नव्या पिढीनं गांधी-आंबेडकर मतभेदांकडे कसं बघावं?

१४ एप्रिल २०२०

वाचन वेळ : १४ मिनिटं


आज १४ एप्रिल. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिन. आज १४ एप्रिल. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिन. डॉ. आंबेडकर आणि महात्मा गांधी नातं नेमकं काय होतं, हे कोडं भल्या भल्यांना उलगडलेलं नाही. उलट नव्या पिढीत गांधी-आंबेडकर मतभेदांचा गुंता वाढतोय..अशावेळेस ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत दत्ता भगत यांचं हे चिंतन महत्त्वाचं ठरतं.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्या परस्पर संबंधाविषयी माझ्या मनात गेल्या चार दशकांपासून एक कुतुहल आणि जिज्ञासा आहे. मी अधून-मधून हाच उद्देश मनात ठेवून थोडंबहुत लेखन केलं आहे. पण गांधी-आंबेडकर हा माझ्या अभ्यासाचा विषय आहे असं सांगायचं धाडस मात्र अजुनही मला झालं नाही. कारण कुतुहल, जिज्ञासा असणं आणि अभ्यासविषय असणं या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत असं मी मानतो.

अभ्यासकांची वाट तार्किक संगतीची असते. या मार्गाने जात जात तो साम्य-विरोधाच्या आड वाटा तपासतो आणि अखेरीस त्याच्या मनातल्या ज्या कुठल्या गृहित कसोट्या असतात त्याआधारे तो श्रेष्ठ-कनिष्ठाचे मूल्यभान देतो. कुतुहल आणि जिज्ञासा असणारा माणूस हा अंतरंगाचे तळ शोधतो. तिथे होणारे आकलनाचे विस्मयकारक दर्शन हीच त्याची मर्यादा. त्यापुढे असणाऱ्या निष्कर्षाच्या पायरीवर त्याला चढता येणं शक्य नसतं. कारण मुळात तो प्रकृती धर्मानं ललित लेखक असतो. मी हा असा ललित लेखक आहे.

विस्तार दोष पत्करुन मी हा फरक एका उदाहरणानं सांगू शकतो. अर्थात हे उदाहरण तरूण वाचकांसाठी आहे आणि त्यांच्यापुरतेच आहे असं समजावं. आपल्या भारतीय कुटूंबव्यवस्थेत परस्परांशी फारसं पटत नसलेले आईबाप असंख्य पहायला मिळतात. पण त्यांचं अपत्यप्रेम हा त्यांना बांधून ठेवणारा एक महत्वाचा धागा असतो. मुलं मोठी झाली म्हणजे त्यांना हे कळतंही. पण आईबापांच्या संवाद-विसंवादाचं एक कुतुहल सतत त्यांच्या मनात घर करून असतं. हे असं जाणवत राहणं त्यांना छळत नसतं. पण त्याचं हे जाणवणं संपूनही जात नाही, सतत राहतं.

गांधी आंबेडकर यांच्या परस्पर संबंधांचं स्वरूप सतत ‘जाणवत राहणं’ हा मात्र माझा एक प्रकृतीधर्म आहे. त्या आधारे मला कोणी दुषणं दिली तर मला त्याचं फारसं वाईट वाटत नाही. तसंच कोणी गौरव केला तर त्यामुळेही मी हरखून जात नाही. पण त्यानिमित्तानं 'अपत्यप्रेम' हा समान धागा मुलांना आपल्या आई-वडिलांविषयी आत्मीयतेनं बांधून ठेवतो तसा गांधी-आंबेडकर विरोधातही त्यांच्याविषयी वाटणारी आपुलकी समजून घेता येणं शक्य आहे. एवढाच हा लेख लिहिण्यामागे माझा हेतू आहे, हे वाचकांनी लक्षात घ्यावं असं मला वाटतं.

हेही वाचा : बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती तीनवेळा का जाळली?

मला माझं हे कर्तव्य वाटतं

गांधी आणि आंबेडकर यांचे परस्परांशी आयुष्यभर पटत नव्हते हे सांगण्यासाठी पुस्तकांची गरज नाही. तरीसुद्धा उभयंतांचे कार्य आणि त्यांची विचारसरणी कोणीतरी कोणाचा कायम गुलाम राहतं याचा पुरस्कार करणारी होती असं कोणालाही वाटतं नाही. त्यामुळेच आपणास प्रश्न पडतो की मानवमुक्तीच्या लढ्यातले हे दोन्ही महापुरूष संवादी का राहिले नाहीत? हा प्रश्न ज्यांच्या मनात अधूनमधून डोकावतो अशा तरुणांची संख्याही दिवसेंदिवस वाढतेय.

