कामाला जाताय? मग कोविडचा धोका कमी करण्यासाठी हे वाचा

११ ऑगस्ट २०२०

वाचन वेळ : ६ मिनिटं


अनलॉक चालू झाल्यापासून अनेक कंपन्यांची ऑफिस उघडलीयत. कर्मचारी कामावर जाऊ लागलेत. कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी कंपन्याही ऑफिस सॅनिटाईझ करतायत, कर्मचाऱ्यांना काही सोयी पुरवल्या जातायत. यासोबतच कोरोना वायरसचा धोका कमी करण्यासाठी आपण कर्मचाऱ्यांनीही काही काळजी घ्यायला हवी.

अनलॉकची प्रक्रिया सुरू करून जवळपास दोन महिने उलटलेत. कोविड १९ या साथरोगाचा प्रसार कमी झालेला नाही. या आजाराचे वायरस अजूनही आपल्या आजूबाजूलाच फिरतायत. त्यामुळेच अनलॉक असला तरी अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना डिसेंबरपर्यंत वर्क फ्रॉम होम म्हणजे घरून काम करायला सांगितलंय. इंटरनेट, कम्प्युटर यावरच सगळं काम असणाऱ्या कर्मचाऱ्यांना हे शक्यही होतं. पण काही कंपन्यांना मात्र देवाचं नाव घेत ऑफिसची दारं उघडावीच लागलीयत.

अशा कंपन्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी अनेक उपाययोजना करतायत. कंपनीकडून मोफत सॅनिटायझर, मास्क, ग्राहकांशी जवळून संपर्क येणाऱ्या कर्मचाऱ्यांना पीपीई कीट, ऑफिस सुरू होण्यापूर्वी जंतूनाशकाची फवारणी, ऑफिसमधे प्रवेश घेण्यापूर्वी थर्मल गनने तापमान मोजणी अशा बऱ्याच गोष्टी केल्या जातायत. हे कंपनीकडून या सोयी सुविधा मिळाल्याच पाहिजेत. पण त्यासोबत आपण कर्मचाऱ्यांनी काम करत असताना कोविड १९ या आजाराचा धोका कमी करण्यासाठी काय करायला हवं हे समजून घेतलं पाहिजे.

हेही वाचा : कोरोना वायरसबद्दल मुलांशी आपण कसं बोलायचं?

सार्वजनिक वाहन टाळा

सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिवेन्शन या अमेरिकन संस्थेनं कर्मचाऱ्यांनी काय काळजी घ्यावी याची एक मार्गदर्शिका काढलीय. या मार्गदर्शिकेत सगळ्यात पहिले  सार्वजनिक वाहतुकीचा वापर टाळा असा सल्ला दिलाय. हा सल्ला महत्त्वाचा आहेच. पण त्याही आधी घरातून निघतानाच मास्क, रूमाल आणि सॅनिटायझर सोबत घ्यायला विसरायचं नाहीय. गरज असेल तर हॅण्ड ग्लोवही वापरायला हरकत नाही. पण ते घातल्यावरही काय काळजी घ्यावी लागेल हे समजून घेतलं पाहिजे. मास्क हतात किंवा बॅगमधे न ठेवता घरातून पाऊल बाहेर ठेवण्याआधीच चेहऱ्यावर घालायचाय. अशी आपली पूर्वतयारी होऊन आपण घराबाहेर पडलो की मग सार्वजनिक वाहतुकीचा वापर कसा टाळता येईल याचा विचार करूया.

सार्वजनिक वाहतूक म्हणजे बस, रेल्वे, टॅक्सी, रिक्षा याऐवजी तुम्ही खासगी वाहनांचा वापर करा, असं सीडीसीच्या मार्गदर्शिकेत सांगितल्यामुळे त्यांच्यावर टीका झालीय. सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्याऐवजी ऑफिस जवळ असेल तर चालत जायचा पर्याय या मार्गदर्शिकेत सुचवलाय. ते शक्य नसेल तर सायकलचा वापर करावा. किंवा सायकलनेही जाणं शक्य नसेल तर चार पाच जणांत रोज एक गाडी शेअर करून जाणं हा चांगला पर्याय असू शकतो. फक्त गाडीले चार लोक आणि ड्रायवर अनेक लोकांच्या संपर्कात येणारा किंवा रोज बदलणारा नसावा.

अगदीच खासगी वाहन वापरणं शक्य नसेल तर बस, रेल्वे किंवा मेट्रो वगैरेमधून जाताना खूप काळजी घ्यावी लागेल. संपूर्ण वेळ मास्क लावायचा, रेल्वेच्या, बसच्या खिडक्या उघडायच्या, आपल्या सहप्रवाशांमधे अंतर ठेवायचं असं बरंच काही करणं गरजेचं आहे. आपण खूप वेळ प्रवास करणार असू तर बसण्याआधी जागेवर सॅनिटायझरचा स्प्रे करता येईल.

