#NoBra या हॅशटॅगविषयी ब्र का नाही काढायचा?

०७ सप्टेंबर २०२०

वाचन वेळ : ४ मिनिटं


ऑक्टोबर महिना ब्रेस्ट कॅन्सर अवेअरनेससाठी वाहिलेला असतो. याचदरम्यान १३ तारखेला नो ब्रा डे पाळला जातो. सध्या लॉकडाऊनपासून घरात असणाऱ्या महिलांना ब्रापासून सुट्टी मिळालीय. त्यामुळे सोशल मीडियावर हॅशटॅग नो ब्रा तुफान चालतंय. मुली, महिला त्यांचे अनुभव शेअर करतायत आणि त्या पोस्टवर हे पाश्चिमात्य देशांचं फॅड असल्याच्या कमेंट्स पडतायत.

लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर काही महिन्यात अचानक #NoBraDay असा हॅशटॅग सुरू झाला. लॉकडाऊनमुळे घराबाहेर पडावं लागत नाही. पायजमा पॅण्ट आणि शर्ट किंवा साधा गाऊन यावर मुली, महिला दिवस दिवस काढतात. तसंच घरातलं, ऑफिसचं काम करतात. त्यामुळे लॉकडाऊनमधे ब्रापासून सुट्टी मिळाल्याचा आनंद या मुली सोशल मीडियावर व्यक्त करत होत्या. मात्र, हा पाश्चिमात्य देशातलं फॅड आहे, भारतीय स्त्रीला हे शोभत नाही असं सांगत अनेकांनी या मुलींच्या पोस्टवर उड्या टाकल्या. भरपूर चर्चा झालीय.

या हॅशटॅगविषयी अजूनही चर्चा सुरूच आहे. ऑक्टोबर महिना हा ‘इंटरनॅशनल ब्रेस्ट कॅन्सर अनेअरनेस मंथ’ म्हणून ओळखला जातो. त्यातूनच २०११ पासून १३ ऑक्टोबरला #NoBraDay पाळण्याची प्रथा सुरू झाली.

#NoBraDay कॅम्पेन का सुरू झालं?

नो ब्रा हा असा कसला डे? म्हणत बऱ्याचशा भारतीयांना डोकं खाजवावं लागलं. यातच १४ ऑक्टोबरला सोशल मीडियावर #NoBra कॅम्पेन चालवणाऱ्या दक्षिण कोरियातल्या पॉप स्टार सुली यांचा मृत्यू झाला. त्या २५ वर्षांच्या होत्या. या बातमीने तर खळबळ माजली. तिच्या मृत्यूचं कारण अद्याप समजू शकलं नाही.

#NoBra कॅम्पेनवर सोशल मीडियातून अपमानास्पद प्रतिक्रिया आल्या. त्यामुळे सुली खूप नाराज होत्या असं सांगण्यात येतंय. आणि तेव्हापासूनच डिप्रेशनमधे गेल्या. डिप्रेशनमधे गेल्यामुळेच त्यांचा मृत्यू झाल्याची चर्चा सुरू आहे. म्हणून पुन्हा #NoBra हा हॅशटॅग सुरू झाला.

ब्रा इतर कपड्यांसारखी एक

‘ब्रा’ हा शब्द कुणी उच्चारला तरी मुली लाजतात. काही लोक हा शब्द उच्चारलेल्या व्यक्तीकडे कोणतातरी गुन्हा केल्यासारखं बघतात. १९११ मधे ‘ब्रा’ या शब्दाला ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरीत स्थान मिळालं. आजही लोक एखाद्या मुलीच्या 'ब्रा'चे पट्टे बघून अस्वस्थ होतात. पुरुषच नाही तर महिलाही अस्वस्थ होतात. आणि एकमेकींना इशारा करून बाहेर आलेला पट्टा आत ढकलण्यासाठी सांगतात.

