महिला दिन विशेष : आईंना हमे देखके हैरान सा क्यूँ हैं?

०८ मार्च २०२१

वाचन वेळ : ७ मिनिटं


आज आंतरराष्ट्रीय महिला दिन. आपल्या पांढरपेशी दुनियेचा हिस्सा नसणार्‍या वेश्या या बाईविषयी आस्था, आपुलकी असण्याचा प्रश्नच येत नाही. तरीही खोकल्याची उबळ यावी तसं बॉलीवूडला अधूनमधून या विषयाचे उमाळे येत राहतात. वेश्यांचं चित्रण करणारे अनेक सिनेमे आपल्याकडे झालेत. त्यात वेश्या नेमक्या कशा होत्या याचं विश्लेषण ‘गुंगूबाई काठियावाडी’ या आगामी सिनेमाच्या निमित्ताने करायला हवं.

हिंदी सिनेमासृष्टीला रेड लाईट एरियातल्या वेश्यांच्या कथांवर सिनेमे बनवायला आवडतं. मात्र त्यात प्रबोधनाचा किंवा वास्तवतेच्या दर्शनाचा भाग नाममात्र असतो. भडक, सवंग, गल्लाभरू आणि आजच्या भाषेत सांगायचं झालं तर कॅची कंटेंट असलं की त्यांचं काम भागतं. इथला प्रेक्षकही फार अपेक्षा ठेवून आलेला नसतो. याचा अर्थ सगळेच आंबटशौकीन असतात अशातला भाग नाही. हरेक प्रेक्षकाने वैचारिक जाणिवा प्रगल्भ होण्यासाठी असे सिनेमे पाहावेत अशी अपेक्षाही नाही.

हिंदी सिनेसृष्टीला १९५५ मधल्या ‘देवदास’पासून ते आता येऊ घातलेल्या ‘गंगूबाई काठियावाडी’पर्यंतचा डार्क कॅनव्हास लाभलाय. कामाठीपुर्‍यातल्या वेश्यांचा आवाज बुलंद करणार्‍या गंगूची ही कथा ‘माफिया क्वीन्स ऑफ बॉम्बे’ या हुसैन झैदी यांच्या पुस्तकात आहे. याची सध्या सोशल मीडियासह सगळीकडे चर्चा आहे.

काही दिवसांत सिनेमा प्रदर्शित होईल. तिकीटबारी त्याचं भवितव्य ठरवेल. काही अवधीतच लोक विसरूनही जातील. इथं आयुष्यच इतकं गतिमान झालंय की, कुणाला कुणाची खबरबात असण्याची गरजच नाही. मग आपल्या सभ्य पांढरपेशी दुनियेचा हिस्सा नसणार्‍या वेश्यांविषयी आस्था, आपुलकी असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.

तरीदेखील खोकल्याची उबळ यावी तसं बॉलीवूडला अधूनमधून या विषयाचे उमाळे येत राहतात आणि हा विषय काही काळापुरता पुन्हा चर्चेत येतो. आता त्यात सोशल अपील किती आणि गॉसिप किती हा संशोधनाचा विषय व्हावा.

‘चेतना’ ठरला अचेतन

१९७० मधे बी. आर. इशारांचा ‘चेतना’ आला होता. त्यात रेहाना सुलतानने साकारलेल्या सीमाच्या तोंडी एक डायलॉग होता. ‘मैंने इतने नंगे मर्द देखे हैं की मुझे अब कपड़े पहनने वाले मर्दों से नफरत होने लगी है’...’ चेतना’ने त्या काळात तब्बल पाच दशकांपूर्वी जे कंटेंट दिले होते, ते ‘बेगमजान’मधे सेन्सॉरने अडवलं.

‘चेतना’ बॉक्स ऑफिसवर अचेतन ठरला. कारण तेव्हाचं पब्लिक माइंडसेट या आशय विषयासाठी तयार नव्हतं. ‘चेतना’ व्यवसाय करू शकला नाही. पण त्याच्या ओव्हरनाईट पब्लिसिटीमुळे रेहानाला वाटू लागले की, आपण ‘मायापुरी’पासून ‘रसरंग’पर्यंत आणि ‘स्क्रीन’पासून ‘फिल्मफेअर’पर्यंतची गॉसीप क्वीन झालो. सगळीकडे तिचे बोल्ड अवतारातले तोकड्या, तंग आणि पारदर्शक कपड्यातले फोटो छापून येऊ लागले.

