थॉमस चषक स्पर्धेतला भारताचा विजय, ऑलिम्पिक सुवर्णपदकाची नांदी

२६ मे २०२२

वाचन वेळ : ६ मिनिटं


भारतीय खेळाडूंनी अनेक धक्कादायक निकाल नोंदवत थॉमस चषक बॅडमिंटन स्पर्धेत अजिंक्यपद पटकावलं. या स्पर्धेत बॅडमिंटन क्षेत्रातल्या सर्वच मातब्बर टीमचा समावेश होता. पण भारतीय टीमने त्या सर्वांना मात दिली. भारतीय पुरुष टीमची कामगिरी ही भावी ऑलिम्पिक सुवर्णपदकाच्या दिशेनं वाटचाल आहे. बॅडमिंटनपटूंसाठीच नाही, तर प्रत्येक क्रीडा प्रकारातल्या खेळांडूसाठी ही घटना प्रोत्साहन देणारी आहे.

बँकॉकच्या इम्पॅक्ट एरिनामधला तो सोनेरी क्षण! भारताचा तिरंगा ध्वज फडकताना आणि राष्ट्रगीत सादर होताना त्या संकुलामधे उपस्थित असलेल्या प्रत्येक भारतीयाच्या डोळ्यातून आनंदाश्रू ओसंडून वाहत होते. असे क्षण भारताच्या वाट्याला क्वचितच येत असतात. हा दुर्मिळ क्षण साकारला गेला, तो भारतीय पुरुष बॅडमिंटनपटूंनी केलेल्या ‘न भूतो न भविष्यती’ अशा कामगिरीमुळेच. इतिहासात पहिल्यांदाच भारतीय खेळाडूंनी थॉमस चषकावर आपलं नाव कोरलं.

भारतीय खेळाडू हा विजय साकार करतील, असा अंदाज जगातल्या बॅडमिंटन पंडितांनी केलाही नसेल. कारण या स्पर्धेत बॅडमिंटन क्षेत्रातल्या सर्वच मातब्बर टीमचा समावेश होता. त्यातही चौदा वेळा हे विजेतेपद मिळवणारा आणि गतविजेता असलेला इंडोनेशिया आणि या खेळात अनेक वर्ष प्राबल्य गाजवणारा चीन यांच्यातच विजेतेपदासाठी लढत होईल, अशी अपेक्षा करण्यात आली होती.

एक मात्र नक्की, की जेव्हा एखादी टीम कोणतंही मानसिक दडपण न घेता स्वप्नवत कामगिरी करण्याच्या जिद्दीने आणि आत्मविश्वासाने सहभागी होतो, तेव्हा त्याची वाटचाल अनपेक्षित आणि आश्चर्यजनक होत असते. भारतीय खेळाडूंनी महत्त्वाकांक्षा ठेवत अनेक धक्कादायक निकाल नोंदवत अजिंक्यपद पटकावलं. ‘पूना गेम’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या या खेळातल्या भारतीय पुरुष टीमची कामगिरी ही भावी ऑलिम्पिक सुवर्णपदकाची नांदी आहे.

थॉमस चषक स्पर्धेत भारत

थॉमस चषक ही पुरुष गटाची जागतिक अजिंक्यपद स्पर्धा असते, तर महिला गटासाठी जागतिक अजिंक्यपद स्पर्धेसाठी उबेर चषक देण्यात येतो. या दोन्ही स्पर्धा सांघिक लढती असतात. आजपर्यंत बॅडमिंटन म्हणजे वैयक्तिक अजिंक्यपद स्पर्धा, एवढाच विचार करण्यात आला होता. टेनिसमधे ज्याप्रमाणे डेविस चषक स्पर्धेला अनन्यसाधारण महत्त्व असतं, त्याप्रमाणेच बॅडमिंटनमधे सांघिक स्वरूपाच्या अजिंक्यपद स्पर्धेला अतिशय प्रतिष्ठा लाभलीय.

यापूर्वी बॅडमिंटनच्या सांघिक स्पर्धांबाबत फारसा गांभीर्याने विचार करण्यात आला नसावा. त्यामुळे या स्पर्धांमधे भारताची कामगिरी फारशी प्रभावी झाली नव्हती. यंदा मात्र या दोन्ही स्पर्धांसाठी अतिशय गांभीर्याने विचार करण्यात आला होता. कदाचित, माजी ऑल इंग्लंड विजेते खेळाडू आणि ख्यातनाम प्रशिक्षक पुलेल्ला गोपीचंद यांनी भारतीय बॅडमिंटन संघटनेच्या उपाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर याबद्दल सकारात्मक दृष्टीने पाहिलं गेलं असावं.

थॉमस चषक स्पर्धेसाठी भारतीय टीमची निवड करताना रीतसर चाचणी स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेतल्या खेळाडूंची कामगिरी, शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्ती या सर्वच गोष्टींचा अतिशय बारकाईने विचार करण्यात आला होता.

