भारतीय क्रिकेटपटू आयपीएलसारख्या भरघोस कमाईच्या स्पर्धेत जीव ओतून आणि संबंधित टीमच्या निष्ठेनं खेळतात. पण देशासाठी खेळताना त्यांची ही निष्ठा दिसून येत नाही, हा भारतीय क्रिकेटपटूंवर लागलेला शिक्का आहे. तो पुसून काढण्याची हुकमी संधी त्यांना येणाऱ्या टी-२० वर्ल्डकपमधे मिळतेय. या संधीचं सोनं करण्याची क्षमता निश्चितपणे त्यांच्याकडे आहे.
टी-२० वर्ल्डकपमधल्या जागतिक गटाच्या प्राथमिक फेरीला याआधीच सुरवात झालीय. अव्वल बारा टीममधे स्थान असलेल्या भारताच्या वर्ल्डकप मोहिमेला येत्या रविवारी म्हणजेच २३ ऑक्टोबरपासून सुरवात होतेय. या स्पर्धेतल्या संभाव्य विजेत्या टीममधे भारताची गणना केली जातेय.
२००७मधे आयोजित केलेल्या पहिल्या टी-२० वर्ल्डकपमधे भारतानं महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली सनसनाटी विजेतेपद मिळवलं होतं. त्यानंतर २०१४मधे मिळवलेल्या उपविजेतेपदाचा अपवाद वगळता भारतीय टीमची कामगिरी निराशाजनकच ठरलीय. जागतिक स्तरावर हुकूमत गाजवण्याची क्षमता असलेल्या भारतीय क्रिकेटपटूंनी पुन्हा विश्वविजेतेपदाला गवसणी घालावी, अशीच चाहत्यांची अपेक्षा आहे.
भारताला यंदाच्या स्पर्धेतल्या साखळी गटात पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, बांगलादेश आणि प्राथमिक फेरीतून अव्वल बारा टीममधे प्रवेश करणाऱ्या दोन टीम, अशा पाच टीमबरोबर लढती खेळायच्या आहेत. भारतीय टीमची सध्याची कामगिरी लक्षात घेतली, तर भारतीय टीमला साखळी गटातून बाद फेरीत प्रवेश करताना अडचण येणार नाही, अशी अपेक्षा आहे.
हेही वाचाः मेजर ध्यानचंद यांनी हिटलरचा प्रस्तावही नाकारला
भारताची सलामीचीच लढत पाकिस्तानसारख्या पारंपरिक प्रतिस्पर्ध्याशी होणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातला क्रिकेट सामना हा नेहमीच एखाद्या धर्मयुद्धाप्रमाणे खेळला जातो. पाकिस्तानबरोबर खेळताना भारतीय टीमवर नेहमीच मानसिक दडपण असतं. एकवेळ विजेतेपद मिळवलं नाही तरी चालेल; पण पाकिस्तानविरुद्धचा सामना भारतानं गमावू नये, अशीच नेहमी चाहत्यांची इच्छा असते.
इतर टीमच्या तुलनेत भारताविरुद्ध खेळताना पाकिस्तानचे खेळाडू नेहमीच ईर्ष्येनं खेळतात. साहजिकच, या सामन्यामधे भारतीय खेळाडूंना आपल्या क्षमतेनुसार शंभर टक्के कामगिरी करण्याची आवश्यकता आहे. भारतीय टीमनं आजपर्यंत अनेकदा पाकिस्तान टीमला हरवलंय. पहिल्या टी-२० वर्ल्डकपमधल्या अंतिम सामन्यात भारतानं पाकिस्तानवर मात केली होती.
कागदावर दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू नेहमीच बलाढ्य मानले जातात. पण वर्ल्डकपसारख्या महत्त्वपूर्ण स्पर्धांमधे त्यांची कामगिरी बेभरवशी आणि निराशाजनक असते, असा आजपर्यंतचा अनुभव आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नुकत्याच झालेल्या टी-२० मालिकेत भारतानं शानदार विजय मिळविला होता.
त्यामुळे आफ्रिकेविरुद्धच्या आगामी लढतीत भारतीय टीमची बाजू वरचढ मानली जातेय. अर्थात, या लढतीमधेही भारताला पूर्ण ताकदीनिशी खेळावं लागेल. साखळी गटातली बांगलादेश टीम भारतीय टीमच्या तुलनेत कमकुवत मानली गेली असली, तरीही अनेकदा बांगलादेश टीमनं भारतीय टीमसह अनेक बलाढ्य टीमविरुद्ध आश्चर्यजनक विजय मिळवलेत.
