‘सेक्स्टॉर्शन’ च्या ऑनलाईन छळापासून कसं वाचायचं?

२८ जून २०२१

वाचन वेळ : ५ मिनिटं


‘एक्स्टॉर्शन’ म्हणजे खंडणी. तसंच लैंगिक छळ करुन खंडणीची मागणी करणं अशा अर्थाने ‘सेक्स्टॉर्शन’ हा शब्द वापरला जातो. कोरोना काळात ‘सेक्स्टॉर्शन’साठी न्यूड कॉल करून पैसे उकळण्याचे प्रकार प्रचंड वाढलेत. त्यांना आळा घालायचा असेल तर सायबर सुरक्षित माणसांची साखळी तयार करायला हवी. 

इंटरनेटचा अवकाश विस्तारत चाललाय. तसा ऑनलाईन विश्‍वात अपप्रवृत्तींचा उपद्रवही वाढत चाललाय. सायबर गुन्हेगारी ही आज कुणा एका व्यक्‍तीची, देशाची समस्या राहिलेली नाही. ती जागतिक समस्या झालीय. या गुन्हेगारांच्या जाळ्यात गोरगरीब, नोकरदार, व्यावसायिक अगदी डॉक्टर, वकीलही अकारण भरडले जातायत.

नागरिकांनी मेहनतीने कमावलेले पैसे नकळत गायब करून आर्थिक नुकसान करणाऱ्या सायबर गुन्ह्यात दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढ  होतेय. सायबर गुन्हेगारांनी सगळ्याच क्षेत्रात शिरकाव केलेला दिसून येतो. या गुन्ह्यांमुळे अनेकजण देशोधडीला लागले. अनेकांचे संसार उद्ध्वस्त झालेत. त्यातही गुन्हेगार फक्त देशाच्या बाहेरूनच नाही, तर देशात खेड्यापाड्यांत बसून गुन्हे करत असल्याचं समोर आलंय.

हेही वाचा : इंटरनेटच्या समुद्रात गळ टाकून बसलेल्या हॅकर्सचं काय करायचं?

सेक्स्टॉर्शन म्हणजे काय?

सायबर गुन्हेगारीचे स्वरूप व्यापक आहे. त्यामागचा मुख्य उद्देश हा बहुतांश वेळा आर्थिक नुकसान पोचवणं किंवा आर्थिक फायदा मिळवणं हा असतो. अनेकदा मानसिक छळही केला जातो. पण अलीकडच्या काळात ऑनलाईन लैंगिक छळाचं प्रमाणही वाढलंय. याला ‘सेक्स्टॉर्शन’ असाही शब्द वापरला जातो.

‘एक्स्टॉर्शन’ म्हणजे खंडणी, तशीच लैंगिक खंडणी म्हणजे लैंगिक छळ अशा अर्थाने ‘सेक्स्टॉर्शन’ हा शब्द वापरला जातो. यात पैशाच्या रूपात खंडणी मिळवण्यासाठी किंवा लैंगिक सुख मिळवण्यासाठी व्यक्‍तीच्या लैंगिक प्रतिमा किंवा माहिती सोशल मीडिया किंवा इंटरनेटवर प्रसारित करण्याची धमकी देत लैंगिक छळ केला जातो.

अश्लील फोटोंवरून ब्लॅकमेलिंग

यात गुन्हेगार डेटरला प्रच्छन्‍न लैंगिक फोटो पाठवायला भाग पाडतो. एकदा का गुन्हेगारांना म्हणजे स्कॅमरना फोटो मिळाले की आपण तपास किंवा कायदा यंत्रणेचे अधिकारी असल्याचं ते सांगतात. त्याने फोटो अल्पवयीन मुलांना पाठवलेत, असं सांगतात. अटक टाळायची असेल तर पैसे द्या, अशी धमकी देतात. अनेकदा हे स्कॅमर्स अधिकार्‍यांच्या नावाचा गैरवापरही करतात. म्हणजे सेवेतल्या अधिकार्‍यांची नावं स्वत:ची असल्याचे सांगत व्यक्‍तींना लुटायचा प्रयत्न करतात. 

