लॉकडाऊनमधले मोकळे रस्ते दाखवतायत शाश्वत पर्यावरणाची वाट

०५ जून २०२१

वाचन वेळ : ५ मिनिटं


आज ५ जून. जागतिक पर्यावरण दिवस. गेल्या वर्षभरात लॉकडाऊनमुळे भारतातलं पर्यावरण, हवेचा दर्जा, पाण्याच्या पातळीत सुधारणा झाल्याचं दिसतंय. याशिवाय, कार्बन उत्सर्जन, कचरा, नद्यांचं प्रदुषणही कमी झालंय. वर्षभरातली ही बेरीज वजाबाकी समजून घेताना पुढच्या वर्षात कोणत्या सवयींचा गुणाकार करायचा याचं साधं सोपं गणित मांडणारा यंदाचा पर्यावरण दिवस आहे.

जगात सूर्याच्या खाली जे जे येतं ते सगळंच पर्यावरण. आज जागतिक पर्यावरण दिवस. गेल्या ४७ वर्षांपासून जगातल्या १४३ देशात दरवर्षी ५ जूनला हा दिवस साजरा केला जातो. पर्यावरण वाचवण्यासाठी आणाभाका घेतल्या जातात. परिषदा भरवून पर्यावरणाच्या संवर्धनासाठी कृतीकार्यक्रम आखले जातात. शाळांमधे मुलांना पर्यावरणावरच्या धोक्यांची माहिती दिली जाते. काही जनजागृतीचे कार्यक्रम होतात. पण मनापासून पर्यावरणासाठी लढणारे अगदी थोडे लोक असल्याने या सगळ्यातून संवर्धनाची शक्यता कमीच राहते.

पण यावर्षीचा पर्यावण दिन काहीसा वेगळा ठरेल. कारण, गेल्या वर्षभरात कसलेही कृतीकार्यक्रम, परिषदा, जनजागृतीचे कार्यक्रम न घेताही भारतातल्या सगळ्या नागरिकांकडून नकळतपणे पर्यावरणाचं संवर्धन झालंय. गेल्या वर्षभरात लॉकडाऊनमुळे भारतातलं पर्यावरण, हवेचा दर्जा, पाण्याच्या पातळीत सुधारणा झाल्याचं दिसतंय. याशिवाय, कार्बन उत्सर्जन, कचरा, नद्यांचं प्रदुषणही कमी झालंय. वर्षभरातली ही बेरीज वजाबाकी समजून घेताना पुढच्या वर्षात कोणत्या सवयींचा गुणाकार करायचा याचं साधं सोपं गणित मांडणारा यंदाचा पर्यावरण दिवस आहे.

हेही वाचा : एका झाडाची किंमत शोधली कशी?

लॉकडाऊनचा मोकळा श्वास

डेनिस हेस हे प्रसिद्ध पर्यावरणवादी कार्यकर्ते. त्यांनी अर्थ डे नेटवर्कची स्थापना केली. ते म्हणतात, एका माणसानं आठवड्यातला फक्त एक दिवस घरी बसून काम केलं तरी प्रदूषण थोडंफार कमी व्हायला मदत होईल. गेले एक वर्ष जवळपास सगळेच मध्यमवर्गीय आणि उच्चमध्यमवर्गीय भारतीय वर्क फ्रॉम होम करतायत. ऑफिसमधले एसी, कम्पूटर, जाण्या- येण्यासाठी होणारं वाहनांचं प्रदुषण, कचरा, कागदांचा वापर, वीजेचा वापर, कारखान्यांमधून होणारं हवेचं, नदीचं प्रदुषण, मोठमोठाले आवाज हे सगळंच कमी व्हायला मदत झालीय.

भर शहरात मध्यभागी असणाऱ्या फ्लॅटच्या खिडकीतूनही एक मोकळा श्वास उरात भरून घेता यावा असं २०२० हे वर्ष होतं. वर्ल्ड एअर क्वालिटीचा मार्च २०२१ मधे प्रकाशित झालेला रिपोर्ट अगदी हेच सांगतो. २०२० या वर्षात हवेचं प्रदुषण अतिशय कमी झाल्याचं तर या रिपोर्टमधे स्पष्टच लिहिलंय.

