आपल्या मुलांसाठी डाएट प्लॅन गरजेचा की हेल्दी लाईफ प्लॅन?

०६ जून २०१९

वाचन वेळ : ६ मिनिटं


आजपासून आपण डाएट करूया असं ठरवलं की खरंच होतं का आपलं डाएट? खरंतर काही दिवसांतच आपला उत्साह निघून जातो. तसं मुलांना आपण कितीही सांगितलं तरी त्यांच्या जीभेवरची जंक फूडची चव कशी जाणार? आता सरकार यावर काम करतंय. पण त्यासाठी आपण आणि मुलांनी एकत्र येऊन आपलं एकूणच लाईफ हेल्दी बनवण्यासाठी प्लॅन केलं पाहिजे.

शाळेच्या डब्यात चपाती, भाजी न्यायला मुलांना आवडतं नाही ना. तरीही नाईलाज म्हणून आपण नेतो. कारण रोज बाहेरचं खाऊ शकत नाही. पण लहान मुलं हट्ट करून आज कॅंटीनमधे खातो असं म्हणू शकतात किंवा आज काहीतरी वेगळं दे, असा हट्ट धरतात. मग आपणही काहीतरी इंन्स्टट पाकिटातलं बनवून देतो. पण हेच चमचमीत आणि यम्मी यम्मी पदार्थ आपल्या मुलांसाठी धोकादायक ठरताहेत.

काय होतं जीभेवरचा कंट्रोल सुटल्यावर?

आपल्या सगळ्यांनाच माहितीय की पौष्टीक आहार किती गरजेचा आहे. त्यात काय खाल्लं पाहिजे यावर प्रत्येकजण लेक्चर देऊ शकतो. तरीही आपण स्वत: आणि आपल्या मुलांना अनहेल्दी पदार्थ खायला देतो. कारण आपला आपल्या जीभेवर कंट्रोलच नाहीय.

त्यामुळे मुलांमधे अतिलठ्ठपणा आणि मधुमेहासारखे आजार बळावू लागलेत. यामागे एचएफएसएस म्हणजे हाय फॅट, सोडीअम आणि शुगर हे कारण आहे. याचा अर्थ जास्त प्रमाणात फॅट, मीठ आणि साखर असलेले पदार्थ खाल्ल्याने आपल्या मुलांना वेगवेगळे आजार होतात. आपल्याकडे भारतात तर या आजारांचं प्रमाण गेल्या दोन वर्षांमधे ४५ टक्क्यांनी वाढलं असल्याचं मार्केट रिसर्च करणाऱ्या स्टॅटेस्किका कंपनीच्या  अहवालात म्हटलंय. 

आता शाळांमधे नो जंकफूड

म्हणूनच शेवटी मुलांच्या अन्न पदार्थांच्या सेवनावर वचक बसवण्यासाठी २०१० मधे दिल्ली हायकोर्टाने देशातल्या शाळा, कॉलेजमधल्या मुलांना सुरक्षित, स्वच्छ आणि पोषक आहार मिळावा यासाठी गाईडलाईन बनवण्याचे निर्देश दिले. याच्या आधाराने एफडीए म्हणजेच महाराष्ट्र सरकारच्या अन्न आणि औषध प्रशासन विभागाने स्कूल अँड कॉलेज फुड प्रोजेक्ट बनवलाय. याची अंमलबजावणी येत्या ऑगस्टपासून होणार आहे.

या प्रोजेक्टचा पहिला टप्पा मुंबईतल्या २ हजार २०० शाळांमधे राबवला जाणार आहे. यात मुलांना घरगुती आणि पौष्टीक अन्न देणं बंधनकारक आहे. यामधे कडधान्य, तृणधान्य, फळभाज्या, पालेभाज्या, दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचा समावेश असणार आहे. तसंच पदार्थ बनवण्याची पद्धत, स्वच्छता तपासण्यात येणार आहे. पदार्थांची साठवणूक आणि वापरावराच्या सुरक्षेची काळजी घेतली जाणार आहे.

हेही वाचा: मॅकडोनल्ड खाऊच्या ठेल्यापासून फास्टफूड इंडस्ट्रीचा बादशाह कसा बनला?

पालक आणि मुलांचं डाएट वेगळं

या प्रोजेक्टसाठी शाळेत खास हेल्थ टीम बनवण्यात येणार आहे. याची दर सहा महिन्यांनी एफडीएच्या अधिकाऱ्यांकडून तपासणी होईल. पण हे सगळं शाळा आणि एफडीए करतील तेही फक्त शाळेच्या मधल्या सुट्टीपुरतच असेल. मग आपणही आपल्या मुलांच्या आजारविरहीत हेल्थी भविष्यासाठी काहीतरी केलं पाहिजे.

