९०० वर्षांच्या दुष्काळाने संपवली सिंधू संस्कृती?

२४ डिसेंबर २०१९

वाचन वेळ : ५ मिनिटं


सिंधू संस्कृती, हडप्पा, मोहेंजोदारो ही नावं ऐकलं की सगळ्या देशाचंच कुतूहल जागं होतं. आता फक्त अवशेष उरलेल्या ४००० वर्षांपूर्वींच्या संस्कृतीची ही शहरं कशामुळे नामशेष झाली असतील, असे प्रश्न आपल्या सगळ्यांच्या मनात असतात. त्याचं एक उत्तर आयआयटी खरगपूरच्या संशोधकांनी दिलंय. सलग ९०० वर्षं पडलेल्या दुष्काळामुळे या संस्कृतीचा ऱ्हास झाल्याचा दावा त्यांनी केलाय.

हडप्पा आणि मोहेंजोदारो या सिंधू नदीच्या खोऱ्यातल्या संस्कृतींबाबत बरंच संशोधन झालंय. हे सगळं संशोधन करण्यात पदेशातल्या संस्थांचा पुढाकार असतो. तिथली लोकं काय खात होती, तिथली नागरी व्यवस्था कशी होती, नगरांची रचना काय होती वगैरे सगळी माहिती जमिनीखाली आणि जमिनीच्या वरुन मिळालेल्या अवशेषांवरुन शोधून काढण्यात आलीय. पण नेमक्या कोणत्या कारणांमुळे ही संस्कृती लोप पावली हे काही परदेशातल्या संशोधन संस्थांना शोधता आलं नाही.

आनंदाची गोष्ट अशी की आयआयटी खरगपूर या भारतीय संशोधन संस्थेला हे शोधून काढण्यात यश आलंय. हिमालय आणि युरोपातून घेतलेल्या पावसाच्या सॅम्पलवरुन ४००० वर्षांपूर्वी ९०० वर्षांचा दुष्काळ पडल्याचं सिद्ध झालंय. त्यामुळे सिंधू नदीच्या खोऱ्यातली संस्कृती लोप पावली, असं संशोधन आयआयटीमधल्या जिऑलॉजी आणि जिओफिजिक्स विभागातल्या संशोधकांनी शोधून काढलंय.

सिंधू संस्कृती आहे तरी काय? 

सिंधू ही आशिया खंडातली सगळ्यात मोठी नदी. तिबेटमधल्या मानस सरोवरापासून १०० किलोमीटर अंतरावर ही नदी उगम पावते ते हिंदुकुश पर्वतावरुन लडाखच्या दिशेने वाहते. तिथून पाकिस्तानातल्या कराचीमधून अरबी समुद्राला जाऊन मिळते. या नदीच्या खोऱ्यात उपनद्यांच्या काठावर इसवीसनपूर्व ३५०० ते इसवीसनपूर्व १८०० या काळात प्रगत मानवी वस्ती होती. तिलाच सिंधू संस्कृती असं म्हटलं जातं. 

१९२१मधे रेल्वेमार्गाचं काम सुरू असताना जुन्या शहरांचे अवशेष सापडले. त्याचं संशोधन केल्यावर हडप्पा आणि मोहेंजोदारो या दोन शहरांचा शोध लागला. या गावात अत्यंत विकसित व्यवस्था असल्याचं समोर आलं. नगरांची रचना अगदी सुनियोजित होती. सांडपाण्याची व्यवस्था केली होती. शेतीची प्रगत अवजारं वापरली जात होती. पुरापासून वाचण्यासाठी उंचीवर घरं बांधली गेली होती. अशा अनेक गोष्टी या संशोधनातून समोर आल्या आणि सगळं जग आश्चर्यचकित झालं. 

