जिंकल्यावर भारतीय असणारी वंदना कटारिया हरल्यावर दलित कशी होते?

१२ ऑगस्ट २०२१

वाचन वेळ : ५ मिनिटं


आपल्या जातीच्या अस्मिता इतक्या घट्ट झाल्यात की प्रत्येक गोष्टीला जातीची 'सिलेक्टिव' लेबलं लावून आपण मोकळे होतो. त्यामुळेच नीरज चोप्राचं भालाफेकीतलं यश सगळेजण 'आपल्या जातीचं' म्हणून अभिमानाने मिरवतात. तर महिला हॉकी टीमने हरूनही इतिहास घडवणं एका जातीचं अपयश ठरतं. त्यातूनच वंदना कटारियाचा संघर्ष वजा करून ती केवळ 'दलित' असल्यामुळे ऑलिम्पिकमधल्या भारताच्या पराभवाचा जल्लोष केला जातो.

शाळा, कॉलेज म्हटलं की धम्माल असायची. खेळाच्या तासामधे मनसोक्त उंदडायला मिळायचं. शालेय स्तरावरच्या वेगवेगळ्या स्पर्धा मुलांसाठी पर्वणी असायच्या. त्यासाठी आधी प्रॅक्टिस व्हायच्या. समोरच्या टीमला हरवून आपल्या शाळेसाठी मेडल मिळवणं कितीतरी अभिमानाचं असायचं. त्याचं फार कौतुकही व्हायचं.

खेळ म्हणजे नुसता उंदडायला वेळ. पण पुढे जाऊन अनेक पोरंपोरी हेच आपलं करियर समजतात. शाळेसाठी मेडल मिळवणं जितकं अभिमानाचं तितकंच मग पुढे देशाला मेडल आणून देणंही अभिमानाचं वाटायला लागतं. कॉमनवेल्थ गेम्स, ऑलिम्पिक या खेळाडूंसाठी सुवर्णसंधी असते.

या स्पर्धांमधून वंदना कटारियासारखे खेळाडू उभे राहतात. स्वतःचं अस्तित्व निर्माण करतात. देशासाठी खेळतात. पण त्यांच्या जिंकण्या-हरण्यात जातीयवादी मानसिकता संधी शोधतात. त्यातून गुगल गुरूच्या आधाराने खेळाडूंच्या जातींचा शोध सुरू होतो. वंदना कटारियाचा संघर्ष वजा करत केवळ तिचं 'दलित' असणं पराभवचं कारण ठरतं. पण वंदनाचा हा प्रवास सोप्पा नाहीय.

अवहेलनेतही बापाची भक्कम साथ

वंदना कटारिया हरिद्वारच्या रोशनाबाद इथली. एकूण ९ भावंडं. तिचं बालपण अशा ठिकाणी गेलं जिथं खेळाचं वातावरण घरीचं काय तर आजूबाजूलाही नव्हतं. मुलगी म्हणून वंदनाच्या वाट्याला कायम नकारघंटा आली. तिची आजी तिच्यामागे घरचं काम आणि जेवण बनवायचा तगादा लावायची. मुलीने घराबाहेर पडणं अपमानाचं होतं तिथं वंदनानं खेळात उडी घेणं मान्य होणारं नव्हतंच.

ती लहानपणी झाडांच्या झुलणाऱ्या फांद्यांशी खेळायची. हीच तिची बालपणीची दोस्त मंडळी. खेळासाठी म्हणून सगळ्यांच्या नजरा तिला चुकवायला लागायच्या. त्या फांद्यावर ती प्रॅक्टिस करायची. हे वेगळेपण तिचे वडील नाहर सिंग यांनी ओळखलं होतं. ते एका कंपनीत काम करायचे. आजूबाजूला इतक्या साऱ्या नकारघंटा, नकारात्मकता असूनही वडलांनी मात्र वंदनाला पाठिंबा दिला. भक्कम साथ दिली. त्यामुळेच ती इथपर्यंत पोचू शकली.

