बाप आणि मुलीचं नातं फार हळवं असतं. दोघांच्याही नात्याकडे तसंच पाहिलं जातं. पण याच नात्यामधे पैसा आणि संपत्तीच्या हव्यासापोटी मिठाचा खडा पडला तर? असंच काहीसं चित्रण असलेली 'हक्कसोड' ही मिलिंद जाधव यांची कादंबरी ग्रामीण भागातल्या नातेसंबंधांवर भाष्य करते. त्याला वेगवेगळे पदरही आहेत. यातली मिलिंद जाधव यांनी उभी केलेली पात्र आपल्या आजूबाजूलाही दिसत राहतात.
कायदा हा न्याय मिळवून देण्यासाठी असतो, पण कायद्याच्या गैरवापर करून आपला स्वार्थ साधणाऱ्या स्वार्थकेंद्री मनोवृत्ती वाढताना दिसतेय. आपल्या 'स्व' च्या दिर्घ 'मी' साठी आपण कोणाला त्रास देतोय याच भान हरपलेली अनेक नात्यातली माणसं आपल्या आजूबाजूला दिसतात. 'हक्कसोड' या कादंबरीतून 'मिलिंद जाधव' यांनी उभी केलेली पात्र समाजात सगळीकडे दिसतात.
'हक्कसोड' या कादंबरीतून जी पात्र येतात त्या पात्रातलं प्रमुख पात्र महिपतराव आणि जानकी. त्यांनी आपलं घर उभं करण्यासाठी आयुष्य झिजवलंय. आपल्या घरातल्या प्रत्येक स्त्री-पुरुषाच्या वाट्याला चांगलं जगणं यावं म्हणून आयुष्यभर मेहनत केलीय. महिपतराव हे सरकारी कार्यालयात नोकरी करून रिटायर झालेले आहेत. त्याला बरीच वर्ष उलटलेली आहेत. काही शेती त्यांनी आधीच घेऊन ठेवलेली आहे.
ही शेती त्यांच्या दिवंगत पत्नीच्या नावे आहे. त्या दिवंगत पत्नीला दोन मुली आहेत. ज्या त्या शेतीच्या वारसदार म्हणून त्यांची नावं आहेत. त्या दोन मुली सुलोचना, निलिमा यांची लग्न महिपतराव आणि जानकी यांनी मोठ्या थाटामाटात लावली आहेत. जानकीही या दोघींची सावत्र आई असली तरी ती आजिबात सावत्रपणाची वागणूक देताना दिसत नाही.
या मुलींना चांगलं घर मिळावं, कष्टाचं जगणं त्यांच्या वाट्याला येवू नये म्हणून धडपडणारी आई आहे. मुलं चांगली शिकलेली बघून, त्यांना नोकरीसाठी मदत, घर बांधण्यासाठी मदत, अडल्यानडल्या प्रत्येक ठिकाणी मदत केलेली आहे. त्यात महिपतरावांना कधीच जानकीबाईंनी अडवलेलं नाही.
जानकी आणि महिपतरावांना दोन मुलं आणि एक मुलगी आहे. जी सुलोचना आणि निलिमाचे सावत्र बहिण भाऊ आहेत. सुधाकर, उमेश आणि नेहा पण या सगळ्यांचं चांगलं एक नातं आहे जे कधीच सावत्र वाटत नाही. पण एक वेळ अशी येते की, महिपतरावांना वाटतं आपल्या मुलींचे संसार चांगले स्थिर झालेले आहेत. त्यांचं आयुष्य सुखासमाधानाने भरलेलं आहे. पण आपली जी मुलं आहेत, यांना नोकऱ्या नाहीत.
सुधाकर मुंबईला एका कंपनीत नोकरी करतो पण त्या नोकरीचा भरोसा नाही. आपलं जे शेत आहे ते या पोरांच्या नावाने करून टाकू ज्यामुळे त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न मिटलं हे मार्गी लागतील आणि आपल्याला आपण सर्वांसाठी काहीतरी केल्याचं समाधान मिळेलं.