भारतीय टीमनं आफ्रिकेपाठोपाठ ऑस्ट्रेलियाविरुद्ध घरच्या मैदानावर मालिका जिंकलीय. त्याचा फायदा भारतीय टीमचं मनोधैर्य उंचावण्यासाठी निश्चितपणे झालाय. असं असलं तरीही कोणत्याही टीमविरुद्ध फाजील आत्मविश्वास ठेवणं म्हणजे स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेण्यासारखंच आहे. वर्ल्डकपमधे खेळणारी कोणतीही टीम दुय्यम दर्जाचा नसते.
कारण मर्यादित षटकांच्या वर्ल्डकपमधे आजपर्यंत केनिया, झिम्बाब्वे, बांगलादेश अशा टीमनी भल्याभल्या टीमना पराभवाची चव चाखायला लावलीय. हे लक्षात घेतलं, तर प्रत्येक सामन्यातली प्रतिस्पर्धी टीम बलाढ्य आहे, असं गृहीत धरून खेळलं तर आपोआपच आपली कामगिरी चांगली होते.
भारतीय टीमनं जरी आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध नुकत्याच मालिका जिंकल्या असल्या, तरीही त्या मालिका त्यांनी घरच्या मैदानावर जिंकल्या आजेत, ही गोष्ट विसरता कामा नये तसेच मालिका विजय मिळविलं असलं, तरीही भारतीय खेळाडूंच्या कामगिरीत अनेक चुका दिसून येत होत्या, ही गोष्ट नाकारता येणार नाही.
हेही वाचाः कमीत कमी सोयीसुविधा, तरीही अपंगाच्या भारतीय क्रिकेट टीमचं मोठं यश
येणारी टी-२० स्पर्धा ऑस्ट्रेलियात आयोजित केली जाणार आहे. तिथली खेळपट्टी आणि हवामान या गोष्टीही खेळाडूंच्या कामगिरीच्या दृष्टीनं महत्त्वाच्या आहेत. ऑस्ट्रेलियातली खेळपट्टी ही त्यांच्या खेळाडूंसाठी पोषक असणारच; पण तरीही अशा खेळपट्टीवर आपले बॉलर कशी कामगिरी करतात, हेही महत्त्वाचं ठरणार आहे. तिथल्या खेळपट्ट्यांवर चेंडू उसळून येतो हे लक्षात घेतलं, तर द्रुतगती बॉलरप्रमाणेच फिरकी बॉलरनाही त्याचा फायदा मिळण्याची शक्यता आहे.
त्यामुळेच की काय, भारतीय टीमनं तीन फिरकी बॉलरचा आपल्या टीममधे समावेश केलाय. हुकमी द्रुतगती बॉलर जसप्रीत बुमराह आणि अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा यांची अनुपस्थिती भारताला प्रकर्षानं जाणवणार आहे. द्रुतगती बॉलिंगची मुख्य मदार भुवनेश्वर कुमारवर असेल. भुवनेश्वर कुमारने क्रिकेटमधे भरपूर पावसाळे पाहिलेत, असं म्हटलं तर ते फारसं वावगं ठरणार नाही. त्याला जरी विकेट मिळत असल्या, तरी अनेकदा तो खूप धावा देतो, असं आजपर्यंत दिसून आलंय.
आपल्यावर मोठी जबाबदारी आहे, हे ओळखून त्यानं अचूक टप्पा आणि दिशा ठेवतच बॉलिंग केली पाहिजे. किफायतशीर बॉलिंग कशी करायची, याबाबत त्यानं ग्लेन मॅकग्रा, कपिल देव यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवला पाहिजे. भुवनेश्वर कुमारबरोबरच अर्शदीप सिंग, हर्षल पटेल आणि हार्दिक पंड्या यांच्याकडूनही प्रभावी मार्याची अपेक्षा आहे.
