राष्ट्रकुलच्या वजनदार यशानंतर भारतीय वेटलिफ्टर्सचा ऑलिम्पिकवर डोळा

१२ ऑगस्ट २०२२

वाचन वेळ : ६ मिनिटं


भारतीय खेळाडूंनी वेटलिफ्टिंग या क्रीडा प्रकारात गेल्या दहा-बारा वर्षांमधे घेतलेली झेप अतिशय कौतुकास्पद आहे. वेगवेगळ्या स्पर्धांमधे भारतीय वेटलिफ्टर्सनी सातत्यानं देशाची मान उंचावलीय. ऑलिम्पिकला अजून दोन वर्षे बाकीयत. या कालावधीत अधिकाधिक स्पर्धात्मक सराव करून भारतीय खेळाडू किमान चार-पाच ऑलिम्पिक मेडल मिळवतील, असा विश्वास राष्ट्रकुलमधल्या कामगिरीनं वाटतो.

गोल्ड मेडलच्या तुलनेत अव्वल यश मिळवण्यासाठी घेतलेले अपार कष्ट, त्यासाठी गाळलेला घाम, शेवटपर्यंत दाखवलेली जिद्द आणि हिंमत याचं मोल खूपच अनमोल असतं. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतल्या वेटलिफ्टिंगमधे भारतीय खेळाडूंनी केलेली दशकपूर्ती हे त्यांनी घेतलेल्या मेहनतीचं तसंच त्यांना मदत करणार्‍या अनेक घटकांनी केलेल्या त्यागाचं प्रतीक आहे.

कोणत्याही क्रीडा प्रकारात झटपट यश कधीच मिळत नसतं आणि जर ते मिळालं, तर ते फारसं टिकतही नाही. भारतीय खेळाडूंनी वेटलिफ्टिंगमधे गेल्या दहा-बारा वर्षांत घेतलेली झेप अतिशय कौतुकास्पद आहे. ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा, युवा ऑलिम्पिक्स, जागतिक अजिंक्यपद स्पर्धा, आशियाई क्रीडा स्पर्धा आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमधे भारतीय वेटलिफ्टर्सनी सातत्यानं देशाची मान उंचावलीय.

भारतीय वेटलिफ्टिंगचा संघर्ष

बर्मिंगहॅममधे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताच्या मीराबाई चानू, जेरेमी लालरिनुंगा, अचिंता शेऊली यांनी गोल्ड; संकेत सरगर, विकास ठाकूर, बिंदियाराणी देवी यांनी सिल्वर; तर गुरुराज पुजारी, लवप्रीत सिंग, गुरुदीप सिंग, हरजिंदर कौर यांनी ब्राँझ मेडलची कमाई केली. या खेळातही करिअर करता येतं, हा विश्वास या खेळाडूंनी सार्थ ठरवलाय.

वेटलिफ्टिंगमधला भारताचा ऑलिम्पिक मेडलचा दुष्काळ करनाम मल्लेश्वरीनं २०००मधे झालेल्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत संपुष्टात आणला. एवढंच नाही, तर ऑलिम्पिकसारख्या प्रतिष्ठेच्या क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला मेडलच्या व्यासपीठावर उभे राहू शकतात, हेही तिनं सिद्ध केलं.

मात्र त्यानंतर पुन्हा वेटलिफ्टिंगमधे ऑलिम्पिक मेडल मिळवण्यासाठी भारताला २१ वर्षांची वाट पाहावी लागली. हा कालावधी भारतीय वेटलिफ्टिंग संघटकांसाठी खूप संघर्षमय आणि आव्हानात्मक ठरलाय. उत्तेजकाच्या घटनांमुळे अनेक वेळेला टीकेचं लक्ष्य बनलेल्या वेटलिफ्टिंग संघटकांनी प्रतिकूल परिस्थितीत खेळाडूंची उत्तम रितीनं बांधणी केलीय, असं म्हटलं तर ते फारसं वावगं ठरणार नाही.

त्यामुळेच की काय, गेल्या सात-आठ वर्षांमधे जागतिक स्तरावरच्या महत्त्वपूर्ण स्पर्धांमधे वेटलिफ्टिंग हा भारतासाठी मेडल मिळवण्याचा हुकमी क्रीडाप्रकार झालाय. त्याचं सर्व श्रेय या खेळात काबाडकष्ट घेणारे खेळाडू, त्यांच्यासाठी अनेक गोष्टींचा त्याग करणारे त्यांचे पालक, खेळाडूंना पाल्यासमान घडवणारे त्यांचे प्रशिक्षक, संघटक आणि अर्थातच शासन यांना द्यावं लागेल.

उत्तेजक सेवनाचं ग्रहण

वेटलिफ्टिंग, बॉक्सिंग, कुस्ती अशा ताकदवान खेळांमधे सहभागी होणारे खेळाडू शारीरिक तंदुरुस्ती वाढावी म्हणून काही वेळेला उत्तेजक द्रव्यसेवनाचा झटपट आणि चुकीचा मार्ग स्वीकारतात. मुळातच उत्तेजक सेवनाबद्दल खेळाडूंबरोबरच त्यांचे प्रशिक्षकही अनभिज्ञ असतात. साधारणपणे दोन हजारपेक्षा जास्त औषधे आणि अन्नघटक जागतिक उत्तेजक प्रतिबंधक कायद्यांतर्गत अवैध मानले जातात.