हेही वाचा: प्रेमासाठी खावाच लागतो एखादा धक्का
नवीन कायद्यानुसार आईवडलांच्या संपत्तीत मुलींनाही बरोबरीचा वाटा द्यायला हवा असा नियम आहे. आपल्या मुलींना आपण या मुलांच्या आधीच सर्व काही दिलेलं आहे. आता शेतात त्यांना वाटा द्यायची गरज नाही. आपण त्यांच्याकडून हक्कसोड लिहून घ्यायला पाहिजे म्हणून वडील मुलींच्या घरी चकरा मारत असतात. सह्या देण्यासाठी मात्र दोघीही चालढकल करत असतात. महिपतराव मुलींच्या घरी चकरा मारून परेशान होतात.
आपल्याला मुली सह्या का देत नाहीत हे कळल्यावर जीवाची लाहीलाही झालेले महिपतराव वकीलाचा सल्ला घेतात. वकील म्हणतात, तुम्हच्या सेवा पुस्तिकेला पत्नी म्हणून कोणाचं नाव आहे. त्यांना ते आठवत नाही, त्यामुळे ते पंचायत समिती - जिल्हापरिषद चकरा मारत राहतात. अर्जावर अर्ज देऊनही सेवा पुस्तिका पाहू दिली जात नाही. इकडं मुलींशी तडजोडी चालूच राहतात. मुली रोज नवी काहीतरी मागणी करत राहतात.
शेवटी मुली म्हणतील ते सगळं द्यायला महिपतराव तयार होतात. कारण काहीच उपाय नसतो. मोहोद्रींच वावर आणि वरून चार लाख रूपये द्यायला तयार होतात. ही मोहोद्रींची जमीन पिढीजात आली असल्यानं आणि विभागणी केलेली नसल्यानं त्या शेतावरच्या हक्कसोडासाठी महिपतरावांची बहिण प्रयागबाईची सही लागणार असते. प्रयागबाईचा मुलगा शंकर तिला तशी सही करू देत नाही.
सहीसाठी पैसे मागणारी बहीण, संपत्तीत नुसता वाटा मागुन न थांबता सतत बापाला छळणाऱ्या मुली माणूसपणाची, नात्याची सर्व रेषा पार करून भोगवादी संस्कृतीचं प्रतिनिधीत्व करतात. मुलींना वाटा देण्याचा कायदा जरी असला तरी आपल्या सद्सद्विवेकबुद्धीला जागृत ठेवून निर्णय घेता आला पाहिजे. आपल्या वागण्याचे परिणाम नात्याच्या वितुष्टापेक्षा काळजावरचे न बुजणारे घाव असतात.
ज्या पालकांनी मुलगा-मुलगी समानमानुन मुलीला आधीच सगळं दिलेलं आहे. अशा मुलींनी राहिलेल्या संपत्तीतून वाटा न मागता बेकारी अनुभवणाऱ्या भावाच्या पाठीशी उभं राहून नात्याच्या परिघाचा विस्तार करावा वाटणाऱ्या बापाला कायद्याचा बडगा दाखवून म्हातारपणी छळलं जाणं हे मानवी संवेदनेला काळिमा फासणारं आहे.
पैसे-शेत नावावर केल्यावरही तलाठ्याच्या मदतीने त्रास देत राहणाऱ्या मुली जशा ठळक येतात. तशाच आपापल्या नवऱ्याच्या मागे ठामपणे उभा राहणाऱ्या स्त्रियाही इथं दिसतात. महिपतरावांच्या मागे जानकी, सुधाकरच्या मागे उजा या खंबीरपणे उभ्या राहिल्या असल्या तरी त्यांना टोचणाऱ्या वेदना आणि त्यांचा मुका झालेला संसार 'हक्कसोड' या एकाच विषयाभोवती फिरत राहतो.
