कोरोनामुळे घडणार की बिघडणार आपली ही पॅनडेमिक जनरेशन?

१३ एप्रिल २०२१

वाचन वेळ : ४ मिनिटं


कोरोनाचा परिणाम आपल्यावर होतोय, तसा आपल्या मुलांवरही होतोय. कोरोनामुळे घराच्या चार भींतींबाहेरचं जग यातल्या अनेकांनी पाहिलेलंही नाहीय, अशी मुलं कोरोनानं घडवलेल्या या पॅनडेमिक जनरेशनमधे आहेत. तशीच शाळा बंद पडल्यामुळे मजुरीवर जाणारी मुलंही याच जनरेशनची आहेत. आणखी २० वर्षांनी या पॅनडेमिक जनरेशनच्या माध्यमातून कोरोना आपल्या प्रत्येक गोष्टीवर छाप पडत राहणार, यात शंका नाही.

संकटं पिढी घडवतात. मुलं काय पाहतात, काय अनुभवतात, काय परिस्थितीत जगतात यावरून ती पिढी कशी होणार, काय मूल्य स्वीकारणार हे ठरत असतं. अमेरिकेत ९ सप्टेंबरला ट्वीन टॉवरवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. त्या हल्ल्यानं एका संपूर्ण पिढीवर परिणाम केल्याचं अनेक संशोधनातून सिद्ध झालं. कोरोना वायरसचं संकटही याला अपवाद नाही.

जीवघेणा आजार आपल्या डोक्यावर घोंगावतोय, आपली अर्थव्यवस्था डबघाईला आली, माणसांच्या नोकऱ्या जातायत, रोजगार सोडून, शहरं सोडून माणसं चालत घरी गेली. बहुतांश कुटुंबात राहण्याचा प्रश्न निर्माण झालाय. रोजचं अन्नं मिळेल की नाही याची भीती वाटावी असे असुरक्षित दिवस पाहिलेत. अशा वातावरणात मुलं वाढतायत. एक नवी पिढी तयार होतेय.

पॅनडेमिक जनरेशन म्हणजे काय?

दुसऱ्या महायुद्धानंतर थेट या कोरोना संकटांमुळेच जगातल्या सगळ्या देशांनी एकाचवेळी एकाच कारणासाठी आपल्या शाळा आणि शैक्षणिक संस्था बंद केल्यात. याचा खोलवर आणि गंभीर परिणाम येणाऱ्या पिढीवर होणार आहे. या पिढीला ‘पॅनडेमिक जनरेशन’ असं म्हटलं जाईल. साथरोग आल्यानंतर जन्मलेली आणि त्याकाळात ० ते १४ या वयात असणारी सगळी मुलंमुली या ‘पॅनडेमिक जनरेशन’ मधे येतील.

अजून २०-२५ वर्षांनी म्हणजे २०४० च्या जगात या पॅनडेमिक जनरेशनमधल्या पोरांची संख्या जास्त असेल. उद्याचे डॉक्टर, इंजिनियर, शिक्षक या पॅनडेमिक जनरेशमधले असतील. इथल्या ऑफिसेसमधे या जनरेशनचीच मुलं काम करतील. तीच उद्याचं भवितव्य घडवतील. उद्याच्या प्रत्येक गोष्टीवर कोरोना या जनरेशनच्या माध्यमातून स्वतःची छाप पाडत राहील.

हेही वाचा : कोरोना वायरसबद्दल मुलांशी आपण कसं बोलायचं?

दुसऱ्यांचा विचार करणारी पिढी

ही पॅनडेमिक जनरेशन अनेक कारणांसाठी वेगळी आहे. या पिढीतल्या बहुतेकांचा अगदी तंत्रज्ञानाच्या मांडीवरच जन्म झालाय. खऱ्या मित्रांपेक्षा जास्त स्मार्टफोन, टॅब, लॅपटॉप हेच त्यांचे लंगोटी यार आहेत. घराबाहेर जाणं शक्य नसलं तरी या सगळ्या तंत्रज्ञानाचा वापर करून ते स्वतःचं मनोरंजनही करून घेतात. त्यातून नको ती कामंही करत असतात. तसंच ऑनलाईन क्लास, ई-लर्निंग प्लॅटफॉर्ममधून जास्तीची माहितीही जमा करतात.

