अमेरिकेत सुमारे चाळीस लाख हिंदू धर्मीय आहेत. तिथल्या वैद्यकीय, विज्ञान-तंत्रज्ञान, शैक्षणिक, व्यावसायिक क्षेत्रात त्यांचं योगदान मोठं आहे. तरीही अमेरिकन लोकांच्या मनात ‘हिंदूफोबिया’ म्हणजेच हिंदूंबद्दल तिरस्कार किंवा अकारण भीती वाढत जात असल्याचं दिसून येतंय. त्यांना द्वेषभावनेला सामोरं जावं लागतंय. हा द्वेष कधी हिंसात्मक मार्गाने तर कधी इतर छुप्या मार्गाने व्यक्त होतोय.
हिंदू धर्म हा जगातल्या सर्वात प्राचीन धर्मापैकी एक धर्म आहे. त्याला हजारो वर्षांचा इतिहास आहे. जगभरात शंभरहून अधिक देशांत १.२ अब्ज हिंदू राहतात. भारतीय माणूस आपली मातृभूमी सोडून दुसऱ्या देशात गेला तरी आपला धर्म, संस्कृती सोबत नेतो. परमुलखात आपल्या मूल्यांची जोपासना करतो. पण ते करताना आपला धर्म, संस्कृती कोणावरही लादायचा प्रयत्न करत नाही.
विविधतेतून एकता ही भारतीयांच्या रक्तातच असल्यामुळे ते परमुलुखात गेले तरी तिथल्या समूहाशी एकजीव होण्याचा प्रयत्न करतात. त्यांची संस्कृती अंगिकारली नसली तरी तिचा अनादर करीत नाहीत. असं असूनही जगभरातल्या भारतीयांना त्यातही हिंदूंना, मुसलमानांना, शीख लोकांना वेगवेगळ्या द्वेषभावनेला सामोरं जावं लागतं. हा द्वेष कधीतरी हिंसात्मक, तर कधी शाब्दिक, लिखित पद्धतीने छुप्या मार्गाने व्यक्त होतो.
अमेरिकेत हे प्रमाण वाढतंय. अमेरिकेतलाही हिंदू समुदाय या द्वेषभावनेपासून सुटलेला नाही. अमेरिकेत सुमारे पंचेचाळीस लाख भारतीय आहेत. त्यापैकी चाळीस लाख हिंदू धर्मीय आहेत. या सगळ्यांचं अमेरिकेच्या विकासात मोठं योगदान आहे.
तसंच त्यांनी आपले योग, संगीत, आयुर्वेद, खाद्यसंस्कृती असा आपला अमूल्य ठेवाही अमेरिकन लोकांसोबत शेअर केलाय. पण तिथल्या लोकांच्या मनात ‘हिंदूफोबिया’ म्हणजे हिंदूंच्या बद्दल तिरस्कार किंवा अकारण भीती वाढत जात असल्याचं दिसून येतंय.
रुटगर्स विद्यापीठाच्या २०२२ च्या एका अहवालातून असं समोर आलंय की, ‘हिंदूफोबिया आणि हिंदूबद्दल द्वेष हा समाजमाध्यमे आणि संवादाच्या प्लॅटफॉर्मचा वापर करून श्वेतवर्णीयांकडून मुद्दाम वाढवला जातोय.’ ही गोष्ट खरोखरच चिंताजनक आहे. त्याचा थेट परिणाम सध्यातरी अमेरिकन समुदायावर होईल असं वाटत नाही. पण, भविष्यात तो होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
हेही वाचा: काट्याच्या शर्यतीत भारताचा जावई झाला इंग्लंडचा पंतप्रधान
या वाढत्या हिंदूफोबियाच्या विरोधात अमेरिकेतल्या जॉर्जिया राज्याच्या विधिमंडळात एक एप्रिल रोजी एक ठराव संमत करण्यात आला. या राज्यातल्या अटलांटा या शहरात मोठा हिंदू समुदाय आहे. त्या शहराचे विधानसभेचे प्रतिनिधी लॉरेन मॅकडोनाल्ड आणि टॉड जोन्स यांनी हा ठराव मांडला होता. त्याला रिक जॅस्पर्स, डेव्हिड क्लार्क आणि ब्रेंट कॉक्स यांनी पाठिंबा दिला.