मग या गुन्हेगारांच्या टोळ्या बायकांची ऑनलाईन अकाऊंट तयार करतात. आकर्षक महिलांचे फोटो गिऱ्हाईकांना आकर्षित करण्यासाठी पोस्ट करतात. मग अश्‍लील फोटो टाकून जाळ्यात अडकलेल्या व्यक्‍तींना त्या महिलांशी वीडियो चॅट करायला लावतात. हे बहुतांश वेळा अश्‍लील असतं. एकदा का त्यांना असे वीडियो मिळाले की, या टोळ्या हे वीडियो चॅट त्यांच्या मित्रांना किंवा नातेवाईकांना पाठवण्याची धमकी देतात आणि पैशाची मागणी करतात. 

कोरोनाच्या काळात अशा प्रकारच्या ‘सेक्स्टॉर्शन’मधे ‘न्यूड कॉल’च्या घटना लक्षणीयरीत्या वाढल्याचं समोर आलंय. अलीकडेच बंगळूरमधला एका इंजिनीअर आणि उत्तर प्रदेशातला एक राजकीय नेता या जाळ्यात अडकला होता. त्यांना सोशल मीडियावरून एक कॉल आला आणि यामधे कॉल करणारी महिला नग्‍नावस्थेत होती. काही दिवसांनी या अश्‍लील कॉलवरून ब्लॅकमेलिंग सुरू झालं. अशा अनेक घटना घडत असतात. पण बहुतेकदा त्या समोर येत नाहीत.

हेही वाचा : तर आपण विचार करणंही डिजिटल यंत्रांकडे सोपवून देऊ

कायद्याचं संरक्षण

ज्या व्यक्‍ती याला बळी पडल्यात त्यांनी आपले अनुभव न लाजता इतरांना सांगण्याची गरज आहे. ‘सेक्स्टॉर्शन’ या संकल्पनेविषयी अधिक माहिती घेण्याची गरज आहे. लोकांना त्याबाबत जागरूक करण्याची आवश्यकता आहे. अनेकदा याला बळी पडलेले लोक लोकलाजेस्तव गप्प बसतात. याची ना तक्रार करतात, ना कुणाला काही सांगतात. साहजिकच, अशा प्रकारे लोकांकडून खंडणी वसूल करणार्‍या टोळ्यांचं फावतं आणि अधिक जोमाने ते आणखी गुन्हे करायला सज्ज होतात. 

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या विषयाशी निगडित कायद्यांची माहितीही आपण घेतली पाहिजे. २००० च्या माहिती-तंत्रज्ञान कायद्यातलं कलम ६६ ई खासगीपणाचं उल्लंघन करणाऱ्यांना शिक्षा देतो. हेतूपूर्वक किंवा जाणूनबुजून कुणत्याही व्यक्‍तीच्या, तिच्या किंवा त्याच्या परवानगीशिवाय, खासगी क्षेत्राची प्रतिमा काढून, ती प्रकाशित किंवा संविहित करते, ती त्या व्यक्‍तीच्या खासगीपणाचे उल्लंघन करत असते. 

याच कायद्याचं कलम ६७ इलेक्ट्रॉनिक स्वरूपात अश्‍लील साहित्य प्रकाशित किंवा संविहित करण्याबद्दल आहे. तर कलम ६७ अ इलेक्ट्रॉनिक स्वरूपात प्रच्छन्‍न लैंगिक कृती असलेले अश्‍लील साहित्य प्रकाशित किंवा संविहित करण्याबद्दल आणि कलम ६७ ब इलेक्ट्रॉनिक स्वरूपात लहान मुलांबाबतीतल्या अश्‍लील गोष्टी करण्याबद्दल शिक्षा करतं.

१८६० च्या भारतीय दंडसंहितेचं कलम ३८७ खंडणीविरोधात लागू केलं जातं. तेही ऑनलाईन खंडणीच्या गुन्ह्यातही लागू होतं. तसंच खंडणीखोर मुलीचा विनयभंग करत असेल, तर आयपीसीच्या कलम ५०६ ५०६ चा दुसरा परिच्छेद लागू करण्यात येतो. 

सेक्स्टॉर्शनमुळे आत्महत्या

सुप्रीम कोर्टाने १ फेब्रुवारी २०१६ ला ‘सेक्स्टॉर्शन’ आरोपी एम. सत्यानंदम याचा अटकपूर्व जामीन रद्द केला. हा सत्यानंदम निलंबित विभागीय अभियंता होता. म्हणजे विद्युत विभागात इंजिनिअर म्हणून काम करत होता. महिलांचा लैंगिक छळ करून त्यांच्याकडून खंडणी वसूल करणार्‍या टोळीत त्याचा सहभाग होता.