आपल्या मित्रं मैत्रिणींशी बोलायची जुनी साधनं बंद पडली असली तरी त्याला पर्याय त्यांनी शोधलाय. झूम, गुगल मिट, वीडियो कॉल ते शिकलेत. फक्त तंत्रज्ञानच नाही तर दुसऱ्याबाबत विचार करणारी ही पिढी आहे. आपल्या वागण्यानं, आपल्या मास्क न घालून फिरण्यानं लोकांना कसा त्रास होऊ शकतो हे या छोट्या मुलांनी वारंवार ऐकलंय. कोरोनाच्या काळात वाढलेल्या मानसिक आरोग्याची जाणीवही या मुलांच्यात आपसुकच पेरली गेलीय. त्यामुळेच स्वतःसोबत दुसऱ्यांचाही विचार करणारी ही पिढी असेल.

पण कोरोनाचे हे सगळे चांगले परिणाम भोगणारी मुलं ही बहुतेक श्रीमंत आणि उच्चमध्यमवर्गीय घरातलीच असणार आहेत. तर दुसरीकडे भारतातली बहुतेक कुटुंब कोरोनामुळे उद्ध्वस्त झालीयत. त्यातल्या मुलांचे होणारे हाल कल्पना न करण्यासारखे आहेत. कोरोनानं त्यांच्या शिक्षणावर, कुटुंबावर, सामाजिक नातेसंबंधांवर, आनंदावर आणि स्वतःला सिद्ध दाखवण्याच्या संधीवर केलेले आघात बहुतांश मुलांना गरिबीच्या खाईत ढकलणारे आहेत.

आरोग्य व्यवस्थेची वाताहत

तंत्रज्ञान हाताळणाऱ्या मुलांपेक्षा इंटरनेट नावाच्या गोष्टीचा गंधही झाला नाही, अशीही मुलं या पिढीत जास्त आहेत. स्मार्टफोन, इंटरनेट अगदी टीवी विकत घेणंही त्यांच्या आईवडीलांना परवडणारं नव्हतं. लॉकडाऊनमधे घरात बसून काय करायचं याचा विचार त्यांनी केला नाही. तर आईवडीलांसोबत सिमेंट मिक्सरमधून, सायकलवरून, हातगाडीवरून आणि काहीच नाही मिळालं तर चालत गावाकडे काही जण स्थलांतरीत झालेत. 

त्यांच्या पालकांच्या नोकऱ्या गेल्या. साठवलेल्या तुटपुंज्या पैशांवर कसंतरी त्यांचं घर चाललंय. मजुरीवर काम करणारे तर उपाशी मरायची वेळ आली. अशा परिस्थितीत पुरेसं अन्न, चांगल्या आरोग्य सेवा अगदी लसीकरण न मिळालेली मुलंही या पिढीत आहेत.

अजून जन्मालाही न आलेल्या मुलांनाही कोरोनाचा असा फटका बसलाय. नशिबाने गर्भाला किंवा नवजात बाळांना कोरोनाची लागण झाल्यामुळे पोलिओसारखी मोठी शारीरिक हानी होत नाही. पण साथरोगातल्या लॉकडाऊनमुळे गरिब कुटुंब आरोग्य आणि खाण्यापिण्याकडे कमी लक्ष देणार. साहजिकच, मुलांच्या आरोग्याचे आणखी हाल होताना दिसतील, असं २०२०ला वर्ल्ड बँकेकडून प्रकाशित झालेल्या ह्युमन कॅपिटल इंडेक्समधे सांगण्यात आलं.

हेही वाचा : कोरोना कुटुंबातलं सातवं पोरच इतकं वात्रट कसं निघालं?

