सोशल मीडियाचा चेहरामोहरा बदलणारं ऍप म्हणून ‘क्लबहाऊस’ची सध्या चर्चा सुरूय. एका खोलीत असताना होतो तसा संवाद या ऍपमधून एखाद्याशी करता येतो. ओळखत नसलेल्या माणसांना आपला नंबर न देता बोलता येतं. त्यामुळेच ‘लव जिहाद’ पासून आरक्षणाचं महत्त्व सांगण्यापर्यंत सगळे विषय इथं येतायत. तेही स्थानिक भाषांमधे. सोशल मीडियातली आवाजाची पोकळी ऍपनं सहजपणे भरून काढलीय.
रात्री साडेदहा वाजता क्लबहाऊसला गेलो तर एखाद्या रुममधे मस्तपैकी जुन्या हिंदी गाण्यांची मैफिल भरलेली असते. लोक स्वतःच आठवून आठवून गाणी गात असतात. पुढच्याच रुममधे डेल्टा प्लस या कोविडच्या नव्या वेरियंटच्या माहितीची देवाणाघेवाण चालू असते. पहाटे पहाटे लोक शांतपणे मेडिटेशन करत असतात. भर दुपारी काही रुममधे कुठे नोकरी आहे का याची चर्चा चालू असते. एखाद्या रुममधे तर आरक्षणावर बोलणं चालू असतं. कुणी नेते, अभ्यासक नाहीत तर अगदी सामान्य माणसं एकमेकांशी बोलून आरक्षणाचं बरंवाईटपण ठरवत असतात.
आपण कधीही न पाहिलेल्या, ओळखत नसलेल्या माणसांचे आवाज आपल्याला ऐकू येत राहतात. आपणही बोललो तर आपला आवाज त्यांच्यापर्यंत जाऊ शकतो. कधीही बघा, ‘क्लबहाऊस’मधे गर्दीच जमलेली असते. पण खऱ्या क्लबहाऊससारखं या गर्दीमुळे कोरोना पसरायचा धोका अजिबातच रहात नाही. कारण या रुम म्हणजे ‘क्लबहाऊस’ या ऑनलाईन ऍपमधल्या वर्च्युअल जागा आहे.
सोशल मीडियाचा चेहरामोहरा बदलणारं हे ऍप सध्या फारच चर्चेत आहे. मार्च २०२० ला हे ऍप बाजारात आलं होतं. सुरवातीला फक्त आयओएस सिस्टिम म्हणजेच आयफोन युजरसाठी मर्यादित असलेलं हे ऍप नुकतंच अँड्रॉईडधारकांसाठीही उपलब्ध झालंय. तेव्हापासून तिथलं वातावरणही बदललंय. ऐकण्या ऐकवण्याची हक्काची जागा उपलब्ध करून देत हे ऍप सोशल मीडियावरची आवाजाची पोकळी भरून टाकतंय.
हेही वाचा : आपल्यावरच्या नियंत्रणासाठीच चाललाय सोशल मीडिया आणि सरकार यांच्यातला संघर्ष
वॉट्सअपवर आपल्याला कुणाशी बोलायचं असेल तर आपण मेसेज टाइप करतो. तो त्याला पाठवतो. मग समोरून त्याचा रिप्लाय येतो. तसंच, क्लबहाऊसमधे कुणाशी बोलायचं असेल तर टाइप मेसेजऐवजी आपण फक्त बोलायचं. त्यावेळेला तो माणूस ऍपच्या रुममधे उपलब्ध असेल तरच त्याला आवाज जातो. आपण मेसेज टाकून ठेवायचा मग नंतर तो ऐकल असं इथं नसतं. माणूस खोलीत असेल तरच त्याला आवाज जातो ना, तसं. असं आपला नंबर कुणालाही न देता कोणत्याही अनोळखी व्यक्तीसोबत कितीही वेळ एका खोलीत थांबता येतं. ओपन रूम तयार करून एकाच वेळी अनेक लोकांशीही बोलता येतं.
एखाद्या सोशल रुममधे लोक वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करतात तेव्हा पॉडकास्ट ऐकल्यासारखं वाटतं. फक्त पॉडकास्ट आधी ठरवून संहिता बनवून केलेला असतो. क्लबहाऊसच्या रूममधे सगळंच जिवंत, सगळंच उत्स्फुर्त. अगदी लाइव. त्यातही तुम्ही कसे दिसता, काय घातलंय, तुमच्या पाठीमागे काय आहे असं काहीही दिसत नाही. फक्त तुमचा आवाज ऐकू येतो. शिवाय, रेकॉर्ड, सेंड अशी काहीही बटणं दाबावी लागत नसल्याने आपण रोजचं काम करतही रुममधे सहभाग घेऊ शकतो.
