बॉलिवूडच्या सिनेमात कधी आनंदी दलित पाहिलाय का?

०४ मार्च २०२०

वाचन वेळ : ७ मिनिटं


बॉलिवूड आपण फारशा गंभीरपणे घेत नाही. पण त्यातले सिनेमे कळत नकळत आपला मेंदू घडवत असतात. त्यामुळे त्यातली जातही शोधावी लागते. म्हणूनच जेएनयूतले प्राध्यापक आणि लेखक डॉ. हरीश वानखेडे यांनी मुंबई विद्यापीठात केलेली जात आणि बॉलिवूड या विषयावरची मांडणी महत्त्वाची ठरते. या भाषणातले हे काही महत्त्वाचे मुद्दे, आपल्याला विचार करायला लावणारे.

कार्यक्रमः अ टॉक बाय आंबेडकर सेंटर फोर सोशल जस्टिस 

ठिकाणः फिरोजशाह मेहता भवन, मुंबई विद्यापीठ, कलिना, मुंबई

वेळः ३ मार्च, सकाळी ११:३० वाजता

वक्ते: प्रा. हरीश वानखेडे

विषयः जात आणि बॉलिवूड

 

भारतीय सिनेमाच्या सुरवातीपासून जात आहेच

भारतीय सिनेमाची सुरवात दादासाहेब फाळके यांनी केली हे तर सगळ्यांनाच माहीत आहे. त्यांच्या श्री कृष्ण जन्म या सिनेमात कृष्णाकडे चार वर्णातले लोक येतात असा सीन आहे. त्यामुळे या सिनेमापासूनच ‘जात’ ही भारतीय सिनेमात येते असं म्हणता येईल.

आजच्या काळात बॉलिवूडमधे हिंदी सिनेमे तयार होतात, त्यात सवर्णांचं प्रतिनिधित्व असल्याचं आपल्याला दिसतं. यासाठी आपण २०१९ मधे बनलेल्या सिनेमांची यादी काढूया. त्यातल्या बहुतांश सिनेमात मुख्य भूमिका साकारणारं पुरुष पात्र हे खन्ना, सिंग, मल्होत्रा अशाच आडनावाचं असतं. असं का होतं?

सवर्णामुळे कथेला हिरोईझम येतो

शाहरुख खानची कुठलीही फिल्म काढा. त्यात त्याचं आडनाव मल्होत्रा, रायचंद असंच असतं. समजा, ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ म्हणजेच डीडीएलजेमधलं शाहरुख खानचं राज मल्होत्रा हे नाव काढून त्याऐवजी हरीश पासवान असं नाव ठेवलं तर कसं वाटतं? या नावासोबत शाहरुख खान करत असलेली भूमिका, आसपासचं वातावरण, त्याची प्रेम मिळवण्याची धडपड काहीच मॅच होत नाही.

डीडीएलजे ही खरंतर प्रेमकथा नसून खत्री जातीतल्या एनआरआयची गोष्ट आहे. त्यांचे संस्कार, त्यांचं राहणीमान आणि त्यांच्या कुटुंबात असलेली पितृसत्ता याचं गौरवीकरण त्यात दिसतं. कथेतलं पात्र सवर्ण किंवा उच्चवर्गीय जातीचं असल्याशिवाय बॉलिवूडमधे सिनेमाचं कथानक मांडणं शक्यच होत नाही. कथानकाला हिरोईझम येतो तोच मुळात सवर्ण पात्रामुळे. तनू वेड्स मनू, शुभ मंगल सावधान ही त्याचीच उदाहरणं आहेत.

यावरून बॉलिवूडमधे दलित जातीच्या लोकांचं, पात्रांचं प्रतिनिधित्व दिसतच नाही, असा निष्कर्ष एखादा काढेल. पण हा निष्कर्ष चुकीचा आहे. बॉलिवूडच्या कथेमधे विशिष्ट जातींचं वर्चस्व आहे हे खरंय. पण याला छेद देणारे अनेक सिनेमे निघालेत. बॉलिवूडमधे दलित पात्र जरूर असतात. पण ती कशी दाखवली जातात, त्यांचं चित्रण कशाप्रकारे केलं जातं, हे बघायला हवं.