हेही वाचा: आमच्या प्रेमाचा एक तर सैराट होतो नाहीतर काकण!
वडलांना वाटतं राहतं आपण जीवंत आहोत तो पर्यंत आपल्या लेकरांना न्याय मिळावा. पण तसं होत नाही बाप तलाठ्याला भेटतो. बोलतो पण तलाठी आपल्या हातात काहीच नसल्याचं स्पष्ट सांगतो. तेव्हा आपल्यालाच मुलींनी आपल्याला फसवल्याचा घाव महिपतरावांच्या जिव्हारी लागतो. तीव्र वेदनेची कळ छातीत उठते. सगळा भूतकाळ डोळ्यासमोरून सरकत जातो.
पहिली बायको, या पोरींची आई आठवते. तिचं पत्र आठवत. त्या पत्रातले तिचे शब्द 'पोरी घरी कधी येणार म्हणून इचारून इचारून पोरी मला रडकुंडीला आणतात. तुम्हाला ठाऊक हाय, पोरी तुमच्याबिगर राहत नाहीत. त्यायले येकापरिस माय नसली तं चालती, पन बाप पायजे आस्तो' मायेच्या सर्व कांगोऱ्यांना पुसत जातात.
हे अर्थहीन प्रेम-शब्द महिपतरावांना कोरडेपणाच्या अंधाऱ्या जगात घेऊन जातात. छातीत तीव्र कळ अन् ते जगाचा-जगण्याचा, आपल्याच लेकीबाळीकडून फसवल्याच्या दाहक अनुभवातून झालेली तडफड-फडफडीसह शांत होतात.
या कादंबरीतली लेखकाची भाषा ही संवादी असल्यामुळे कादंबरीतून येणारे संवाद थेट मनाला भिडणारे आणि दुःख जाणिवेच्या तीव्र संवेदना स्पर्श करणारे आहेत. या कादंबरीत वायफळ लांबी किंवा संवाद नसल्यामुळे कुठलेही आडेवेडे न घेता हृदयाला स्पर्श करणारे आणि जगण्याच्या तीव्रतम असह्यतेला वाचा फोडणारे असे आहेत.
मधेमधे जोडून आलेलं कथानक पाहिलं तर भावाला फसवणाऱ्या भावाविषयीही लेखक लिहितो. नुसत्या 'स्री' या नात्यातून फसल्याजाण्याच्या एकाच गोष्टीवर लेखक बोलत नाही तर अनेक वेगवेगळ्या नात्यातून फसल्या जाण्याच्या जाणिवेनं या कादंबरीचा पट विस्तृत होत जातो आणि मानवी पातळीवरून बदलत चाललेला नात्याच्या गुंतागुंतीचा पीळ उकलत जाण्यास सुसह्य ठरतो.
सोनारी हे शेत त्यातली पीकं, पिंकलर, रस्त्याच्या-रानाच्या आसपासची पाखरं या सगळ्या नोंदी घेत लेखक नात्यांच्या सर्व बाजूसह नातं टिकवण्यासाठी हिशोबाबरोबर दुसऱ्याच्या मेहनतीची जाणीव ही करून द्यायला पाहिजे.
नात्यातलं सहवेदन संपून व्यवहारीपणाच्या बोहल्यावर चढलेल्या माणसांच्या भोगवादी जगण्याचं, त्यातून निर्माण झालेल्या आणि तुटत चालेल्या भावभावनांचं सावत्रपण ठसठसत्या खवंदासारखं मानवी मनाचे अंतरंग कुरतडत राहणारं या शाश्वत सत्याच्या दारापर्यंत घेऊन जाताना कादंबरी नात्यातल्या कोरडेपणाची जाणीव करून देत राहते.
कादंबरी - हक्कसोड
लेखक - मिलिंद जाधव
प्रकाशन - लोकवाङ्मय गृह
पानं - ९२ किंमत - १०० /-
हेही वाचा:
आजची पिढी कमिटमेंट देते, पण अडकून पडत नाही