कोरोनाची माहिती नको, पण फेक न्यूज आवर!

१७ जून २०२०

वाचन वेळ : ६ मिनिटं


भीक नको पण कुत्रा आवर अशी एक म्हण आपल्याकडे आहे. तशीच गत कोरोना वायरसबद्दलच्या माहितीची झालीय. साथरोगाशी लढण्यासाठी लागणाऱ्या खऱ्या विश्वसनीय माहितीऐवजी फेक न्यूजचाच जास्त सुळसुळाट झालाय. फेक माहितीच्या या रोगाला डब्लूएचओनं माहितीचा साथरोग म्हणजेच इन्फोडेमिक असं नाव दिलंय. हा इन्फोडेमिक थांबवायचा तर सामान्य माणसालाही त्याविरोधात काम करावं लागेल.

१) जपानमधले तासुको होंजो नावाच्या मेडिसिन शिकवणाऱ्या डॉक्टरांच्या मते, कोरोना वायरस हा नैसर्गिक नाही. हा वायरस नैसर्गिकरित्या तयार झाला असता तर तो चीनसारखं वातावरण असलेल्या देशांमधेच टिकू शकला असता, असं त्यांचं म्हणणं आहे.

२) हार्दिक अभिनंदन! देशाच्या लष्कराइतकंच मोठं काम आता देशातले व्यापारी करू लागलेत. दिल्लीतल्या व्यापाऱ्यांनी स्वतः तोटा पत्करून दीड कोटी रुपयांच्या चीनी मालाची ऑर्डर रद्द केली.

३) कोरोना कसा जाईल ते श्रीकृष्णाने सांगून ठेवले आहे. वाचा पूर्ण कथा.

४) ज्योतिषशास्त्राप्रमाणे कोरोना साथरोग २० सप्टेंबरपर्यंत जाणार नाही. पण याकाळात प्रत्येक राशीला कोणते दिवस त्रासाचे आहेत त्याचा अभ्यास पाठवत आहे.

आपल्या सगळ्यांच्याच वॉट्सअपमधे नातेवाईकांचा एक ग्रुप असतो. दूरदूरचे जवळचे सगळे नातेवाईक या ग्रुपमधे असतात. या ग्रुपमधे कोणत्या प्रकारचे मेसेज फॉरवर्ड होत असतात त्याची चार उदाहरणं वर दिलीत.

हेही वाचा : तुम्हाला कोरोना फेक न्यूज रोगाची लागण झालेली नाही ना?

आपण माहितीच्या साथरोगाशी लढतोय

कोरोना साथरोगाशी सामना करायचा, त्याचा प्रसार थांबवून आधीसारखं जगता यावं यासाठी प्रयत्न करायचे तर त्याबद्दल सगळी माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे. या वायरसची लागण कशी होते, त्याची लक्षणं कोणती, किती दिवसांत लक्षणं दिसतात, हात का धुवायचे वगैरे सगळीच्या सगळी माहिती देशातल्या प्रत्येक छोट्यामोठ्या माणसाला माहीत असायला हवी. आणि हे शेअर करण्याचं सगळ्यात सोयीचं ठिकाण म्हणजे सोशल मीडिया.

पण प्रत्यक्षात होतंय उलटंच! सोशल मीडियावर कोरोनाबद्दलची उपयुक्त माहिती शेअर होण्यापेक्षा फेक न्यूज, खोटी किंवा अर्धवट बातमी, अफवा यांचीच गर्दी जास्त झालेली दिसते. जागतिक आरोग्य संघटना अर्थात डब्ल्यूएचओनं या साऱ्या परिस्थितीला इन्फोडेमिक असं म्हटलंय. ‘आपण फक्त कोरोना या साथरोगाशी लढत नाहीत. तर इन्फोडेमिकशीही लढतोय. वायरसपेक्षा फेक न्यूज जास्त वेगाने आणि सहजपणे पसरते,’ असं डब्ल्यूएचओचे महासंचालक टेड्रॉस अधानोम यांचं म्हणणं आहे. मार्च महिन्यात फॉरेन पॉलिसी अँड सिक्युरिटीच्या तज्ञांसोबत जर्मनीत झालेल्या मिटिंगमधे ते बोलत होते.