हेही वाचा : ओबीसी जनगणनेचं आपण स्वागत करायचं की विरोध?

दलितांचा प्रेम करण्याचा हक्क मान्य करा

बॉलिवूडमधलं दलितांचं चित्रण विषयावर बोलायचं झालं तर आपल्याला आत्तापर्यंतच्या हिंदी सिनेमाचं मॅपिंग करावं लागेल. म्हणजेच सिनेमामधे आवाज आणायचं तंत्र विकसित झाल्यानंतर हिंदी भाषेत जे सिनेमे तयार झाले ते काळानुसार मांडावं लागेल. त्यातही दलित महिला आणि पुरूष यांच्याबाबतीत वेगवेगळा विचार केला तर एक महत्त्वाची गोष्ट लक्षात येईल. हिंदी सिनेमात दाखवलं जाणारं दलित बाईचं पात्र हे काळानुसार बदलत जातं.

१९३६ मधला ‘अछूत कन्या’ किंवा १९५९ चा ‘सुजाता’ हे त्याकाळातले दोन गाजलेले सिनेमे. या दोन्ही सिनेमात एक दलित बाई एका सवर्ण पुरुषाच्या प्रेमात पडते. आणि समाज त्या जोडप्याला एकत्र येऊ देत नाही, असं दाखवलंय. या दोन्ही सिनेमातली ‘ती’ ही स्वतंत्र, आक्रमक स्त्री दाखवलेली नाही. किंवा आत्ताच्या हिरोइनींसारखी ती स्वप्नाळूही नाही. प्रत्येक माणसाला असतात त्या प्रेमासारख्या मुलभूत भावना दलितांनाही आहेत हे मान्य करा, इतकी साधी मागणी या सिनेमात केली गेलीय.

यातली ‘ती’ कुठलंही राजकीय स्वातंत्र्य, हक्क मागत नाही, एक वेगळंच जग निर्माण करा असंही तिचं म्हणणं नाही. तिला फक्त आपला प्रेम करण्याचा मान्य केला जावा इतकंच वाटतं. आपल्याकडे आत्ताच्या काळात बनलेला फॅंड्री हाही याच धाग्यावर बनवलेला सिनेमा आहे. साधं प्रेम करण्याची भावना मान्य करा इतकी साधी मागणी हे सिनेमे करतात. स्वातंत्र्यापूर्वीचे आणि नंतरचेही अनेक सिनेमे दलितांना भावना असतात हे सांगण्यावर भर देतात. ते कुठेही त्यांचे हक्क, त्यांचे अधिकार याविषयी बोलताना दिसत नाहीत.

दलित बाई नेहमीच पीडित असते

स्वातंत्र्याआधीच्या सिनेमातली बाई ही पूर्णपणे परावलंबी दाखवलीय. तिला स्वतःचा आवाज नाही, तिला स्वतःसाठी उभं राहता येत नाही, असं दिसतं. पण त्यानंतरच्या अनेक सिनेमात बाई ही पीडित किंवा व्हिक्टिम म्हणून दाखवण्यात आलीय. जातव्यवस्थेमुळे झालेल्या बलात्काराला बळी पडलेली बाई १९७० च्या संपूर्ण दशकात आणि त्यापुढेही केंद्रस्थानी होती.

याचं उदाहण म्हणून आपल्याला निशांत, मंथन या सिनेमांकडे पाहता येतं. गावातल्या एका बाईवर सवर्णांनी बलात्कार केलाय आणि पोलिस, प्रशासन कुठेही दाद मिळत नाही म्हणून जुलूम करणाऱ्यांना मारून टाकायचं असं यात दाखवलंय. या सिनेमात दलित बाई एक पीडित म्हणून पुढे येते. बॅंडिट क्वीन मधली दलित बाई मात्र यापेक्षा वेगळी आहे. ती पीडित आहे. पण त्यानंतर ती आक्रमक होते. स्वतःवर झालेल्या अत्याचारांचा बदला घेऊन ती सिनेमाची हिरो होते.

