कोरोना काळात मुलांचा अभ्यास ऑनलाईन झालाय. त्यांचा स्क्रिन टाइमही वाढलाय. डोळ्यांच्या तक्रारींनी मुलं कुरकुरतायत. स्क्रिनचा मुलांच्या डोळ्यांवर ताण येणार नाही यासाठी काही सोप्या गोष्टी करता येतील. मुलांच्या डोळ्यांची काळजी कशी घ्यायची याच्या या टीप्स डोळ्यात तेल घालूनच वाचायला हव्यात.
आजच्या पिढीतली मुलं श्वास घेण्याइतकी सहज टेक्नॉलॉजी वापरतात. कम्प्युटर असो, टॅबलेट असो किंवा मोबाईल ही सगळी टेक्नॉलॉजी आपल्यापेक्षा चांगल्याप्रकारे या मुलांना वापरता येते. जन्मल्यापासूनच ही टेक्नॉलॉजी त्यांच्या जवळपास असते. पण ही टेक्नॉलॉजी वापरण्यासाठी लागणारे साजेसे डोळे मात्र त्यांना जन्मापासून मिळालेले नाहीत. त्यामुळेच या टेक्नॉलॉजीचा अतिवापर केला तर त्याचे वाईट परिणाम डोळ्यांवर होतात.
कोरोना वायरसच्या संक्रमणानं या टेक्नॉल़ॉजीचा अतिवापर करायला आपल्याला भाग पाडलंय. शाळा, कॉलेज बंद झाल्यामुळे सगळे वर्ग ऑनलाईन भरतायत. ऑनलाईन वर्गात घेतला जाणारा अभ्यास समजत नाही म्हणून अनेक मुलं लर्निंग प्लॅटफॉर्मवर शिकतात. वीडियो, पीपीटी, चित्रं या स्क्रिनवरच्याच गोष्टी म्हणजे मुलांचा अभ्यास. शिवाय, घराबाहेर जाता येत नाही म्हणून पुन्हा मोबाईल किंवा कम्प्युटर गेमकडेच मुलं वळतात. त्यामुळे आता आपल्या मुलांच्या डोळ्यांची काळजी कशी घ्यायची याची काळजी पालकांना लागून राहिलीय.
हेही वाचा : कशी करायची ई-लर्निंग प्लॅटफॉर्मची निवड?
लॅपटॉप, कम्प्युटर महाग असतात. त्यामुळे बहुतेक पालक आपल्या मुलांना अभ्यासासाठी मोबाईल किंवा फार तर टॅब आणून येतात. या दोन्ही गोष्टी डोळ्यांच्या अगदी जवळ घेऊन वापरायच्या आहेत. खूप जवळ घेऊन एखादी गोष्ट खूप काळ वापरत असू तर मायोपिया होण्याची शक्यता असते. या आजारात लांबच्या गोष्टी धूसर दिसू लागतात. ते सुधारण्यासाठी चष्मा, लेन्स वापरण्याची गरज पडते.
रोजच्या जगण्यात एका दिवसांत आपण अनेक गोष्टी वेगवेगळ्या अंतरावरून पाहत असतो. आपल्या डोळ्याचा फोकस सतत बदलत राहतो. पण एकाच अंतरावरून खूप वेळ आपल्याला एकाच स्क्रिनकडे पहावं लागतं. आपल्या डोळ्याचा फोकस एकाच जागी स्थिर राहतो. यामुळे डोळ्याच्या स्नायूंवर ताण येतो आणि ते कमजोर होतात. शिवाय, स्क्रिनकडे बघताना विषेशतः लहान मुलं मग्न होऊन जातात. त्यात आपण डोळे मिचकवायचं विसरतो.
डोळे मिचकवणं हे इतरवेळी अगदी नैसर्गिक आणि सहज होत असतं. यामुळे डोळ्यातला ओलावा टिकून राहतो. पण स्क्रिनकडे पाहताना डोळे मिचकवायचं विसरलो की डोळे कोरडे पडतात आणि तो कोरडेपणा घालण्यासाठी डोळ्यातून खूप पाणी येतं. अशात अंधाऱ्या खोलीत आपण स्क्रिनकडे पाहत बसलो असू तर त्यातल्या किरणांमुळे डोळ्याच्या पडद्याला इजा पोचते.
स्क्रिनच्या या दुष्मपरिणांमुळे अनेक लहान मुलांमधे डोळ्यांचे आजार, लहान वयात चष्मा लागण्याचं प्रमाण वाढलंय. त्यामुळेच मुलांनी जास्तीत जास्त किती वेळ स्क्रिन वापरावी, असा प्रश्न अनेक पालक डॉक्टरांना विचारतायत आणि मुलांनी अजिबात स्क्रिनकडे पाहू नये असं याचं साधं सोपं उत्तर आहे.
अमेरिकेच्या पिडिऍट्रिक्स अकेडमीनं २ वर्षांखालील मुलांच्या हातात अजिबात स्क्रिन देऊ नये असा सल्ला दिलाय. कोणत्याही प्रकारची डिजीटल कृती या वयातल्या मुलांसाठी त्यांनी नको म्हणून सांगितलीय. २ ते ६ वर्षांच्या मुलांना फार फार तर १ तास आणि ७ वर्षांच्या पुढच्या मुलांसाठी २ तास पालकांच्या देखरेखीखाली इंटरनेट वापरायला दिलं जावं असंही त्यांनी सुचवलं आहे. फक्त मुलांनी नाही तर मोठ्या माणसांनीही आपण किती वेळ स्क्रिनसमोर घालवतो हे तपासणं गरजेचंय.
