कोरोनाचा संसर्ग कमी होत गेल्यामुळे जगभरात बर्याच अंशी दिलासादायक स्थिती असतानाच, आता या संसर्गामुळे झालेल्या मृत्यूच्या आकडेवारीवरून वादंग माजलंय. जागतिक आरोग्य संघटनेच्या दाव्यानुसार, कोरोना रुग्णांच्या मृत्यूचं प्रमाण जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीपेक्षा खूपच जास्त आहे.
मार्च २०२०पासून सुरु झालेली कोरोनाची लाट संपत आलेली असताना, जगभरात अनेक देशांमधल्या कोरोना मृत्यूच्या संख्येवरून वादविवाद सुरु झालेत. हा वाद पुन्हा सुरु होण्यामागे जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच डब्ल्यूएचओनं सुरु केलेल्या एका प्रकल्पाचं निमित्त आहे.
जगातल्या सर्वच देशांमधे मार्च २०२०पासून कोरोनामुळे किती मृत्यू झाले, याचं पुनरावलोकन करण्यासाठी डब्ल्यूएचओनं एक प्रकल्प हाती घेतलाय. वेगवेगळ्या देशांतल्या सरकारी तसंच इतर माध्यमांमधून आलेली कोरोना रुग्णांची माहिती एकत्रित केली जातेय. यासाठी त्या त्या देशातल्या आरोग्य संघटना आणि अनेक पत्रकारांच्या समित्या तयार केल्या आहेत. सर्व स्तरावरून मिळणारी कोरोना रुग्णांच्या मृत्यूची माहिती एकत्रित केली जात असून, लवकरच ती प्रसिद्ध केली जाणार आहे.
या माहितीला अनेक देशांतल्या सरकारी यंत्रणांनी आक्षेप घेतला असून, ती प्रसिद्ध होऊ नये म्हणून डब्ल्यूएचओकडे मागणी केलीय. याबद्दलची सगळ्यात पहिली बातमी अमेरिकेतल्या ‘न्यूयॉर्क टाइम्स’ने दिली. या माहितीला आक्षेप घेणार्या देशांमधे भारताबरोबरच चीन, इजिप्त, इथोपिया, इराण, बांगलादेश आणि सीरिया या देशांचाही समावेश आहे.
हेही वाचा: कोरोना कुटुंबातलं सातवं पोरच इतकं वात्रट कसं निघालं?
डब्ल्यूएचओच्या या माहितीला विरोध करणारे काही देश असले, तरी काही देशांनी ही माहिती प्रसिद्ध होण्याआधीच, सुधारित मृत्यूची आकडेवारी जाहीर करण्यास सुरवात केलीय. यात सगळ्यात पुढे अमेरिका असून, अमेरिकेच्या सरकारी रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्र म्हणजेच सीडीसीनं नुकतीच कोरोना मृत्यूची नवीन आणि सुधारित आकडेवारी जाहीर केलीय.
आधीच्या आकडेवारीनुसार, अमेरिकेत सात लाखांच्या आसपास कोरोना मृत्यूची नोंद केली गेली होती. मात्र सुधारित आकडेवारीनुसार, हीच मृत्यूची संख्या आठ लाखांपेक्षा अधिक आहे. यामधे काही लहान मुलांचाही समावेश आहे. याच जोडीला ब्रिटनमधल्या आरोग्य यंत्रणेनेही आपली सुधारित आकडेवारी जाहीर केली असून, पूर्वीच्या मृत्यूपेक्षा सुधारित आकडेवारीत तीन हजारांची वाढ दिसून आलीय.
याबरोबर आणखी एक नवीन आणि आश्चर्यकारक कोरोना मृत्यूची माहिती समोर येतेय. ती म्हणजे, गेल्या दोन वर्षांच्या कालावधीत काही देशांमधे शनिवारी आणि रविवारी कोरोना मृत्यूची संख्या सोमवार ते शुक्रवार या दिवसांपेक्षा अधिक होती. या देशांमधे अमेरिका, ब्रिटन, ब्राझील यांचा समावेश आहे. याउलट जर्मनीमधे शनिवारी आणि रविवारी कोरोना रुग्णांच्या मृत्यूचं प्रमाण इतर दिवसांपेक्षा कमी होतं.
चीनमधल्या आकडेवारीवरूनही डब्ल्यूएचओ आणि चीन सरकार यांच्यामधे वाद सुरु झाले आहेत. चीनमधलं अगदी अलीकडचं उदाहरणच पाहायचं झालं तर शांघाय या त्यांच्या आर्थिक राजधानीत मार्च २०२२पासून चार लाख कोरोना रुग्णांची नोंद झालीय; पण मृत्यू मात्र फक्त दहाच नोंदवले गेलेत. तसंच कोरोनाची सुरवात झाल्यापासून आतापर्यंत चीनमधे फक्त पाच हजारच मृत्यूंची नोंद केली गेलीय.
अमेरिकेतल्या ‘न्यूयॉर्क टाइम्स’ आणि ब्रिटनमधल्या ‘द गार्डियन’च्या माहितीनुसार, डब्ल्यूएचओ जानेवारी २०२२मधेच सुधारित आकडेवारी जाहीर करणार होती. पण, भारत तसंच इतर देशांच्या विरोधामुळे ही माहिती जाहीर केली गेली नाही. ‘न्यूयॉर्क टाइम्स’च्या बातमीनुसार, कोरोना रुग्णांच्या मृत्यूच्या आकडेवारीवरून भारत सरकार आणि डब्ल्यूएचओ आमने-सामने आले आहेत.