नाहर सिंग यांनी काटकसर करून वंदनाला खेळण्यासाठी प्रोत्साहन दिलं. तिने हॉकी खेळायला सुरवात केली. हातात आलेल्या स्टिकमुळे अनेकजण तिच्याकडे चेष्टेनं पहायचे. पण बापाच्या असलेल्या भक्कम पाठिंब्याने याकडे दुर्लक्ष करायचं बळ वंदनाला मिळालं.

हेही वाचा: फूटबॉलपटूच्या किकने बदलला मुस्लिमांकडे बघण्याचा दृष्टिकोन

खो-खो ते थेट हॉकी

२००२ मधे खो-खोची एक राष्ट्रीय स्पर्धा भरवण्यात आली होती. इथूनच तिची स्पर्धांमधे भाग घ्यायला सुरवात झाली. खो-खोमधल्या या प्रयत्नांनी अवघ्या ११ वर्षांच्या वंदनाला हॉकीमधे खेळण्याची संधी मिळाली. तिचं सुरवातीचं ट्रेनिंग उत्तरप्रदेशमधल्या मेरठच्या एनएएस कॉलेजच्या हॉकी मैदानात झालं.

व्यावसायिक दृष्टिकोनातून विचार करायचा तर मेरठमधलं ट्रेनिंग तिच्यासाठी फार महत्वाचं होतं. त्यासाठी कोच प्रदीप चिनोटी यांचं तिला वेळोवेळी मार्गदर्शन मिळालं. २००४ ते २००६ ही ट्रेनिंगची वर्ष. या काळात तिने खूप साऱ्या राज्य आणि जिल्हास्तरीय हॉकी स्पर्धांमधे भाग घेतला.

२००७ ला तिला लखनौच्या हॉकी हॉस्टेलमधे प्रवेश मिळाला. वंदनाच्या वडलांनी विरोध होईल म्हणून ही गोष्ट तिच्या आईपासूनही लपवून ठेवली. ऍडमिशन झालं. इतर खेळाडू सुट्टीत घरी जायचे तेव्हा आपले पैसे वाचतील म्हणून ती घरी जाणं टाळायची. त्या पैशातून आणि कोचच्या मदतीने तिने किट आणि हॉकी स्टिक मिळवली.

हॉकीमधे पदकांचा सिलसिला

२००७ ला वंदनाचं भारतीय हॉकीच्या ज्यूनियर टीममधे सिलेक्शन झालं. त्यानंतर २०१० ला ती हॉकीच्या सिनियर टीममधे पोचली. २०१३ ला जपानमधे झालेल्या एशियन चॅम्पियनशीपमधे तिच्या टीमला सिल्वर मेडल मिळालं होतं. तर वर्षभराने कोरियात झालेल्या १७ व्या एशियन गेम्समधे टीमने ब्रॉंझ पदक पटकावलं.

त्यानंतर २०१६ मधे सिंगापूरमधे ४ थी एशियन चॅम्पियनशीप झाली होती. या स्पर्धेत तिच्या टीमला गोल्ड मेडल मिळालं. तर २०१८ ला झालेल्या एशियन गेम्समधे त्यांनी ब्रॉंझ पदक पटकावलं. ११ व्या कॉमनवेल्थ स्पर्धेतही वंदनाची टीम चौथ्या नंबरवर होती. मेडलच्या दिशेनं त्यांचा प्रवास असाच सुरु राहिला. आणि वंदनाचं यशही.

हेही वाचा: मेजर ध्यानचंद यांनी हिटलरचा प्रस्तावही नाकारला

ऑलिम्पिकमधे हार, ऐतिहासिक यशही

हरिद्वार ते ऑलिम्पिकपर्यंतचा वंदनाचा प्रवास खाचखळग्यांनी भरलेला होता. अशातच टोकियो ऑलिम्पिकची तयारी करत असतानाच यावर्षी मे महिन्यात भक्कम पाठिंबा असलेल्या तिच्या वडलांचं निधन झालं. पण तिने हार मानली नाही. ऑलिम्पिकमधे मेडल जिंकून आपल्या वडलांना श्रद्धांजली वहायचा निश्चय तिने पक्का केला होता.