ऑफिसच्या खिडक्या उघडा

ऑफिसमधे पोचल्यावर वॉचमनला आपली थर्मल टेस्ट करायला आवर्जून सांगायला हवं. त्यानंतर ऑफिसमधे जाताना लिफ्टचा वापर टाळायलाच हवा. बंद, हवा खेळती नसेल अशा ठिकाणी वायरस जास्त लवकर पसरतो. त्यामुळेच लिफ्ट ऐवजी पायऱ्यांचा वापर करणं आपल्याला फायद्याचंच आहे. शिवाय, ऑफिसमधे एसी असला तरी हवा खेळती रहावी म्हणून गेल्या गेल्या पहिले ऑफिसच्या सगळ्या खिडक्या उघडण्याचा सल्ला सीडीसीच्या मार्गदर्शिकेत दिलाय.
 
अशा प्रकारे सुरक्षितपणे प्रवास करून आपण ऑफिसमधे पोचलोच तरी गेल्या गेल्या काम चालू करून चालणार नाही. आपण बाहेरून कोरोनाचे वायरस आपल्यासोबत ऑफिसमधे आणल्याची शक्यता असते. त्यामुळे सगळ्यात आधी बाथरूममधे जाऊन आपले हात साबणाने २० मिनिच स्वच्छ धुवायला हवेत. शक्य झाल्यास आपला मास्क बदलून दुसरा स्वच्छ धुतलेला मास्क घालायला हवा. आधीचा मास्क पिशवीत वगैरे ठेवायला एक वेगळी पिशवी, वेगळी जागा करावी.

बाहेरही आणि ऑफिसमधेही शारीरिक अंतर पाळायचंय हे आपण विसरायला नको. ऑफिसमधे आलो आणि आपला कितीही जवळचा मित्र असेल तरी लस येईपर्यंत त्याला मिठी मारायला जायचं नाहीय, हे लक्षात ठेवायला हवं.

हे कोरोना स्पेशलही वाचा : 

ये दोस्ता, लस कशी तयार केली जाते?

साथीच्या आजारात सारं जग समाजवादी वळण घेतं

डॉक्टरांनी घातलेला सूट म्हणजे कोरोनाविरूद्धचं चिलखतच!

कोविड-१९ आजारावर औषध नसताना पेशन्ट बरं कसं होतात?

कोरोनाला रोखण्यासाठी तैवानकडून आपण काय शिकलं पाहिजे?

एकदा बरं झाल्यावरही पेशंटला का होतेय पुन्हा कोरोनाची लागण?

किराणा दुकानातून आपण कोरोनाला घरी नेण्यापासून कसं वाचू शकतो?

४ फूटांचं अंतर ठेवाच

ऑफिसचं दाराचं हॅण्डल, किबोर्ड, माऊस, टेबल, जिन्याने वर येत असू तर जिन्याचं हॅण्डल आणि सॅनिटायझरचा स्टॅण्ड यासारख्या गोष्टींवर कोरोनाचे वायरस जास्त असतात, असं सिद्ध झालंय. त्यामुळे आता काम सुरू करत असताना या गोष्टी सॅनिटायझर रूमालावर घेऊन पुसून घ्यायला हव्यात. कंपनीकडून ऑफिस दररोज सॅनिटाईझ होत असेल तर या गोष्टींवर ते औषध राहिलेलं असू शकतं. तेही पुसून घ्यायला हवं. आपण बसतो त्या खुर्चीही काळजी घ्यायला हवी. अगदी आपण वापरतो तो टेलिफोनही नीट स्वच्छ करायला हवा.

सुपरमार्केट, मेडिकल, रिसेप्शनिस्ट अशा ठिकाणी काम करणाऱ्या, खूप ग्राहकांच्या संपर्कात येणाऱ्या कर्मचाऱ्यांना मधे पारदर्शक प्लॅस्टिकचा वापर करता येईल. शिवाय, ग्राहकांची उभं राहण्याची जागाही ठरवायला हवी. त्यांच्यात आणि आपल्यात कमीतकमी ४ फूटांचं अंतर राहील याची काळजी घ्यायला हवी.

आपण ऑफिसमधे वगैरे काम करत असू तर सगळे कर्मचारी जास्तीत जास्त एकमेकांच्या संपर्कात कधी येतात ते पहायला हवं. मिटिंग रूम, टॉयलेट, लॉकर रूम, कॅन्टिन आणि एखाद्या रूममधे आत जाताना आणि बाहेर येताना माणसं एकमेकांच्या जास्त संपर्कात होतात. अशावेळी आपण सतर्क रहायला हवं.

बाथरूममधे गर्दी नको

आपल्या सहकाऱ्यांशी शारीरिक संपर्क टाळण्यासाठी ऑफिसचं शेड्यूल बदलणं हाही एक उपाय असू शकतो. मिटिंग कमीत कमी लोकांच्यात किंवा एकावेळी १० लोकांसोबत करता येईल. शिवाय, सगळ्यांनी एकाचवेळी बाथरूमला जाणं, हात धुवायला जाणं टाळायला हवं. तसंच, आता नेहमीपेक्षा जास्त वेळा बाथरूम स्वच्छ होईल याची काळजी घ्यायला हवी. डब्बा खायच्या सुट्टीतही कॅन्टिनमधे किंवा डब्बा खायच्या रूममधे गर्दी होऊ नये यासाठी अर्ध्या कर्मचाऱ्यांनी आधी आणि अर्ध्या कर्मचाऱ्यांनी नंतर डब्बा खायचा असं करता येईल.

आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, आता आपण आपले डब्बे किंवा जेवण कशातून आणतो याची विशेष काळजी घ्यायला हवी. प्लॅस्टिकच्या पिशवीत पोळी, कोरडा खाऊ आणणे अशा गोष्टी आता टाळायला हव्यात. आपण कॅन्टिनमधेच जेवणार असू तर तिथे सगळी काळजी घेतली जातीय ना हे पहायला हवं.

शिवाय, स्वच्छ, शुद्ध पाणी प्यायला हवं. सध्या पावसाळ्यात तर हे फारच महत्त्वाचं आहे. त्यासाठी आपण ऑफिसमधे वॉटर प्युरिफायर बसवून घ्यायला हवा. आपल्या सहकार्याला तहान लागली असेल तर त्याला आपली पाण्याची बॉटल जरूर द्यायला हवी. पण त्याआधी सहकार्याला त्याचे हात सॅनिटाईझ करायला सांगायला हवेत.

अनेक कर्मचाऱ्यांना कामाच्या मधे चहाचा किंवा सिगारेट पिण्यासाठी ब्रेक घेण्याची सवय असते. बाहेर जाऊन टपरीवर चहा पिऊन आपण परत येतो. याऐवजी आता ऑफिसमधेच चहाची सोय करणं सोयीस्कर ठरेल. सिगरेट पिण्यासाठीही बाहेर जाण्याऐवजी अनेक कंपन्यांमधे ऑफिसमधेच एक रूम बनवलेली असते. मात्र, ही रूम हवेशीर असेल याची खात्री करायला हवी. पण बाहेर जाता येत नाही या कारणामुळे आपली सिगरेट प्यायची सवय सुटली तर कोरोनाला थँक्स म्हणावं लागेल.

हेही वाचा : सुपर स्प्रेडर म्हणजे काय? ते मुद्दाम कोरोना पसरवतात का?

लसीकरण चालू ठेवा

ऑफिसमधून घरी जातानाही आपल्याला प्रवासाची काळजी घ्यायची आहे. यासोबत करायची आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या सोबत प्रवास करणारा एखाद्या प्रवाशाने मास्क घातला नसेल तर तो घालण्याची आठवण त्याला आवर्जून करून द्यावीय शक्यतो ऑफिसमधून थेट घरीच जायला हवं. आपल्या शर्टवर, कपड्यांवर, मास्कवर कोरोनाचे वायरस असू शकतात. त्यामुळे ऑफिसमधून कुणा नातेवाईकाच्या घरी वगैरे जाणं बरोबर नाही.

घरी जाऊन आपले कपडे, मास्क लगेचच पाण्यात भिजवून ठेवायला हवा. हात स्वच्छ धुवून मगच घरात वावरायला हवं. आपला डब्बा, त्याची पिशवी यांचंही सॅनिटायझेशन होतंय ना याची काळजी घ्यायला हवी. दुसऱ्या दिवशी ऑफिसला जाताना आपल्याकडे स्वच्छ मास्क, पिशवी या गोष्टी असणं गरजेचं आहे.

शिवाय, आपण खूप प्रवास करत असू किंवा सतत बाहेर असू तर आपली रोगप्रतिकारक शक्ती बळकट करण्याकडे जरूर लक्ष द्यायला हवं. पौष्टिक जेवण आणि व्यायाम या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेतच. पण गरज पडेल तेव्हा दवाखान्यात जाऊन फ्लूविरोधी लस टोचून घ्यायला हवी. 

मुळातच आपल्याला बरं नसेल तर ऑफिससाठी किंवा कोणत्याही कारणासाठी घराबाहेर पडूच नये. आपण अगदी ठणठणीत बरे असू तरच बाहेर पडावं आणि बाहेर पडल्यावर अशा काही गोष्टी करून आपण कोरोना वायरसचा धोका कमी करू शकतो. पण एवढं करूनही आपल्याला चुकून कोरोनाची लागण होऊ शकते हे लक्षात ठेवावयला हवं. लागण झाली तरीही घाबरायचं काहीही कारण नाही.

हेही वाचा : 

युद्धात जिंकणाऱ्या अमेरिकेला कोरोना का हरवतोय?

कोरोना पॉझिटिव आलो तरी आम्ही घरीच राहिलो, कारण

कोरोनाच्या काळात जन्मलेल्या मुलाला काय म्हणायचं बरं?

एडवर्ड जेन्नरः देवी संपवणाऱ्या या देवमाणसाने लसीकरण शोधलंय

कोरोनाच्या R0 नंबरवर आपलं, लॉकडाऊनचं भवितव्य अवलंबून आहे?

कोरोना काळात आपल्याला पेशंटचे १७ अधिकार माहीत असायला हवेत!

विटॅमिन डीच्या कमतरतेमधे दडलंय देशांच्या वेगवेगळ्या मृत्यूदराचं गुपित?