हिंदी सिनेमातल्या दलित बाईच्या पात्राला बवंडर या सिनेमापासून एक वेगळाच टर्न मिळाला. भंवरी देवीच्या आयुष्यावर बनवलेला हा सिनेमा आहे. यात मुख्य पात्र साकारणारी दलित बाई हीसुद्धा पीडित आहे. पण आपल्यावरच्या अत्याचारांचा बदला घेण्यासाठी ती किंवा तिचं कुटुंब आक्रमक होत नाही. तर एखादी दलित बाई सामाजिक कार्यकर्ती बनून आपल्या हक्कांसाठी लढूही शकते, हेच आपल्याला बवंडर सांगतो.

हेही वाचा : मी ‘अळणी मीठवाली’चा मुलगा होतोः राघवेंद्र भीमसेन जोशी

दलित आयडेंटीटी बायकांवर लादलेली नाही

समांतर काळातल्या सिनेमात दलित बाई कशी असते याबाबत बोलायचं झालं तर आपल्याला न्यूटन आणि आर्टिकल १५ या दोन सिनेमांचा विचार करावा लागेल. न्यूटनमधे मुख्य पात्र एका पुरुषाचं आहे. पण त्याच्यासोबत असणारी मुलगी ही त्या भागातली आदिवासी समाजातली  दाखवलीय. तिच्या असण्यात, वागण्या बोलण्यात तिचा हा आदिवासी भाग मुळीच जाणवत नाही. ती मध्यमवर्गीय, आधुनिकतावादी, महत्त्वाकांक्षी बाई दाखवलीय. संविधान, लोकशाही अशा गोष्टींवर तिचा विश्वास आहे.

आर्टीकल १५ मधली दलित डॉक्टर ही कसल्याशा संभ्रमात अडकल्यासारखी वाटते. समोर पेचप्रसंग असताना कुठली राजकीय भूमिका घ्यायची याबद्दल ती गोंधळलेली असते. पण आसपासच्या परिस्थितीचा एक सेन्स तिच्यात दाखवलाय. सत्याच्या बाजुने उभं राहण्याचा विवेक तिच्यात आहे.

तर अशाप्रकारे बॉलिवूडमधली दलित बाई परावलंबी, दुसऱ्याच्या उपकारावर जगणारी इथपासून ते पीडित, बदला घेण्यासाठी आक्रमक होणारी असा प्रवास करून आता ती एका विवेकी व्यक्तिमत्वावर येऊन थांबलीय. म्हणजेच, बॉलिवूडमधे दलित बाईचं प्रतिनिधित्व करताना एक विशिष्ट प्रकारची दलित आयडेंटीटी तिच्यावर लादली गेलेली नाही. ती काळानुसार बदलत जाते

अछूत ते लगानः सगळे दलित पिचलेलेच

आता आपण बॉलिवूडमधल्या दलित पुरुष पात्रांकडे पाहू. अछूत हा १९४० चा फारसा न चाललेला सिनेमा. यात दाखवलेल्या दलित पुरुषाचं चित्र हे पूर्वग्रहातून आलेलं स्टिरिओटाईप आहे. १९७०-८० मधल्या समांतर सिनेमांमधेही दलितांचं असंच चित्रण दाखवलंय. दलित हे सतत दुःखी, अत्यंत बिकट परिस्थितीतही जगणारे असंच दाखवलंय.

पार या सिनेमातला नसिरुद्दीन शहा यांनी साकारलेला नौरंगीया हा दलित मजूर जातीयवादाने ग्रस्त गावातून पळ काढतो तेव्हाही त्याच्या वाट्याला संकटंच येतात. सत्यजीत रे यांच्या सद्गती या सिनेमात ओम पुरी यांनी साकारलेलं दुखी हे पात्र काम करून थकव्यानं, भुकेनं मरून जातं. पण जातवादाला आव्हान देत नाही. १९८० च्या आक्रोश या सिनेमातला नायकही असाच जुलूमांना कंटाळून स्वतःला संपवून टाकतो.