‘चेतना’च्या पोस्टरवरचे रेहानाचे फोटो तर अगदी ‘फाडू’ होते. लाल साडी परिधान केलेली आणि एका हातात व्हिस्कीची बॉटल घेऊन बेडवर पडलेली, कस्टमरना खुणावणारी अशी तिची विविध रूपं प्रसिद्ध झाली. मात्र याची परिणती अशी झाली की, तिला केवळ वेश्यांच्या, बोल्ड भूमिकांच्याच ऑफर येऊ लागल्या.

हेही वाचा : बॉलिवूडच्या सिनेमात कधी आनंदी दलित पाहिलाय का?

वेश्येचं पात्र साकारल्याची किंमत

‘दस्तक’ या सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळूनही तिच्या रिअल लाईफ आणि रील लाईफची अक्षरशः फरफट झाली. एका मनस्वी अभिनेत्रीला पडद्यावर वेश्या साकारल्याची ही किंमत मोजावी लागत असेल तर प्रत्यक्षात ज्या वेश्या व्यवसाय करतात, त्यांना उतारवयात कोणती किंमत मोजावी लागत असेल?

एखाद्या वेश्येने ‘धंदा’ बंद करून सामान्य स्त्रीप्रमाणे संसार थाटला तरी पुरुषी समाजश्वापद तिच्या इतिहासाला हुंगत राहतं. तिचा पूर्वेतिहास कळल्यावर तिनं आपल्यासोबत विनामोबदला कुठेही कधीही झोपावं, अशी अपेक्षा बाळगू लागतं. हाच अधाशी वासनाडोंब रेहानाच्या करिअरला जाळून गेला. वेश्या साकारण्याची किंमत तिच्याकडून वसूल करून गेला.

प्रेक्षकांना न खटकणारी पुष्पा

याच्या नेमकी उलटी गोष्ट राजेश खन्नाच्या ‘अमरप्रेम’मधल्या शर्मिला टागोरची आहे. विभूतिभूषण बंदोपाध्याय या महान लेखकाच्या ‘हिंगेर कचोरी’ या कथेवर हा सिनेमा आधारला होता. पहिल्या पत्नीच्या मृत्यूनंतर जवळजवळ सत्तावीस वर्ष विभूतिभूषण विधूर म्हणून एकांताचं आणि अनेक हालअपेष्टांचं जिणं जगले. याच काळात त्यांनी जी दुनिया बघितली, त्यावर आधारित अनुभवांना ते शब्दबद्ध करत गेले.

कोलकात्याच्या बदनाम गल्ल्यात ‘हिंगेर कचोरी’मधील अनंग बाबू त्यांना वास्तवात भेटला होता. त्याचा जीव की प्राण असलेली पुष्पा तिथेच गवसली होती. विभूतिभूषणनी त्यांना नानाविध रंग चढवत आपल्या कथेत गुंफलं. मातृत्वाला भुकेल्या मुलाची आणि एका अय्याश रसिक तरुणाची कथा पुष्पाच्या पात्राशी जोडल्याने पुष्पाचं वेश्या असणं प्रेक्षकांना खटकत नाही.

बच्चूच्या वाडीतलं देखणं नाचगाणं

पुढे जाऊन शर्मिला टागोरने संजीवकुमार सोबत ‘मौसम’मधेही वेश्या साकारली. मात्र त्या कथेस प्रेमी युगुलाखेरीज बाप आणि मुलगी यांच्यातल्या नात्याचा टच होता. हिंदी सिनेमात तवायफ बहुतकरून पेश केल्या गेल्यात. बर्‍याच जणांना वाटतं की, वेश्या वस्तीत राहणार्‍या सगळ्या महिला देहविक्रय करत असाव्यात. हे म्हणजे कंट्री बारमधे कुणी पाणी जरी प्यायला तरी लोकांनी मात्र त्याने दारूच ढोसली असं समजावं तसं आहे.