लहानपणी सगळीच मुलं दूध पितात. पण अचानक त्यांना चहा, कॉफीची गोडी लागते. कारण त्यांचे मम्मी, पप्पा चहा पित असतात. तसंच मुलांना अचानक पिझ्झा, बर्गर, फ्राईज, केक आवडू लागतो. कारण मम्मी, पप्पा मुलांचे लाड करताना हे सगळं देतात. मग त्याची चव आवडली की मुलं सारखा हट्टं करणारच.

ही आवड लागली तरी सजग मम्मी, पप्पा म्हणून आपणही हेल्दी होण्यासाठी डाएट करतो तसंच मुलांनाही देतो. इथेच तर आपण चुकतो. आपण करत असलेलं डाएट हे आपल्या वयोमानानुसार, कामाच्या पद्धतीनुसार करतो. पण आपण जे करतो ते मुलं काहीच करत नाहीत. अशावेळी मुलांचं आणि आपलं वेगळं डाएट प्लॅन करणं गरजेचं आहे, असं आहारतज्ज्ञ महेश्वरी पॉल सांगतात.

मुलांच्या वेळापत्रात खेळही हवेत

मुलांची शाळेची वेळ, अभ्यासाची वेळ, खेळण्याची वेळ, आवडतं काम करण्याची वेळ ठरवून त्यानुसार त्यांच्या खाण्याच्या वेळा ठरवाव्यात. हल्ली मुलं ट्युशनलाही जातात पण त्यांना खेळण्यासाठी वेळ राखून ठेवला पाहिजे. कारण जेवढे ते खेळतील तेवढे ते जास्त एक्टीवेट होतील. या वयातले खेळ हे त्यांच्या स्वभाव, विचार, अभ्यास या सगळ्यांवर परिणाम करत असतात.

शाळा, खेळ, अभ्यास, एक्स्ट्रा करिक्युलम एक्टिविटीजमुळे मुलं थकतात. त्यांना भूक लागते. अशावेळी शरिराला पाण्याची आवश्यकता असते. पाणी भरपूर प्या असं आपल्याला आहारतज्ज्ञ सांगतात म्हणून आपण खूप पाणी प्यावं असं नाही. त्यामुळे शरिराला त्रास होतो. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक झाला की शरिराला त्रास होतो. तहान लागली की पाणी प्यावं. त्यावेळी मात्र पाणी पिणं टाळू नये, असं हेल्थ कोच प्रशांत देशमुख यांनी सांगितलं.

हेही वाचाः श्रीखंड पुरी खाताय, पण तुम्हाला त्याविषयी काय माहितीय?

मुलांसोबत प्लॅनिंग करू

पाण्याचा नियम हा मोठ्यांनाही लागू होतो. पालकांनीसुद्धा न्युट्रीशनबद्दल थोडी माहिती करून घेणं गरजेचं आहे. म्हणजे खाण्याचं वेळापत्रक बनवताना सोप होईल. पण हे सगळं तुम्ही बनवलंत, त्यानुसार मुलांना पदार्थ करून दिलेत पण त्यांना ते आवडले नाही किंवा इंटरेस्टिंगच वाटलं नाही तर, यासाठी आपण मुलांनाही या प्रोसेसमधे सहभागी करून घेतलं पाहिजे.

त्यांच्यासोबत मेन्यु डिस्कस करणं, कधीतरी बाजारात घेऊन जाणं, तिथे त्यांना भाजी कशी घ्यायची हे शिकवणं, त्या भाज्यांचं महत्त्व सांगणं. तसंच ते पदार्थ बनवताना त्यांची छोटी छोटी मदत घेणं या सगळ्यांतून मुलं ही प्रोसेससुद्धा एन्जॉय करतील आणि पदार्थही, असा सल्ला पॉल यांनी दिला.

आता बऱ्याच मुलांना ब्रेड, पास्ता, नुडल्स, वेफर्स या सगळ्याची सवय लागली असणार. पण ती हळूहळूच बदलता येईल. घरातल्या खिडकीत एखादी कुंडी ठेऊन त्यात कोथिंबीर किंवा अजून काही लावा.. आणि त्याच्या देखभालीची जबाबदारी मुलांवर द्या. जेणेकरून मुलं नैसर्गिक आणि हेल्दी पदार्थांकडे वळतील. त्यांना शेतात घेऊन जा, असंही पॉल म्हणाल्या.

आपल्याला काही गोष्टी शिकाव्या लागतील

समजा आपण काबुली चण्याची भाजी करणार आहोत. तर सुकी भाजी करून त्यावर चाट मसाला, भाजलेले तीळ, आळशी वैगरे घालून चपातीमधे चटणी लावून त्यावर भाजी ठेवून रोल करून ती पालक आणि मुलं डब्यात नेऊ शकतात. तसंच मुलांच्या डब्यात आपण वरुन किसलेलं पनीर घालणं मस्ट आहे. पण पालकांच्या डब्यात पनीर नको. त्याचबरोबर वेगवेगळ्या सलाडच्या रेसिपीज शिकून घेता येतील.

