हनी ट्रॅप: पहिल्या वर्ल्ड वॉरपासून ते सोशल मीडियापर्यंत

३० सप्टेंबर २०१९

वाचन वेळ : ७ मिनिटं


सध्या मध्य प्रदेशातलं हनी ट्रॅप प्रकरण खूप गाजतंय. यातलं प्रत्येक अपडेट रोजच्या रोज मीडियातून येतंय. हे हनी ट्रॅप काही नवीन नाहीत. याला अगदी पहिल्या वर्ल्ड वॉरपासूनचा इतिहास आहे. यात नेहमी हाय प्रोफाईल लोकांना फसवण्यात येतं. पण आता सोशल मीडियावरुन हे ट्रॅप आपल्यावरही पडू शकतात.

जवळपास रोज बातम्यांमधे आपण एक शब्द ऐकतोय किंवा वाचतोय तो म्हणजे हनी ट्रॅप. देशातला सगळ्यात मोठा ब्लॅकमेलिंग सेक्स स्कॅंडल असं या प्रकरणाला म्हटलं जातंय. आतापर्यंत या प्रकरणाच्या तपासाच्या चार हजारापेक्षा जास्त फाईल्स बनल्यात.

हनी ट्रॅप गँगने आतापर्यंत महत्त्वाचे नेते, आयएएस अधिकारी, इंजिनिअर, व्यापारी, नेते, पत्रकार इत्यादींना आपल्या ट्रॅपमधे अडकवलंय. सेक्स वीडियो, अश्लील चॅट या सगळ्यांवरून ब्लॅकमेलिंग केलं. या सगळ्यांचे पुरावे गँगमधल्या लोकांच्या लॅपटॉप आणि मोबाइलमधून मिळालेत.

काय आहे हनी ट्रॅप?

आता हे हनी ट्रॅप म्हणजे नेमकं आहे काय? ब्लॅकमेलिंग की सेक्स स्कॅंडल? मुलींना फसवून जबरदस्ती करणं? असे प्रश्न साहजिकच आपल्या मनात येतील. तर सोप्प्या शब्दात सांगायचं, तर हनी ट्रॅप म्हणजे एखाद्याला खोटं खोटं प्रेमाच्या जाळ्यात ओढणं. त्याच्याशी भावनिक आणि शारीरिक संबंध प्रस्थापित करून समोरच्याची सगळी गोपनीय माहिती मिळवणं आणि ही माहिती दुसऱ्याला देणं किंवा स्वत:च्या कामासाठी फायदा करणं किंवा समोरच्याला ब्लॅकमेल करणं इत्यादींसाठी वापरली जाते.

राजकारण, कॉर्पोरेट, फॅशन, मनोरंजन, गुप्तचर यंत्रणा, लष्कर, खेळ इत्यादी सगळ्याच क्षेत्रात हनी ट्रॅप गँगचं काम चालतं. गोपनीय माहिती मिळवून आपला फायदा करण्यासाठी किंवा समोरच्यावर वार करण्यासाठी याचा वापर होतो. हनी ट्रॅपमधे ट्रॅप अर्थात सापळा टाकण्यासाठी महिलांचाच सर्वाधिक वापर होतो. यात महिलांना समोरच्या माणसाला एकप्रकारे संमोहित करायचं असतं. असाच प्रकार मध्य प्रदेशातल्या हनी ट्रॅप प्रकरणात घडल्याचं समजतंय.

एमपीतलं प्रकरण कसं समोर आलं?

मध्य प्रदेशातल्या हनी ट्रॅप प्रकरणाच्या तपासातून आतापर्यंत साधारण ९० सेक्स वीडियो समोर आलेत. यात १३ आयएएस अधिकारी, २८ आमदार अडकल्याचं समजतंय. ही यादी तपास अधिकाऱ्यांच्या हाती लागलीय. ही यादी कोडवर्डमधे असल्याचं राजस्थान पत्रिका या हिंदी वर्तमानपत्राने आपल्या बातमीत लिहिलंय. खरंतर पोलिसांना या प्रकरणाची ऑगस्टमधेच भनक लागली. पण १८ सप्टेंबरला हे प्रकरण पहिल्यांदा पुढे आलं. आणि १९ सप्टेंबरला या प्रकरणातल्या ५ संशयितांना अटक केल्याची बातमी आली.