भारतीय वेटलिफ्टिंग क्षेत्र काही वर्षांपूर्वी उत्तेजकांच्या घटनांमुळे ग्रासलं गेलं होतं. २०१०मधे नवी दिल्लीत राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग महासंघानं भारतीय वेटलिफ्टिंग महासंघावर उत्तेजकांच्या अनेक घटनांमुळे कारवाई करण्याचं ठरवलं होतं. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत यजमान भारताचं खेळाडूंवर स्पर्धेबाहेर राहण्याची नामुष्की ओढवणार होती.

ही नामुष्की टाळण्यासाठी भारतानं आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग महासंघाकडे मोठ्या प्रमाणात आर्थिक दंड भरला होता. या घटनेनंतर भारतीय वेटलिफ्टिंग संघटक खडबडून जागे झालं आणि त्यांनी आपला खेळ आणि खेळाडू उत्तेजकविरहित कसे राहतील, याबद्दल अतिशय नियोजन पद्धतीनं प्रयत्न केलेत.

त्यामुळेच राष्ट्रकुल क्रीडा आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमधे भारतीय खेळाडू वेटलिफ्टिंगमधे मेडलची लयलूट करू लागलेत. या खेळाडूंच्या यशामुळे वेटलिफ्टिंग हा खेळ लोकाभिमुख झालाय आणि प्रसार माध्यमेही या खेळाकडे सकारात्मक द़ृष्टीनं पाहू लागलीत. 

हेही वाचा: महात्मा गांधींचं क्रिकेटशी नातं सांगणारे हे किस्से आपल्याला माहीत आहेत का?

मीराबाईने मिळवलं गोल्ड

बर्मिंगहॅममधल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत नेमबाजी या हुकमी क्रीडा प्रकाराचा समावेश नव्हता, त्यामुळेच अधिकाधिक मेडल मिळवण्याची जबाबदारी भारताच्या वेटलिफ्टर्सवर आली होती. विजय शर्मा यांच्यासारख्या अभ्यासू आणि निष्णात प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली भारतीय खेळाडूंनी ही जबाबदारी अतिशय समर्थपणे पेलली. अर्थातच, या खेळाडूंना सहायक प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफमधल्या इतर सहकार्‍यांचीही बहुमोल साथ लाभलीय.

टोकियो ऑलिम्पिकमधे रुपेरी कामगिरी करणार्‍या मीराबाई चानू हिच्याकडून राष्ट्रकुल स्पर्धेत गोल्ड मेडलचीच अपेक्षा होती. अनेक विक्रम करत तिनं अपेक्षापूर्ती केली. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत तिनं वेटलिफ्टिंगमधे करिअर घडवलंय. तिच्या या संघर्षामधे तिच्या आईवडलांचा आणि गावाकडच्या अनेक लोकांचा महत्त्वाचा वाटा आहे.

प्रतिस्पर्धी खेळाडू कोण आहेत, यापेक्षा जेव्हा आपण आपल्या स्वतःशी स्पर्धा करतो तेव्हा खर्‍या अर्थानं आपली कामगिरी चांगली होते, असं विधान तिनं राष्ट्रकुल स्पर्धेपूर्वी केलं होतं. हे विधान सत्य ठरवत तिनं अतिशय आत्मविश्वासानं या स्पर्धेत गोल्ड मेडल जिंकलं!

अचिंताची सोनेरी संघर्षगाथा

अचिंता शेऊली यालाही खूप संघर्ष करावा लागलाय. तो शाळेत असतानाच त्याच्या वडलांचं आकस्मिक निधन झालं. त्याचे वडील सायकल रिक्षा चालवायचे. या संकटातून अचिंताचं कुटुंब सावरत नाही, तोच त्यांच्याकडे उदरनिर्वाहासाठी पूरक साधन असलेल्या छोट्या कुक्कुटपालनामधल्या सर्व कोंबड्या कोल्ह्यांनी फस्त केल्या.

त्यामुळे या कुटुंबापुढे उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला. अचिंताचा मोठा भाऊ अलोक यानं कुटुंबाची जबाबदारी स्वतःकडे घेत, इतरांच्या शेतात मोलमजुरीचं काम सुरू केलं. अचिंताची आई शिवणकाम करते. अचिंतानेही शालेय शिक्षण आणि वेटलिफ्टिंगचा सराव करताना फावल्या वेळेत शिवणकाम करत घराचा आर्थिक भार उचललाय.

आर्मी स्पोर्टस् इन्स्टिट्यूटनं त्याच्याकडचं वेटलिफ्टिंगचं नैपुण्य पाहून, त्याला आपल्या अकादमीत प्रशिक्षण घेण्याची संधी उपलब्ध करून दिली आणि तेव्हापासून त्याची खेळासाठी आवश्यक असणारी आर्थिक चिंता मिटलीय. त्यामुळेच त्याला वेटलिफ्टिंगमधे उंच भरारी घेता आलीय.

