वर्तमानाचं प्रतिबिंब मराठी साहित्यात उमटत नाही असं म्हणतात, पण कोरोनाकाळ याला अपवाद ठरला. कोरोनाकाळावर कथा, कविता, कादंबऱ्या लिहिल्या गेल्याच, तसंच कोरोनाचे परिणाम सांगणारी अनेक पुस्तकं बाजारात आली. या सगळ्या साहित्याचा हा धावता आढावा घेणारा हा लेख.
कोरोनानं सामान्यांचं जगणं मुश्कील केलं. जगण्यावागण्याची तर्हा बदलली. माणसाला भय आणि भानही या काळानं दिलं. सामान्य डोळ्यांना न दिसणार्या एका वायरसनं हे सारं केलं.
साहित्याला समाजाचा आरसा म्हटलं जातं. हे कोरोना काळात लिहिल्या गेलेल्या मराठी साहित्याकडे पाहता अधिक खरं वाटतं. आजचे साहित्यिक हे काळानुसार अधिक समाजाभिमुख होत असल्याचंही जाणवतं. मराठी साहित्याची पूर्वपरंपरा पाहता अशा आपत्तींचे पडसाद साहित्यात उमटलेले दिसून येतात.
यासाठी पहिला पुरावा मिळतो, तो जगद्गुरू संत तुकोबारायांच्या अभंगात. त्यांचा एक एक शब्द म्हणजे तोलामोलाचा. आजच्या काळालाही लागू होणारा. महाकवी म्हणून संत तुकाराम वैश्विक सत्य सांगतात.
दुष्काळाने होते नव्हते ते हिरावले. दिवाळे निघाले. आप्त गेले. घरदार बुडाले. तुकारामांनी भांबनाथ गाठला. महाचिंतन केलं. कर्जखतांना इंद्रायणीचा डोह दाखवला. दुष्काळाने त्यांच्यातला महाकवी जागा केला. आज त्यांची कविता ‘अभंग’रूपाने अक्षय राहिली. कोरोना हा तर ‘रात्रंदिवस वैरियाचा’ काळ. अवदसेचा काळ. तो त्यांनी साडेतीनशे वर्षांपूर्वीच बघितला.
समर्थ रामदासांनीही त्याच दुष्काळाला शब्दात बांधलं. पेशवाईत लढाचढाईचे पोवाडे निर्माण झाले. लावण्या बहरल्या. म्हणजे जे काही घडलं, ते साहित्याचा विषय बनलं.
अगदी १८५७ ला असाच दुष्काळ पडला. कृष्णराव भालेकर यांनी ‘दीनमित्र’मधून एप्रिल १८८८ ते जुलै १८८८ या काळात ‘बळीबा पाटील आणि १८५७ चा दुष्काळ’ या नावाने लिहिलं. ही मराठीतली पहिली ग्रामीण कादंबरी ठरली. खरंतर ही कादंबरी दुष्काळानंतर दहा वर्षांनी आली.
नंतर इसवी सन १८९७ चा दुष्काळ. या दुष्काळाच्या अहवालावरून हरिभाऊ आपटे यांनी ‘काळ तर मोठा कठीण आला’ ही कथा लिहिली. या सबंध लेखनामागे मानवी करुणा होती. किंबहुना हाच साहित्याचा स्थायीभाव आहे.
अशाच काही प्रेरणांनी स्वातंत्र्यसंग्राम चितारला गेला. उदा. व्यंकटेश माडगूळकरांची ‘वावटळ’ ही यातलीच एक. याचा अर्थ - लेखक ज्या काळात वावरतो, तो काळ अचूक पकडतो. तो स्वस्थ बसत नाही. कालांतराने का होईना, पण त्या काळाची प्रतिक्रिया देतो.
हेही वाचा : जयंत नारळीकर म्हणजे फळांनी लगडलेलं एक सफरचंदाचं झाडच!
कोरोना काळावर आलेल्या आजवरच्या साहित्याकडे पाहता कादंबरीचा क्रम पहिला येईल. कारण कादंबरी हा वाङ्मयप्रकार मोठा अवकाश पकडतो. व्यापकता हा तर कादंबरीचा मूलधर्म. कोरोनावर ‘लॉकडाऊन’ या एकाच शीर्षकाच्या तीन कादंबर्या प्रसिद्ध झाल्यात. या कादंबर्यांमधून कोरोनाचा भयकाळ येतो.