श्वेता जैन आणि आरती दयाल या दोघींचं नाव हनी ट्रॅपच्या गँगमेंबर म्हणून समोर आलंय. या दोघांनीच एका कॉलेजातल्या १८ वर्षांच्या मुलीला यात अडकवलं. त्या मुलीला लक्झरी हॉटेल, चकचकीत आयुष्य आणि पैशांचं आमिष दाखवून सेक्स करण्यास भाग पाडलं. ही मुलगी गरीब घरातली आणि तिला पैशाची गरज होती. या दोघींनी तिची ओळख इंदूर महापालिकेतले इंजिनियर हरभजन सिंहशी एका हॉटेलात करून दिली. आणि तिला त्याच्याबरोबर एक रात्र घालवयला सांगितलं.

त्या रात्रीचा संपूर्ण वीडियो आरतीने काढला. आणि श्वेताने त्याला वीडियो लीक करण्याची धमकी दिली. तसंच ३ कोटी रुपयांची मागणीही केली. पण सिंह यांनी या विरोधात तक्रार केल्यामुळे प्रकरण समोर आलं. आणि हळूहळू एकूण प्रकरणातला एक एक धागा आपल्या समोर उलगडू लागलाय.

राजकीय पक्षांकडूनही सर्रास वापर

राजस्थान पत्रिका वर्तमानपत्राने जैन यांनी पोलिसांना दिलेल्या स्टेटमेंटची माहिती आपल्या बातमीत दिलीय. त्यानुसार, हनी ट्रॅपमधे साधारण ४० महिला भरडल्या गेल्यात. हनी ट्रॅपच्या ५ गँग आहेत. वेगवेगळ्या राज्यांमधल्या हाय प्रोफाइल लोकांना यात अडकवलंय. या सर्व मुली गरीब घरातून आल्यात. विशेषत: कॉलेजमधल्या आर्थिकदृष्ट्या कमकुवत घरांतल्या मुली हेरून त्यांना यात सामील केलंय.

हनी ट्रॅपच्या माध्यमातून सरकारी अधिकाऱ्यांच्या पोस्टिंग मॅनेज करण्यात आल्यात. तसंच अनेक कंपन्यांशी टायअपकरून काही व्यापाऱ्यांना आणि कंपन्यांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना यात अडकवलं. आणि त्यांच्या कंपनीची आणि काँट्रॅक्टविषयीची माहितीही काढण्यात आली. तसंच देशातले दोन मोठे पक्ष म्हणजे भाजप आणि काँग्रेस हे देखील एकमेकांना फसवण्यासाठी यात सामील होते. पक्षाचे बडे नेते, कार्यकर्ते यांनी एकमेकांवर कुरघोड्या करण्यासाठी या गँगची मदत घेतल्याचंही यात म्हटलंय.

मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी या प्रकरणी भाजपवर टीका केलीय. भाजपचे मंत्रीही या सेक्स स्कँडलमधे सहभागी असल्याचा आरोप केलाय. तसंच महाराष्ट्राच्या देवेंद्र फडणवीस सरकारमधल्या एक मंत्र्याचाही यामधे सहभाग असल्याचा दावा केलाय.

हेही वाचा: महाराष्ट्राला सेक्स शिकवणाऱ्या पुस्तकाची गोष्ट

गोष्ट पहिल्या हनी ट्रॅपची

हनी ट्रॅप प्रकरण आणखी चिघळत जाणार यात काही वाद नाही. यात कोणाचे हात गुंतलेत? मास्टरमाईंड कोण? कुणाचं नुकसान झालं? कुणाला फायदा झाला? मुलींचं पुढे काय? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला येत्या काळात मिळतीलच. पण हनी ट्रॅप ही आताची गोष्ट नाही. यालासुद्धा इतिहास आहे. आणि हनी ट्रॅपचा आपापल्या सैन्यदलात वापर करण्याची जणू काही एक प्रथाच तयार झालीय.

सर्वात पहिल्यांदा हनी ट्रॅपचा वापर १९१७ मधे पहिल्या वर्ल्ड वॉरमधे झाला. जर्मनमधली डान्सर मार्गारेथा गेर्ट्रुइडा या डच महिलेने हा सापळा अर्थात ट्रॅप टाकला. फ्रान्सच्या लष्करी अधिकाऱ्याशी तिने शारीरिक आणि भावनिक संबंध प्रस्थापित केले. आणि शत्रूपक्षाच्या गोटातून जर्मनीविरुद्धच्या कटाची माहिती काढली. या पहिल्या हनी ट्रॅपची माहिती द गार्डियन या ब्रिटिश वर्तमानपत्राने २०१४ मधे आपल्या एका बातमीत दिलीय.