तिथे इसवीसनपूर्व १८००व्या शतकानंतरचं काहीही सापडलं नाही, त्यामुळे ही संस्कृती तेव्हा लोप पावली असावी, अशा अंदाज बांधण्यात आला. मात्र ही संस्कृती कशामुळे लोप पावली याची नेमकी कारणं उपलब्ध नव्हती. काही जणांच्या मते, नदीला खूप पूर आल्यामुळे किंवा त्यासारखी नैसर्गिक आपत्ती आल्यामुळे ही शहरं नष्ट झाली. त्यामुळे या शहरांमधले लोक स्थलांतरित झाले. काही अभ्यासकांच्या मते, युरोपातून आलेल्या आर्य आक्रमकांच्या अत्याचारांमुळे ही शहरं नष्ट झाली. 

साधारण मार्च २०१४मधे केम्ब्रिज युनिवर्सिटीने ही संस्कृती नष्ट करण्यामागचं नवं कारण सांगितलं. २०० वर्षांचा मोठा दुष्काळ पडल्यामुळे नद्या सुकल्या. आणि त्यामुळे लोकांनी गावं सोडली, असा निष्कर्ष केम्ब्रिज विद्यापीठानं काढला होता. पण आता २०० नाही तर ९०० वर्षं दुष्काळ पडला होता असं आयआयटीच्या संशोधनातून समोर आलंय.

हेही वाचा : युगानुयुगे तूच : महामानवाच्या जीवनाचा ठाव घेणारी दीर्घकविता

९०० वर्ष पाऊस पडला नाही

आयआयटी खरगपूरमधले भूशास्त्र विभागाचे प्राध्यापक अनिल कुमार गुप्ता यांनी `कोलाज`शी बोलताना याची माहिती दिली. ते म्हणाले, `सुमारे ५००० वर्षांपूर्वी भारतातल्या पावसाचं प्रमाण कसं होतं, याचा शोध घेण्यासाठी हिमालयातल्या काही भागांमधून पावसाची सॅम्पल गोळा करण्यात आली. मेघालयामधून हे सॅम्पल घेण्यास सुरवात झाली. प्रत्येक अर्धा किंवा पाऊण किलोमीटर अंतरावरची सॅम्पल घेण्यात आली. ही सॅम्पल गोळा करायला विभागातल्या संशोधकांना जवळपास दोन ते तीन वर्ष लागली.`

या संशोधनाची प्रक्रिया सांगताना गुप्ता म्हणाले, `सॅम्पल गोळा केल्यानंतर या सॅम्पलमधून ऑक्सिजनचे अणू बाहेर काढले. त्याचं परीक्षण केलं गेलं. ऑक्सिजनच्या अणूंना आयसोटोप्स असं म्हणतात. या आयसोटोप्सच्या अभ्यासावरुन त्या त्या क्षेत्रात किती पाऊस पडला हे शोधून काढता येतं. हा पाऊस म्हणजे उन्हाळ्यानंतर पडणारा मान्सून असतो. या सॅम्पलवरुन भारतीय मॉन्सून कसा बदलत गेला, हे कळत गेलं.` 

गुप्ता पुढे म्हणाले, `मागील ५००० वर्षांपैकी जवळपास ९०० वर्षं पाऊस पडलेलाच नाही, असं या संशोधनातून समोर आलं. सिंधू संस्कृती ही प्रामुख्यानं शेतीवर अवलंबून होती. सिंधू आणि तिच्या उपनद्यांना १२ महिने पाणी असे. त्यामुळेच या संस्कृतीची भरभराट झाली होती. पण ९०० वर्ष आलेल्या दुष्काळामुळे नद्यांचं पाणी पूर्णपणे आटलं. त्यामुळे लोक गाव सोडून गेले, असा निष्कर्ष या संशोधनातून काढला गेलाय.`

आईस एजमुळं पाऊस थांबला

केम्ब्रिज विद्यापीठानं काढलेल्या संशोधनातून हा दुष्काळ नेमका पडला कशामुळे हे समोर आलं नव्हतं. पण आयआयटीच्या संशोधनातून हेही समोर आलंय. त्याविषयी गुप्ता म्हणाले, `सिंधू संस्कृतीची भरभराट झाली तो काळ भूशास्त्राच्या भाषेत मेडिएवल वॉर्म पिरियड म्हणून ओळखला जातो. विसाव्या शतकाच्या मध्यात जसं वातावरण होतं, तसं वातावरण या काळात होतं, असं म्हटलं जातं. या काळात वातावरणात उबदारपणा असल्यामुळे भरपूर पाऊस पडला. पिकं चांगली आली. सिंधू संस्कृतीसह जगभर याच काळात अनेक नव्या संस्कृती उभ्या राहिल्या.