ज्यांच्या खांद्यावर कोणाचाही झेंडा नाही असा हा फार मोठा वाचकवर्ग या प्रश्नाचे उत्तर जाणून घेऊ इच्छित असेल तर एक शिक्षक या नात्याने माझा जेवढा अवाका आहे त्याआधारे त्या वाचकांशी संवाद साधावा म्हणून मला माझं हे कर्तव्य आहे असंच वाटतं.

सनातनी ठरवणं अत्यंत सोपं जातं

बाबासाहेब हे हिंदूंचे, त्यातही सनातनी हिंदूंचे, कडवे विरोधक होते. हे त्यांनी स्वतःच एके ठिकाणी मान्य करून एक विधान केलंय. ते असं, ‘मी सनातनी हिंदूंविरुद्ध बोलत आलो हे खरंच आहे. पण त्याहून अधिक कठोरपणे मी ब्रिटीश राजवटीबद्दलही विरोधी बोलत आलो. पण त्याची दखल मात्र फारशी कुणी घेतली नाही.’ या वाक्यामागे केवढी वेदना होती याचा आपण कधी विचारच केला नाही. त्यांचे हे विधान त्यांनी स्वतःच्या बचावासाठी केलेलं नव्हतं.

ज्यांनी आंबेडकरांचा सूक्ष्म अभ्यास केला आहे हे कुणीही अमान्य करू शकणार नाही. पण खरी अडचण अशी आहे, की हे कोणी अधोरेखित करून त्यांचं प्रतिमाहनन थांबवलं असंही घडलं नाही. अभ्यासकांनी या अंगाने डॉ. आंबेडकरांना चरित्रनायक म्हणून कधीच रंगवलं नाही. याबाबत द. न. गोखले हे मात्र थोडेसे अपवाद आहेत.

महात्मा गांधीबद्दलही असंच म्हणता येतं. गांधींचं सगळं राजकारण आणि समाजकारण सतत धार्मिक परिभाषेतच व्यक्त झालंय. त्यामुळे कुठल्याही आंबेडकरवादी अनुयायास त्यांना सनातनी ठरवणं अत्यंत सोपं जातं. व्यावहारिक राजकारण ज्यांना करायचं असतं त्यांना तर गांधी समता आणि न्यायाच्या विरोधाचं प्रतिक आहेत हे सतत सांगत राहणं गरजेचंच होऊन बसलंय. मात्र गांधीवादी अनुयायांनी गांधी परिभाषेच्या पलिकडे असणारं त्याचं व्यक्तिमत्व आंबेडकर अनुयायांपर्यंत पोचवण्यासाठी कोणते प्रयत्न केलेत?

उलट गोलमेज परिषदेत बहिष्कृतांचा नेता कोण असा प्रश्न उपस्थित झाला तेव्हा कोणती उत्तरं दिली गेली? महाराष्ट्रातील नगण्य लोक असणारा महार जातीचा वर्ग अपवाद म्हणून वजा केला तर उरलेले सर्व भारतीय पातळीवरचे, बहिष्कृत गांधींनाच आपला नेता मानतात. हा जो युक्तिवाद करण्यात आला त्यावरच गांधीवादीदेखील समाधानी दिसतात,  असं माझं निरीक्षण आहे.

यासाठी मी एक उदाहरण देतो. पण ते उदाहरण देण्यापूर्वी डॉ. आंबेडकरांचे सुप्रसिद्ध चरित्रलेखक डॉ. धनंजय कीर यांचं एक विधान आधी नोंदवतो. आंबेडकर अनुयायी आणि गांधीवादी या उभयतांना कीरांबद्दल आदर आहे म्हणून मी त्यांचंच विधान इथे नोंदवतो. 