पहिली ज्ञानेश्वर जाधवर या बार्शी परिसरातल्या तरुणाची ‘लॉकडाऊन’ ही एक कादंबरी आहे. पुण्यात राहणारा एक इंजिनिअर तरुण लॉकडाऊन घोषित होताच, आपल्या बायको-मुलांसह गावी जायला निघतो. वाटेत दुचाकीचं पंक्चर काढून तो पुढची वाट धरतो. गावी पोचायला अगदी काही किलोमीटर अंतर उरलेलं असतं. सगळे जण या आनंदात असतात. तोवर चौकशीअंती सर्वांना क्वारंटाईन केलं जातं.
प्रत्यक्षात लॉकडाऊनचा पन्नास दिवसांचा काळ हा या कादंबरीचा बलस्थान ठरतो. नायकाच्या पत्नीच्या मृत्यूने कादंबरीचा शेवट करुण होतो. मानवी भावभावनांच्या होरपळीचं वास्तवचित्रण या कादंबरीत येतं.
अशाच काही घटनांचं उत्कट चित्रण डॉ. श्रीकांत पाटील यांच्या ‘लॉकडाऊन’ या कादंबरीत आहे. परसू नावाचा शेतकरी केंद्र असणारी ही गावकहाणी दर्दभरी होते. कोरोना काळात सर्वांच्या पोटाची काळजी करणारा शेतकरी हा खरा कोरोनायोद्धा आहे, हा विचार ही कादंबरी मांडते. यातल्या परसूच्या जोडीला त्याची पत्नी रखमा आणि त्याचे चार मित्र येतात. त्यांची गाव रक्षणाची जिद्द वाखाणण्याजोगी वाटते. कोरोना काळातल्या अनेक घटनांचा विचार या कादंबरीत केला आहे.
ज्येष्ठ साहित्यिक नागनाथ कोत्तापल्ले यांची याच शीर्षकाची कादंबरी ही तिसरी ठरते. एक मोठ्या उंचीचा लेखक आपल्या समकाळाकडे जितक्या व्यापक पद्धतीने बघतो, ते सगळं अगदी चिंतनशील आहे.
पुण्याच्या स्मिता देशपांडे यांची ‘अॅण्टिडोट’ ही कादंबरी ‘कोरोना, चीन आणि आणखी बरंच काही...’ या उपशीषर्कांतर्गत बर्याच गोष्टींविषयी खुलासा करते. एखाद्या विषाचा किंवा वायरसचा परिणाम रोखणारं द्रव्य म्हणजे अॅण्टिडोट होय. जागतिक स्पर्धा, चीनची महासत्तेची महत्त्वाकांक्षा, वुहानमधून सुरू झालेली साथ, औषधशास्त्र, बदलतं अर्थकारण आणि यास खतपाणी घालणारा वुहानमधला वायरस असे अनेक धागेदोरे उलगडते.
गुप्तहेराची कल्पित कथा आणि त्याद्वारे घेतलेला शोध, हा कोरोनामागचं ऐतिहासिक सत्य शोधणारा ठरतो. चिकित्सकपणा, उत्कंठावर्धक तपशिलाद्वारे कोरोना काळाचा व्यापक पट उभा राहतो.
‘बाबुरावांची कोरोनागाथा’ ही प्रा. रमेश साळुंखे यांची कादंबरी प्रकाशनाच्या वाटेवर आहे. या कादंबरीत बाबुराव हे मुख्य पात्र असून ते आपल्या शेजार्यापाजार्यांकडे आणि पर्यायाने समाजाकडे ज्या पद्धतीनं बघतं, त्यामुळे कादंबरीचं कथानक रोचक होतं.
या काळातला थीमबेस्ड कथासंग्रह अनुजा जगताप यांनी संपादित केला. ‘लव्ह इन द टाइम ऑफ करोना’ या नावाने तो प्रकाशित झाला. कोरोनावरचा हा मराठीतला एकमेव आणि पहिला कथासंग्रह होय. कोरोनाचा हाहाकार सुरू असतानाच काही निवडक लेखकांना ‘कोरोना आणि प्रेम’ ही थीम देण्यात आली होती.