उत्तर भारतातल्या सगळ्या मुख्य शहरांतल्या वेश्या वस्त्यांत देहविक्रय करणार्‍या स्त्रियांव्यतिरिक्त नाचगाणं करणार्‍या कलावंतीणी आहेत. आपल्याकडे कामाठीपुर्‍यातल्या बच्चूच्या वाडीमधे अगदी देखणं नाचगाणं सादर होतं. या गल्लीला ‘मुजरा गली’ असं नाव होतं. बॉलीवूडमधल्या हिरॉईनपेक्षाही सुंदर अशा लावण्यवती इथं आढळतात.

‘मुकद्दर का सिकंदर’चा पूर्ण स्टोरीप्लॉट आणि रेखाने साकारलेली जोहराबाई ही इथलीच देण होती. कादरखान यांचं बालपण ग्रांटरोडच्या परिसरात कोमेजत गेलं. त्याच काळात त्यांना जोहरा गवसली. इथलं नाचगाणं जरी अप्रतिम असलं तरी ते देहमिलनाच्या वाटेवरचं नाही हे नक्की.

हेही वाचा : अजय देवगण बड्डे स्पेशलः नैंटीजची लवइष्टोरी

दिलकश तवायफची हळुवार गाथा

नाचगाणं भरात होतं तेव्हा अनेक हिंदी सिनेमांत तवायफ आणि कोठ्यांचे विषय मांडले गेले. ‘देवदास’, ‘पाकिजा’, ‘उमराव जान’, ‘जिंदगी या तुफान’, ‘मुकद्दर का सिकंदर’, ‘घुंगरू’, ‘जहां आरा’, ‘मिर्झा गालिब’, ‘अमर प्रेम’, ‘एक नजर’, ‘शराफत’, ‘बाजार’, ‘मंडी’, ‘आप के साथ’, ‘चेतना’, ‘दस्तक’, ‘रज्जो’ आदी सिनेमात या विषयावर प्रकाश टाकला गेलाय. समांतर सिनेमाचे सुगीचे दिवस होते तेव्हा शाम बेनेगल आणि गोविंद निहलानी यांनी या विषयाला बर्‍यापैकी न्याय दिल्याचं दिसतं.

‘बाजार’मधल्या विकाऊ वधूचं आणि स्त्रीशोषणाचं सामान्यीकरण अस्वस्थ करतं. पाकिस्तानी लेखक गुलाम अब्बास यांच्या लघुकथेवर आधारलेल्या श्याम बेनेगलांच्या ‘मंडी’सह ‘गरम हवा’मधल्या ममत्व असणार्‍या लढाऊ वेश्यांची तडफड असोशीने जाणवते. ‘चक्र’मधल्या गलिच्छ वस्तीतलं बाईपणाआडच्या मादीचं सत्य ही काही बोलकी उदाहरणं ठरावीत.

‘पाकिजा’ ही एका दिलकश तवायफची हळुवार गाथा होती. दिलीपकुमार आणि शाहरुख या दोघांनीही साकारलेल्या ‘देवदास’मधली वेश्या असणारी चंद्रमुखी आपल्याला खटकत नाही. आपण केवळ कणवयुक्त नजरेने तिच्याकडे पाहत नाही तर आपल्या अंतर्मनात तिची अभिलाषा क्षणभर का होईना, तरळून जाते.

बंगालमधे नवरात्र दुर्गापूजा हा सर्वात मोठा सण आहे. दुर्गेच्या सुबक मूर्ती बनवण्यासाठी ज्या विविध ठिकाणची माती आणली जाते, त्यातलं एक ठिकाण वेश्यालय आहे. तिथं नाचगाणं करणार्‍या चंद्रमुखीकडून पारो माती आणते, ती चालते. पण चंद्रमुखी घरी आलेली कुणालाही चालत नाही हे वास्तव आहे आणि समाज यावर कुठलंही भाष्य करत नाही.