कोणत्याही रूममधे काय विषय चाललाय हे पाहून आपण ‘ड्रॉप इन’ करू शकतो. आपल्याला बोलायचं असेल तर ‘रेझ हॅण्ड’ करावं लागतं. रुम सांभाळणाऱ्या मॉडरेटरनं संधी दिली की आपल्याला बोलता येतं. मधूनच आपल्याला काम आलं तर ‘लिव क्वायटली’ म्हणत गपचूप रुम सोडताही येते. तुम्ही रुममधे आल्याचं किंवा तिथून बाहेर पडल्याचंही कुणाला कळत नाही. एखाद्या आवडत्या विषयावर बोलण्यासाठी दोन दिवसांनी एखाद्या रूममधे चर्चा सुरू होणार असेल तर त्याचा रिमाइंडरही लावता येतो.
नवी रूम तर अगदी सहज सुरू करता येते. ओपन, सोशल आणि प्रायवेट अशा तीन प्रकारच्या रुम असतात. प्रायवेट रुममधे तुम्ही निवडलेलीच माणसं येऊ शकतात. सोशल रुममधे तुम्ही फॉलो करत असलेल्या कुणालाही येता येतं. तर ओपन रुम असेल तर जगातलं कुणीही कुठूनही येऊ शकतं.
सुरवातीला फक्त इंग्लिश बोलणारे या ऍपवर येत होते. पण आता जगभरातल्या सगळ्या स्थानिक भाषांमधल्या रूम चालू झाल्यात. मराठी कट्टा, मराठी संगीत, मराठी टेक, मराठी मंडळ अशी मराठीतल्याही कितीतरी रुम आहेत. आपल्याला आसपासच्या लोकांना गोळा करून वऱ्हाडी, खान्देशी, कोकणी अशी कोणत्याही भाषेला क्लबहाऊसमधे जन्म देता येऊ शकतो. किबोर्डच नसल्यानं प्रमाण भाषेचं बंधनच उरत नाही.
हेही वाचा : फेक न्यूजची बाधा न हो कोणे काळी!
२०१९ पासूनच क्लबहाऊसच्या निर्मितीची सुरवात झाली. पॉल डॅविसन आणि रोहन सेठी या दोन अमेरिकन तरुणांनी सोशल मीडिया स्टार्टअपची सुरवात केली. सुरवातीला ‘टॉकशो’ या नावानं पॉडकास्ट ऍप सुरू करायचं असंच ठरलं होतं. पण पॉडकास्टच्या कल्पनेतून दुसरी कल्पना उभी राहिली आणि मार्च २०२० पासून आयओएस वापरणाऱ्यांसाठी ऍप सुरू झालं.
याच दरम्यान कोरोना साथरोगाचा प्रसार झपाट्याने सुरू झाला होता. घरात बसून कंटाळलेल्या लोकांनी क्लबहाऊसला डोक्यावर घेतलं. डिसेंबर २०२० पर्यंत क्लबहाऊसचे ६ लाख सदस्य झाले. त्यातच टेस्ला कंपनीचे सीईओ एलोन मस्क, फेसबुकचा निर्माता खुद्द मार्क झुकेरबर्ग यांनीही आपण क्लबहाऊस वापरत असल्याचं जाहीर केलं. त्यांच्या या घोषणेमुळे एकट्या जानेवारी महिन्यात क्लबहाऊसची सदस्य संख्या दुपटीनं वाढली.
सुरवातीला अगदी साधं वाटणारं ऍप नंतर आकर्षक झालं. पण तरीही आपलं सोपं असणं त्यानं सोडलं नाही. ऍपमधे भांडवलदारांनी गुंतवणूक केली तशी त्यात नव्या नव्या फिचरची भर पडली. आपल्या कशात रस आहे हे ऍपला सांगून त्याप्रमाणे रुमचे पर्याय शोधता येऊ लागला. काही निवडक सदस्यांना गुगल पे सारखं आर्थिक व्यवहार करण्याची सोयही मिळतेय.
सुरवातीला ऍप फक्त आयओएसवाल्यांना वापरता येत असल्याने आयफोन परवडणारी उच्चमध्यमवर्गीय आणि श्रीमंत मुलांचाच वावर इथं होता. त्यातही ऍपवर यायचं असेल तर आधी वापरणाऱ्याकडून इन्विटेशन मिळणं गरजेचं होतं. यामुळे ऍपच्या निर्मात्यांना वापरकर्त्यांच्या संख्येवर नियंत्रण ठेवता येत होतं. पण ऍप स्टेटस सिम्बॉल होऊन बसलं. क्लबहाऊसवर असलेलं शेंबडं पोरंही ‘लै बडा माणूस’ असल्याच्या आवेषात असायचं.
