सोन्यातली फसवणूक टाळायची असेल तर हॉलमार्कची बाराखडी शिकायला हवी

२७ मार्च २०२१

वाचन वेळ : ५ मिनिटं


केंद्र सरकारने १ जून २०२१ पासून सोन्याच्या दागिन्यांवर हॉलमार्किंग सक्तीचं केलंय. आता देशातल्या कोणत्याही विक्रेत्याने हॉलमार्क नसलेले दागिने विकले तर त्याला मोठी शिक्षा केली जाईल. ग्राहकांची फसवणूक थांबवण्यासाठी हा निर्णय घेतला गेलाय. भारतातलं सोन्याचं महत्त्व लक्षात घेता त्यावर बंधनकारक असणाऱ्या या हॉलमार्किंगचीही बाराखडी समजून घ्यायला हवी.

सोनं म्हणजे भारतीयांचा जीव की प्राण. भारतात सोन्याला अतिशय महत्त्व आहे. सोनं कितीही महाग झालं तरी त्यावर भारतात लोक खूप पैसे खर्च करतात. त्यातही सणावाराला, लग्न कार्याला घरातल्या बाईच्या अंगावर सोन्याचे दागिने हवेच असतात. गुंतवणूक करण्याचा सगळ्यात चांगला पर्याय म्हणूनही भारतीय सोन्याच्या दागिन्यांकडे पाहतात.  त्यामुळेच या दागिन्यांच्या खरेदी विक्रीबाबतचा कोणताही नियम भारतीयांसाठी महत्त्वाचा असतो. 

१ जून २०२१ पासून सोन्याच्या सगळ्या दागिन्यांवर हॉलमार्क असणं सक्तीचं झालंय. १ जूनपासून १४, १८ आणि २२ कॅरेटचे आणि हॉलमार्क असलेले दागिनेच विक्रेत्यांना विकता येतील, असा नियम केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार विभागाने लागू केलाय. खरंतर जानेवारी २०२० लाच हा निर्णय घेण्यात आला होता. सगळ्या दागिने विक्रेत्यांना नोंदणी करण्यासाठी एक वर्षाचा वेळ देऊन १५ जानेवारी २०२१ पासून हॉलमार्क सक्तीचं होणार होतं. पण १९ मार्चला ही मुदत वाढवली.
   
या निर्णयामुळे ग्राहकांमधे गोंधळाचं वातावरण निर्माण झालंय. हॉलमार्किंग म्हणजे नेमकं काय? ते ओळखायचं कसं? ग्राहकांनी आधीच विकत घेतलेल्या दागिन्यांवर हॉलमार्क नसेल तर त्याचं काय होणार? असे अनेक प्रश्न पडतायत. म्हणूनच या हॉलमार्किंगची बाराखडी समजून घ्यायला हवी.

हॉलमार्किंग म्हणजे काय?

सोने, चांदी, प्लॅटिनम आणि काही देशांमधे पॅलाडियम या धातूंपासून बनवलेल्या वस्तूंवर त्याच्या शुद्धतेचं प्रमाणपत्र देणारा एक मार्क किंवा स्टॅम्प दिलेला असतो. अनेकदा एकापेक्षा जास्त मार्कही असतात. मौल्यवान धातू विकणारा विक्रेता त्या धातूच्या शुद्धतेबद्दल जी माहिती सांगतोय ती खरी आहे हे या मार्कवरून स्पष्ट होतं.

भारतात सोन्याच्या दागिन्यांवर बीआयएस हॉलमार्क वापरला जातो. बीआयएस म्हणजेच ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड या राष्ट्रीय दर्जाच्या संस्थेने घालून दिलेल्या नियमांत हा दागिना बसतो, असा त्या हॉलमार्कचा अर्थ होतो. एप्रिल २००० पासून याची सुरवात झाली. गेल्या काही वर्षांपासून काही मोठे ज्वेलर्स आपले सगळे दागिने हॉलमार्क करूनच विकत होते.

हेही वाचा : श्रीमंतांकडून जास्त टॅक्स घेण्याची सूचना अभिजीत बॅनर्जी का करतात?

बीआयएसचे ४ स्टॅम्प

या बीआयएस हॉलमार्कमधे ४ प्रकारचे स्टॅम्प असतात. पहिला, बीआयएस या संस्थेचा लोगो. दुसरा, सोन्याची कॅरेटमधली शुद्धता. यात २२ कॅरेट सोन्यासाठी 22K916, १८ कॅरेटसाठी 18K750 आणि १४ कॅरेटसाठी 14K585 असे शब्द वापरले जातात. सोन्याची शुद्धता दोन प्रकारात मोजली जाते. एकतर कॅरेटमधे आणि दुसरं शुद्धतेचा क्रमांक.

