सध्याचा सोशल मीडिया हा मंडईसारखा झालाय. इथं अहोरात्र सुरू असलेल्या प्रचंड मोठ्या कोलाहलात कोण कुणाला काय सांगतंय आणि का सांगतंय हे समजणं आकलनापलीकडचं होत चाललंय. आपण वेड्यासारखे मूलभूत समस्या विसरून फसव्या बैलांच्या मागे धावण्यात धन्यता मानायला लागलोत. आणि जोवर धावतोय तोवर आपल्यासाठी कात्रजचे नवनवे घाट बांधलेच जातील.
कल्पना करा की, तुम्ही अत्यंत गजबजलेल्या भाजी मंडईच्या मध्यभागी उभे आहात. तुमच्या चहूबाजूला वेगवेगळ्या भाज्यांचे विक्रेते आपापल्या गाळ्यात उभे आहेत आणि ते मोठमोठ्याने ओरडत आपापली भाजी विकायचा प्रयत्न करतायत. त्या सगळ्यांचे आवाज एकमेकांमधे मिसळून जाऊन एक प्रचंड मोठा गलका होतोय.
मंडईत ग्राहकांचीही गर्दी आहे. अनेक ग्राहक अनेक गाळेधारकांशी तावातावाने चर्चा आणि घासाघीस करतायत. या सगळ्या गलक्यात कोण कोणाला काय विकत आहेत, हेच आपल्याला समजेनासं झालंय. घरून नुसते कांदेच घ्यायचे आहेत, असं ठरवून आलेले आपण या कोलाहलात हरवून जाऊन, जिथून सगळ्यांत मोठा आवाज येतो त्या दिशेने जायला लागलो आहोत. आणि त्या ठिकाणी गेल्यावर कांद्याच्या ऐवजी तिथे दिसणारी वांगी घेऊन घरी परत जायला लागलोत.
सध्याचा सोशल मीडिया हा अशा मंडईसारखा झालाय. इथं अहोरात्र सुरू असलेल्या प्रचंड मोठ्या कोलाहलात कोण कुणाला काय सांगतंय आणि का सांगतंय हे समजणं सर्वसामान्य माणसाच्या आकलनाच्या पलीकडचं होत चाललंय. मग आपण इथं का आलो याचा विसर पडून, जिथून सगळ्यांत मोठा आवाज येतो त्या दिशेला लोक जायला लागलेत आणि तिथून जे विचार गळी उतरवले जातील, ते गळ्यात मारून घेतले जातायत.
हेही वाचा : मुलांना कोडिंगचं शिक्षण द्यावं का?
होतं असं की, सोशल मीडियावर रोज काही विषय ‘ट्रेंडिंग’ असतात. ट्रेंडिंग विषय म्हणजे ज्या विषयी जास्त संख्येने पोस्ट येत आहेत असे विषय. ट्रेंडिंग विषयांची यादी बघितली की, बहुसंख्य नेटिझन्स आज कशाची चर्चा करत आहेत, सोशल मीडियावर एकूणच मूड काय आहे याचा अंदाज येतो. ट्विटरवर तर देश, राज्य किंवा शहरनिहाय ट्रेंडिंग विषयांची यादी मिळते. म्हणजे कुठल्या भागात राहणारे लोक कशासंबंधी जास्तीत जास्त चर्चा करत आहेत हे समजतं.
सोशल मीडियावरचे ‘ट्रेंडिंग’ विषय बहुसंख्य वेळा अगदी नुकत्याच घडलेल्या एखाद्या घटनेबद्दल किंवा एखाद्या मोठ्या बातमीबद्दल चर्चा करणारे असतात. या घटना अथवा बातम्यांमधे अनेकदा काही वादग्रस्त मुद्दे असतात. एखादा वादग्रस्त मुद्दा ट्रेंडिंग असतो, तेव्हा संपूर्ण सोशल मीडियावर त्या विषयावर दोन्ही बाजूंनी तावातावाने मुद्दे मांडणार्या असंख्य पोस्टना उधाण येतं.
या चर्चा इतक्या टोकाला जातात की, जगात जणू दुसरा काही विषयच नाही, आजचा ट्रेंडिंग ‘हॅशटॅग’ जो आहे तोच जगातला एकमेव विषय राहिलेला आहे, असं वाटू शकतं. आता एक गंमत अशी आहे की, सोशल मीडियावर चार क्षण विरंगुळ्यासाठी, मित्र-मैत्रिणींशी संवाद साधण्यासाठी किंवा स्वतः व्यक्त होण्यासाठी आलेल्या व्यक्तीलाही त्या त्या वेळी ट्रेंडिंग असलेले विषय समोर दिसतात आणि त्यात वाहवत जाऊन मूळ ज्या कारणासाठी आलो ते कारण बाजूला पडतं. ट्रेंडिंग विषयाच्या कोलाहलात माणूस हरवून जातो.