नीरजा, गणेश मतकरी, परेश जयश्री मनोहर, प्रवीण धोपट, प्रणव सखदेव, श्रीकांत बोजेवार, मनस्विनी लता रवींद्र, हृषीकेश पाळंदे या आठ लेखकांच्या नातेसंबंध आणि प्रेम या थीमवर आधारित आठ कथांचा समावेश या संग्रहात करण्यात आला.
मराठीत अपवादभूत ठरावी अशी ही प्रयोगशील निर्मिती आहे. विषय देऊन लेखकांना लिहायला प्रवृत्त केलं जातं आणि हा प्रयोग यशस्वीही होतो, याचा उत्तम नमुना म्हणूनही याकडे बघता येईल.
हेही वाचा : यशवंत मनोहर, सरस्वती आणि फेसबूकवरची चर्चा
ज्येष्ठ लेखक रा. रं. बोराडे यांची ‘माझं गाव माझी माणसं’ ही कथा शब्दशिवारच्या दिवाळी अंकात आहे. शहरातून गावाकडे बळीरामतात्या-प्रयागा काकी येतात. नियमाप्रमाणे त्यांना क्वारंटाईन करण्याचा प्रसंग उद्भवतो. आपल्याच मातीतली माणसं अशी का वागतात? या प्रश्नानं दोघं अस्वस्थ होतात. शेवटी आपलीच माणसं आपल्या साहाय्यास येतात, अशा सुखद आशयाने ही कथा पूर्ण होते.
डॉ. मृदुला बेळे यांचं ‘कोरोनाच्या कृष्णछायेत’ हे पुस्तक विषयाच्या सुसूत्र मांडणीमुळे वाचनीय ठरतं. लेखिका स्वत: जवळपास दोन दशकं औषधनिर्मितीच्या क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यामुळे अत्यंत अभ्यासपूर्ण मांडणी, मानवी संघर्षाची कहाणी लेखिकेने यात सांगितलीय.
जगभर घोर टाळेबंदी झाली. अर्थव्यवस्था कोलमडली. अशा कठीण काळातसुद्धा माणसं झगडत राहिली. पण, जग ठप्प होण्याचा चांगला परिणाम म्हणजे पर्यावरण सुधारलं, प्रदूषणात घट झाली, आकाश निरभ्र झालं. साथ हा निसर्गाचा उद्रेक आहे, हे लेखिकेचं ठाम मत असून कोरोना ही जरी कृष्णछाया असली तरी, हे ग्रहण लवकरच सुटणार आहे, हा आशावाद लेखिकेने व्यक्त केलाय.
हाच आशय विस्तृत करणारी आणखी काही पुस्तकं या काळात आली. ‘करोना’सोबत जगताना’ हे डॉ. धनंजय केळकर आणि डॉ. समीर जोग यांचं पुस्तक, सामान्य लोकांच्या मनातली कोरोनाची भीती दूर करतं. शेखर देशमुख यांच्या ‘उपरे विश्व’मधलं मानवी जगणं आणि उपरेपणाची भावना याची गुंफण भावते. शाश्वतता समजावता समजावता हे पुस्तक जगणं शिकवतं. विश्वाच्या ढवळून निघण्याचा अर्थ या पुस्तकाच्या नावातूनच सूचित होतो.
अर्थतज्ज्ञ डॉ. जे. एफ. पाटील यांचे ‘कोरोनायण’ हे पुस्तक. या काळातल्या अर्थपरिणामांचा ऊहापोह करणारं ठरतं. ‘सेवारती’ हे डॉ. दिलीप शिंदे यांचं पुस्तक अनुभवांची गोष्ट सांगतं. कोरोना काळात अंथरुणाला खिळलेल्या वृद्धांची सेवा करणार्या सेविका आणि डॉक्टर यांच्या भावस्थितीचं दर्शन घडवतं. संवेदनांची अनुभवसिद्ध कहाणी सांगतं.
मनोविकारतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांचं ‘करण्याचे दिवस, कळण्याचे दिवस’ हे ऐन कोरोना काळातलं महत्त्वाचं पुस्तक ठरलं. मानसिकद़ृष्ट्या खचलेल्यांना नवा विचार आणि धीर देणारं ठरलं. स्वत: पत्रकार असणार्या गौरी कानिटकर यांच्या ‘जग थांबतं तेव्हा... लॉकडाऊन काळातल्या नोंदी’ या पुस्तकात १७ मार्च ते ३१ जुलै २०२० या काळातल्या डायरीवजा नोंदी येतात. आपल्याच भवतालाकडे अत्यंत सजगपणे पाहिलं गेलंय.