शाळाही मागे सुटली

युनायडेट नेशन्स इंटरनॅशनल चिल्ड्रन्स इमरजन्सी फंड्स म्हणजेच युनिसेफ या संस्थेच्या एका अहवालात सांगितल्याप्रमाणे १६० कोटी म्हणजेच जगातल्या ९१ टक्के मुलांवर शाळा बंद झाल्याचा परिणाम झालाय. यातली २९ कोटी मुलं तर भारतातलीच आहेत.  

शाळेत मधल्या सुट्टीत मिळणारा पोषक आहार मुलांना मिळत नाही. अनेक संस्था किंवा सरकारी योजनांमार्फत मोठ्या मुलींना शाळेत सॅनेटरी नॅपकिन्स मिळायचे. तेही आता बंद झालेत. घरात पैसा नाही म्हणून मुलं मजुरी करतायत आणि मुलींचा बालविवाह होतोय. कोरोना संपल्यावर ही मुलं शाळेत परत येतील याची काहीही शक्यता उरलेली नाही.

लॉकडाऊनमधे चालत घराकडे निघालेल्या मजुरांपैकी एका बाईचा रात्री बिहार स्टेशनवर झोपेत मृत्यू झाला होता. याची कल्पना नसलेलं तिचं वर्षा दोन वर्षाचं बाळ तिच्या अंगावरच्या पांघरुणाशी खेळत होतं. हा वीडियो सोशल मीडियावर खूप वायल झाला होता. ते छोटं मुलंही याच पिढीचं प्रतीक आहे.

अंतरं वाढवणारी पॅनडेमिक जनरेशन

तंत्रज्ञानाच्या मांडीवर खेळत मोठी झालेली, वर्क फ्रॉम होम करणाऱ्या आईवडीलांसोबत सुरक्षित वातावरणात वाढलेली मुलं आणि लसीकरण चुकलेली, शिक्षण न मिळालेली मुलं या दोघांची मिळून ही पॅनडेमिक जनरेशन बनलीय. समाजातल्या दोन घटकांमधलं अंतर या पिढीत जास्तच ठळकपणे दिसेल. खरंतर, तंत्रज्ञानाच्या जगात हे अंतर कमी होईल असे अंदाज शास्त्रज्ञांनी वर्तवले होते. पण त्यांचंही म्हणणं ही पॅनडेमिक जनरेशन खोटं ठरवेल.

संकट सुरू असताना आणि ते झाल्यानंतर मुलं काय अनुभवतात यावर ती कशी प्रतिक्रिया देणार हे ठरतं. दुसऱ्या महायुद्धानंतर जन्मलेल्या मुलांनी आपल्या आईवडीलांना, आपल्या देशातल्या सगळ्यांना एक साधं राहणीमान मिळवण्यासाठी धडपडताना पाहिलं. या महायुद्धात आपल्या अनेक प्रिय माणसांचे जीव जातानाही काही जणांनी पाहिले. 

त्यातून आपल्या कुटुंबाला सुरक्षितता मिळवून देण्यासाठी नियम पाळत आपलं काम करत राहणं, छोट्या छोट्या गोष्टींचं महत्त्व समजून घेणं हे या पिढीनं आत्मसात केलं. त्यामुळेच या पिढीला सायलेंट जनरेशन असं म्हणतात. त्यानंतर बेबी बुमर्स आले, जनरेशन एक्स, जनरेशन वाय म्हणजेच आत्ताचे मिलेनियल आले. पॅनडेमिकसोबत वाढणाऱ्या जनरेशन झेडचं काय होतं ते पहायचं आहे.

हेही वाचा : 

हात धुण्यासाठी साबण वापरायचा की सॅनिटायझर?

क्वारंटाईनमधेही लोकांना जातीची माती का खावी वाटते?

लस असतानाही आपल्याला वायरसवरच्या औषधांची गरज पडेल?

आपण सारखं चेहऱ्याला हात का लावतो? ही सवय कशी मोडायची?

ताप मोजणाऱ्या बंदुकीनं कोरोना वायरसवर अचूक निशाणा साधता येईल?