कीर एका ठिकाणी म्हणतात, ‘टिळकांनी मध्यमवर्गास कार्यान्वित केलं,  आणि आपलं कार्य सामान्य जनतेपर्यंत पोचवलं. गांधीजींनी अखिल जनतेला कार्यप्रवृत्त केलं. आंबेडकरांनी भारतीय समाजाचा निकृष्ट वर्ग जागा केला.’ कीरांनी हे विधान तिन्ही नेत्यांचं मोठेपण अचूकपणे नोंदवण्यासाठी केलं. पण नकळतपणे या विधानातून जे मूल्यभान ध्वनित होतं,  ते मात्र घातक आहे. मध्यम वर्ग आणि नित्कृष्ट वर्ग अखिल जनतेत येतो की नाही? तसं असेल तर गांधींची भूमिका सर्वसमावेशक तर टिळक-आंबेडकरांची भूमिका त्यांचे-त्यांचे हितसंबंध असणाऱ्या गटांपुरती सीमित असा अर्थ होतो की नाही?

आता मी तो प्रसंग नोंदवतो ज्या प्रसंगामुळे गांधी-आंबेडकर यांच्या परस्परसंबंधाविषयी माझं कुतुहल वाढलं.

हेही वाचा : डावे, आंबेडकरवाद्यांच्या टोकाच्या गांधीविरोधामुळे आरएसएसचं फावलं!

धम्म प्रवर्तनाची गोष्ट

प्रसंग नागपूरमधील. तारीख १३ ऑक्टोबर, १९५६. धम्मप्रवर्तन समारंभाची ती पूर्वसंध्या होती. पत्रकारांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना गराडा घातला होता. श्याम हॉटेलचा परिसर समता सैनिक दल आणि शासनाची पोलिस व्यवस्था यांच्या करड्या नजरेखाली होता. पण पत्रकारांच्या कोलाहलामुळे सारा परिसर गजबजून गेला होता. वातावरणात तणाव होता. पण त्या तणावातही एक प्रकारचं समाधान होतं.

बाहेर अफवांचे पेव फुटले होते. कोणीतरी घाबराघुबरा होऊन दुसऱ्याला सांगत होता, 'अंबाझरी डॅम स्फोट घडवून उडवला जाणार आहे!' तर दुसरा त्याला धीर देत सांगत होता 'दीक्षाभूमीच्या स्थळाची उंची एवढी आहे की डॅममधलं पाणी नाग नदीच्या वाटेनं सरळ निघून जाईल. इथपर्यंत येणारच नाही. अख्ख्या नागपूरला कुठेच धोका नाही.'

कसली धास्ती होती पत्रकारांच्या मनात? हिंदुस्थान नावाच्या भूगोलाचा तुकडा पश्चिम उत्तरेकडून सगळ्या मुस्लिम देशांनी वेढलेलं होता. त्यातही १९४७-४८ मधल्या वणव्यानं पेटलेल्या पाकिस्तान सरहद्दीच्या फाळणीच्या ज्वाळा पूर्णपणे विझल्या कुठं होत्या? अफगाण आणि काश्मीरच्या सरहद्दीवर रशियातल्या कम्युनिस्टांची पाळत होती. या कम्युनिस्टांचं ना कधी गांधींशी जुळलं होतं ना आंबेडकरांशी. उत्तरेत हिमालय होता. पण त्यापलीकडचा बौद्ध परंपरेचा वैचारिक इतिहास असलेला चीन भारतालगतच्या बुद्धराष्ट्राचा घास घेण्यासाठी टपून होता.

चकमा बुद्धांचे लोंढे बंगालकडून भारतात घुसत होते. आंतरराष्ट्रीय पातळीवर ही एवढी उलाढाल चालू असताना बाबासाहेबांनी ना इस्लामची निवड केली ना ख्रिश्चन धर्माची.  हंगामी मंत्रिमंडळात बाबासाहेबांना घेतलं तेव्हा अनेकांना वाटलं, बाबासाहेबांना मंत्रीपद देऊन हिंदूस्थानवरचं ‘हिरवं संकट’ थोपवून धरलं गेलं. अन्य आणि सनातन हिंदूचं तर सोडाच पण बाबासाहेबांच्या अत्यंत निकट असणाऱ्या निष्ठावान अनुयायांनासुद्धा या अफवेनं घेरलं होतं. पण ही सगळी संकटं दूर झाली होती. त्यामुळे आता अशा बाहेरच्या कुठल्याच संकटाचं भय देशावर नाही म्हणून धास्तावलेपण कमी झालं होतं.