२४ कॅरेट हे सोन्याचं शुद्ध रूप अतिशय मऊ असल्याने त्याचे दागिने बनवण्यासाठी चांदी किंवा झिंकसारख्या धातूंचा वापर करावा लागतो, हे आपण शिकलोय. त्यामुळे २२ कॅरेट सोनं याचा अर्थ २४ पैकी २२ सोनं आणि २ कॅरेट इतर धातू वापरलाय. तर शुद्धतेचा क्रमांक हा प्रत्येक हजार युनिटमागे मोजला जातो. म्हणजे, २२ कॅरेट सोन्यात ९१६ युनिट सोनं आणि उरलेल्या भागात इतर धातू असे हे शब्द आपल्याला डिकोड करता येतील.

बीआयएस हॉलमार्किंगमधे तिसरा मार्क असतो तो दागिना ज्या हॉलमार्किंग सेंटरमधे चाचणी होऊन बाहेर आलाय त्याचा लोगो किंवा नंबर आणि चौथा मार्क म्हणजे ज्वेलरचा आयडेंटिफिकेशन मार्क किंवा नंबर. सोन्याच्या दागिन्यांवर शक्यतो आतल्या बाजुला हे बीआयएस हॉलमार्किंग केलेलं असतं.

हॉलमार्किंगसाठी नोंदणी गरजेची

हॉलमार्क असलेले दागिने भारतातल्या सगळ्यांपर्यंत पोचावेत यासाठी २००० पासून भरपूर प्रयत्न केले गेलेत. त्यासाठी ऍसेईंग अँड हॉलमार्किंग सेंटर म्हणजे एएचसीची केंद्रं देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी उपलब्ध करून दिलीत. विशेषतः खेडेगावात किंवा छोट्या शहरात हे हॉलमार्किंग पोचावं यासाठी प्रयत्न केले जातात. हॉलमार्किंगसाठी लागणाऱ्या खर्चाला सबसिडी उपलब्ध करून देणं, लायसन्स मिळवण्यासाठी रजिस्ट्रेशन फी कमीत कमी ठेवणं अशा अनेक गोष्टी केल्या जातात. 

बीआयएसच्या वेबसाईटवर अशा ९४६ अधिकृत हॉलमार्किंग सेंटरची यादी दिलीय. जवळपास २५ हजार ज्वेलर्स जोडले गेलेत. बीआयएसचं सर्टिफिकेट असणारा कोणताही ज्वेलर्स या ९४६ पैकी कोणत्याही एका केंद्रावरून आपल्या दागिन्यांवर हॉलमार्क लावता येतो. बीआयएस सर्टिफिकेट मिळवण्याची प्रक्रियाही फार सोपी, ऑनलाईन पद्धतीनं होणारी आहे आणि त्याला लागणारी फीसुद्धा अगदी कमी आहे.

हेही वाचा : जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस भारतात इन्वेस्टमेंट का करतोय?

हॉलमार्किंगच्या तीन पायऱ्या

हॉलमार्किंगच्या पद्धतीत तीन पायऱ्या असतात. विक्रेत्याकडून दागिने आले की पहिले आलेल्या दागिन्यांच्या एका बॅचची चाचणी होते. हे दागिने बीआयएसच्या मुलभूत नियमांत बसतात का ते पाहिलं जातं. त्यानंतर त्यातल्या प्रत्येक दागिन्याची शुद्धता तपासणी होते. ही थोडी गुंतागुंतीची प्रक्रिया असते. 

पहिली प्रत्येक दागिन्याच्या वरच्या भागावर एक तपासणी होते. त्यानंतर दागिन्यातला एक अगदी छोटा तुकडा काढून त्याची तपासणी करतात. त्यानंतर केंद्राकडून सोन्याचे युनिट मोजणारी आणखी एक कडक तपासणी केली जाते. 

ही सगळी प्रक्रिया पूर्ण व्हायला साधारण ५ ते ६ तास लागतात. त्यानंतरच त्यावर हॉलमार्क केल्याचे स्टॅम्प लागतात. त्यासाठी हाताने ठप्पा मारायचा किंवा आजकाल लेझर मशिनचा वापर केला जातो. मग दागिने केंद्रातून पुन्हा विक्रेत्याकडे पाठवले जातात.

ग्राहकांसाठी हॉलमार्किंग का महत्त्वाचं?