कोरोनासारख्या जगभर पसरलेल्या साथरोगाला इंग्लिशमधे पँडेमिक म्हणतात. तसंच, आता हा फेक न्यूजच्या वायरसला इन्फोडेमिक म्हणजेच माहिती साथरोग असं नाव दिलंय. डब्ल्यूएचओच्या म्हणण्यानुसार, मूळ प्रश्नाचं उत्तर शोधणंच अवघड होऊन जावं इतकी माहिती चहुबाजुंनी येत असेल तर त्या स्थितीला इन्फोडेमिक असं म्हणता येईल. या घटनेत वायरसबरोबरच आरोग्याच्या गोष्टींबाबत चुकून किंवा मुद्दाम अर्धवट माहितीचा आणि अफवांचा प्रसार होतो.

भडका उडवणारं इंधन

अशा चुकून पसरवलेल्या माहितीमधे अनेक प्रकारचे घरगुती उपायही येतात. कोरोना वायरससाठी जुन्या आयुर्वेदातल्या गोष्टी कामाला येतात, अमकी अमकी गोष्ट खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते किंवा गरम पाणी आणि लिंबू प्यायल्याने वायरस घशातच मरतो यासारख्या वैज्ञानिक वाटणाऱ्या गोष्टी खरंतर वायरसविरोधातल्या लढाईत अडथळा आणणाऱ्या असतात. त्यातून वायरस अजून पसरण्याचीही शक्यता असते.

तसंच, चीनने त्यांच्या प्रयोगशाळेत वायरस निर्माण करून षड्यंत्र रचल्याचा  सिद्धांत मांडणं, ५ जी सेल टॉवरमुळे वायरसचा प्रसार होतो किंवा बिल गेट्स यांना लसीच्या माध्यमातून लोकांच्या शरीरात चीप सोडायची आहे म्हणून ते लसीकरणाला आर्थिक मदत करतायत असल्या फेक न्यूजचा आरोग्यावर विपरित परिणाम होतोय. देशांच्या सार्वजनिक आरोग्यावरच नाही तर राजकारणावर, लोकांच्या राहणीमानावरही हा परिणाम होत असतो.

द कन्वर्सेशन या वेबपोर्टलवर उपलब्ध माहितीनुसार तर यातून झेनोफोबिया म्हणजे दुसऱ्या देशांतल्या माणसांबद्दल तिरस्काराची भावना वाढीस लागते. कोरोनाच्या प्रसारानंतर मंगोलियन वंशाच्या लोकांवर थुंकल्याच्या किंवा त्यांची छेड काढल्याच्या घटना घडल्याचं आपल्या वाचनात आलं असेल. शिवाय विशिष्ट धर्माचे लोक हा वायरस मुद्दाम पसरवतायत असंही सांगण्यात येतंय. यासारख्या अफवा, मिथकं आणि अतिशोयक्ती करून सांगितलेल्या गोष्टीच आगीचा भडका उडवण्यासाठी इंधन म्हणून काम करत असतात.

हे कोरोना स्पेशलही वाचा : 

साथीच्या आजारात सारं जग समाजवादी वळण घेतं

डॉक्टरांनी घातलेला सूट म्हणजे कोरोनाविरूद्धचं चिलखतच!

कोविड-१९ आजारावर औषध नसताना पेशन्ट बरं कसं होतात?

कोरोनाला रोखण्यासाठी तैवानकडून आपण काय शिकलं पाहिजे?

एकदा बरं झाल्यावरही पेशंटला का होतेय पुन्हा कोरोनाची लागण?

किराणा दुकानातून आपण कोरोनाला घरी नेण्यापासून कसं वाचू शकतो?