पण काही केल्या अनेकांना कळतच नव्हतं,  सर्व धर्म सोडून बाबासाहेबांनी हा बुद्धधर्म काय म्हणून निवडला? कोणता व्यावहारिक स्वार्थ होता त्यामागे? वर्तमान तर असा की हा बुद्धधर्म हिंदू जीवनशैलीत पार विरघळून गेला होता. मग का म्हणून बाबासाहेबांनी हा धर्म निवडावा? अनेक पत्रकारांच्या मनात हेच कुतुहल ओसंडून वाहत होतं. बाबासाहेब अनेक पत्रकारांना उत्तर देत होते. त्यातले काही शंकाखोर होते, हेही बाबासाहेबांना माहीत होतंच.

अनेक उत्तरांपैकी एक उत्तर असं होतं, ‘माझा बौद्धधर्म 'हीनयान' आणि 'महायान' या दोन संप्रदायिक पंथांपेक्षा वेगळा आहे, भिन्न आहे. हवं तर याला तुम्ही ‘नवयान’ म्हणू शकता. पण बाबासाहेब एवढं बोलून थांबले नाहीत. ते पुढे म्हणाले, 'मी गांधींना आश्वासन दिलं होतं, की कमीतकमी हानीकारक मार्ग निवडेन. मी बौद्धधर्म स्वीकारून हिंदू समाजाच्या, हिंदुस्थानच्या दृष्टीनं एक उपकारक कृत्यच करतोय.’ आता बाबासाहेबांचं हे उत्तर ऐकून कोणाचं काहीही होवो पण माझ्यासारखा आंबेडकर अनुयायी क्षणभर का होईना गोंधळून गेला नसेल तरच नवल.

हे कोरोना स्पेशलही वाचा : 

कोरोनाग्रस्त मृतदेह जाळायचा की पुरायचा?

जगाच्या तुलनेत भारत कसा लढतोय कोरोनाशी?

साथीच्या आजारात सारं जग समाजवादी वळण घेतं

एकदा बरं झाल्यानंतर पुन्हा कोरोनाचा संसर्ग होतो का?

कोरोनाचा पेशंट वेंटिलेटरवर किती काळ जिवंत राहतो?

डॉक्टरांनी घातलेला सूट म्हणजे कोरोनाविरूद्धचं चिलखतच!

कोविड-१९ आजारावर औषध नसताना पेशन्ट बरं कसं होतात?

गांधींना दिलेलं आश्वासन का पाळावं?

कोण गांधी? कोणत्या गांधींना आपण वचन दिलं होतं बाबासाहेब? अवघ्या दहा वर्षापूर्वी ‘व्हॉट काँग्रेस अॅँाड गांधी डिड फॉर अनटचेबल्स?’ असा रोखठोक प्रश्न विचारून अत्यंत स्फोटक टीका ज्यांच्यावर केली तेच हे गांधी? बाबासाहेबांचं हे पुस्तक वाचून ‘हरिजन सेवक संघा’चे कार्यकर्ते खूप चवताळले होते. बाबासाहेबांचा प्रश्न १९४६ च्या निवडणुकीत नेस्तनाबूत करावा म्हणून कामास लागले होते सगळे.

गांधी हयात होते आणि त्यांचे डावे-उजवे हात संपूर्ण सत्तेत होते. तरी त्या गांधीना दिलेल्या आश्वासनाचा विचार करायचा? काय म्हणून? अखेर बाबासाहेबांच्या पक्षाचा धुव्वा उडवला त्यांनी. निवडणुकीचा हा धुरळा शांत झाला न झाला तोच हिंदू कोड बिलावरून किती मुस्कटदाबी झाली बाबासाहेबांची. अखेर ते व्यथित होत मंत्रीपदावरून पायउतार झाले.

आज त्यावेळची कागदपत्र वाचली म्हणजे पडद्याआडून जे घडलं तेसुद्धा किती भयंकर होतं हे कळतं. नेहरू म्हणाले, ‘बाबासाहेब, थोडा धीर धरा. तुम्ही राजीनामा का देता आहात याचं एक लेखी निवेदन सभेत द्या. तेवढा तर दम धरा!’ बाबासाहेबांनी नेहरूंची विनंती ऐकली, पण सभापतींनी ती वेळच येऊ दिली नाही. त्याआधीच बाबसाहेबांचा राजीनामा मंजूर झाला हे घोषितही करून हे सभापती मोकळे झाले.