टोकियो ऑलिम्पिकमधे भारतीय महिला हॉकी टीमने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ४-३ ने मॅच जिंकली. वंदनाने केलेल्या गोलच्या हॅट्रीकने इतिहास घडवला. चौथ्या, १७ व्या आणि ४९ व्या मिनिटाला तिने हा गोल केला. अशी हॅट्रीक करणारी ती पहिली महिला भारतीय ठरली.

४१ वर्षांमधे पहिल्यांदा भारतीय महिला हॉकी टीम सेमी फायनलमधे पोचलीय. इथं पोचण्यासाठी त्यांनी हॉकीतल्या जगातली २ नंबरची टीम समजल्या जाणाऱ्या ऑस्ट्रेलियाला हरवलं. हे ऐतिहासिक पाऊल होतं. त्यामुळेच सेमी फायनलमधली महिला हॉकी टीमची धडक भारतीयांसाठी अभिमानाची आहे. आणि त्यातलं वंदना कटारियाचं योगदानही.

खेळाला 'जात' चिकटावी?

भारतीय महिला हॉकी टीमने ऑलिम्पिकपर्यंत पोचणं खूप मोठी गोष्ट आहे. भारतीय महिला हॉकीच्या टीम याआधी तीनवेळा ऑलिम्पिकमधे सहभागी झाल्या आहेत. पण प्रत्येकवेळी त्यांना अपयश आलंय. यावेळी आपली टीम चौथ्या नंबरवर होती. आपण खेळामधे हरलो असू पण महिला हॉकी टीमने नवा इतिहास रचलाय.

भारतीय महिला हॉकीतल्या अनेक महिला खेळाडू संघर्ष करत इथपर्यंत पोचल्यात. नेहा गोयल, कॅप्टन राणी रामपाल यांना आपल्या गावखेड्यातल्या संघर्षाला तोंड द्यावं लागलंय. मुलगी म्हणून घर, समाजाचे अपमान पचवावे लागलेत. त्या सगळ्याला तोंड देत या मुलींनी हे यश मिळवलंय. पण काही महाभागांनी यात खेळाडूंची जात शोधत आपल्या जातीयवादी मानसिकतेचं दर्शन घडवलं.

महिला हॉकीची टीम सेमी फायनलमधे हरली आणि  या टीममधल्या वंदना कटारियाच्या घराजवळ फटाके फोडण्यात आले. टीममधे दलितांना घ्याल तर असंच होईल असं म्हणत जल्लोष करण्यात आला. हा जल्लोष नेमका कशाचा होता? आपल्या मागास मानसिकतेचा की वंदनासारख्या पोरींनी हरल्यानंतरही मिळवलेल्या खुपणाऱ्या ऐतिहासिक यशाचा?

आपल्या जातीच्या अस्मिता इतक्या घट्ट झाल्यात की यश, अपयशाला जातीची लेबल आपण सहज लावतो. त्यामुळेच नीरज चोप्राचं भालाफेकीतलं यश 'आपल्या जातीचं' म्हणून अभिमानाने मिरवलं जातं. पण त्याचवेळी महिला हॉकी टीमने हरूनही इतिहास घडवणं 'जातीचं अपयश' ठरतं. वंदनानं आपण भारतासाठी, आपल्या देशासाठी खेळलो आहोत असं म्हणत या जल्लोष करणाऱ्यांना चोख उत्तर दिलंय.

हेही वाचा: 

कधीकाळी बालिश वाटणाऱ्या विराटची प्रगल्भ तिशी

भरकटलेल्या समाजात राहणाऱ्या भटक्यांची एक गोष्ट

सगळं संपलंय, असं वाटेल तेव्हा शाहबाज नदीमची ही गोष्ट वाचा

फारुख इंजिनिअर बीसीसीआयच्या कारभारावर बोलले, त्यात चूक काय?