विशेष म्हणजे हे सगळे प्रतिनिधी रिपब्लिकन पक्षाचे आहेत. खरंतर डेमोक्रॅटिक पक्ष हा जास्त हिंदू समुदायाला पाठिंबा देतो. रिपब्लिकन पक्षातल्या बहुतांश लोकांना भारतीयांच्या बद्दल आकस आहे. त्यांना वाटतं की हे लोक आपल्या पेक्षा वरचढ होण्याचा, आपला धर्म, संस्कृती अमेरिकेत पसरविण्याचा, आपल्या नोकर्या, संधी काढून घेण्याचा प्रयत्न करतात. या गैरसमजातूनच मग द्वेष भावना वाढते.
अटलांटा विधिमंडळातल्या या ठरावामधे हिंदूफोबियाला आळा घालण्यासाठी कोणत्याही तरतुदी केलेल्या नाहीत. केवळ हिंदूंच्या विरोधात वाढणार्या द्वेषाकडे लक्ष वेधलं असून हिंदू समुदायाच्या अमेरिकेतल्या योगदानावर प्रकाश टाकलाय. अटलांटा शहरातल्या हिंदू अमेरिकन नागरिकांच्या भावना या ठरावाद्वारे मांडून हिंदूफोबियाचा फक्त निषेध केला गेलाय.
इथल्या हिंदू समुदायाने कायमच जॉर्जिया राज्यातला आर्थिक आणि सामाजिक समतोल साधण्यात मदत केल्याचं मत या विधानसभा प्रतिनिधींनी मांडलं. कोहिलेशन ऑफ हिंदूज ऑफ नॉर्थ अमेरिका या संघटनेने हा ठराव मंजूर करावा यासाठी प्रयत्न केले.
अमेरिकेतल्या हिंदू समुदायाला कायदेशीर सल्ला देण्याचं काम ही संघटना करते. कामाच्या ठिकाणी काही अडचणी असतील त्या सोडवणं आणि हिंदू संस्कृतीबद्दल जनजागृती करण्याचं काम करते. अटलांटातल्या विधिमंडळात झालेल्या चर्चेने अमेरिकेतल्या इतर नागरिकांकडून भारतीयांना होणाऱ्या त्रासाची नोंद घेण्यात आली.
हेही वाचा: ट्रम्पतात्यांचा दोस्त नरेंद्र मोदींना शपथविधीच्या दुसऱ्याच दिवशी झटका
हे जरी खरं असलं तरी हिंदू नागरिकांमधेही सगळं आलबेल नाही. जातीचं राजकारण भारतातून अमेरिकेत गेल्यावरही संपलेलं नाही. फेब्रुवारी महिन्यात सिएटल सिटी कॉऊन्सिलने जातीभेदाविरुद्ध एक कायदा संमत केला. जी जात नाही ती जात भारतीय लोकांच्यासोबत अमेरिकेत पण येऊन पोचलीय आणि बर्याच ठिकाणी ती आपलं अस्तित्व दाखवत असते.
कॅलिफोर्निया, सिएटल अशा आयटी हब असणार्या शहरात पण जातभेदभावाच्या घटना घडू लागल्या होत्या. त्याचं मूळ खोलवर रुजण्याआधी सिटी कॉऊन्सिलच्या एकमेव भारतीय सदस्या क्षमा सावंत, ज्या स्वतः हिंदू उच्चवर्णीय आहेत, त्यांनी भेदभाव करणार्या प्रकारांत जातीचाही समावेश करावा म्हणून प्रस्ताव मांडला होता. जो बहुमताने संमत झाला.
साधारणतः धर्म, वर्ण, वंश, लिंग, प्रांत यावरून भेदभाव केला जातो. जर जातीवरून कोणी भेदभाव केला तर तो गुन्हा मानून त्याला शिक्षा देण्याची तरतूद करण्यात आली. असा कायदा करणारं सिएटल अमेरिकेतलं पहिलं शहर ठरलं. पण जसं या कायद्याचं स्वागत करण्यात आलं त्याच प्रमाणात त्याला विरोधही काही हिंदू संघटनांनी केला.