हा वाद सुरु होण्यामागे वर सांगितलेलं कारण असून, डब्ल्यूएचओच्या दाव्यानुसार, भारतातल्या कोरोना रुग्णांच्या मृत्यूचं प्रमाण सध्याच्या आकडेवारीपेक्षा खूपच जास्त आहे. डब्ल्यूएचओनं देशभरातून ६००पेक्षा अधिक स्थानिक पत्रकारांकडून माहिती घेतली असून, मिळालेली माहिती आणि जाहीर झालेल्या आकडेवारीमधे खूप तफावत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.
फक्त भारतातलीच नाही, तर संपूर्ण जगभरातली सुधारित आकडेवारी डब्ल्यूएचओ एप्रिल महिन्याच्या शेवटी जाहीर करण्याच्या तयारीत आहे. ‘द गार्डियन’नुसार, डब्ल्यूएचओच्या नवीन आकडेवारीत कोरोना मृत्यूची संख्या सुमारे दीड कोटी इतकी असू शकते. सध्या हीच आकडेवारी साठ लाखांच्या आसपास आहे.
‘न्यूयॉर्क टाइम्स’ आणि ‘द गार्डियन’मधील वृत्तानुसार, भारतातली सुधारित कोरोना रुग्णांच्या मृत्यूची आकडेवारी ही आताच्या आकडेवारीपेक्षा सात ते दहापट अधिक असू शकते. भारतातल्या काही राज्यांचा विचार केला तर तेलंगणा, आंध्र प्रदेश, राजस्थान, गुजरात, बिहार, उत्तर प्रदेश आणि छत्तीसगड या राज्यांतल्या कोरोना रुग्णांचे मृत्यू हे दाखवलेल्या संख्येपेख्या कितीतरी पट अधिक आहेत.
हेही वाचा: कोरोना रोखण्यासाठी डिग्लोबलाइज होणं ही तर आपली घोडचूक ठरेल
भारत सरकारकडून डब्ल्यूएचओच्या सुधारित आकडेवारीवर आक्षेप घेण्यास काही कारणं सांगितली आहेत. भारत सरकारच्या म्हणण्यानुसार, डब्ल्यूएचओनं मृत्यूची नोंद करणारे जे संख्याशास्त्रीय मॉडेल वापरलंय, ते अचूक नाही. भारतासारख्या लोकसंख्येनं महाकाय देशासाठी हे मॉडेल लागू पडत नाही.
डब्ल्यूएचओनं कोरोना मृत्यूची आकडेवारी ठरवण्यासाठी जगातल्या देशांची दोन स्तरांमधे विभागणी केलीय. भारत सरकारच्या म्हणण्यानुसार, डब्ल्यूएचओनं पहिल्या स्तरावरच्या देशांमधलं संख्याशास्त्रीय मॉडेल वापरून त्याआधारे दुसऱ्या स्तरावरच्या देशांतले सरासरी मृत्यू ठरवलेत. पहिल्या स्तरावर विकसित देशांचा समावेश केला असून, दुसऱ्या स्तरावर विकसनशील आणि आफ्रिकन देशांचा समावेश केलाय.
डब्ल्यूएचओच्या माहितीनुसार, त्यांनी खासगी आणि सरकारी रुग्णालयातले कोरोनादरम्यानचे मृत्यू, सरकारी आकडेवारी, स्थानिक वृत्तपत्रात आलेल्या बातम्या, काही स्वयंसेवकांच्या मदतीनं घरोघरी जाऊन केलेली सर्वेक्षणं आणि संख्याशास्त्रीय मॉडेल्स यांच्यावरून कोरोना मृत्यूचं अनुमान काढलंय.
‘द हिंदू’ या भारतीय वृत्तपत्राच्या माहितीनुसार, देशातल्या १८ राज्यांमधे कोरोना मृत्यूच्या संख्येत मोठी तफावत आहे. याचबरोबर डब्ल्यूएचओच्या गणनेत थेट कोरोनामुळे झालेलं मृत्यू, कोरोनामुळे रुग्णांमधे निर्माण झालेल्या गुंतागुंतीच्या परिस्थितीचे मृत्यू, त्याचबरोबर कोरोना नसूनही ज्यांना वेळेवर उपचार मिळू शकले नाहीत, अशा लोकांचे मृत्यूही यात समाविष्ट केले आहेत.
‘न्यूयॉर्क टाइम्स’च्या अहवालात असंही म्हटलंय की, काही देशांनी कोरोनामुळे झालेल्या मृत्यूच्या आकडेवारीचा वेळोवेळी मागोवा घेतलाय आणि तो डब्ल्यूएचओला सादर केलाय. पण, भारतानं गेल्या दोन वर्षांपासून ते केलं नाही. त्यात असंही म्हटलंय की, भारत आणि इतर काही देशांमधे मृत्यूची आकडेवारी अनिश्चित आहे. या सर्व कारणांमुळे सध्या भारत सरकार आणि डब्ल्यूएचओ यांच्यामधे संघर्ष सुरु आहे.
लवकरच डब्ल्यूएचओचं एक शिष्टमंडळ भारताला भेट देणार आहे. यावेळी ते गुजरातमधे भारत सरकारच्या सहकार्यानं उभारलेल्या पारंपरिक औषध उपचारपद्धतींच्या संशोधन केंद्राचं उद्घाटन करणार आहे. यावेळी सरकारी स्तरावर बोलणी होऊन, या गुंतागुंतीच्या समस्येवर मार्ग निघून, डब्ल्यूएचओ आपला कोरोना मृत्यूचा अहवाल प्रसिद्ध करेल अशी चिन्हं सध्या दिसतायत.
हेही वाचा:
कोरोनानंतर आपण वेगळ्याच जगात असणार आहोत
एकदा बरं झाल्यानंतर पुन्हा कोरोनाचा संसर्ग होतो का?
(दैनिक पुढारीच्या बहार पुरवणीतून साभार)