आलेख सपाट करायचाय

अनेकदा काहीजण इंटरनेटवर वायरसबद्दलचे जोक किंवा मीम मजा म्हणून शेअर करतात. मुद्दाम कुणाला त्रास व्हावा या हेतूने हे मीम वायरल केले जात नसले तरी त्यातून चुकीची माहिती पसरण्याचा धोका असतोच. किंवा अनेकदा अशा जोक आणि मीममुळे कोरोनाबद्दलच्या माहितीचा गोंधळ वाढतो. या सगळ्याचा इतका त्रास लोकांना होतोय की कोरोना वायरसबद्दल आता काहीही माहिती नको, पण तो इन्फोडेमिक आवर असं म्हणायची वेळ आलीय.

साथरोगाच्याच भाषेत सांगायचं तर डब्ल्यूएचओ आणि इतर संस्था या इन्फोडेमिक वायरसची लागण होणाऱ्या पेशंटचा उंचावत जाणारा आलेख सपाट कसा करायचा याच्याच मागे लागलेत. डब्ल्यूएचओने तर कोणती बातमी, पोस्ट वैज्ञानिक किंवा खरी आहे आणि कोणती खोटी याची शहानिशा करण्यासाठी मिथबस्टर नावाची एक टीमच बनवलीय. ही टीम फेसबूक, गुगल, पिनइन्टरेस्ट, ट्वीटर, टिकटॉक, यूट्यूब आणि यासारख्या अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लक्ष ठेवून आहे.

अत्यंत ताकदीने ही टीम काम करत असते. सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लक्ष ठेवून कुणी वायरसबद्दल कोणतीही खोटी बातमी, अफवा किंवा मुद्दाम तिरस्कार पसरवताना दिसलं तर त्याची माहिती किंवा पोस्ट डिलिट केली जाते. तसंच, अनेकदा अशी माहिती पसरवणारं अकाऊंटही ब्लॉक केलं जातं. अनेकदा त्या फोटोवर किंवा माहितीवर ती फेक असल्याचा ठपकाही ठेवला जातो.

यूएननंही पुकारलं बंड

आपल्याकडे अनेक ऑनलाईन वेबपोर्टल किंवा पेपरच्या ऑनलाईन आवृत्त्यांमधे फॅक्ट चेकिंगसाठीही काही माणसं नेमलेली असतात. काही वेबसाईट तर फक्त बातम्या खऱ्या आहेत की खोट्या याचं फॅक्ट चेकिंग करण्याचंच काम करत असतात. डब्ल्यूएचओसुद्धा आपल्या ईपीआय डब्लूआयएन या नेटवर्कमधून हे काम करत असते. शिवाय, तंत्रज्ञान तज्ञांना इंटरनेटवरून अशी चुकीची माहिती काढून टाकण्याचं आणि योग्य, विश्वसनीय माहिती देण्याचं कामही दिलेलं असतं.

गुगलकडून युट्यूब, गुगल मॅप्स अशा अॅप्समधून खोटी बातमी काढण्याचं काम सुरू आहे. वायरसबद्दल माहिती मिळवण्यासाठी एखाद्याने की वर्ड शोधला तर त्या समोर वायरसबद्दल योग्य माहिती यावी याची खबरदारी ट्विटरवर घेतली जातेय. वॉट्सअप आणि फेसबुक मेसेंजरवर डब्ल्यूएचओ नजर ठेवून आहे. तिथे लोकांना हेल्थ अलर्टही दिला जातो. त्यात कोरोनाबद्दलची योग्य माहिती असते.

युनायटेड नेशन्सही फेक न्यूजविरोधात बंड पुकारलंय. खोटी बातमी तपासण्यासाठी त्यांनी ४५ देशांतल्या १०० माणसांना फॅक्ट चेकर म्हणून तैनात केलंय. या सगळ्या संस्था हे काम अत्यंत कसोशीने करतायत. पण तरीही इन्फोडेमिक नियंत्रणात येताना दिसत नाही. असं का? कारण या संस्थांसोबत आपण सामान्य माणसं काहीच प्रयत्न करत नाहीत.