मोसादने केला प्रभावी वापर

हनी ट्रॅपचा मोठ्या प्रमाणात वापर सैन्यदलात झालाय हे खरं. जगातली सगळ्यात मोठी आणि बलशाली गुप्तचर यंत्रणा म्हणून मोसादला ओळखलं जातं. मोसाद ही इस्राइलची गुप्तचर यंत्रणा आहे. मोसादनेच या ट्रॅपचा सगळ्यात प्रभावी वापर केल्याचं फॉरेन पॉलिसी मासिकातल्या माहितीवरुन समजतं. द वॉशिंग्टन पोस्ट कंपनीचं हे मासिक. त्यांनी आपल्या डिसेंबर २०१८ च्या अंकात ही माहिती दिलीय.

मोसादने जिहाद्यांची माहिती शोधण्यासाठी, अमेरिकेच्या लष्कराची माहिती काढण्यासाठी याचा वापर केलाय. पण त्यांचे काही ट्रॅप फसलेतही. ज्यामुळे एका महिलेला १८ वर्षांचा तुरंगवासही भोगावा लागला. हा ट्रॅप जगातले जवळपास सर्वच देश वापरतात. आणि प्रत्येक देशातले अधिकारी यात अडकतातसुद्धा. अगदी आपले भारतीय जवानसुद्धा अशा ट्रॅपमधे अडकलेत. द प्रिंटच्या बातमीनुसार किमान ५० सैनिक आणि अधिकारी यात अडकलेत. कित्येकदा माहिती काढण्यासाठी हे लोक पत्रकार असल्याचही खोटं सांगतात.

हनी ट्रॅपमुळे देशांनी केलेले करार, लष्कराची माहिती, योजना इत्यादींची माहिती काढून देशावर वेगवेगळ्या प्रकारे हल्ला होतो. आणि याचे अनुभव सर्वच देशांना आल्यामुळे कोणत्याही लष्करी अधिकाऱ्याला फेसबूक किंवा व्हॉट्अ‍पवर स्वत:ची ओळख उघड करण्याची परवानगी नसते. तसंच यासाठी काही मार्गदर्शक सूचनाही बनवल्यात. तसंच हनी ट्रॅप कसे लावतात, त्यामध्ये कशाप्रकारे अडकले जाऊ शकतो यावर प्रबोधन केलं जातं, असंही एफपीने आपल्या लेखात लिहिलंय.

हनी ट्रॅपमधे क्रिकेटर्सही अडकलेत

हनी ट्रॅप हे फक्त राजकारण, देशांची माहिती, व्यापार यातच होत नाही. तर मॅच फिक्सिंगसाठीसुद्धा या ट्रॅपचा वापर होतो. न्यूझीलंड, श्रीलंका इत्यादी देशातले खेळाडू यात अडकले होते. त्यामुळे प्रत्येक वर्ल्डकपच्यावेळी न्यूझीलंड मीडियामार्फत बुकिजना रोखण्याच्या संदर्भातल्या बातम्या येतात.

सट्टा बाजारातले बुकिज मुलींना खेळाडूंकडे पाठवतात. आणि त्यांच्याशी संबंध निर्माण करून त्यांना ब्लॅकमेल करतात. आणि मॅच फिक्स करण्यासाठी भाग पाडतात. म्हणूनच न्यूझीलंड मीडियाकडून बुकिज तसंच अशा मुलींपासून लांब राहण्याचा सल्ला खेळाडूंना दिला जातो. २०१४ आणि २०१८ च्या वर्ल्डकपवेळी अशा बातम्या समोर आल्या होत्या.