कोठ्यावर नाचणारी सात महिन्यांची गर्भवती

बॉलीवूडने अत्यंत हळव्या पद्धतीने हा विषय हाताळला नाही, असंही म्हणता येणार नाही. यासाठी गुरुदत्त यांच्या ‘प्यासा’चं उदाहरण सार्थ ठरावं. ‘प्यासा’मधल्या एका गाण्याच्या शूटिंगचं परफेक्ट लोकेशन ठरवता येत नव्हतं. गुरुदत्त यांनी ठरवलं होतं की, कोलकात्यामधल्या रेडलाईट एरियातल्या एखाद्या बनारसी कोठ्यावरच हे गाणं शूट करायचं. त्याशिवाय सच्चेपणा येणार नाही.

अडचण अशी होती की, गुरुदत्त कधीच कोठ्यावर गेले नव्हते. शूटकरता सेट पोझिशन्स आणि कॅमेरा अँगलच्या नोंदी घेण्यासाठी आपला लवाजमा टाळून मित्रांसह गुरुदत्त तिथं गेले. गुरुदत्त तिथं येताच त्यांची खातरदारी झाली. चिकाच्या पडद्याआड नर्तकी येऊन उभी राहिली आणि बाहेरच्या लफ्फेदार बैठकीत मैफल सजली.

गुरुदत्त कमालीच्या उत्सुकतेने सगळे बारकावे टिपत होते. मुजरा सुरू झाल्यानंतरचं दृश्य पाहून ते कमालीचे अस्वस्थ झाले. त्यांच्या अंगावर सर्रकन काटा आला. काही क्षण त्यांना स्वतःचीच लाज वाटली. मुजरा पाहताना त्यांच्या चाणाक्ष नजरेनं ताडलं होतं की, कोठ्यावर नाचणारी ती तरुणी जवळपास सात महिन्यांची गर्भवती होती. ती हसर्‍या चेहर्‍याने नाचत होती. पण तिच्या हालचाली अवघडलेल्याच होत्या. त्यातून तिची मजबुरी साफ झळकत होती.

हेही वाचा : इफ्फी : देशविदेशांच्या सिनेमांचा कॅलिडोस्कोप

अनमोल रत्नाची भर

ती नेटाने आणि कष्टाने नाचत होती. तरीदेखील लोक मिटक्या मारत तिचा नाच पाहत होते. तिच्यावर दौलतजादा करत होते. हे विदारक दृश्य पाहताच गुरुदत्त आपल्या मित्राशी कानगोष्ट करून तिथून उठून गेले. जाताना त्यांच्या हातातली नोटांची बंडलं त्यांनी तिथंच ठेवली. ते सगळे पैसे त्या मुलीच्याच हाती देण्याविषयी ते बजावून गेले.

या घटनेनंतर दोन दिवस स्वतःला बंदिस्त केलं, त्या धक्क्यातून सावरताच गुरुदत्तनी ‘प्यासा’मधील गुलाबोला म्हणजे वहिदा रेहमानला कळवलं की, मला साहिरच्या ‘त्या’ गाण्यासाठी कुंटणखान्याचा सीन मिळालाय. आणि आधी ठरवल्याप्रमाणे त्याच लोकेशनप्रमाणे त्यांनी ते गाणं शूट केलं आणि हिंदी सिनेमासंगीताच्या खजिन्यात एका अनमोल रत्नाची भर पडली. एसडींनी संगीत दिलेलं, काळजाला पीळ पाडणारे रफींच्या दर्दभर्‍या आवाजातलं ते आर्त गीत होतं ‘जिन्हें नाज है हिंदपर, वो कहा है!’

पुरुषी वासनेची जोपासना

स्त्रीकडे बघण्याचा समाजाचा द़ृष्टिकोन किती दूषित असतो याचं बोलकं उदाहरण म्हणून या सिनेमाकडे पाहता येईल. वेश्येनं सुधरावं म्हटलं तरी लोक तिला सुधरू देत नाहीत ही वस्तुस्थिती आहे. तिच्या आयुष्यातला अंधार धुंडाळत तिथं येतात आणि तिला पुन्हा त्या देहाच्या बाजारात नेऊन तिचा कडेलोट करतात.

