुर्लक्ष होतंय. पर्यावरणाच्या संतुलनासाठी ३३ टक्के क्षेत्र वनाच्छादित असणं आवश्यक आहे, असं मानलं जातं; पण भारतात केवळ २० टक्केच क्षेत्र वनाच्छादित असल्याचं शासकीय आकडेवारी सांगते. विशेष म्हणजे ही आकडेवारीही फसवी आहे.
कारण वनविभागाची जंगलांबद्दलची व्याख्याच चुकीची आहे. आणखी एक गोष्ट म्हणजे, महाराष्ट्रामधे जंगलांची सर्वांत जास्त व्याप्ती विदर्भामधे आहे. त्यामुळंच ब्रिटिश काळापासून वनखात्याची मुख्य कार्यालयं विदर्भात आहेत. असं असलं तरी आणि पश्चिम महाराष्ट्रामधे जंगलांची व्याप्ती कमी असली तरी पश्चिम घाटामुळे आपल्याकडं जैवविविधता ही खूप अधिक प्रमाणात आहे.
हे व्यस्त प्रमाण जगभरात दिसून येतं. मात्र वनाच्छादित प्रदेश अधिक असणं हे जैवविविधतेसाठी आवश्यक आहे. दुर्दैवानं आज भारतात आणि महाराष्ट्रात दाट वनांचं प्रमाण घटत चाललं असून ते १३ ते १४ टक्क्यांपर्यंत खाली गेलंय. त्याहून अधिक गंभीर गोष्ट म्हणजे जैवविविधतेनं समृद्ध असणार्या जंगलांचं प्रमाण १० टक्केच राहिलंय.
यावरून आपल्याला जैवविविधतेचं आणि पर्यावरणाचं महत्त्वच कळलेलं नाही असं दिसतं. भारतामधे दरवर्षी १४लाख हेक्टरवरचं जंगल नष्ट होतंय असं काही अभ्यासांमधून दिसून आलंय. यावरून आपण किती मोठ्या प्रमाणावर जैवविविधतेचा र्हास करतोय याची कल्पना येते.
हेही वाचा:
जंगलातून मेट्रो धावताना जंगल उरेलच कसं?
प्लॅस्टिकमुक्त भारताचं स्वप्न कसं शक्य होणार?
आरेत झाडं तोडण्याचं समर्थन आणि विरोध का होतोय?
आरेतल्या वृक्षतोडीचा झाडं लावून निषेध करणाऱ्या चिंचणीची भन्नाट गोष्ट!