एकूणच हिंदी सिनेमातली दलित बाई किंवा पुरूष हा एखाद्या सामान्य माणसासारखा आयुष्य जगणारा असूच शकत नाही असं दिसतं. दामुलमधला पपलु काळा आणि निस्तेज, अंकुरमधला नायक पितृसत्ताक आणि दारूडा, पिपली लाइवमधला नायक भ्रष्ट आणि अनैतिक, लगानमधला कचरा शरीराने अधू अशाच प्रकारचे दलित नायक आजपर्यंत सिनेमांमधे दाखवलेत. एखादं आनंदी, उत्साही दलित पात्र एकाही सिनेमात दिसत नाही. दलित हे नेहमी गरिब, वंचित आणि अत्याचार सहन करणारे म्हणून दाखवले जातात.

हेही वाचा : नव्याकोऱ्या चार सिनेमांसोबत नेटफ्लिक्स आणतंय नवं कल्चर

आरक्षण मधला सैफ अली खान काय सांगतो?

सिनेमात दाखवलेलं हे चित्रण समाजाशी वास्तव सांगणारं आहे ही गोष्ट खरी असली तरी त्यातून दलितांची आर्थिक प्रगती, सामाजिक मोबिलिटी आणि शहरी भागात उभी राहिलेली दलितांची राजकीय चळवळ याकडे सिनेमातल्या या चित्राने दुर्लक्ष होऊ शकतं. नव्याने निर्माण झालेल्या मध्यमवर्गीय दलित वर्गातल्या कथानकाला या जुन्या हिंदी सिनेमांमधे स्थान दिलं गेलेलं नाही.

पण आत्ताच्या अनेक सिनेमांमधे या मध्यमवर्गीय दलितांचा विचार केलेला दिसतो. नुसता विचारच नाही तर एक प्रतिष्ठित दलित म्हणूनही त्यांचं चित्रण केलेलं आहे. असं चित्रण करणारा पहिला सिनेमा म्हणून प्रकाश झा यांच्या २०११ मधे आलेल्या आरक्षण या सिनेमाला मान द्यावा लागेल. या सिनेमात सैफ अली खानने साकारलेला दीपक कुमार हा  कथित खालच्या जातीचा शिकलेला, आधुनिक विचारांचा, मेहनती मुलगा आहे. कोणत्याही प्रकारच्या अत्याचाराला तो बळी पडत नाही.

इतकंच नाही, तर तो एका वरच्या जातीच्या मुलीच्या, दीपिका पदुकोनच्या प्रेमातही पडतो. पण इथं गंमत अशी की दीपक हा दलित मुलगा हाच सिनेमाचा नायक असतानाही सिनेमात एका सवर्ण पात्राचा म्हणजेच अमिताभ बच्चनचा वावर दिसतो. त्यामुळे पूर्ण फोकस दलित नायकावर राहत नाही.

दलित नेहमी बॅकग्राऊंडला असतात

२०१० चा आक्रोश हा अक्षय खन्नाचा सिनेमा. त्यात अजय देवगणने एका दलित आयपीएस ऑफिसरची भूमिका निभावलीय. शिवाय राजनिती या सिनेमातही त्याने सुरज कुमार या दलित तरूणाची भूमिका बजावलीय. हा सुरज कुमार स्वतःला कर्णाचं आधुनिक रूप म्हणवून घेत असतो. म्हणजेच सध्याच्या काही सिनेमांमधे दलितांचा सकारात्मक पद्धतीने विचार केलेला दिसतो. पण समाजात असणाऱ्या वाईट गोष्टींविरोधात दलित स्वतंत्रपणे लढतायत असं कथानक कोणत्याही सिनेमाचं नाही. ते नेहमीच बॅकग्राऊंडला असतात.

