पोरींनी जिंकलेल्या क्रिकेट वर्ल्डकपचं कौतुक कोण करणार?

०५ फेब्रुवारी २०२३

वाचन वेळ : ६ मिनिटं


नुकत्याच मिळालेल्या वर्ल्डकप विजयानं भारतीय महिला क्रिकेटमधील गणितं बदलतील. या १९ वर्षाखालच्या मुलींच्या टीममधल्या खेळाडूंकडे नजर टाकली तर लक्षात येणारी गोष्ट म्हणजे यातल्या बहुतांशी खेळाडू छोट्या गावातून आलेल्या आहेत. ज्यांच्या घरात क्रिकेटचा वारसा तर सोडाच क्रिकेटच्या संस्कारांचाही स्पर्श झालेला नाही.

दक्षिण आफ्रिकेत २००७ला पुरुषांच्या पहिल्या ट्वेन्टी ट्वेन्टी वर्ल्डकपचं विजेतेपद भारतानं नवोदित कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात जिंकलं. याच इतिहासाची पुनरावृत्ती दक्षिण आफ्रिकेच्याच भूमीवर शफाली वर्माच्या नेतृत्वात भारताच्या १९ वर्षाखालच्या मुलींच्या टीमनं गेल्या रविवारी मुलींचा पहिलावहिला वर्ल्डकप जिंकून केली.

ट्वेन्टी ट्वेन्टी क्रिकेट २००७ला रोपटं होतं पण आज १६ वर्षात या क्रिकेटच्या प्रकाराचं अनेक पारंब्या असलेल्या वटवृक्षात रूपांतर झालंय. पुरुष, महिला, देशोदेशीच्या अनेक लीगमधे यावर्षी भर पडली ती १९ वर्षाखालच्या मुलींच्या वर्ल्डकपची. या पहिल्याच आवृत्तीचं विश्वविजेतेपद पटकावताना भारतीय मुलींनी एक ऑस्ट्रेलियाविरुद्धचा पराभव सोडला तर बहारदार खेळ करत विश्वविजेतेपदावर आपलं नाव कोरलं.

हेही वाचा: महात्मा गांधींचं क्रिकेटशी नातं सांगणारे हे किस्से आपल्याला माहीत आहेत का?

अतिशय महत्त्वाचा विजय

भारताच्या या विजयाला अनेक अर्थानं महत्व आहे. कर्णधार शेफाली वर्मा ही आता भारतीय महिला टीमचीही एक प्रमुख खेळाडू असल्यानं तिच्या आंतरराष्ट्रीय अनुभवाचा फायदा भारताला झालाच पण ती जी टीम घेऊन या स्पर्धेत खेळली ते बघता भारतातल्या क्रिकेट प्रसाराची व्याप्ती लक्षात येईल. देशात क्रिकेटची मक्तेदारी एकेकाळी फक्त मुंबई, दिल्लीसारख्या मोठ्या शहरांपुरती मर्यादित होती.

बाकीच्या छोट्या शहरात काय गावातल्या गल्लीगल्लीत क्रिकेट तेव्हाही खेळलं जायचं पण त्याची नोंद घ्यायची तसदी कुणी घेतली नव्हती. साहजिकच अशी ठिकाणं उत्तम क्रिकेट सुविधा, सामुग्री, प्रशिक्षण केंद्रे यापासून वंचित होती. देशासाठी क्रिकेट खेळायचं स्वप्न बघायचं असेल तर या मोठ्या शहरांचा रस्ता पकडण्याशिवाय पर्याय नव्हता. गेल्या दहा बारा वर्षात हे चित्र पालटलं.

टीम निवडीची प्रक्रिया, निकष बदलले आणि रांची सारख्या ठिकाणाहून आलेला महेंद्रसिंग धोनी भारताचा एक उत्तम कर्णधार बनू शकला आणि काश्मीर ते कन्याकुमारी तसंच गुजरात ते आसाम पर्यंत सर्व भागातून उत्तमोत्तम खेळाडू भारतीय टीममधे दिसायला लागले. पुरुषांच्या क्रिकेटच्या बद्दल हे चित्र सुधारलं तरी महिला क्रिकेट हे गेल्या सात-आठ वर्षांपूर्वीपर्यंत मर्यादित होतं.

मिताली राज, अंजुम चोप्रा युगापासून हे चित्रही पालटायला लागलं आणि भारतीय महिला टीमही सशक्त बनली. या १९ वर्षाखालच्या मुलींच्या टीममधल्या खेळाडूंकडे नजर टाकली तर प्रामुख्यानं लक्षात येणारी गोष्ट आहे ती म्हणजे यातल्या बहुतांशी खेळाडू या छोट्या गावातून आलेल्या आहेत आणि ज्यांच्या घरात क्रिकेटचा वारसा तर सोडाच क्रिकेटच्या संस्कारांचाही स्पर्श नव्हता.