यात पण कोण होतं पंतप्रधान? कोण होतं राष्ट्रपती आणि कुणाचं होतं सरकार? महात्मा गांधीना राष्ट्रपिता मानायचंच होतं ना? मग अशा त्या गांधीना दिलेल्या आश्वासनाचा बाबासाहेबांनी काय म्हणून विचार करावा? हा इतिहास सोडा. तीन-साडेतीन वर्षांपूर्वी काय घडलं ते आठवून पहा.

हेही वाचा : डॉ. बाबासाहेब आंबेडकरः भारतातल्या मानवी स्वातंत्र्याचे शिल्पकार

स्वतंत्र मतदारसंघाचा मुद्दा

१९५२ च्या निवडणुकांचे निकाल डोळ्याखालून घाला. ज्यांना मताधिकार नव्हता आणि मताधिकार म्हणजे काय हेही कळत नव्हतं, एवढंच काय मताधिकार हवा अशी ज्यांची मागणीही नव्हती त्यांच्यासाठी १९१९ ते १९२९ अशी दहा वर्ष बाबासाहेब वणवण भटकून जागृती घडवून आणत होते. अखेर सायमन कमिशन हेच मताधिकाराचं निवेदन घेऊन बाबासाहेब भेटायला गेले. ते एकटेच गेले का? संस्थानं नव्हते गेले का? मुस्लिम प्रतिनिधी नव्हते भेटले? ब्राम्हणेतर पक्षानं सायमनला नाही का निमंत्रण दिलं?

अहो, फार कशाला दक्षिणेतल्या ब्राम्हणेतर पक्षाचे आणि सनातनी मंडळींचे प्रतिनिधीही सायमनला भेटले. अर्थात कारणही तसंच होतं. २३ ऑक्टोबर १९२९ रोजी सायमनला साक्ष देताना बाबासाहेब म्हणाले, ‘वयात आलेल्या सर्व स्त्री पुरुषास मताधिकार असावा.’ खरंतर कोणत्याच जातीच्या नेत्याला आपल्या जातीबाहेरचे लोक आपल्या प्रतिनिधीस मत देतील की नाही याची धास्ती वाटत नव्हती. खरा मुद्दा होता निवड सांभाळू शकेल एवढ्या जातीनिष्ठ लोकसंख्येची म्हणून ज्या जातीची लोकसंख्या जास्त त्यांच्यापुढे आपला टिकाव लागायचा कसा हेच भय प्रत्येकाच्या मनात होतं.

जातवार लोकसंख्या लक्षात घेऊन प्रतिनिधींची संख्या ठरवण्याची हीच तर मागणी बाबासाहेबांनी उघड केली होती. सायमननंतर स्वतंत्र मतदारसंघ मागितलाच नव्हता बाबासाहेबांनी. इतकंच काय पहिल्या गोलमेज परिषदेपर्यंत ते म्हणत होते की विषय अवस्थेतल्या गटांची एकजूट व्हायची तर सर्वांना प्रतिनिधीत्व, संमत होईल असं प्रतिनिधीत्व हाच उपाय असतो.

हिंदू कोडबिल आणणारा कोण हा आंबेडकर?

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत स्वतंत्र मतदारसंघाचा प्रश्न होताच कुठं? आणि विरोध करायला महात्मा गांधी तरी हयात होते का? पण सनातनी हिंदुना माहीत होतं, विचारानं थोपवता येत नाही ते वादळानं धरलं असं करता येतं. कोण आंबेडकर? एका अतिशुद्राला कोणी दिला हिंदू धर्मात हस्तक्षेप करायचा अधिकार? हिंदूंच्या धर्मशास्त्रात ढवळाढवळ करून हिंदू कोड बिल आणणारा कोण हा आंबेडकर?

त्याही काळी तथाकथित साधूसंत आणि साक्षी महाराजांसारखे विद्वान कमी नव्हते. त्यांनी आवई उठवली, की हे आंबेडकर हिंदूंच्या बहिणभावाचे लग्न व्हावे असे नियम घालत आहेत. हा आरोप आपल्यावर होऊ शकतो याचा अंदाज आधीच बाबासाहेबांना होता. म्हणून त्यांनी त्या काळात या आरोपांचं निरसन करण्याची काळजी घेतली होती. 