महिलांच्या अंतर्वस्त्रांकडे, खासकरून ब्राकडे एक लैंगिक उद्दीपक वस्त्र म्हणून बघितलं जातं. आजही अनेक महिला ब्राला इतर कपड्यांखाली झाकून ठेवतात. आतल्या खोल्यांमधे कुठेतरी वाळत घालतात, जिथे कुणाचीही नजर पडणार नाही. शर्ट, पँट आणि बनियन या कपड्यांप्रमाणेच ब्रासुद्धा एक वस्त्रच आहे. ब्राकडे आपण एक वस्त्र म्हणूनच बघायला हवं.

हेही वाचा : चला, समतेच्या सॅनिटायझरनं पुरुषीपणाचा वायरस मारून टाकूया

ब्रामुळे त्वचा मोकळा श्वास घेत नाही

#NoBraDay हे हॅशटॅग सुरू झालं त्यावेळी बहुतेक भारतीयांना गैरसमज झाला. परदेशी ट्रेंड हा भारतीय महिलांमधे अश्लीलता पसरवतो असं म्हणत त्याची खिल्ली उडवली. त्यामागचा नेमका उद्देश खूप कमी लोकांना समजला. पॉप स्टार सुली यांनी सोशल मीडियावर #NoBra कॅम्पेन सुरू करून जगभर खळबळ माजवली. त्यांनीच #NOBraDay ला सुरवात केली. तिचे फोटो सोशल मीडियावर वायरल झाले. नंतर ती दक्षिण कोरियाची #NOBraDay मोहिमेची ब्रँड ॲम्बॅसिडर बनली. पण यामागचा तिचा उद्देश समजून न घेताच तिला ट्रोल केलं गेलं.

ऑक्टोबर हा संपूर्ण महिना ब्रेस्ट कॅन्सरविषयी महिलांमधे जागरूकता पसरवण्यासाठी समर्पित केला गेलाय. एक दिवसासाठी का होईना महिलांनी ब्रा मुक्त आणि आपल्या शरीराला म्हणजेच स्तनाला पूर्ण जाणून घ्यावं असा उद्देश या मोहिमेचा आहे. सतत ब्रा घातल्याने वेदना होणं साहजिक आहे. जसं खूप तास टाइट कपडे घातल्यावर शरीराला अस्वस्थता वाटते, तसंच स्तनांनापण वाटतं.

वायर मटेरियल किंवा टाइट स्पोर्ट्स ब्रा घातल्याने त्वचा मोकळा श्वास घेऊ शकत नाही. रक्तवाहिन्या आवळल्या जातात. मग त्वचारोग होण्याची शक्यता वाढते. तसंच आपल्या स्तनांच्या स्नायूंना नुकसान होऊ शकतं. नाजुक त्वचेवर रॅशेस म्हणजेच लाल चट्टे येणं, त्या भागात खाज येणं, जळजळ होणं. सतत ब्रा घातल्याने खांदेदुखीला सामोरं जावं लागतं. याव्यतिरिक्त त्वचेवर डाग येणं किंवा जखम होण्यासारख्या समस्याही होतात.

आपल्या स्तनांचं निरीक्षण केलं पाहिजे

ब्रा घातल्याने त्वचा स्वच्छ राहत नाही. त्या भागात घाम येतो. त्यामुळे फंगस किंवा बॅक्टेरियाचा प्रादुर्भाव होतो. आणि सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे यामुळे ब्रेस्ट कॅन्सर उद्भवण्याची शक्यता असते. या सर्व समस्या सर्वांनी समजून घेणं खूप गरजेचं आहे. ब्रेस्ट कॅन्सर पासून सावध राहण्यासाठी या मोहिमेची सुरवात झाली.

महिलांनी एक दिवस का होईना आपल्या स्तनाची काळजी घेतली पाहिजे. आपल्या स्तनाचं निरीक्षण केलं पाहिजे. प्रत्येक महिलेने आपल्या स्तनासंदर्भात काही समस्या उद्भवली आहे का हे पाहणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे या मोहिमेकडे लाजीरवाणेपणाने बघण्यासारखं काही नाही.