सोशल मीडिया हे माहितीच्या प्रसारासाठीचं अत्यंत प्रभावी माध्यम आहे हे सगळ्यांना माहीत आहेच. ते वैयक्तिक अभिव्यक्तीसाठी अत्यंत उत्तम माध्यम आहे हेही आपण अनुभवत आहोत. याच बरोबर राजकीय विचारांच्या लढाईचं माध्यम म्हणूनही ते मोठ्या प्रमाणात वापरलं जातंय. या माध्यमाची ताकद आणि आवाका लक्षात घेऊन आपल्या पक्षाच्या किंवा विचारसरणीच्या प्रचार-प्रसारासाठी सर्वच राजकीय पक्ष याचा वापर करतायत.
बहुसंख्य राजकीय पक्षांची आणि त्यांच्या नेत्यांची सोशल मीडिया अकाऊंटही हल्लीच्या काळात असतात आणि त्यावर अनेक जण स्वतः लिहितही असतात. अनेक राजकीय नेते तर व्यक्त होण्याचं आणि विचार मांडण्याचं प्रमुख साधन म्हणून सोशल मीडिया वापरतायत. सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असलेल्या राजकीय नेत्यांना इथं हजारो-लाखो फॉलोअर असतात आणि ते मांडत असलेल्या विचारांचा, त्यांच्या पोस्टचा लाखो लोकांवर थेट प्रभाव पडत असतो.
हेही वाचा : फेक न्यूजची बाधा न हो कोणे काळी!
आता कल्पना करा की, वेगवेगळ्या विचारसरणींचे, वेगवेगळे राजकीय नेते हे सोशल मीडियाच्या मंडईमधले गाळाधारक आहेत आणि त्यांना त्यांच्या गाळ्याकडे आपल्यासारख्या सर्वसामान्य नागरिकाचं लक्ष वेधून घ्यायचंय. हे करण्यासाठी अर्थातच त्यांना सोशल मीडियाच्या कोलाहलात स्वतःचा आवाज अधिक मोठा किंवा अधिक वेगळा ठेवायचा प्रयत्न करावा लागतो.
हे होण्यासाठी सतत प्रकाशझोतात राहायचा प्रयत्न करणं, सतत काही स्फोटक अथवा वादग्रस्त विधानं अथवा पोस्ट करत राहणं याची काही जणांना सवय जडलेली दिसते. तर काहीजण स्वतःची रेष मोठी करता येत नसेल तर विरोधकांची लहान करण्यासाठी खोटंनाटं काही लिहिण्यापासून ते ‘फोटोशॉप’ केलेले खोटे फोटोज आणि ‘फोर्ज’ केलेली कागदपत्रे प्रकाशित करण्यापर्यंत काहीही उद्योग करताना दिसतात.
कोणत्याही पद्धतीने आपण ‘ट्रेंडिंग’ राहणं किंवा ट्रेंडिंग विषयासंबंधी अधिक वादग्रस्त काहीतरी लिहिणं असा प्रयत्न ज्यांचा समाजावर सकारात्मक प्रभावही पडण्याचीही शक्यता असते. असे अनेक राजकीय नेते करताना दिसतात.
हे करण्यामागचे त्यांचे दोन वेगळे हेतू असू शकतात. स्वतःकडे, आपल्या विचारांकडे लक्ष वेधणं आणि सतत वेधत राहणं हा पहिला हेतू असतो हे आपण बघितलंच. दुसरा हेतू आपल्याला गैरसोयीच्या वाटणार्या मुद्द्यांवरून लक्ष दुसरीकडे हटवणं हाही असू शकतो, असतो.
गैरसोयीच्या मुद्द्यांवरून आपलं लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी अनेक नेते आपल्याला शिस्तीत कात्रजचे घाट दाखवत असतात. कात्रजच्या घाटाची गोष्ट तुम्हाला आठवते का? नसेल तर एक क्विक रीकॅप. पुण्यात तळ ठाकलेल्या शाहिस्तेखानावर छापा मारून छत्रपती शिवाजी महाराज सिंहगडावर जायला निघाले. खानाचं सैन्य पाठलाग करणार हे त्यांना माहीत होतं आणि त्या सैन्याशी समोरासमोर लढाई करणं शक्य नव्हतं. मग महाराजांनी एक सॉलिड आयडिया केली.