ऑस्कर विजेत्या ‘द सेल्समन’ या इराणी सिनेमात एक वेश्या घर सोडून जाते. तिथं नवी स्त्री राहायला येते. लोक तिलाही वेश्याच समजतात. कुठली खातरजमाही करावी वाटत नाही. बिनधास्त तिच्या आयुष्यात घुसखोरी करतात आणि एका सुखी जोडप्याचं जीवन उद्ध्वस्त करतात.

एका वेश्येच्या घराची ही कथा आहे तर साक्षात वेश्याव्यवसाय करणारी स्त्री कुठेही गेली तरी पुरुषी श्वापदं तिला हुंगत हुंगत तिथं येऊन पोचतातच! ज्या देशात आईने बाळाला दूध पाजताना कोण्या पुरुषाने तिच्या त्या मातृवत्सल स्तनाकडे पाहिल्यावर त्याची वासना जागृत होते याची घृणास्पद भीती बाळगून तिच्यासाठी बंदिस्त जागा उपलब्ध व्हाव्यात म्हणून आटापिटा केला जातो. मूळ पुरुषी वासनाउत्पत्तीच्या किड्याची लोभस रूपात जोपासना केली जाते तिथे ‘बेगमजान’ला ‘फक्त प्रौढांसाठी’चं ए प्रमाणपत्र मिळणं साहजिक होते.

हेही वाचा : आमच्या प्रेमाचा एक तर सैराट होतो नाहीतर काकण!

जगण्याची आणि प्रेमाची लढाई

‘पहले वो एक औरत है, फिर कोठेवाली है’ असं रग्गील स्वरात सांगणारी बेगमजान पाहून सादत हसन मंटोच्या तौबा टेक सिंगची आठवण येते. आर.के.च्या ‘राम तेरी गंगा मैली’मधे पहाडी भागात राहणार्‍या भोळ्या भाबड्या गंगाला मणिलालने फसवून कोलकात्यात ताजेश्वरी बाईच्या कोठ्यावर आणलेलं असतं. नरेनचा मौसा तिला पुन्हा त्याच्या पुढ्यात घेऊन जातो आणि त्याला वास्तव सुनावतो की, बाजारू चीजों से घर सजाये जाते है, बसाये नही जाते! खरंच आहे हे!

पण सगळ्याच स्त्रियांचं नशीब ‘गंगा’सारखं नसतं. ‘अमरीन’सारख्या स्त्रिया जास्ती असतात. ‘आईना हमे देख के हैरान सा क्यू है?’ असा सवाल घेऊन फिरणार्‍या देखण्या अमरीनचं पात्र साकारलं होतं रेखाने! सिनेमा होता मुजफ्फर अलीचा ‘उमराव जान’! अमरीनची जगण्याची आणि प्रेमाची लढाई एकाच वेळी सुरू असते.

खरंतर रोजच्या जगण्याच्या रोजीरोटीच्या लढाईत आजकाल जो तो हैराण आहे. प्रत्येकाला काही तरी हवंय, आणि या हव्याहव्याशा हव्यासात नाती पणाला लागतात. ‘दिल की धडकन’ वगैरे सगळे नाजूक गोष्टी केव्हाच बेजान होऊन जातात कळत नाही. काळजाचा दगड होत जातो. तर ही अमरीन म्हणजे जणू ‘दुख की लंबी काली सहमी सहमी सी रात’ असते!

हीच काळी रात्र या बायकांच्या आयुष्यात अखंड असते. सिनेमाने तिचा बाजार न मांडता त्यातून त्यांच्या व्यथा, संघर्ष वास्तववादी पद्धतीने मांडायला हवा. वेश्येकडे जाऊन शरीरभोग घेणार्‍या लोकांच्या भोगवादी दृष्टिकोनात आणि त्यांचे विषय सवंग पद्धतीने मांडून पैसा कमावण्याच्या दृष्टिकोनात फारसा फरक नाही, असं म्हणणं गैर नाही. सहृदयी व्यक्ती म्हणून आपण तरी तशी अपेक्षा ठेवूया.

हेही वाचा : 

वो सुबह कभी तो आयेगी!

फक्त प्रेम पुरेसं आहे का हो, सर?

'ब्रोकन’ तरूणाई ‘ब्रेक’ डान्सवरच थिरकणार ना!

भारतात बॉलिवूडसारखे आणखी किती वूड आहेत?