‘चौकात उधळले मोती’ हे अंबरीश मिश्र यांचे पुस्तक. या पुस्तकाच्या निर्मितीमागील कहाणीही तितकीच महत्त्वाची वाटते. घरात बसून उर्दूचा अभ्यास करता करता मिश्र यांना उर्दूवर लिहावं वाटलं नि त्यातून या पुस्तकाची निर्मिती झाली. यात उर्दूकडे अत्यंत डोळसपणे पाहिलं गेलंय.
सचिन बनछोडे यांचं दैनिक ‘पुढारी’तल्या तीस लेखांचं ‘गाथा कोरोनाची’, कॉम्रेड विलास रणसुभे यांचं ‘कोरोना-मुस्लिमांना हिंदूंना केलेली मदत’, संदीप पाटील आणि भारतभूषण गिरी यांचे ‘नोवेल कोविड’ आणि गुरुबाळ माळी यांचे ‘कोरोना अनलॉक’ ही चार पुस्तकं कोल्हापुरातून याच काळात प्रकाशित झाली.
याशिवाय 'कोरोनानंतरचे जग' हा प्राचार्य डॉ. प्रकाश कुंभार यांनी संपादित केलेलं ६१५ पानांचा संदर्भग्रंथही कोल्हापुरातूनच आलाय. यात राज्यभरातल्या महत्वाच्या तज्ञांचे लेख एकत्रित केलेत.
कवी विजय चोरमारे यांची ‘निर्जंतुकीकरण केलं जातंय माणसांचं’ ही कविता रस्त्यावरच्या माणसांच्या सबंध आयुष्यालाच कायमची टाळेबंदी लागणार आहे, असा व्यवस्थाविचार मांडते. लोकनाथ यशवंत, श्यामसुंदर मिरजकर यांनी या काळाची गती नेमक्या शब्दांत व्यक्त करणार्या, सामान्यांचा उद्गार ठरणार्या कविता लिहिल्या.
सुनील पांडेचं ‘लॉकडाऊनच्या कथा’, डॉ. अनिल गांधी यांचं ‘युद्ध कोरोनाशी’, शशिकला उपाध्ये यांची ‘कोरोना डायरी’, डॉ. अविनाश भोंडवे यांचं ‘कोरोनाचा चक्रव्यूह’, सुनील माळी यांचं ‘परग्रहावरून कोरोना आणि...’ अशी इतर काही लक्षणीय पुस्तकं या काळात प्रसिद्ध झालीयत.
कोरोना भयकाळाचं जे चित्रण आलं, त्याला कुणी तत्कालीन रिअॅक्शन म्हणेल. कुणी आणखी काही. पण मराठीत असं चित्रण येणं, ही गोष्ट मोठीच मानावी लागेल. सोशल मीडियावर तर अनेकांना व्यक्त होता आलं. वेबसीरिज याची उत्तम उदाहरणं ठरतील. पण, या काळाची लिखित नोंद झाली, हा या काळाचा दस्तऐवजच झाला.
यानिमित्ताने वैद्यकीय क्षेत्रातल्या, वृत्तपत्रामधल्या, साहित्य क्षेत्रातल्या, विविध स्तरात वावरणारे सजग लोक लिहिते झाले. अनेक शंकाकुशंकांना या काळात निर्माण झालेल्या साहित्याने छेद दिला. काही शब्द पुन्हा वापरात आले.
एक साथ येते, सबंध विश्व व्यापते. मानवजात तिच्या सावटाखाली आल्यावर तिचं काय होतं, याचा शोध हे साहित्य घेतं. या काळाची बखर होणं, हे साहित्यासाठी आशादायक चित्र आहे. येत्या काळात यासंबंधी आणखी नवं काही निर्माण होत राहील, ही शक्यता नाकारता येत नाही.
हेही वाचा :
इफ्फी : देशविदेशांच्या सिनेमांचा कॅलिडोस्कोप
मनोरंजन ब्यापारी: रिक्षा चालवत ते जगप्रसिद्ध लेखक बनलेत
पाचवीला पुजलेल्या प्लेग लॉकडाऊनमुळेच जगाला शेक्सपिअर मिळाला!
करण्याचे दिवस, कळण्याचे दिवस : मानसिक आरोग्य मोजण्याचा थर्मामीटर