सिनेमात शोभावा असा संघर्ष

शफाली वर्मा, रिचा घोषसारख्या या टीममधल्या खेळाडू भारतीय महिला टीमच्या भाग आहेत तेव्हा त्यांचा अनुभव, मोठ्या सामन्यात परदेशी वातावरणात खेळायचा अनुभव नक्कीच फायद्याचा ठरला पण बाकीची टीम बघता यातल्या बहुतांशी खेळाडूंसाठी वर्ल्डकप खेळणं ही फार मोठी गोष्ट होती. यातल्या प्रत्येक खेळाडूची कहाणी एका सिनेमाचा विषय होऊ शकेल.

फिरकीपटू सोनम यादवचे वडील फिरोझाबादच्या एका काच कारखान्यात कामगार आहेत तर फलक नाजचे वडील उत्तर प्रदेशात एका छोट्या शाळेत शिक्षक आहेत. घरची आर्थिक परिस्थिती बेताची, क्रिकेट खेळायची संधी मर्यादित अशा अवस्थेतून या मुलींचा प्रवास चालू झाला.

उपकर्णधार सौम्या तिवारीनं तर घरच्या कपडे धुण्याच्या धुपाटण्यानं क्रिकेट खेळायला सुरुवात केली तर सलामीवीर त्रिशा रेड्डीच्या वडिलांना आपल्या मुलीच्या भवितव्यासाठी आपली चार एकर जमीन विकावी लागली.

हेही वाचा: महान क्रिकेटपटूंच्या निवृत्तीचा चीड आणणारा भारतीय इतिहास

सावित्रीची लेक अर्चनादेवी

या सर्व खेळाडूंमधे अर्चना देवीचा प्रवास नुसता थक्क करून सोडणारा नाही तर अनेकांसाठी प्रेरणादायी ठरतो. कानपूरपासून १०० किलोमीटर दूर असलेल्या उन्नावमधलं रतईपुरवा हे तिचं गाव गुगलवर नकाशात शोधायला गेलं तरी दोनदा झूम केल्याशिवाय दिसत नाही. लहानपणीच वडलांचं छत्र हरवलं तरी तिच्या आईनं सावित्री देवींनी स्वतः शेतकाम करून मुलीचं शिक्षण पूर्ण करण्याचा निग्रह केला.

तिला साडेतीनशे किलोमीटर दूरच्या मुराबादच्या कस्तुरबा गांधी विद्यालयात दाखल केलं. तिथं अभ्यासाबरोबर खेळात तिचं प्राविण्य दिसून यायला लागलं. एकदा धावण्याच्या शर्यतीत दुसरा क्रमांक आल्यावर तिच्या शिक्षिका पूनम गुप्ता यांनी तिला खेळात करियर घडवायचं मार्गदर्शन केलं. तिच्यातले गुण ओळखून गुप्तांनी तिला कानपूरला जायचा सल्ला दिला जेणेकरून तिच्या गुणांना योग्य पैलू पडतील.

अर्चनाची आई सुरवातीला तयार नव्हती कारण मोठ्या शहरात पाठवायचं म्हणजे पैशाचा प्रश्न होता. पूनम गुप्ता यांनी आईला समजावलं आणि तिच्या संपूर्ण खर्चाची जबाबदारी उचलली तेव्हा अर्चना कानपूरला पोचली. या सर्व प्रवासात सावित्री देवींना गावातून काय मिळालं असेल तर फक्त अवहेलना.

फायनलमधली चमकदार कामगिरी

प्रवाहाच्या उलटं जात स्वतः राबून मुलीला शिक्षणासाठी गावाबाहेर पाठवणं हे गावकर्‍यांच्या दृष्टीनं क्रांतिकारी न ठरता सावित्री देवींना जवळपास वाळीत टाकण्याचं ठरलं. तिकडे कानपूरला अर्चनादेवीनं रोवर्स क्रिकेट क्लबमधे आपलं नाव नोंदवलं. याचे प्रशिक्षक कपिल पांडे आहेत, जे कुलदीप यादवचेही प्रशिक्षक होते. सुरवातीला अर्चना मध्यमगती बॉलर होती पण कपिल पांडेंनी तिला फिरकी टाकायचा सल्ला दिला.

कुलदीप यादवबद्दलही त्यांनी असाच बदल घडवून आणला होता आणि कुलदीपप्रमाणेच अर्चनालाही त्यांनी यशस्वी फिरकीपटू बनवलं. या बदलामुळे अर्चनासाठी अनेक दालनं उघडली गेली. अर्चनानं २०१८मधे उत्तरप्रदेशच्या अंडर-१६ टीममधे पदार्पण केलं. पदार्पणाच्या आसामविरुद्धच्या सामन्यातच ३ बळी मिळवले. ९ सामन्यात १५ बळी घेत तिनं आपली छाप पाडली.