असं असलं तरी आता लहान मुलं एक दोन नाही तर जवळपास ५-६ किंवा अनेकदा त्यापेक्षा जास्त काळ त्यांना स्क्रिनसमोर घालवावा लागतोय. ही स्क्रिन आपल्या रोजच्या कामांसाठी, अभ्यासासाठी, शिक्षणासाठी इतकी अनिवार्य झालीय की त्याचा वापर टाळणं शक्यच नाहीय. अशावेळी आपला स्क्रिनकडे बघण्याचा वेळ जास्तीत जास्त कमी ठेवणं आणि स्क्रिनकडे पाहताना काही काळजी घेणं या गोष्टी करायला हव्यात.
हेही वाचा : आता वीडियो भेटही प्रभावीपणे व्हायला हवी!
ऑनलाईन क्लासला किंवा अगदी कम्प्युटरवर गेम खेळायला मुल बसलं तरी त्याची बसण्याची पद्धत सुधारायला हवी. डोळ्यांच्या खूप जवळ मोबाईल, लॅपटॉप किंवा टॅब असणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. डोळे आणि स्क्रिन यांच्यात कमीत कमी १८ ते २४ इंचाचं अंतर हवं. शिवाय, डोळ्यांना समांतर अशी स्क्रिन असेल तर खाली मान घालून किंवा मान दुखेस्तोवर वर पाहत मुलांना अभ्यास करायला लागणार नाही.
मुलं असो किंवा मोठी माणसं स्क्रिनकडे २० मिनिटांपेक्षा जास्त कुणीही पाहू नये. २० मिनिटांनंतर स्क्रिनपासून आपण एक ब्रेक घेतला पाहिजे. हा ब्रेक कमीतकमी २० सेकंदांचा तरी असायला हवा. या २० सेकंदांत आपल्यापासून निदान २० फूट लांब असणाऱ्या गोष्टींकडे बघायला हवं. हिरवी झाडं, हिरवा रंग याकडे बघण्याची सवय लावून घ्यायला हवी. हा २०-२०-२० चा फॉर्म्युला सगळ्यांनीच लक्षात ठेवण्यासारखा आहे.
कोणतीही स्क्रिन वापताना त्याचा ब्राईटनेस किंवा स्क्रिनचा प्रकाश हा कमीत कमी राहिल याची काळजी घ्यावी. हा ब्राईटनेस बाहेरच्या प्रकाशाशी मॅच व्हायला हवा. ब्राईटनेसमधे मूल स्क्रिनकडे पाहत असेल तरी त्याचा त्रास होऊ शकतो. शिवाय, मूल ज्या खोलीत बसलंय त्या खोलीच्या प्रकाश व्यवस्थेकडे विशेष लक्ष द्यायला हवं. त्याच्या डोळ्यावर थेट लाईट पडणार नाही, याचीही काळजी घ्यायला हवी.
माणसं साधारणपणे एका मिनिटांत १० ते १४ वेळा डोळे मिचकवतात. पण स्क्रिनकडे पाहताना कधी कधी वाचतानाही आपण डोळे मिचकवायचं विसरून जातो. अचानक डोळ्यांचं मिचकवणं बंद झाल्यामुळे डोळ्यांना खाज सुटते, डोळे कोरडे होतात. त्यामुळे स्क्रिन वापताना नैसर्गिकपणे डोळे मिचकवले जातायत ना याकडे लक्ष द्यायला हवंच. शिवाय, ३० मिनिटांत निदान १० वेळा शांतपणे डोळे बंद करून उघडायचे आहेत, अशी सूचना मुलांना द्या.
हेही वाचा : ऑनलाईन शिक्षणाचा ध्यास घेणाऱ्या शिक्षकांना ‘नितळी’च म्हणायला हवं
जेवणाचा परिणाम डोळ्यांवर होतो हे तर सगळ्यांनाच माहिती आहे. स्क्रिनसमोर बसणाऱ्या मुलांच्या पोटात गाजर, कोबी, आंबे, सफरचंद, कलिंगड या गोष्टी जातायत याची काळजी घेतली पाहिजे.
याशिवाय घराबाहेर जाता येत नसेल तरी घरातच निदान १ तासाचा शारीरिक व्यायाम मुलांकडून करून घेतला पाहिजे. डोळ्यांसाठी काही वेगळे व्यायामही उपलब्ध असतात. काही योगासनांचाही डोळ्याच्या आरोग्यावर चांगला परीणाम होतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, मुलांची झोप व्यवस्थित पूर्ण व्हायला हवी. अपुऱ्या झोपेतून उठून मुलं स्क्रिनसमोर बसली की त्याचा ताण डोळ्यांवर पडणारच.
थोडं खा, पौष्टीक खा, थोडा व्यायाम करा आणि पुरेशी झोप घ्या हेच आपल्याला कोरोना संपेपर्यंत आणि त्यानंतरही करायचं आहे. याशिवाय, रात्री मुलांच्या डोळ्यात ड्रॉप्स घालणं, त्यांना डोळ्यांवरची औषधं देणं असंही करता येईल. पण त्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा.
हेही वाचा :
कोरोना वायरसबद्दल मुलांशी आपण कसं बोलायचं?
आपली ओळख का लपवत होता हा 'बिहार का बेटा'?
मराठा आरक्षण पुन्हा मिळवण्यासाठी काय करता येईल?
मतीन दिवाण: गांधीवादाशी प्रामाणिक ध्येयनिष्ठ कार्यकर्ता