हवेत पीएम २.५ याचे कण किती असतात यावरून हा रिपोर्ट काढला जातो. २.५ मायक्रॉन किंवा त्यापेक्षा कमी आकाराचे पार्टिक्युलेट मॅटर म्हणजे पीएम२.५. हे आकारानं इतके लहान असतात की नाकातून श्वास घेतल्यावर थेट रक्तात मिसळायला यांना फारसा वेळ लागत नाही. हवा प्रदुषित करून माणसाच्या आरोग्यावर परिणाम करण्यात हे प्रदुषक सगळ्यात जास्त पटाईत आहेत, असं आयक्यूएअर ही स्वित्झर्लंडची हवेचा अभ्यास करणारी संस्था म्हणते. या लॉकडाऊनकाळात हवेत ही प्रदुषकं ४० ते ६० टक्के कमी झाली होती.

निसर्गाची मलमपट्टी

लॉकडाऊननंतर लगेचच वातावरणातल्या एरोसॉलच्या प्रमाणातही घट झाल्याचं नासाच्या तीन उपग्रहांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे सर विश्वेश्वरय्या नॅशनल ऑफ टेक्नोलॉजीमधे झालेल्या संशोधनातून समोर आलं. विशेषतः उत्तर भारतात हे एरोसॉलचं म्हणजे वातावरणातले लहान थेंब, धुळीचे कण, कार्बनचे सूक्ष्म कण यांचं प्रमाण फार कमी झालं होतं. कार्बन उत्सर्जन, नायट्रोजन, सल्फर ऑक्साईड ही सगळीच प्रदुषकं एकावेळीच कमी झाल्यामुळे भारताचा एअर क्वालिटी इंडेक्स १५०-२०० वरुन १०० च्याही खाली गेला होता. हा इंडेक्स जितका कमी तितकं पर्यावरणासाठी चांगलं असतं.

हवेचं शुद्धीकरण हे तर लॉकडाऊननं केलेलं सगळ्यात महत्त्वाचं काम. पण ते एवढ्यावरच थांबलं नाही. अगदी पाण्याचं आणि आवाजाचं प्रदुषणंही लॉकडाऊनमुळे कमी झालं. कारखाने आणि त्यातून नदीत, नाल्यात सोडलं जाणारं सांडपाणी हे नद्या खराब होण्यामागचं सगळ्यात महत्त्वाचं कारण. तेच बंद झाल्याने देशभरातल्या नद्यांनी मोकळा श्वास घेतला. समुद्राचे किनारेही पर्यटक नसल्यामुळे स्वच्छ राहिले.

गाड्यांचे कारखान्यांचे अनावश्यक आवाज थांबले, जमिनीचं वायब्रेशन कमी झालं.  मुंबई, चेन्नई, कोलकत्ता सारख्या महानगरात माणसांनी अनेक वर्षांनी मोकळं, स्वच्छ आकाश अनुभवलं. अनेक ठिकाणी रात्रीच्या चांदण्याही परतल्या. स्वतःची मलमपट्टी करण्यात निसर्गानं लॉकडाऊन घालवला.

हेही वाचा :  पाऊस तर जगभर पडतो, पण भारतातला मान्सून जगावेगळा आहे!

दुर्लभ झालं सुलभ

खरंतर प्रदुषण कमी झाल्यामुळे, लोक घरात अडकल्याने निसर्ग किती मोकळा झाला हे सांगण्यासाठी आकडेवारीचीही गरज पडणार नाही इतके त्याचे परिणाम लोकांना प्रत्यक्ष अनुभवता येत होते. पंजाबमधून १९९५ पर्यंत दिसणारी आणि नंतर गायब झालेली हिमालयाची टोकं एरोसॉल कमी झाल्यानं पुन्हा एकदा दिसू लागली. मध्य प्रदेशातल्या इंदोर शहरातल्या एका रस्त्यावरच्या पूलावरून ३५ किमी दूर देवास डोंगरावरच्या पवन चक्क्या फिरताना दिसत होत्या. याचे फोटोही सोशल मीडियावर वायरल झाले होते.