हेही वाचा: अमिताभप्रमाणे आपलं सोशल मीडिया अकाऊंट हॅक होऊ नये म्हणून

हनी ट्रॅप आपल्यावरच झाला तर,

हनी ट्रॅपमधे सुरवातीपासूनच महिलांचा वापर होत आलाय. पण गेल्या दोन दशकात पुरुषांचाही यात भरणा आहे. आणि आता होमोसेक्शुअल, लेस्बिअनसुद्धा अशा ट्रॅप घालण्याच्या गँगमधे सामील झालेत. आपण हे सिनेमातही पाहिलाय. शाहरुख खानच्या ‘डॉन’ सिनेमात प्रियांका चोप्रा, ‘एक था टायगर’मधे कटरीना कैफ आणि सलमान खान, ‘१६ डिसेंबर’मधे मिलिंद सोमण, ‘कॉर्पोरेट’मधे बिपाशा बासू इत्यादी. हॉलिवूडमधे तर हनीट्रॅपच्या खऱ्या घटनेवरचा हनीट्रॅप नावाचा सिनेमाच २०१४ मधे आला.

सध्या हनी ट्रॅप हा प्रकार सोशल मीडियावर सर्वाधिक वाढलाय. अगदी कुणालाही यातून फसवलं जातं. कुठलाही मोबाईल नंबर किंवा सोशल मीडिया अकाऊंट शोधून त्यावर स्वतःची जुजबी माहिती देणारा पहिला मेसेज टाकला जातो. कुतूहल म्हणून आपण रिप्लाय करतो. मग गोड बोलून जवळीक साधली जाते. नंतर फोटो, चॅट, वीडियो वरून ब्लॅकमेल केलं जातं. पैसे मागितले जातात.

यापासून आपण सावध राहिलं पाहिजे. त्यासाठी अनोळखी माणसांशी चॅट करणं टाळा. वैयक्तिक माहिती पाठवू नका. कुणी सतत मेसेज करत असेल तर त्याला ब्लॉक करा. तरीही फसवणूक झालीच तर तत्काळ पोलिसांशी संपर्क करा. कधी हे विकृत मानसिकतेतून होतं तर कधी पैसे उकळण्यासाठी. हा गुन्हा असून त्यासाठी शिक्षा होऊ शकते. अनोळखी माणसाचा मेसेज आल्यानंतर शहानिशा केल्याशिवाय त्याला आपली माहिती देऊ नये. आपल्या फोटो किंवा पोस्टला अनोळखी माणसाने लाईक केल्यावर त्याच्याशी लगेच बोलू नका, असा सल्ला वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश बिराजदार देतात.

ट्रॅप टाकणाऱ्या महिलाच ट्रॅपमधे

हनी ट्रॅपमधे ट्रॅप टाकणाऱ्या महिलांना एकाप्रकारे वेश्या व्यवसायात ढकललं जातं. गरीब, कमजोर कुटुंबातल्या मुलींना पैशांसाठी असं करण्यास भाग पाडलं जातं. तर काहींना त्या त्या क्षेत्रात काम मिळवून देण्याचं आमिष दाखवलं जातं. सध्याच्या मध्य प्रदेशातल्या प्रकरणात काही गरजू मुली अडकल्यात. तर काहींना राजकारणात काम करायचं होतं. पक्षात मोठं पद देण्याचा किंवा निवडणुकीचं तिकीट देण्याच्या आमिषावरुनही त्यांना ट्रॅप केलं. यात अडकलेल्या ४० महिलांच्या चौकशी दरम्यान त्यांची ही माहिती समोर आलीय. पोलिसांनीही मीडियाशी बोलताना या माहितीला दुजोरा दिलाय.

आपण एक वाक्य वेळोवेळी ऐकतो, वाचतो. 'युद्धात आणि प्रेमात सगळं काही माफ असतं.' हे वाक्य जवळपास प्रत्येक भाषेत आहे. याचाच आधार घेत हनी ट्रॅपचा वापर केला जातो. पण शेवटी एक प्रश्न उरतोच. आपल्या विरोधी गटातली माहिती काढण्यासाठी वापरलं जाणारं हनी ट्रॅप हे अस्त्र नैतिक आहे की अनैतिक?

हेही वाचा: 

द फॅमिली मॅनः गुप्तचर यंत्रणेची आतली गोष्ट सांगणारी वेब सिरीज

खरंच, भगतसिंगांची फाशी रोखण्याचा गांधींजींनी प्रयत्नच केला नाही?

घटस्थापना : भारतातल्या कृषीप्रधान संस्कृतीचं दर्शन घडवणारा सण

तुकोबांच्या अभंगांना तात्विक अधिष्ठान मिळवून देणाऱ्या संत बहिणाबाई

सत्यशोधकीय नियतकालिकेः वाङ्मयेतिहासात मोलाची भर घालणारा संदर्भ ग्रंथ