ऑस्ट्रेलियातल्या खेळपट्टीवर रविचंद्रन अश्विन, यजुवेंद्र चहल, अक्षर पटेल या फिरकी बॉलरना हुकूमत गाजवण्याची संधी आहे. अश्विनने अनेक पावसाळे पाहिलेत. अलीकडच्या काळात अपेक्षेइतकं सातत्य त्याच्या कामगिरीत दिसून येत नाही. विशेषतः उंची देऊन फसवा फिरकी मारा करण्याच्या कौशल्यात तो कमी पडतो, असं दिसून येतंय.
भारतीय क्रिकेटमधली स्पर्धा लक्षात घेतली, तर आपला हा अखेरचाच वर्ल्डकप असण्याची शक्यता आहे, हे लक्षात ठेवून त्यानं अधिकाधिक किफायतशीर पण जास्त विकेट मिळण्याजोगी बॉलिंग करण्याची आवश्यकता आहे. यजुवेंद्र आणि अक्षर यांनी यंदाच्या मोसमात सातत्यपूर्ण यश मिळविलंय. असंच यश त्यांनी या वर्ल्डकपमधेही मिळवावं, अशी अपेक्षा आहे.
हेही वाचाः स्पर्श न करता खेळता येतं, म्हणून आपल्याकडे क्रिकेट वाढलं
सलामीचा धडाकेबाज बॅट्समन रोहित शर्मा याच्यासारख्या अनुभवी खेळाडूकडे भारतीय टीमची धुरा सोपविण्यात आलीय. कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळताना त्यानं अनेकदा बॅटिंगचे अनेक विक्रम मोडले असले, तरीही यंदाच्या मोसमात त्याच्याकडून अपेक्षेइतकं सातत्य दिसून आलेलं नाही. भारतीय टीमसाठी हीच एक मोठी काळजी करणारी गोष्ट आहे.
अर्थात, तो जरी अपयशी ठरला तरी लोकेश राहुल, सूर्यकुमार यादव, विराट कोहली, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक आणि हार्दिक पंड्या हे भारताच्या बॅटिंगचे मोठे आधारस्तंभ मानले जातात. गेल्या वर्ल्डकपमधे खेळलेल्या भारतीय टीमच्या तुलनेत यंदाच्या टीमच्या मधल्या फळीतही भक्कम बॅटिंग आहे. तसंच आपल्या टीमच्या शेवटच्या फळीतही वेळप्रसंगी आक्रमक टोलेबाजी करीत २५-३० धावा काढण्याची क्षमता असलेले खेळाडू आहेत.
फिल्डींग हा कोणत्याही सामन्यातला विजयाचा महत्त्वाचा घटक मानला जातो. एकवेळ वीस-पंचवीस धावा काढता आल्या नाही तरी चालेल; पण फिल्डींग करताना तेवढ्याच धावा रोखण्याची क्षमता तुमच्याकडे पाहिजे, असं नेहमी म्हटलं जातं.
फिल्डींगमधे जडेजाची अनुपस्थिती प्रकर्षानं दिसणार आहे. त्यामुळे इतर खेळाडूंनी प्रत्येक कॅच घेणं आणि प्रत्येक रन रोखणं, हे अतिशय महत्त्वाचं आहे. असं ध्येय डोळ्यांसमोर ठेवत प्रयत्न केले, तर निश्चितपणे यश तुमच्यापासून दूर जात नाही.
भारतीय टीमची अभेद्य भिंत आणि अतिशय श्रेष्ठ क्रिकेटपटू म्हणून ओळख असलेल्या राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखाली यंदाच्या वर्ल्डकपमधे भारतीय खेळाडू खेळतायत. आपण विश्वविजेतेपद मिळवण्यासाठीच खेळत आहोत, हे ध्येय डोळ्यांसमोर ठेवत भारतीय खेळाडूंनी आपल्या क्षमतेइतकी शंभर टक्के कामगिरी केली पाहिजे. कारण, क्रिकेट हा भारतीयांसाठी श्वास मानला जातो. त्यांचा हा श्वास जपण्याची जबाबदारी भारतीय टीमवर आहे.
हेही वाचाः
क्रिकेटचे लघुउद्योग सुटलेत सुसाट
महेंद्र सिंग धोनी: वनडेतला ‘ग्रेट फिनिशर’
आयपीएलच्या तपाची कहाणी : थोडी मिठी, जास्त खट्टी
स्वर्गातल्या वडलांना येस पप्पा म्हणणाऱ्या जॉनी बिअरस्टोची गोष्ट