एका वृत्तपत्राच्या रिपोर्टनुसार, २०१० ते २०१४ दरम्यान ब्रेस्ट कॅन्सर पीडित महिलांपैकी केवळ ६६.१ टक्के महिला बचावल्या आहेत. तर ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेमत ९० टक्के महिला वाचल्या. मुमताज, काइली मिनोग, बार्बरा मोरी, सिंथिया निक्सन, मेलिसा एथरिज, क्रिस्टिना एप्पलगेट अशा अनेक अभिनेत्री, गायिका यांना ब्रेस्ट कॅन्सरला सामोरं जावं लागलं.

हेही वाचा : जागतिक कन्या दिनः स्त्री सन्मानासाठी दाढीमिशा लावून काम करणाऱ्या शास्त्रज्ञ

पूर्वीच्या काळात ब्रा कशा होत्या?

'brassiere' या फ्रेंच शब्दाचं ‘ब्रा’ हे संक्षिप्त रुप. ब्रेसियर या अर्थ शरीरचा वरचा भाग. पहिली मॉडर्न ब्रा फ्रान्समधेच बनवण्यात आली. हर्मिनी कॅडोल यांनी १८६९ मधे कॉर्सेटला दोन तुकट्यांत तोडून अंतर्वस्त्र बनवले. याच वस्त्राचा वरचा भाग नंतर ब्रा म्हणून घालण्यात आला. आणि नंतर तसा विकण्यातही आला.

ग्रीसच्या इतिहासात ब्रासारख्या दिसणाऱ्या कपड्यांचे चित्रण केल्याचं दिसतं. स्तन झाकण्यासाठी रोमन साम्राज्यातल्या महिला छातीभोवती एक कपडा बांधायच्या. याउलट काही ग्रीक महिला स्तनांखाली एक पट्टा बांधून त्यांना उभारी द्यायचा प्रयत्न करायच्या. भारतीय कथा पुराणातही एका वस्त्राचा उल्लेख आढळतो. तो म्हणजे कंचुकी तसंच कासोळी.. म्हणजेच आधुनिक काळातील ब्राच म्हणावं लागेल.

१९०७ मधे फेमस फॅशन मॅगजिन 'वोग'नं 'brassiere' शब्द लोकप्रिय होण्यात मोठी भूमिका निभावली. पुढे ब्राचा विरोध होऊ लागला. त्यावेळी फेमिनिस्ट संघटनांनी ब्रा घातल्यामुळे होणाऱ्या धोक्यांची जाणीव करून देऊ लागल्या. १९६८ मधे महिलांना सौंदर्याच्या विशिष्ठ चौकटीत बसवण्याची ही धडपड असल्याचं सांगत हा विरोध करण्यात आला.

सौंदर्याची चौकट आणि आरोग्याची ऐशीतैशी पाहता नो ब्राचा पुकारा झाल्यास त्यामधे काही वावगं किंवा अश्लील आहे असं म्हणणे नक्कीच चुकीचं ठरेल. त्यामुळे #NoBra या हॅशटॅगकडे गंभीरतेने बघणं गरजेचं आहे.

हेही वाचा : 

मुलगी जगणं शिकली, तरच प्रगती होणार ना!

कोरोनाचं युद्ध लढणाऱ्या आणि जिंकणाऱ्या महिला लीडर

‘थप्पड’च्या आरशात दिसणारा पुरुष आपण पाहिलाय का?

क्रिकेट म्हणजे पुरुषांचा खेळ, हा समज खोटं ठरवणाऱ्या बायका

पहिल्या पूर्णवेळ महिला अर्थमंत्र्यांनी देशातल्या महिलांना काय दिलं?

आकाश निळंच असतं असं वाटत असेल, तर 'द स्काय इज पिंक' बघाच