हेही वाचा: सौरव गांगुली बीसीसीआयमधे दादागिरी करू शकेल काय?

दुखापतींवर केली मात

सांगलीत वडलांच्या पान आणि खाद्यपदार्थांच्या स्टॉलवर काम करणारा संकेत सरगर यानं वेटलिफ्टिंगसाठी केलेला संघर्ष कौतुकास्पदच आहे. वडलांचं मोठा खेळाडू होण्याचं अपुरे राहिलेलं स्वप्न त्यानं साकार केलंय. हे स्वप्न साकार करताना त्याचे वडील महादेव यांनी अनेक गोष्टींचा त्याग केलाय. मुलाची शारीरिक तंदुरुस्ती आणि शक्ती वाढवण्यासाठी आवश्यक असणार्‍या पौष्टिक पावडरी त्यांनी वेळप्रसंगी कर्ज काढून विकत घेतल्यात.

फावल्या वेळेत आपल्या वडिलांच्या स्टॉलवर बसण्यामधे संकेत याला कधीही कमीपणा वाटलेला नाही. उलट आपण आपल्या कुटुंबाचा आर्थिक भार उचलत आहोत, याचंच समाधान त्याला वाटत आलंय. वेटलिफ्टिंगमधे स्पर्धा म्हणजे काय असतं, हे सुरुवातीच्या करिअरमधे त्याला काही माहितीही नव्हतं. विभागीय स्पर्धेत पदक मिळवल्यानंतर त्याला स्पर्धेतलं तंत्र अवगत झालं आणि तेव्हापासून त्यानं यशाची मालिका सतत उंचावत ठेवलीय.

दुर्दैवानं दुखापतीमुळे त्याला बर्मिंगहॅम राष्ट्रकुल स्पर्धेत गोल्ड मेडल मिळवता आलं नाही; पण दुखापत आणि वेदना होत असतानाही त्यानं सिल्वर मेडल मिळवलं. त्याची ही कामगिरी अतिशय संस्मरणीय आहे. भविष्यातला क्रीडा क्षेत्राचा भावी ‘पोस्टर बॉय’ अशी उपाधी मिळालेला जेरेमी यालाही बर्मिंगहॅम राष्ट्रकुल स्पर्धेत स्नायूंच्या वेदना, कोपर्‍याला दुखापत, पायात गोळे असा त्रास होत होता.

पण त्याकडे दुर्लक्ष करीत या १९ वर्षीय खेळाडूनं आत्मविश्वासाच्या बळावर सर्वोच्च कामगिरी नोंदवत सोनेरी मुकुट मिळवला. पदक वितरण समारंभाच्या वेळी स्वतःचं मेडल घेण्यापूर्वी त्यानं सिल्वर आणि ब्राँझ मेडल विजेत्या खेळाडूंशी हस्तांदोलन केलं आणि प्रेक्षकांचीही मनं जिंकली.

आता तयारी ऑलिम्पिकची

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा ही काही क्रीडातज्ञांच्या दृष्टीने दुय्यम दर्जाची स्पर्धा असते. मात्र या स्पर्धेत कॅनडा, जमेका, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड अशा क्रीडा क्षेत्रातल्या अव्वल दर्जाच्या देशांचा समावेश असल्यामुळे या स्पर्धेतही जागतिक स्तरावरचे अनेक विक्रम नोंदवले जातात, हे लक्षात घेतलं तर राष्ट्रकुल स्पर्धेलाही अनन्यसाधारण महत्त्व आहे.

विशेषतः भारतीय खेळाडूंच्या दृष्टीने, भविष्यकाळातल्या आशियाई क्रीडा आणि ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांच्या दृष्टीने पायाभरणीच मानली जात असते. राष्ट्रकुल स्पर्धेतल्या कामगिरीच्या आधारे आशियाई आणि ऑलिम्पिक स्पर्धांसाठी स्वतःच्या कामगिरीचं आत्मपरीक्षण करता येतं आणि त्याद्वारे पुढच्या सरावाचं नियोजन करता येतं.

वेटलिफ्टिंगमधे भारतीय खेळाडूंना सुगीचं दिवस आलेत आणि आगामी ऑलिम्पिकमधे किमान चार-पाच मेडल मिळण्याच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. ऑलिम्पिकसाठी दोन वर्षे बाकीयत आणि या कालावधीमधे अधिकाधिक स्पर्धात्मक सराव करत खेळाडू या अपेक्षांची पूर्ती करतील, अशी आशा आहे.

हेही वाचा: 

कधीकाळी बालिश वाटणाऱ्या विराटची प्रगल्भ तिशी

अश्विनची मुरलीधरनशी बरोबरी, आता कुंबळेंचा रेकॉर्ड मोडणार?

अथर्व अंकोलेकरः शेवटच्या ओवरमधेही विकेट काढणारा जिद्दी बॉलर

फारुख इंजिनिअर बीसीसीआयच्या कारभारावर बोलले, त्यात चूक काय?