साखळी गटात भारतापुढे जर्मनी, कॅनडा आणि चीन तैपेई यांचं आव्हान होतं. भारतीय टीमच्या खेळाडूंची गेल्या दीड-दोन वर्षांमधली कामगिरी लक्षात घेता, भारतीय टीम बाद फेरीत सहज प्रवेश करेल, अशीच अपेक्षा होती. भारताने जर्मनी आणि कॅनडा या दोन्ही टीमविरुद्ध निर्विवाद विजय मिळवला. चीन तैपेई टीमविरुद्ध मात्र भारताला २-३ असा निसटता पराभव स्वीकारावा लागला.

हेही वाचा: अली अख्तर : टेनिस हाच त्यांचा विश्वास होता

असा मिळाला निर्णायक विजय

उपांत्यपूर्व फेरीत भारताची पाचवेळा विजेतेपद मिळवणार्‍या मलेशियाबरोबर गाठ पडली. या लढतीमधल्या २-२ अशा बरोबरीनंतर निर्णायक सामन्यात भारताचा एच. एस. प्रणॉय याच्यापुढे लिजोंग जूनहो याचं आव्हान होतं. प्रणॉय याच्यापेक्षा लिजोंग हा मानांकनात वरचढ होता. पण प्रणॉयने कोणतंही मानसिक दडपण न घेता, कमालीची जिद्द आणि आत्मविश्वास दाखवला. त्यामुळेच त्याने हा सामना जिंकून भारताला उपांत्य फेरीतला प्रवेश मिळवून दिला.

उपांत्य फेरीत माजी विजेत्या डेन्मार्कविरुद्ध विजय मिळवणं ही काही सोपी गोष्ट नव्हती. पण ब्राँझ पदक निश्चित झाल्यानंतर आता मागे हटायचं नाही. प्रतिस्पर्धी टीम कितीही बलाढ्य असला तरी ‘हम भी कुछ कम नही’ असा विचार ठेवतच भारतीय खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत डेन्मार्कचं आव्हान संपुष्टात आणलं. या सामन्यातल्या निर्णायक लढतीत प्रणॉय याच्यापुढे रासमस गेमके याचं आव्हान होतं. प्रणॉय याच्यापेक्षा रासमस हा मानांकनात वरचढ होता.

प्रणॉय याला हा सामना सुरू असताना दुखापत झाली. पाय मुरगळल्यामुळे तो घसरून पडला तेव्हा भारतीय पथकामधे शंकेची पाल चुकचुकली. पण या दुखापतीवर तात्पुरता उपचार करत प्रणॉय याने सामना पुढे सुरू केला आणि आपल्या टीमला आवश्यक असणारा निर्णायक विजय मिळवूनही दिला.

विजेतेपदाचा पाया रचणारा 'लक्ष्य'

विजेतेपद मिळण्यापेक्षाही ते टिकवणं ही खूप अवघड कामगिरी असते. इंडोनेशियन खेळाडूंवर नेमकं तेच दडपण आलं होतं. त्यांच्या तुलनेत पहिल्यांदा अंतिम फेरी गाठणार्‍या भारतीय खेळाडूंचा आत्मविश्वास खूपच उंचावला होता. आता ऐतिहासिक विजेतेपद मिळवायचंच! याच ध्येयाने झपाटलेल्या भारतीय खेळाडूंनी अंतिम फेरीत इंडोनेशियाला ३-० अशी धूळ चारली.

या सामन्यातल्या पहिल्या लढतीत लक्ष्य सेन याने आपल्यापेक्षा मानांकन आणि अनुभव यात वरचढ असलेल्या अँथोनी जितींग याच्यावर शानदार विजय मिळवला. खरं तर या स्पर्धेतल्या बाद फेरीच्या लढतींमधे लक्ष्य याची कामगिरी फारशी चांगली झाली नव्हती. लक्ष्य याने गेल्या सहा-सात महिन्यांमधे आंतरराष्ट्रीय स्तरावर अतिशय नेत्रदीपक कामगिरी केली आहे. ऑलिम्पिक आणि जागतिक पदक मिळवण्याची क्षमता त्याच्याकडे आहे.

लक्ष्य याचे गुरू आणि भारतीय टीमचे प्रशिक्षक विमल कुमार यांनी त्याची आजपर्यंतची कामगिरी लक्षात घेऊनच अंतिम फेरीतल्या पहिल्या लढतीत त्याच्यावर विश्वास दाखवला. हा विश्वास सार्थ ठरवताना लक्ष्य याने जबाबदारी ओळखून खेळ केला. पहिली गेम गमावल्यानंतरही संयम आणि मनोधैर्य कायम ठेवत त्याने बाकीच्या दोन्ही गेम जिंकल्या आणि भारताच्या विजेतेपदाचा पायाच रचला.