पण या काळानंतर निर्माण झालेल्या वातावरणाला आईस एज असं म्हणतात. सोप्या भाषेत सांगायचं तर या आईस एजमधे संपूर्ण जग विषेशतः युरोप थंडगार पडला. तिथली थंडी वाढली. वारंवार बर्फ पडू लागला आणि वॉर्म पिरियडमधे भरभराटीला आलेल्या सगळ्याच युरोपियन शहरांना जगणं मुश्किल झालं. गुप्ता सांगतात, `याच काळात लोकांनी युरोप सोडून उष्णकटिबंधातल्या प्रदेशात आसरा शोधला. युरोपियन लोकं आशिया आणि दक्षिण आशियाच्या काही भागात स्थलांतरित झाले.`

या आईस एजमुळे भारतातल्याही हिमालयीन भागात सतत बर्फवृष्टी चालू राहिली. बर्फ चालू राहिल्यामूळे आणि समुद्राच्या पाण्याची वाफ होत नसल्यामुळे त्याचा परिणाम पावसावर झाला. सिंधू नदीच्या खोऱ्यातला पाऊस मंदावला. ९०० वर्षं पाऊस पडला नाही. पडला तेव्हाही अत्यंत कमी प्रमाणात पडला. त्यामुळे नद्या कोरड्या झाल्या. परिणामी सिंधू नदीच्या खोऱ्यातलं कृषी उत्पादन घटलं.

हेही वाचा : तरुण संपादकांनी संपादित केलेले दिवाळी अंक

भूगोलात इतिहास बदलण्याची ताकद

`शेती नाही, खायला अन्न नाही, अशा अवस्थेत सिंधू खोऱ्यातल्या माणसांनी आपलं गाव सोडून पूर्वेकडे स्थलांतर करायला सुरवात केली असावी. त्यांनी गंगा यमुना नदीच्या खोऱ्यात नवी गावं वसवली. सिंधू संस्कृतीतलेच हे लोक पुढे आजच्या उत्तर प्रदेश, बिहार, बंगाल, मध्य प्रदेश, गुजरात इथं येऊन राहू लागले`, अशी माहिती गुप्ता यांनी दिली.

गुप्ता म्हणाले, ‘परकीय आक्रमणामुळे आपले राजे, राज्य संपुष्टात आली असं सांगितलं जातं. पण हा भूगोल तपासल्यावर राजकीय आणि सामाजिक कारणांबरोबरच भौगोलिक कारणांमुळेही सिंधू संस्कृतीचा ऱ्हास झाल्याची ही शक्यता पुढे येते. वॉर्म पिरियडमधे भरपूर पाऊस पडत होता. तेव्हा पुरामूळे बंगालमधली अनेक शहरं वाहून गेल्याची शक्यता आहे. तसंच आईस एजमधे दुष्काळामूळे गावं ओसाड पडली आणि लोकांनी स्थलांतर केलं. त्यामुळे प्रदेश उद्ध्वस्त होण्यामागे आणखीही कारणं असू शकतात.` 

भूगोलाचा अभ्यास करुन जगाचा नवा इतिहास शोधता येतो याची जाणीव हे संशोधन करुन देतं.

हेही वाचा : 

पानिपत : प्रत्यक्षात लढलं कोण? सिनेमात कौतुक कुणाचं?

अंधारात आनंद आहे, असं सांगणाऱ्या अक्किथम यांना यंदाचा ज्ञानपीठ

एक शून्य प्रतिक्रियाः जगणं आणि लिहिण्यातल्या शून्य अंतराची कविता

‘बारकुल्या बारकुल्या ष्टोऱ्या’ने मराठी कादंबरीला साचलेपणातून बाहेर काढलं