एकदा का हे हॉलमार्किंग दागिन्यांवर झालं की, विक्रेत्याला त्याच्याकडचे दागिने दर्जेदार आहेत हे वेगळं सांगायची गरज पडत नाही. पण खरंतर, हे हॉलमार्किंग ग्राहकांची फसवणूक होऊ नये यासाठी जास्त महत्त्वाचं आहे. अनेकदा काही विक्रेते २२ कॅरेटचे सांगून २० किंवा त्यापेक्षा कमी कॅरेटचेच दागिने विकतात. सध्याच्या ऑनलाईन शॉपिंग जगात तर हा घोटाळा सर्रास चालतो. पण हॉलमार्कमुळे आपण जितके पैसे देतोय त्याच शुद्धतेचं सोनं आपल्याला मिळतंय याची खात्री होते.

आपल्याकडे असलेले दागिने आपल्याला नव्या स्टाईलप्रमाणे करायचे असतील किंवा त्यात भर घालायची असेल तेव्हाही या हॉलमार्कचा उपयोग होतो. शिवाय, आपल्याला आपल्याकडचे दागिने विकायचे असतील किंवा त्यावर कर्ज मिळवायचं असेल तर हॉलमार्कमुळे ही प्रक्रिया सोपी होते.

म्हणूनच, हॉलमार्क अनिवार्य झाल्यानंतर नेहमी सोन्याचे दागिने घेताना एखादं भिंग ज्वेलर्सकडे मागायचं आणि त्यातून हॉलमार्कचे ४ स्टॅम्प असल्याची खात्री करून घ्यायची. ग्राहक विक्रेत्याकडे बीआयएस रजिस्ट्रेशनचं सर्टिफिकेटही मागू शकतात. याशिवाय, दागिना विकत घेतल्याचं पक्कं बीलही ज्वेलर्सकडे मागायला हवं. 

हेही वाचा : १९९१ मधे भारताला कर्जही मिळत नव्हतं, पण आजचा भारत त्या संकटातून उभा झालाय

ग्राहकांच्या प्रश्नांची उत्तरं

महत्त्वाचं म्हणजे, २ ग्रॅमपेक्षा कमी वजनाचे सोन्याचे दागिने, सोन्याच्या विटा आणि नाणी यांना हॉलमार्किंग बंधनकारक नाही. त्यातही फक्त सोन्याच्या दागिन्यांची विक्री करणाऱ्यांनाच हॉलमार्किंगचं बंधनं पाळावं लागणार आहे. ग्राहकांकडे असणाऱ्या सोन्याच्या दागिन्यांवर हॉलमार्क नसला तरी चालणार आहे. असे दागिने ग्राहकाला कुणाला भेट म्हणून द्यायचे असतील किंवा ज्वेलर्सलाच पुन्हा विकायचे असतील किंवा ते मोडून नवीन दागिने बनवायचे असतील तर त्यासाठीही हॉलमार्कची गरज नाही.

अनेकदा दागिन्यात हॉलमार्किंगचा खर्च वाढतो म्हणून ग्राहकही हॉलमार्किंगकडे दुर्लक्ष करतात. पण बीआयएसच्या अधिकृत वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार एका दागिन्याच्या हॉलमार्किंगसाठी कमीतकमी ३५ रूपये पडतात. तर दागिन्यांच्या एका संपूर्ण बॅचच्या हॉलमार्किंगसाठी जास्तीत जास्त २०० रुपये पडतील. यावर सरकारकडून कर लावला जाईल. त्यामुळे दागिन्यांची किंमत फार तर पाचशे हजाराने वाढेल.

बीआयएस कायदा, २०१६ नुसार, हॉलमार्क नसलेले दागिने विकणाऱ्या विक्रेत्याला एक वर्षांचा तुरूंगवास आणि एक लाख रुपयांचा दंड अशी शिक्षा असेल. किती किमतीचे दागिने हॉलमार्कशिवाय विकलेत यावर या दंडाची किंमत पाचपटींपर्यंत जास्त होऊ शकते. त्यामुळेच, विक्रेत्यांनी आणि ग्राहकांनीही टाळाटाळ न करता प्रत्येक दागिन्यावर हॉलमार्किंग लावून घ्यायला हवं.

हेही वाचा : 

तुम्ही मोबाईल चार्जरशिवाय विकत घेणार का?

देशभर चर्चेचा विषय बनलेल्या रिहानाचं वायरल सत्य असत्य

आंदोलन मोडण्याचे मोडीत निघालेले हाथखंडे मोदी सरकारला का हवेत?

आपल्याला काय त्याचं : तरूणाच्या स्थित्यंतराची तरूणीनं सांगितलेली गोष्ट