कडधान्य, भाज्यांच्या सलाडमधे काय घातलं की चव येईल हा विचार करायला पाहिजे. त्यातून आपल्यालाही समजेल की कशात तेल घालावं, कशात तूप आणि कशात मध घातलं पाहिजे. तसंच चाट मसाला विकत आणण्यापेक्षा सुट्टीच्या दिवशी घरीच १० मिनिटांमधे बनवता येईल. त्यासाठी लागणारे मसाले इंटरनेटवर आधीच वाचून ठेवायचे. नाहीतर आपल्या आईला, आजीला किंवा सासूला कृती विचारता येईल.

मुलांना डब्यात किमान दोन प्रकार द्यायला हवेत, नाहीतर ते खूप बोअर होतात. चपाती, भाजीसोबत फळ किंवा घरी बनवलेला लाडू वगैरे कॉम्बो करता येईल. तसंच प्रेझेन्टेशन मस्ट आहे. मुलांना आकर्षक बनवून एखादा पदार्थ दिला की ते लगेच खायला तयार होतात. त्यामुळे छोटं, मोठं जमेल तसं प्रेझेन्टेशन करायला शिकलं पाहिजे.

हेही वाचाः वर्ल्ड व्हिस्की डेः बसण्याआधी हे वाचायलाच हवं

मुलांच्या आहारात कोणते पदार्थ असावेत?

मुलांच्या आहारात चपाती म्हणजे गहू नेहमीच असतात. पण त्याचबरोबर नाचणी, ज्वारीसुद्धा आली पाहिजे. त्यासाठी भाकरी शिकावं असं काही नाही. पण खीर, खिचडी, थालीपीठांसारखे पदार्थ करता येतील. तसंच रोज शेंगदाणे, गूळ, ताजी फळं, तूप हे मुलांच्या खाण्यात आलंच पाहिजे, असं न्युट्रिशनिस्ट रिधिमा कपूर सांगतात.

तसंच आपण पाकिटबंद साठवलेले, जास्त मीठ, सोडा घातलेले वेफर्स, फरसाण, चकली, नाचोज वगैरे खाणं टाळावं. मुलांनाही द्यायला नको. त्याऐवजी घरात बनवलेली भाजणीची चकली, पोह्यांचा चिवडा द्यावा. सकाळच्या नाश्त्यात पोहे, उपीट, उपमा, इडली, शिरा, पराठे असे पदार्थ आपल्याला बनवता येतील.

तरीही मुलं काय आणि आपण काय बाहेर पाणीपुरीची गाडी दिसली की तोंडाला पाणी सुटतं आणि आपले पाय आपोआपच तिकडे वळतात. आणि आपण बनवलेलं डाएट वगैरे सगळं पाण्यात जातं. मग अशावेळी महिन्यातून एकदा घरातच असे पदार्थ बनवले तर? सहज, सोप्प्या पद्धतीने घरच्या घरी रेसिपीज कशा बनवाव्यात याच्या कृती युट्यूबवर उपलब्ध आहेत.

व्यायामही गरजेचा आहे

हो आपल्याला हेल्दी आयुष्य जगायचंय खरं, पण त्यासाठी फक्त जेवण नाही तर त्याला व्यायामाची जोड देणं तेवढंच गरजेचं आहे. मुलांना आपण खेळण्याचा वेळ दिला तरी मैदान नाही, मित्र नाहीत म्हणून ते मोबाईलवरच गेम खेळत बसतात. अशावेळी त्यांना खेळासाठी प्रवृत्त करणं हे पालक म्हणून आपलं काम आहे.

पण त्यांना आवड नसेल तर, संध्याकाळी वॉकला नेता येईल. शाळा दुपारची असेल तर सकाळी आपणही व्यायाम करावा आणि आपल्याबरोबर मुलांचाही व्यायाम करून घ्यावा, असं योगा शिक्षक सुप्रिया कऱ्हाडे म्हणाल्या.

मग अशाप्रकारे मुलं आणि आपण एकत्र येऊन आपलं लाईफ खरंच हेल्दी बनवू शकतो की नाही?

हेही वाचा:

फेसबुकचं व्यसन लावणाऱ्या मार्क झुकेरबर्गची प्रेरणादायी गोष्ट

रमजान ईद दिवशी अमर हबीब यांची वाचायला हवी अशी कथा

पर्यावरण दिनः संवेदनशील कृती करण्यासाठी पावलं उचलुया