हेही वाचा : बाबासाहेबांनी कधी न दिलेली फेक मुलाखत छापून येते तेव्हा,

इन्फोडोमिक थांबवण्याचे ५ मार्ग

कोरोना वायरसला थांबवण्यासाठी आपण सगळी खबरदारी घेतो. घराबाहेर पडत नाही, दिवसांतून अनेकवेळा हात धुतो, शारीरिक अंतर पाळतो, मास्क वापरतो, शेजारीपाजारी कुणी आजारी असेल तर त्याची माहिती लगेचच सरकारी अधिकाऱ्यांना देतो. पण आपल्या डोळ्यांदेखत कुणी इन्फोडेमिकचा वायरस पसरवत असेल तर त्याला आपण काहीही म्हणत नाही. आपल्या या चुप्पीमुळे, अंगावर जबाबदारी न घेण्याच्या वृत्तीमुळेच हा वायरस अधिकाधिक पसरतोय.

खरंतर, फेक न्यूज ओळखणं खूप सोपं आहे. आपण स्वतः ते काम करू शकतो. किंवा अगदी गुगलवर ती माहिती टाकली तरी कुठल्यातरी वेबसाईटनं केलेलं फॅक्टचेक आपल्या समोर येतं. पण इतक्यावरच थांबून चालणार नाही. तर खोटी बातमी कुठली हे कळल्यानंतर खरी बातमी किंवा खरी माहिती काय हेही शोधून काढायला हवं. त्यासाठी आरोग्य खात्याच्या वेबसाईट, कोविड १९ अलर्ट ऑन गुगल, डब्ल्यूएचओ किंवा युएनसारख्या वेबसाईटचाच आधार घ्यायला हवा.

आपल्यासमोर येणाऱ्या कुठल्याही बातमीवर पटकन विश्वास ठेवायचा नाही हे पक्क लक्षात ठेवायला हवं. द कन्वर्सेशन या वेबसाईटवरच्या एका लेखात इन्फोडेमिक रोखण्याचे पाच उपाय दिले गेलेत.

१. आपण सोशल मीडियावर काहीही वाचलं तरी त्याकडे चिकित्सक पद्धतीने पाहायला हवं.

२. बातमी खोटी आहे असं समजलं तर ती तिथेच सोडून देऊ नका. ती बातमी शेअर करणाऱ्या माणसाला ती काढून टाकण्यासाठी आपण नम्रपणे विनंती करू शकतो.

३. त्याने ती बातमी काढली नाही तर अधिकाऱ्यांकडे किंवा पोस्टवर जाऊन त्या माहितीची तक्रार करता येऊ शकते.

४. बातमीबद्दल शंका आली तर स्वतः ती बातमी खरी आहे की खोटी याची तपासणी करायला हवी.

५. खोटी बातमी पसरवणाऱ्यांपेक्षा जास्त जोरात, जास्त वेगाने आपण खरी बातमी पसरवायला हवी.

अशाप्रकारे सावध राहून आपण सोशल मीडियावर वावरलो तर कोरोनाबद्दलची योग्य माहितीही आपल्याला मिळेल त्यासोबत इन्फोडेमिकपासून आपली सुटकाही मिळेल.

हेही वाचा : 

वारी चुको नेदी हरी

तू देवमाणूस आहेस, की खराखुरा देवच?

चीन कधीच जगावर सत्ता गाजवू शकत नाही, कारण

युद्धात जिंकणाऱ्या अमेरिकेला कोरोना का हरवतोय?

जीवघेणा लॉकडाऊन संपवण्याचे चार साधेसरळ मार्ग

सुपर स्प्रेडर म्हणजे काय? ते मुद्दाम कोरोना पसरवतात का?

विटॅमिन डीच्या कमतरतेमधे दडलंय देशांच्या वेगवेगळ्या मृत्यूदराचं गुपित?

पंतप्रधान म्हणाले ते Y2K संकट, ही तर २१ व्या शतकातली पहिली ग्लोबल फेक न्यूज