ऍपला मिळालेली पसंती पाहता मे २०२० मधे अँड्रॉईड वर्जन आलं आणि सामान्यांसाठी ऍपची दारं उघडी झाली. सामान्य मध्यमवर्गीय माणसांचा घोळका जमल्यानं इथल्या चर्चा अभ्यासू, गंभीर होत नाहीत पण तरीही त्या अस्सल असतात. सामान्यांनी सामान्यांसाठी केलेली चर्चा इथं रंगत असते. त्यात तत्त्वज्ञानातल्या अवघड संकल्पनांऐवजी अनुभव जास्त असतात. सामान्य माणसं खरंखुरं मनातलं बोलत असतात.
अनेक मोठे सेलिब्रेटी, बॉलिवूडचे स्टारही ऍप वापरतात. अमेरिकेतली मीडियाची राणी ओप्रा विन्फ्रे, बील गेट्स यांच्यासोबतच हॉलिवूडमधले इतर कलाकारही क्लबहाऊसवर आहेत. भारतातही अनुपम खेर, विद्या बालन, झोया अख्तर यासारखे बॉलिवुडचे कलाकार आणि रविश कुमार, शशी थरूर, कुणाल कामरा यांच्यासकट अनेक मोठे व्यावसायिकही क्लबहाऊस वापरतात. भाजपचे नेते तेजस्वी सूर्याही क्लबहाऊसवर आहेत. योग गुरू सदगुरूंनीही अलिकडेच ऍपचा वापर चालू केलाय.
इथं या सगळ्या मोठ्या माणसांचे फक्त ट्वीट, मेसेज, पोस्ट वाचून वीडियो बघून समाधान मानावं लागत नाही. तर एखाद्या रूममधे हे लोक बोलत असतील तर अगदी समोरासमोर आहोत असं लाइव बोलता येतं. अगदी साध्या माणसालाही त्यांना प्रश्न विचारता येतात. म्हणूनच इतर कोणत्याही ऍपपेक्षा हे वेगळं ठरतंय.
हेही वाचा : द सोशल डायलेमा: सोशल मीडियाने आपल्याला विकायला काढलंय
वीडियोसाठी आजवर आपल्याकडे युट्यूबसारखे पर्याय होते. मेसेजिंगसाठी तर वॉट्सअपचा हात धरणारं कुणी नव्हतं. फोटोसाठी इन्स्टाग्राम होतं. फार फार तर वीडियोसाठीही टीकटॉकचा आधार होता. गाण्यांसाठी सावन होतं, पॉडकास्टसाठी स्पॉटिफाय होतं. सगळ्या भाषेतले कण्टेण्ट यावर उपलब्ध होते. सगळ्या ज्ञानेंद्रियांचा वापर करुन संवाद करता येत होता. पण तरीही फक्त आवाजावर लक्ष केंद्रित करणाऱ्या ऍपची पोकळी जाणवत होती. ती पोकळी क्लबहाऊसने एकहाती भरून काढली.
असं आवाजावर फोकस करणारं क्लबहाऊस हे काही जगातलं पहिलं आणि एकमेव ऍप नाहीय. अशाच पद्धतीचं ‘लेहेर’ नावाचं ऍप भारतात २०१८ पासूनच चालूय. शिवाय, क्लबहाऊसच्याच धर्तीवर ट्वीटरनेही ‘ट्वीटर स्पेस’ नावाचं ऍप काढलंय. ‘स्वेल’ नावाचं एक ऍपही थोडंफार असंच आहे. शिवाय ‘फ्लेक्स’ या सोशल नेटवर्किंग साईटचं ‘बॅकस्टेज’ हे क्लबहाऊससारखं ऍप यावर्षी बाजारात येणार आहे. पण आवाजाचा वापर करून सोशल व्हायची कल्पना रुढ केली ती क्लबहाऊसनेच.
इतर कोणत्याही ऍपप्रमाणे क्लबहाऊसही आपल्या खासगीपणात ढवळाढवळ करणार आहेच. आपल्या फोनमधले सगळे कॉण्टॅक्ट, त्यांचे फोननंबर ऍक्सेस करायची परवानगी क्लबहाऊस मागतं. बोलताना कुणाचा नंबर लागत नसला तरी इनव्हाइट्स पाठवण्यासाठी कॉण्टॅक्ट्स लागतात असं कारण त्यांनी दिलंय. शिवाय, इतर कोणत्याही सोशल मीडियावरचं अकाऊंट आपण क्लबहाऊसशी कनेक्ट केलं तर आपली सगळी माहिती क्लबहाऊसकडे साठवली जाईल.