मुंबईतल्या वाशीच्या खाडीत पहिल्यांदाच खेळणाऱ्या डॉल्फिनचे फोटोही अनेकांनी वायरल केले होते. तळवे वेटलँडमधेही एप्रिलमधे विदेशी फ्लेमिंगो पक्षांनी भरून गेलं होतं. रांचीतही फेब्रुवारीपर्यंत परत जाणारे पक्षी प्रदुषणविरहीत वातावरणात एप्रिलच्या शेवटापर्यंत रेंगाळले. अशा अनेक बातम्या, स्वच्छ नद्यांचे फोटो भारताच्या नव्या पिढीनं पहिल्यांदाच अनुभवले. अशा इतरवेळी दुर्लभ मानल्या जाणाऱ्या गोष्टी सहज दिसत होत्या.

कचऱ्याचं वाढलेलं प्रमाण

पण निसर्ग स्वतःच्या जखमा भरून काढतोय याचा अर्थ आपलं काम संपलं असा होत नाही. प्रदुषणात घट झालेली असली तरी कचऱ्याचं प्रमाण वाढलं असल्याचं नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशन या संस्थेनं प्रकाशित केलेल्या एका रिसर्च पेपरमधे सांगितलंय. लॉकडाऊनमुळे आपण सगळेच ऑनलाईन शॉपिंगमधूनच मन रमवत होतो. होम डिलिवरीच्या गरजेमुळे त्याच्या पॅकेजिंगचा कचराही वाढलाय. ऑनलाईन मागवलेलं अन्नही असंच प्लॅस्टिकचा वापर करून पॅक केलेलं असतं. घरांचाही कचरा खूप वाढलेला दिसतो.

हॉस्पिटलची मागणी वाढल्याने वैद्यकीय कचराही अतिशय वाढलेला आहे. साधारणपणे २०० ते ३०० मॅट्रिक टन कचरा दररोज तयार होतोय. लॉकडाऊन आधी जवळपास ५० टन इतकं याचं प्रमाण होतं. यात कचऱ्यातच आता पीपीई किट, मास्क आणि ग्लोव्हचीही भर पडलीय. या कचऱ्याचा पुनर्वापर किंवा विघटन करण्यासाठी उभी राहिलेली आधीच कमकुवत असलेली भारतातली व्यवस्थाही या काळात फारशी सक्रिय नव्हती.

हेही वाचा : तर, ते मलाही नक्षलवादी ठरवतीलः नजुबाई गावित

शाश्वत पर्यावरणाची वाट

एअर क्वालिटी रिपोर्ट २०२० प्रमाणे हवेचा दर्जा सुधारला असला तरीही आजही दिल्ली जगातल्या सगळ्यात जास्त प्रदुषित शहरांमधे आपलं स्थान टिकवून आहे. जगातल्या सगळ्यात जास्त प्रदुषित असणाऱ्या ३० शहरांपैकी २२ शहरं भारतात आहेत. त्यात पहिल्या नंबरवर असणाऱ्या चीनमधल्या झिनजियांगनंतर गाझियाबाद या उत्तर प्रदेशमधल्या शहराचा नंबर लागतो. त्यामुळेच पर्यावरण एवढं सुधारूनही भारतावरचा प्रदुषित देशावरचा शिक्का पुसला गेलेला नाही.

पर्यावरणाला आलेले हे चार चांगले दिवस टिकवून ठेवण्याची जबाबदारी आपली आहे. यंदाच्या पर्यावरण दिवसाची थीमही या जबाबदारीची जाणीव करून देणारीच आहे. इकोसिस्टिम रिस्टोरेशन अशी. म्हणजेच लॉकडाऊनमुळे पर्यावरणाच्या सुधारणाऱ्या परिस्थितीत आपण मदत करायला हवी. झाडं लावणं, ती जपणं हा त्यातला एक महत्त्वाचा भाग झाला. पण त्याशिवाय, गरज नसताना गाडी न वापरणं, फिरायला गेल्यावर कचरा न करणं, वीज जपून वापरणं, अगदी आपलं डायट बदलणं अशी छोटी छोटी पावलं टाकत आपण शाश्वत पर्यावरणाची वाट धरू शकू.

हेही वाचा : 

कुछ वायरस अच्छे होते है!

तुम्ही मोबाईल चार्जरशिवाय विकत घेणार का?

 वेगन म्हणजे वेजिटेरीअन नाही, त्यापेक्षा बरंच काही

आयोडीनयुक्त मिठामुळे आपण आजारी पडतोय का?

इतिहास सांगतो, निसर्गातलं वैविध्य संपत असल्यानं जगावर वायरस संकट