मसान हा सिनेमा सगळ्याच पातळीवर वेगळा ठरतो. त्यातल्या विकी कौशलने साकारलेला नायक दीपक हा जातीने डोम आहे. मेलेल्या माणसाचं प्रेत जाळणं हे त्याच्या कुटुंबाचं काम असतं. पण दीपक हा महत्वाकांक्षी मुलगा दाखवलाय. जातीच्या सीमा ओलांडण्याची हिंमत त्याच्याकडे आहे.

तो इंजिनियरिंगसारखा खर्चिक आणि बुद्धीचा भरपूर कस लागणारा अभ्यासक्रम शिकतो. शालू या वरच्या जातीतल्या मुलीच्या तो प्रेमात पडतो. दीपक खालच्या जातीचा आहे हे कळलं तरी शालू तिच्या भूमिकेवर ठाम राहते. अशा प्रकारचं कथानक समाजाचं बदललेलं मत दाखवतं.

हेही वाचा : #बॉयकॉटदीपिका हॅशटॅगने छपाकचा गल्ला खाल्ला?

म्हणून आर्टिकल १५ वेगळा ठरतो

आत्तापर्यंतच्या जातीविषयी बोलणाऱ्या सगळ्या सिनेमांपेक्षा आर्टीकल १५ खूप वेगळा आहे. हाही दलितांवर होणाऱ्या अत्याचारांवर बोलणारा सिनेमा म्हणून ओळखला जातो. दलित आयडेंटीटीचं एकाचवेळी इतक्या वेगवेगळ्या प्रकारचं चित्रण याआधी इतर कुठल्याही सिनेमामधे झालेलं नाही.

या सिनेमात पीडित दलित मुली आहेत. पण संपूर्ण सिनेमात फक्त या मुलींवर फोकस केलेला नाही. उलट त्या मुलींसोबत त्यांचे हतबल, दुर्बल पालक यात दिसतात. गौरा ही दलित मुलगी कार्यकर्ती म्हणून दाखवलीय. शिवाय, जाटवजी हे एका दलित पोलिसाचं पात्र आहे. आपल्या इतर जातबांधवांपेक्षा आपण थोड्या चांगल्या स्तरावर आलेलो असतानाही त्याला वरच्या जातीतल्या लोकांची चाकरी करावी लागते.

सिनेमाच्या सुरवातीलाच आनंदाने नाचगाणारी दलित पात्रं यात दिसतात. पुढे दलितांकडून गटारातून घाण काढतानाचा एक संपूर्ण सीन त्यात शूट केला गेलाय. दोन दलित मुलींवर सामुहिक बलात्कार करून त्यांना मारून टाकलं तरी समाजाला फरक पडत नाही, माध्यमं त्या गोष्टीला महत्त्व देत नाहीत हे वास्तवंही त्यात मांडलंय.

सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आर्टीकल १५ या सिनेमात दलितांचा राजकीय नेताही दाखवलाय. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांपासूनच दलितांसाठी राजकारण खूप महत्त्वाचं झालेलं असताना याआधीच्या कोणत्याही सिनेमात अशा प्रकारचा दलित नेता समोर येत नाही. पण इथं तो येतो आणि तोही चंद्रशेखर आझाद यांच्या स्वरूपात. तो क्रांतिकारी असतो.

इतर सिनेमांसारखंच न्याय मिळत नाही म्हणून हिंसा करून बदला घेणारे पालक याही सिनेमात दाखवता आले असते. पण त्याऐवजी एक सवर्ण आयपीएस ऑफिसर सिनेमात आणला आणि त्याने मुलींना कायदेशीर मार्गाने न्याय मिळवून दिला. म्हणून हा सिनेमा सगळ्याच बाजुंनी वेगळा ठरतो.

हेही वाचा : 

नरेंद्र मोदी खरंच ओबीसी आहेत?

तान्हाजी सिनेमातल्या शिवरायांचं काय करायचं?

सैरंध्री : पहिल्या मेड इन इंडिया सिनेमाची शंभरी

कलाकारांनी भूमिका घेत जनतेसाठी आपला मोठा आवाज वापरणं योग्य?