गांधी हयात नसले तरी पुन्हा सत्तेवर होते ते गांधीचेच उजवे डावे हात. गांधीना 'महात्मा' म्हणावं की नाही हे नव्हतं आश्वासन. तर आपल्या देशाचं कमीतकमी नुकसान व्हावं असं आश्वासन होतं. देश घडवायचं आश्वासन होतं ते. त्यासाठी व्यावहारिक लाभाचा विचार कधीच नव्हता केला त्यांनी. आपल्या मातीतला आपल्याच जीवनशैलीत मुरलेला बौद्ध धर्म त्यांनी स्वीकारला. पण तो स्वीकारतानाही आणखी एक काळजी घेतली.

गांधीच का आठवले?

बौद्धांचा इतिहास घेतला, पंथ घेतले. चाळणीत घातले विधींचे खोटे गोटे चाळून बाजुला काढले. विभूती वाड, अवतार कल्पना, पुर्नजन्म या शब्दांमुळे जे संभ्रम निर्माण होतील तेही बाजुस काढले. म्हणून जो स्वीकारला तो धर्म हीनयान नव्हता, महायान नव्हता तर नवयान होता असं ते म्हणाले. कारण इथून पुढं कोणीही महात्मा होणं नकोच होतं त्यांना. त्याऐवजी समर्पित भावनेनं राष्ट्र घडवणारा सामान्यजन होणं हेच त्यांना महत्वाचं वाटत होतं.

पण असा आदर्श सामान्यजन दुर्मिळ असतो हे आपल्याला माहीत असतं म्हणून असं जे उत्कृष्ट जीवन जगतात त्यांना आपण महात्मा ठरवून मोकळे होतो. ‘धर्म म्हणजे नीती’ एवढी सोपी व्याख्या होती त्यांच्या मनात. ही जाणीव खरं तर इथल्याच मातीत होती. ती मुरवून घेत घेतच ब्राम्हणी विचार पुढे आला होता. असंच होतं तर त्यासाठी गांधीच का आठवले?

गांधींना हे मान्य होतं का? हो, मान्य होतं. म्हणून तर त्यांनी आपल्या मुलाचं लग्न दक्षिण आफ्रिकेतल्या ब्राम्हण मुलीशी केलं आणि तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्रींना वैदिक मंत्र म्हणत विधी पूर्ण करायला सांगितले. पण आपले महपती तर्कतीर्थांना म्हणाले नर्कतीर्थ. गांधी धर्माच्या परिभाषेत समाज परिवर्तनाची प्रयोगशाळा चालवत होते. पण ती आश्रमाच्या भूगोलापुरती सीमित होती. आणि सनातनी मंडळींना हेही कळत होतं हाच आश्रमाचा भूगोल विस्तारत जाईल.

हेही वाचा : बसवण्णा आणि गांधीजींची तीन माकडं

गांधी आणि आंबेडकर यांचे शत्रू सनातनीच का?

शंकराचार्याची गादी सुरक्षित ठेवायची. पण त्यांच्या वचनांचं सामर्थ्यच त्यांच्यापासून हिरावून घ्यायचं असा प्रयोग चालू होता. स्वतःला गांधीवादी म्हणवून घेणाऱ्या महाडच्या तरूण नगराध्यक्षानं थेट शंकराचार्यांना जोड्याची माळ घालावी! केवढं हे धाडस. कारण काय तर ‘सीकेपी ब्राम्हणांना क्षत्रिय म्हणून माझी पाद्यपुजा करायचा अधिकार नाही.’ असं ते म्हणाले. गांधीवादी महाडकरांनी थेट असं उत्तर दिलं. त्याच गांधींची प्रतिमा महाडच्या सत्याग्रहात होती. जयजयकाराच्या घोषणेत गांधीचं नाव होतं.

‘जन्माने ब्राम्हण तोच खरा वैष्णव’ असं गांधी म्हणत नव्हते. ‘पीड पराई जाणतो तोच खरा वैष्णव.’ असं म्हणत होते गांधी. ही सनातन धर्माच्या पुनरुज्जीवनाची चळवळ नव्हती. सनातन्यांच्या परिभाषेत ही समाज पुनर्रचनेचीच चळवळ होती. हे अन्य कोणी ओळखलं नसलं तरी सनातनी मंडळीनी नक्की ओळखलं होतं.