त्यामधे विश्व हिंदू परिषद ऑफ अमेरिका, कोअलिशन ऑफ हिंदूज ऑफ नॉर्थ अमेरिका आणि हिंदू अमेरिकन फाऊंडेशनचा समावेश होता. त्यांच्या मते या कायद्यावरून जातभेदभाव अमेरिकेतल्या हिंदूंमधे असल्याचं स्पष्ट होतं. त्यामुळे हिंदू धर्माबद्दल गैरसमज वाढतील आणि हिंदूफोबियाला आणखी प्रोत्साहन मिळेल.
फेडरल ब्युरो ऑफ इन्वेस्टीगेशन म्हणजे एफबीआयच्या २०२१मधल्या आकडेवारीनुसार अमेरिकेत सर्वात जास्त द्वेषातून होणार्या गुन्हयांना आफ्रिकन अमेरिकन लोकांना सामोरं जावं लागतं. पण ते वर्णद्वेषातून होतात. धर्मावर आधारित गुन्हे हे सर्वाधिक ज्यूविरोधी असून त्याचं प्रमाण ३१.९% आहे तर त्यानंतर शीख विरोधी २१.३% तर इस्लाम विरोधी ९.५% आहे. हिंदूंच्या विरोधी प्रमाण अत्यल्प म्हणजे १% आहे.
हिंदू संघटनाच्या मते, एफबीआयकडे जेवढ्या नोंदी आहेत तेवढंच प्रमाण दिसतं. त्यांचे रेकॉर्ड सोडून आशियाई अमेरिका संघटनाही कुठं काय झालं त्याची नोंद ठेवत असतात. ११ सप्टेंबर २००१ रोजी अमेरिकेवर जो दहशतवादी हल्ला झाला त्यानंतर भारतीयांच्या विरोधी हल्ले वाढले. अमेरिकेत सुमारे एक हजार मंदिरं आणि धार्मिक केंद्रं आहेत. त्यावरही गेल्या पंधरा वर्षात हल्ल्याचे प्रयत्न झालेत.
शैक्षणिक क्षेत्रातही बर्याच ठिकाणी विद्यार्थ्यांची इतर मुलांकडून हिंदू धर्मावरून चेष्टा केली जाते. काही शिक्षक सर्व वर्गासमोर हिंदू धर्मातल्या संकल्पनांची चुकीची माहिती देतात किंवा थट्टा करतात. त्यामुळे बरीच मुलं आपण हिंदू असल्याचं लपवतात. पण तो काही उपाय नाही. आपला धर्म, विचार, संस्कृतीबद्दल आपल्या संकल्पना या इतरांना न दुखावता स्पष्ट करता आल्या पाहिजेत. यासाठी राजकीय पातळीवर प्रयत्न झाले पाहिजेत.
दुसर्या धर्माबद्दल विनाकारण तिरस्कार बाळगून, परधर्मियांना त्रास देणार्यांविरुद्ध कायदे केले पाहिजेत. काही नाही तर निषेध नोंदवता आला पाहिजे. खरंतर जॉर्जिया राज्याचं अनुकरण बाकीच्या राज्यांनी करणं आवश्यक आहे. अमेरिकेत दिवसेंदिवस भारतीयांची संख्या वाढतेय. त्यासोबत त्यांच्याविरोधातले गैरसमज, द्वेष पण वाढायला लागले तर अमेरिकेच्या केंद्र सरकारने ठोस पावलं उचलून भारतीयांना सुरक्षिततेची हमी दिली पाहिजे.
हेही वाचा:
ट्रम्प हरलेत, ट्रम्पवाद अमेरिकेत बोकाळलेला आहेच
हत्ती आणि गाढव अमेरिकेच्या राजकारणात आले कसे?
अमेरिकेत ट्रम्प निवडून येणं हीच असेल जगासाठी मोठी दुःखद बातमी
(दैनिक पुढारीच्या बहार पुरवणीमधून साभार)