या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी इंटरपोलची मदत घेण्यात आली होती. ११ डिसेंबर २०१५ ला आंध्र प्रदेशातल्या मचवरम इथं हे प्रकरण दाखल करण्यात आलं होतं. सत्यनंदम या प्रकरणातला चौथा आरोपी होता. एका महिलेने पोलिस आयुक्‍तांकडे केलेल्या तक्रारीनंतर हा खटला भरण्यात आला होता.

इंटरपोलच्या समन्वयाने आतापर्यंत जगात अनेक ‘सेक्स्टॉर्शन’ची नेटवर्क शोधून काढण्यात आलीयत. यात काही व्यक्‍तींना आतापर्यंत अटक करण्यात आलीय. त्यातच स्कॉटिश किशोरवयीन मुलगी डन्‍निएल पेरी हिच्या लैंगिक छळाशी संबंधित तीन लोकांचाही समावेश आहे. 

पेरी ही सतरा वर्षांची मुलगी होती. तिला ऑनलाईन ब्लॅकमेल करण्यात येत होतं. त्याला घाबरून तिने तीन वर्षांपूर्वी स्कॉटलंडमधल्या एडिनबर्गजवळ फोर्थ रोड पुलावरून उडी मारून आत्महत्या केली. या प्रकरणाचा तपास लावण्यासाठी इंटरपोल डिजिटल क्राईम सेंटर, हाँगकाँग पोलिस फोर्स, सिंगापूर पोलिस फोर्स आणि फिलिपाईन्स नॅशनल पोलिस, अँटी सायबर क्राईम ग्रुप यांनी एकत्रित काम केलं. त्यातून फिलिपाईन्समधल्या संघटित गुन्हेगार टोळ्यांसाठी काम करणार्‍या १९० ते १९५ लोकांना अटक करण्यात आली होती. 

हेही वाचा :  फेसबुक झालंय 'बुक्ड'!

सायबर सुरक्षित माणसांची साखळी

सामान्यत:, एखादा गुन्हा झाला, तर त्या गुन्ह्याला बळी पडलेल्या व्यक्‍तीला सहानुभूती मिळते. पण, सायबर गुन्हा झाला, तर तुम्ही भोळेभाबडे आहात, असं गृहीत धरलं जाऊ शकत नाही. कारण, सायबर गुन्हा हाताळताना माझ्या असं लक्षात आलंय की, कुठं तरी तुमच्या हलगर्जीपणामुळे किंवा ठरवून केलेल्या दुर्लक्षितपणामुळे सायबर गुन्हा आपल्यावर ओढवून घेतलेला असतो. 

सायबर गुन्हे समाज जागरूक नसल्यामुळे होत असतात. एकदा का या गुन्ह्यांबाबत जागरूकता आली, की सायबर सुरक्षित समाजाची रचना होऊ शकते. प्रत्येक एका घरात, कुटुंबात सायबर सुरक्षिततेबाबत माहिती जाणून घेण्याची इच्छा निर्माण व्हायला हवी. 

सायबर गुन्हे घडण्यापासून आपण संपूर्णपणे वाचू शकतो. तुम्हाला जी माहिती मिळेल ती तुम्ही पाचजणांना तरी सांगा. हे केल्याने सायबर सुरक्षित माणसांची साखळी निर्माण होईल. ही साखळीच तुम्हाला, मला आणि समाजाला सायबर गुन्ह्यांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी मदत करेल.

हेही वाचा : 

मुलांना कोडिंगचं शिक्षण द्यावं का?

भल्याभल्यांना घाम फोडतेय चीनची डिजिटल हेरगिरी

आपलं सोशल मीडिया अकाऊंट हॅक होऊ नये म्हणून

चीनी स्वप्नपूर्तीच्या नावाखाली चालतो इंटरनेटबंदीचा अजेंडा

सरकारनं आपल्या मदतीला पाठवलेला 'आरोग्य सेतू' स्वतः सुरक्षित आहे का?

( लेखक सायबर कायदेतज्ञ आहेत.)