आंबेडकर हा माणूस आपल्या व्यवस्थेसाठी घातक आहे, पण त्याच्याशी लढणं सोपं होतं. गांधी मात्र त्यांच्यापेक्षा अधिक घातक आहे. कारण हा माणूस आमची परिभाषा वापरतोय आणि आमचंच सामर्थ्य हिरावून घेतोय. एकाच वेळी आपल्या देशात गांधी आणि आंबेडकर या उभयतांचे शत्रू सनातनीच का? पण हा प्रश्न कधी कोणी विचारत नव्हता. त्याकडे कोणाचं लक्ष जाऊ नये याचीच काळजी घेतली गेली.

एवढं असून वेळ निघून गेली. गांधीचं युग विस्तारतच गेलं. भाबडे लोक त्यांच्या मागं लागत गेले. धर्माच्या परिभाषेत धर्मपरंपरांबद्दल प्रतिकुल भावना रूजू लागल्या होत्या. शंकराचार्यांच्या गाद्या सुरक्षित होत्या. पण त्यांच्या आज्ञापालनाचं शक्तीसामर्थ्यच विलय पावत होतं. गांधीनी एक ओळखलं होतं, की सक्ती करून नाही तर हिंदू माणसाचं मन बदलून परिवर्तन घडवून आणू.

पण हे असंच सांगता सांगता दोन हजार वर्ष उलटून गेली होती. तेवढा वेळ वाट पाहायला मर्त्य माणसाला आयु्ष्य असतंच कुठे? म्हणून सर्वसंमत, लिखित कायदा हाच त्यावरचा उपाय असतो. एखाद्या अवतारी पुरूषानं शब्द उच्चारावा आणि सर्वांनी तो पाळावा एवढं सामर्थ्य मिळवणाऱ्या माणसाला मग जिवंत ठेवणंच धोक्याचं असतं. म्हणून गांधींचा खून होतो तेव्हा बाबासाहेब म्हणतात, ‘इट इज नॉट गुड टू बी सो गुड.’  बाबासाहेबांच्या या अखेरच्या उद्गारात सारं काही येतं. पुन्हा यावर कोणी भाष्य करावं, असं मला वाटत नाही.

देश घडवताना देशाची प्रकृती बिघडू नये म्हणून काळजी घेणारे महात्मा' गांधी आणि सुधारणेचं सुप्त साधन आपल्याच मातीत आहे हे ओळखून त्यासाठी आयुष्यभर मरणयातना भोगणारे युगप्रवर्तक महापुरूष आंबेडकर. यात मोठा कोण, छोटा कोण हे गुडघ्याएवढ्या उंचीच्या माणसांनी ठरवू नये. शक्य झालं तर त्यांचा हा संघर्ष जाणून घेण्यास आपलं स्वतःचं मन मोठं करता येईल का एवढाच विचार करावा, असं मला वाटतं

‘हौतात्म्य’ ही धक्का देणारी गोष्ट असते. पण जिवंत राहून विचार जगावा यासाठी शिव्याशापांना सामोरं जात जगणं हेही कमी मोलाचं नसतं हे आपल्याला कधीतरी उलगडायला हवं.

हेही वाचा : 

गांधीजींना तुकोबा भेटले होते

किती दिवस सोसायची ही घोर नाकेबंदी?

तू देवमाणूस आहेस, की खराखुरा देवच?

संत तुकाराम, महात्मा गांधी आणि कोरोनाची साथ

‘युगानयूगे तूच’: समग्र बाबासाहेबांकडे घेऊन जाणारी कविता

बाबासाहेबांनी कधी न दिलेली फेक मुलाखत छापून येते तेव्हा,

गांधीजींनी न लिहिलेली ही दोन भजनं गांधींच्या नावानं ओळखली जातात

(लेखक दत्ता भगत हे ज्येष्ठ साहित्यिक आणि विचारवंत आहेत. त्यांचा हा लेख गांधी ते महात्मा या एमजीएम विद्यापीठानं दीडशेव्या गांधी जयंतीनिमित्त प्रकाशित केलेल्या आलाय. त्याचा हा संपादित अंश आहे.)