आपण काय बोलतो यातलाही प्रत्येक शब्द क्लबहाऊस रेकॉर्ड करतं. फेसबुकप्रमाणेच ही माहिती विकून सगळी माहिती विकून जाहिरातदारांना आकर्षित करणं हेच क्लबहाऊसचं बिझनेस मॉडेल आहे. त्यातल्या त्यात फोटो, लोकेशन, वीडियो, कॅमेरा असं काही वापरत नसल्यामुळे इतर कोणत्याही ऍपपेक्षा क्लबहाऊसबाबतचे प्रायवसी प्रश्न सध्या तरी कमी आहेत.
हेही वाचा : फेसबुक झालंय 'बुक्ड'!
पण खोटी माहिती, फेक न्यूज, द्वेषपूर्ण मेसेज किंवा लैंगिक अत्याचाराच्या घटना टाळणं हे क्लबहाऊससमोरचं सगळ्यात मोठं आव्हान असणार आहे. फेक न्यूज ओळखण्यासाठी फेसबुक, वॉट्सअपसारख्या माध्यमांनी भली मोठी यंत्रणा उभी केलीय. एखादा फेक मेसेज वायरल होत असेल तर फेसबुककडून तो आपोआप डिलीट होतो. पण क्लबहाऊसमधे समोरासमोरच लाइव बोलायचं असल्याने कधी कोणता विषय निघेल आणि कुठली माहिती कशी पेरली जाईल यावर आळा घालणं फार अवघड आहे.
टेस्क्टवर, वर्च्युअर जगातल्या लिखित शब्दावर नियंत्रण ठेवणारी बऱ्यापैकी चांगली यंत्रणा आपल्याकडे आहे. पण ऑनलाईन लाइव आवाजाची संकल्पना याआधी कधीही विकसित झालेली नव्हती. त्यामुळेच त्याची यंत्रणा उभी करायला आणखी काही काळ जाऊ द्यावा लागेल. शिवाय, अशी यंत्रणा कागदावर आणणं सोपं आहे. पण माणसं लाइव बोलत असताना ती अंमलात आणणं महाकठिण काम आहे.
सध्या तरी क्लबहाऊस होणाऱ्या चर्चा, प्रायवेट रुममधला संवाद रेकॉर्ड करण्यावर बंदी घातलीय. त्यामुळे कुणी रंगावरुन, जातीवरुन बोलत असेल तर त्याचे पुरावे गोळा करणंही अवघड होतंय. यावरुन क्लबहाऊसला टीकाही सहन करावी लागतेय.
अलिकडेच विशिष्ट विचारधारेला वाहिलेल्या काही रूमची निर्मितीही सुरू झालीय. लव जिहादचं वाढतं प्रस्थ या विषयापासून संघींना कसं संपवायचं इथंपर्यंत सगळी चर्चा करणाऱ्या रूम आहेत. यातल्या किंवा एखाद्या सेक्सविषयी बोलणाऱ्या रूममधला संवाद दुसऱ्या फोनवरून रेकॉर्डिंग करून ऑडिओ क्लिप्स वायरल होतायत. ओमेन, चीन, जॉर्डन, इराण अशा काही देशांनी यावर बंदी घालण्यामागे हे खासगीपणाचंच कारण दिलं जातंय.
पण खरंतर, कधीही चर्चा केले जाऊ शकले नसते असे अनेक विषय क्लबहाऊसवर बोलले जातायत हे बंदी घालण्यामागचं खरं कारण आहे. हाँगकाँग मधला मोर्चा, तैवानमधल्या लोकांचा प्रश्न असे विषय मोकळेपणाने बोलता येतायत. इराण सरकारला तर हे ऍप म्हणजे दहशतवाद्यांचा अड्डा वाटतंय. खरंतर, हे दहशतवादी म्हणजे हुकूमशाही सरकारविरोधात बोलणारे सामान्य नागरिक आहेत.
क्लबहाऊससारखे आणखी ऍप बाजारात येतील तेव्हा त्याचे परिणाम आपल्या शैक्षणिक राजकीय, सामाजिक, करिअरच्या क्षेत्रातही होतील. राजकीय पक्षांना प्रचारासाठी यापेक्षा चांगलं साधनं सापडणारंच नाही. पॉडकास्टसारखंच पत्रकारितेची नवी शाखा निर्माण होतील. या सगळ्या शक्यता क्लबहाऊसपासून सुरू झाल्यात. सोशल मीडियाचा आवाज बदलण्याची क्षमता क्लबहाऊसमधे आहे.
हेही वाचा :
कोरोनाची माहिती नको, पण फेक न्यूज आवर!
तिसऱ्या जगाचं नेतृत्व करायची संधी भारताने गमावलीय?
ट्रम्पना सोशल मीडियातून बॅन करण्याची मागणी का होतेय?