त्यांनी कात्रजच्या घाटामधे शिंगांना मशाली बांधलेल्या बैलांना धावत घेऊन जाणारी एक टीम पाठवली. पाठलागावरच्या खानाच्या सैनिकांना वाटलं की, महाराज कात्रजच्या घाटातून जात आहेत म्हणून ते तिकडे गेले आणि महाराज दुसर्या रस्त्याने, कदाचित, सध्या आपण ज्याला सिंहगड रोड म्हणतो, त्या रस्त्याने सिंहगडला गेले! तर महाराजांच्या या अफलातून युक्तीमुळे एखाद्याची दिशाभूल करण्याला, त्याला कात्रजचा घाट दाखवणे हा वाक्प्रचार पडला.
हेही वाचा : इंटरनेटच्या समुद्रात गळ टाकून बसलेल्या हॅकर्सचं काय करायचं?
तर, आजकाल सोशल मीडियावर आपणा सगळ्यांना शिस्तीत कात्रजचा घाट दाखवला जातोय आणि आपणही जिथं जायचं ते सोडून भलतीकडेच धावतोय! म्हणजे असं बघा की, कोरोनाच्या महामारीमुळे निर्माण झालेली भीषण परिस्थिती आणि तिचं व्यवस्थापन करण्यामधे सरकारला सगळ्या आघाड्यांवर येत असलेलं अपयश इत्यादी खर्याखुर्या समस्यांपासून निसटून जावं म्हणून ‘देशप्रेम-देशद्रोह’, ‘अमुकचं टुलकिट - तमुकचा प्रपोगंडा’, ‘आयुर्वेद विरुद्ध आधुनिक वैद्यक’ इत्यादी इत्यादी.
शिंगांना मशाली बांधलेले अनेक बैल वजा विषय रोज बाजारात सोडले जातायत. बाजारात म्हणजे सोशल मीडियावर. आणि आपणही वेड्यासारखे आपल्या मूलभूत समस्या विसरून जाऊन या फसव्या बैलांच्या मागे धावण्यात धन्यता मानायला लागलोत.
अर्थात, तुमच्या-माझ्यासारख्या सर्वसामान्य नागरिकांना कात्रजचा घाट दाखवण्याचं काम फक्त सध्याचे सत्ताधारीच करतायत असं नाही. या आधीचेही सत्ताधारी करत आलेत आणि पुढचेही करत राहतील.
आपल्यासमोर फसव्या आणि अनावश्यक समस्यांचे बैल सोडून आपल्याला पळवत ठेवणं हे आपल्या सत्ताधार्यांचं कर्तव्यच असतं जणू! कदाचित आपण शिवाजी महाराजांच्या नावावर मतं मागत असल्याने, त्यांचा निदान एक तरी गुण आपल्यात आहे असं आपण दाखवलं पाहिजे याचं त्यांना कंपल्शन वाटत असावं. अन या कंपल्शनपोटी ते आपल्याला सदोदित कात्रजचा घाट दाखवत असावेत.
त्यांची कंपल्शन्स काहीही असोत. आपल्याला मात्र काहीही कंपल्शन नसताना आपण अशा शिंगांना मशाली बांधलेल्या बैलांमागे धावत जातो आणि वर एकमेकांची टाळकी फोडत बसतो हा आपलाच मूर्खपणा. आणि जोवर आपण हा मूर्खपणा करणार याची राजकीय पक्षांना खात्री असेल, तोवर आपल्यासाठी रोज नवे कात्रजचे घाट बांधले जातील आणि रोज नव्या बैलांच्या शिंगांना मशाली बांधून त्यात पळवत सोडलं जाईल.
सोशल मीडिया आपला आहे, आपल्यासाठी आहे. इथं आपण विरंगुळ्यासाठी किंवा व्यक्त होण्यासाठी आल्यानंतर इतरांच्या अजेंड्याला बळी पडून डोक्याची मंडई करून घ्यायची की नाही हे ठरवणं आपल्या हातात आहे. तसंच आपली कोणी दिशाभूल करत आहे का असा प्रश्न सतत विचारत राहून इथं सजगपणे वावरणंही आपल्याच हातात आहे. जे आपल्या हातात आहे ते आपण करत राहूया!
हेही वाचा :
ओटीटी प्लॅटफॉर्मना सेन्सॉर असायला हवा?
ओटीटीची मजल सुखवस्तू प्रेक्षकांपर्यंतच : नितीन वैद्य
भल्याभल्यांना घाम फोडतेय चीनची डिजिटल हेरगिरी
आरएसएस आणि रिलायन्सच्या ब्रँड वॅल्यूला मोदींमुळे धोका?
आपल्यावरच्या नियंत्रणासाठीच चाललाय सोशल मीडिया आणि सरकार यांच्यातला संघर्ष
(लेखक मुक्तस्रोत तंत्रज्ञानामधे आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करणारे प्रशिक्षक आणि वक्ते आहेत. त्यांचा लेख दैनिक पुढारीच्या बहार पुरवणीतून घेतलाय. )