हेही वाचा: लेजंड धोनीचा अखेरचा 'षटकार'

अनुभवी किदम्बी श्रीकांत

दुहेरीमधे सात्विक साईराज रान्कीरेडी आणि चिराग शेट्टी या जोडीने गेल्या दोन वर्षांमधे आंतरराष्ट्रीय स्तरावर सातत्यपूर्ण कामगिरी केलीय. त्यात त्यांनी अनेक ऑलिम्पिक आणि जागतिक पदक विजेत्या खेळाडूंवर विजय मिळवलाय. या अनुभवाचा पुरेपूर फायदा घेत, त्यांनी इंडोनेशियाच्या मोहम्मद एहसान आणि सुकमूलजिओ या मातब्बर जोडीला पराभूत केले. त्यांच्या या कामगिरीमुळे भारतास २-० अशी महत्त्वपूर्ण आघाडी मिळाली.

एकेरीच्या तिसर्‍या लढतीत किदम्बी श्रीकांत याच्यापुढे जोनाथन ख्रिस्ती याचं आव्हान होतं. आपल्या टीमची दुहेरीतली दुसरी जोडी थोडीशी कमकुवत आहे. हे लक्षात घेऊनच, विजेतेपद मिळवायचं असेल; तर आपल्याला पूर्ण ताकदीनिशी खेळ करत हा सामना जिंकणं अनिवार्य आहे, हे श्रीकांत याने ओळखलं होतं. त्यामुळे त्याने शेवटपर्यंत संयम, चिकाटी आणि आत्मविश्वास कायम ठेवत ख्रिस्ती याला पराभूत केलं. मानांकनापेक्षाही अनुभव हाच खरा गुरू असतो, हे श्रीकांत याने या लढतीत सिद्ध केलं.

योग्य प्रशिक्षकाची निवड

भारताच्या या टीमला डेन्मार्कचा माजी जगज्जेता खेळाडू मथायस बोई याचं बहुमोल मार्गदर्शन लाभलं. अनेक वेळेला परदेशी प्रशिक्षक आणि भारतीय खेळाडू यांच्यात अपेक्षित सुसंवाद नसला, तर असे प्रशिक्षक नेमण्यामागचा हेतू सफल होत नाही. मथायस हा आपल्या देशात आयोजित केल्या जाणार्‍या इंडियन बॅडमिंटन लीगमधे सहभागी होत असतो. त्यामुळे त्याला भारतीय खेळाडूंची देहबोली, त्यांची मानसिक तंदुरुस्ती इत्यादी गोष्टींचा अतिशय जवळून अभ्यास आहे.

भारतीय खेळाडूंना मार्गदर्शन करताना त्याला या गोष्टींचा खूपच फायदा झाला. भारतीय खेळाडूंबरोबर त्याने अतिशय चांगला संवाद आणि समन्वय ठेवला होता. मथायस याची जिवलग मैत्रीण तापसी पन्नू ही भारतीय सिनेसृष्टीमधली अग्रगण्य अभिनेत्री आहे तसंच इंडियन बॅडमिंटन लीगमधे एका टीमची संचालक म्हणूनही तिचा महत्त्वाचा वाटा आहे. भारतीय टीमबरोबर प्रशिक्षक म्हणून काम करणार्‍या विमल कुमार यांचंही योगदान अतिशय महत्त्वाचं आहे. त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या सामन्यांचा भरपूर अनुभव आहे आणि प्रशिक्षक म्हणूनही त्यांनी अनेक पावसाळे पाहिलेत.

भारताच्या या ऐतिहासिक विजेतेपदानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक खेळाडूशी संपर्क साधला आणि विशेष अभिनंदनही केलं. खेळाडूंसाठी ही शाबासकी अतिशय प्रेरणादायकच ठरली आहे. भारताच्या महिला खेळाडूंना उबेर चषक स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीतच पराभव स्वीकारावा लागला. मात्र भारतासाठी थॉमस चषक स्पर्धेचं विजेतेपद ही कामगिरी केवळ बॅडमिंटनपटूंसाठी नाही, तर प्रत्येक क्रीडा प्रकारातल्या खेळाडूंना प्रोत्साहन देणारीच आहे.

हेही वाचा: 

दंगल आणि लीगपेक्षा तर राणादादाने कुस्तीला ग्लॅमर दिलं

मानसिक आरोग्य नीट राहीलं तरच खेळाडू यश मिळवतील

ऑलम्पिकमधे उत्तेजक घेऊन खेळणाऱ्या खेळाडूंचं काय करायचं?

जगातल्या सगळ्यात मोठ्या दुर्गुणाविरुद्ध क्रिकेटनं एका हत्यारासारखं काम केलं

(दैनिक पुढारीच्या बहार पुरवणीतून साभार)