१९ वर्षाखालच्या मुलींच्या भारताच्या अ टीममधे, चॅलेंजर ट्रॉफी टीममधून खेळताना चमक दाखवत तिनं भारताच्या या वर्ल्डकप टीममधे प्रवेश मिळवला. कपिल पांडेंच्या या जलदगती बॉलरमधून फिरकीपटू बनवलेल्या अर्चनादेवीनं फायनलमधे इंग्लडच्या कर्णधार स्क्रिवेन्स आणि प्रमुख बॅट्समन हॉलंड यांना बाद करून इंग्लंडच्या डावाला खिंडार पाडलं आणि मॅक्डोनाल्डचा अफलातून झेल घेत फायनल जिंकण्यात मोठा वाटा उचलला.

हेही वाचा: शिवाजी पार्कचा श्रेयस अय्यर तर विराटच्या ‘नक्शे कदम पर’ चाललाय!

आधी विरोध, नंतर जल्लोष

याच अर्चनादेवीचा पराक्रम तिथं दक्षिण आफ्रिकेत घडत असताना तिचं गाव रतईपुरवामधे तिच्या घरच्यांना चिंता वेगळीच होती. आजही या गावात चोवीस तास वीज नाही आणि लोडशेडिंगच्या अंधारात गाव बुडालेलं असतं. जेव्हा तिथल्या पोलीस अधिकार्‍याला हे समजलं तेव्हा त्यानं अर्चना देवीच्या घरी इन्वर्टर आणून दिला जेणेकरून त्यांना अंतिम सामना बघता येईल.

ज्या गावानं सावित्री देवींची अवहेलना केली ते सर्व गाव त्या सावित्री देवींच्या घराबाहेर लावलेल्या टीव्हीवर एकत्र सामना बघून अर्चना देवीच्या नावाचा ‘गाव कि बेटी’ म्हणून जल्लोष करत नाचत मिठाई एकमेकांना भरवत होतं.

लहानपणी अर्चना आपल्या भावाबरोबर क्रिकेट खेळताना चेंडू लांब झाडीत गेला म्हणून तो आणयला म्हणून तिचा भाऊ गेला. त्यावेळी त्याला सर्पदंश झाला. दुर्दैवानं उपचार मिळण्यापूर्वीच त्याचं निधन झालं पण त्यानं त्या परिस्थितीत आईला सांगितलं, अर्चनाचं क्रिकेट बंद करू नकोस. आज या विजयानं आपल्या भावाची भविष्यवाणी खरी करून दाखवली.

बदलत्या गणितांचं आश्वासक भविष्य

या वर्ल्डकप विजयानं भारतीय महिला क्रिकेटमधली गणितं बदलतील. आयपीएलच्या धर्तीवर वूमेन्स प्रिमीयर लीग आता चालू होतेय. ऑस्ट्रेलियात बिग बॅश लीग, इंग्लडमधली १०० स्पर्धा यासाठी या टीममधल्या खेळाडूंची दारे उघडी होतील. क्रिकेट हा खेळ आहेच पण आज एक मोठा उद्योगधंदा झालाय. यात गैर काही नाही.

१९ वर्षाखालच्या वर्ल्डकपमधे या सावित्रीच्या लेकी मिस वर्ल्ड बनल्या. थोड्याच अवधीत म्हणजे १० फेब्रुवारीला आता याच दक्षिण आफ्रिकेत महिला ट्वेन्टी ट्वेन्टी वर्ल्डकप चालू होतोय. महिला वर्ल्डकपनं आपल्याला आत्तापर्यंत हुलकावणी दिलीय.

गेल्या २०२०च्या महिला वर्ल्डकपच्या टीममधेही शफाली वर्मा होती. मेलबर्नची फायनल हरल्यावर शफाली खूप रडली होती . या वर्ल्डकपच्या विजेतेपदाचा कप स्वीकारताना तिला भावनावेग आवरता आला नाही पण हे आनंदाश्रू होते. हाच विजयाचा अध्याय पुढे चालू ठेवत महिला वर्ल्डकपसकट दोन कप घेऊन भारतात परतायला तिचं मनोबल उंचावलं असेल.

हेही वाचा: 

कपिल देव: भारतीय क्रिकेटला नवी दिशा देणारा 'देव'

लेडी सेहवाग शफालीचा सिक्सर पुरुषांनाही तोंडात बोट घालायला लावतो!

जगातल्या सगळ्यात मोठ्या दुर्गुणाविरुद्ध क्रिकेटनं एका हत्यारासारखं काम केलं

सलग २१ ओवर निर्धाव टाकणाऱ्या बापू नाडकर्णींची लाईफ जर्नी सांगणारी मुलाखत